Loksabha2019 : राज ठाकरे यांची दिशा 

Raj Thackeray
Raj Thackeray

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध एवढी एकच भूमिका घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे निघाले आहेत. घणाघाती वक्तृत्व. थेट पुराव्यांसह हल्ला. डिजीटल इंडियामध्ये निवडलेल्या गावाची सद्यस्थिती. मुद्रा योजनेतील कर्जासाठी विशिष्ट व्यक्तीला मिळणारी रक्कम. याची मांडणी करताना मोदींच्याच 'डिजीटल इंडिया' संकल्पनेतील 'ऑडिओ-व्हिडीओची' जोड. श्रोत्यांवर त्याचा निश्‍चितच होणारा परीणाम. यांसह पहिल्या सभेत त्यांनी पुराव्यांसह सादरीकरण करीत राजकीय वातावरण तापविले. राज्यभरातील सभांमध्ये शेतीवरील संकट, दुष्काळ, जलयुक्त शिवार याशिवाय केंद्रांकडून मिळणारा कमी आर्थिक वाटा, पंतप्रधानांच्या विविध योजना अशा मुद्‌द्‌यांवर ठाकरे प्रहार करणार आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला त्याचा फायदा निश्‍चितच होईल. 

मोदी यांना गेल्या निवडणुकीत स्वतःहून पाठिंबा देणारे, तर या निवडणुकीत मोदी यांचे कडवे विरोधक असा बदल राज ठाकरे यांच्यात का झाला, त्यामागे भूमिका काय असावी, हा विश्‍लेषणाचा खरा मुद्दा आहे. गेल्या दोन सभांमध्ये ठाकरे यांनी या मुद्‌द्‌यांना स्पर्श केला, त्यांची बाजू मांडली. मनसेच्या काही प्रदेश पदाधिकाऱ्यांसमवेत या बाबत संवाद साधला, असता ही भूमिका आणखी विस्ताराने समजून घेता आली. 

'राज्याचा विकास खुंटेल' 
गुजरातेत मोदी यांनी केलेल्या कामांचे ठाकरे यांनी पूर्वी कौतूक केले होते. मात्र, मोदी पंतप्रधान झाले, तरी त्यांचे गुजरात प्रेम कमी झाले नाही. मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप पूर्वी झाला होता. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच जास्त फायदा होण्याची शक्‍यता, महाराष्ट्रात कमी होणारी गुंतवणूक, वित्त आयोगाकडून मिळणारा कमी वाटा आदी घटनांमुळे महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचे मत ठाकरे यांचे बनत गेले. सामाजिक वातावरण गढूळ बनू लागले आहे. राजकीय वातावरणही निकोप राहिले नाही. मोदी आणखी पाच वर्षे सत्तेवर आल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती त्या स्थितीत पुढे जाणार नाही, राज्याचा विकास खुंटेल, प्रगती थांबेल, या मतांपर्यंत ठाकरे पोहोचले. मनसेच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ही मते उलगडत गेली. त्यामुळे केंद्रातील सत्तेतून मोदी - शहा गेलेच पाहिजेत, अशी ठाम भूमिका ठाकरे यांनी घेतली. त्याचा प्रारंभ त्यांनी मुंबईत गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत केला. 

राज्यभरात दौरा 
ठाकरे यांनी मुंबईच्या सभेत केलेल्या जबरदस्त हल्ल्याने भाजप घायाळ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपच्या दमदार नेत्यालाही हा हल्ला परतवून लावता आला नाही. राज्यात सर्वदूर होणाऱ्या सभांतून हे हल्ले वाढत जाणार आहेत. मोदी लाटेत गेल्या निवडणुकीत युतीकडे वळालेले, मत निश्‍चित ठरविण्याबाबत सध्या कुंपणावर असलेले मतदार युतीच्या विरोधात वळण्यास सुरवात झाली, तर युतीच्या जागा घटतील. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर, पुढील टप्प्यांत मराठवाडा, उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्र, शेवटी कोकण व मुंबईत मतदान होणार आहे. मोदी यांच्या चार सभा राज्यात झाल्या. पवार कुटुंबीयांवरील टीका वगळता या सभांतून फारसे तरंग राजकीय वातावरणात उठले नाहीत. ठाकरे यांच्या सभा आता नांदेड, सातारा, सोलापूर, इचलकरंजी येथे होणार असून, खडकवासला, चिंचवड किंवा पनवेल आणि मुंबईत दोन ठिकाणी सभा घेण्याचे नियोजन आहे. आघाडीने या भागात आधीच आव्हान उभे केल्याने तेथे या सभांचा परिणाम निश्‍चित जाणवेल. ग्रामीण भागांत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर ते बोलले, तर जनमानसावर त्याचा प्रभाव पडेल. 

मनसेची दहा वर्षांतील वाटचाल 
मनसेची वाटचाल प्रारंभी आक्रमक झाली. तेरा आमदार, लोकसभेत चांगली मते, अनेक महापालिकांमध्ये नगरसेवक, नाशिक महापालिकेत सत्ता अशी स्थिती 2009 ते 2012 मध्ये होती. काँग्रेस विरोधी वातावरण, आक्रमक शैलीची तरुणांची संघटना याचा फायदा मनसेला झाला. मात्र, संघटनात्मक बांधणीत ठाकरे कमी पडले. मोदी यांचे नेतृत्व देशपातळीवर आले, अन्‌ काँग्रेस विरोधी वातावरणाचा लाभ उठवित विकासाचा नारा देत ते केंद्रात सत्तेवर आले. 2014 मध्ये ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा देताना सहा मतदारसंघात निवडणूक लढविली. मात्र, तोपर्यंत ध्रुवीकरण झाले होते. काँग्रेस आघाडी विरुद्ध युती या लढाईत मनसेला स्थान मिळाले नाही. त्यावेळी मनसे युतीत सहभागी होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, विधानसभेला चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले. आघाडी विरोधाचा फायदा, तसेच मोदी लाट यांचा वापर करीत भाजप सर्वांत मोठा पक्ष बनला. पुढे दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेनाही त्यांना मिळाली. लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचा धुव्वा उडाला. मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला, तोही आता पक्ष सोडून गेला. महापालिका निवडणुकांमध्ये चार नगरसेवकांचा प्रभाग ही कल्पना भाजपने अमलात आणली, आणि त्यात भाजपने सर्वांधिक, तर त्या पाठोपाठ शिवसेनेने अनेक महापालिकांत यश मिळविले. मनसेचे नगरसेवकही बोटावर मोजण्याएवढेच आले. भाजपने गेल्या चार वर्षांत शिवसेनेलाच सत्तेत फारसा वाटा दिला नाही, त्यामुळे मनसेने दिलेल्या पाठिंब्याचा विचारही त्यांनी केला नाही. मनसे हळूहळू आकसत गेली. गेल्या चार वर्षांत युतीतील वाद, देशातील राजकीय वातावरण याचा फायदा घेत मनसे पुन्हा आक्रमक भूमिका निभावण्याच्या तयारीला लागली आहे. 

विधानसभा हे लक्ष्य 
भाजपला केंद्रात पूर्ण बहुमत मिळणार नाही. एनडीए सत्तेवर आली, तर मित्रपक्षांचे म्हणणे भाजपला ऐकावे लागेल. त्यामुळे राज्यात युती एकत्र लढण्याची शक्‍यता आहे. मोदी लाटेत भाजपचे 122 आमदार, तर शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले. काँग्रेसचे 42, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले. युती व आघाडीच्या लढतीमध्ये गेल्या वेळच्या चौरंगी लढती आता दुरंगी होतील. लोकसभा निवडणुकीचे पडसाद त्यावर पडतील. युतीच्या आमदारांची संख्या घटण्याची शक्‍यता आहे. आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचण्यास अंतर्गत वाद अडचणीचे ठरतील. या परिस्थितीत निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसे करील. कोणाला बहुमत न मिळाल्यास आणि मनसेला काही जागा मिळाल्यास, त्यांना राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठाकरे यांची वाटचाल सुरू झाली आहे. 

गेल्या दहा-बारा वर्षांत वेगवेगळ्या निवडणुकीत मनसेचा थोडाफार प्रभाव सुमारे पन्नास-साठ मतदारसंघांत पडलेला आहे. तेथेच त्यांनी लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसने विरोध केला. मात्र, ठाकरे यांच्यासारखा प्रभावी वक्ता त्यांना आता प्रचारासाठी हवा आहे. केंद्रातील सत्ता निश्‍चित झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचा फड रंगू लागेल. लोकसभा निवडणुकीतच अनेकांनी विधानसभेचे मतदारसंघ बांधण्यास सुरवात केली आहे. लोकसभेला पाठिंबा म्हणजे विधानसभेला पाठिंबा आहे, असे नाही, विधानसभेचे त्यावेळी ठरविण्यात येईल, असे ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात स्पष्ट केले. मनसेची विधानसभेची तयारी जूनमध्येच सुरू होईल. संघटनात्मक बांधणी भक्कम केल्यास आणि चांगले स्थानिक उमेदवार रिंगणात उतरविल्यास, मनसेला यश मिळेलही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com