पवारांच्या मास्टर स्ट्रोकने राष्ट्रवादीला मिळाला बूस्ट 

ज्ञानेश्‍वर बिजले 
रविवार, 29 सप्टेंबर 2019

अजित पवारांचे नाट्य 
मूळात, तीन आठवड्यावर निवडणूक आली असताना, त्या आमदार पदाला काय महत्त्व राहिले होते. पण, मग अजित पवारांची नेमकी खेळी काय यांवरील तर्कवितर्काच्या बातम्यांनी वृत्तवाहिन्यांवर धुमाकूळ घातला. शरद पवार यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद घेत गृहकलहाच्या कथित बातम्यांचे खंडन केले. शनिवारी दुपारपर्यंत या चर्चा रंगतच राहिल्या. अजित पवार यांनी शनिवारी (ता. 28) दुपारी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते त्यांच्यासोबत होते. 

राज्य सहकारी बॅंकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमकतेने पलटवार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळविण्यातच झाला. "मेगाभरती'च्या इव्हेंटच्या आधारे विजयाच्या लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्या भाजपला, गेल्या दोन दिवसांतील राष्ट्रवादीच्या "इव्हेंट'मुळे बॅकफूटला जावे लागले. घटस्थापनेपासूनच निवडणुकीच्या खऱ्या लढाईला सुरवात होत असून, त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा चांगला "बूस्ट' मिळाला. 

खरे पाहता सत्ताधारी पक्षाने गेले महिनाभर त्यांच्या बाजूने वातावरण तयार केले होते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदार पक्ष सोडून जात असल्याचे सोहळे भाजपने मोठ्या इव्हेंटद्वारे सादर केले. त्यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटला गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाशिकच्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. त्यांच्यासह भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्‍मीरच्या मुद्द्यावरून प्रचाराची दिशा राष्ट्रवादाकडे वळविली. भाजपला एकहाती विजय मिळणार, हा प्रपोगंडा जोर धरू लागला होता, अन्‌ विरोधी पक्षांची कोंडी झाली होती. 

शरद पवारांची एकाकी लढत 
अशा प्रतिकूल वातावरणात राज्याच्या निवडणुकीचे मुद्दे राष्ट्रवादाकडून प्रादेशिक प्रश्‍नांकडे वळविण्यासाठी, विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सरसावले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष याकडे त्यांनी त्या भागांत थांबून लक्ष वेधले. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे पक्ष सोडून गेल्यानंतर, त्यांनी तेथे जाऊन काढलेल्या रॅलीला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मित्रपक्ष कॉंग्रेस सध्या फारसा सक्रीय नसतानाही, शरद पवार करीत असलेल्या एकहाती प्रचारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. 

पूर्वांध भाजपचा, उत्तरार्ध राष्ट्रवादीचा 
गेल्या दहा दिवसांतील घटनाक्रम पाहिला, तर पूर्वांध भाजपच्या बाजूने कललेला, तर उत्तरार्धात राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे दिसून येते. महाजनादेश यात्रेच्या सांगतेनिमित्त 19 सप्टेंबरला नाशिकला पंतप्रधान मोदी यांचे भाषण. 21 सप्टेंबरला निवडणुकांची घोषणा. 22 सप्टेंबरला हुस्टन येथे "हाऊडी मोदी' कार्यक्रमात पंतप्रधानांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार, त्याच दिवशी मुंबईत गृहमंत्री शहा यांचे 370 कलमावर व्याख्यान व "राज्यात पुन्हा देवेंद्र' अशी घोषणा. भाजप राज्यातील राजकीय वातावरण व्यापत असतानाच 24 सप्टेंबरला राज्य सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) "मनी लॉंडरींग' प्रतिबंधक कायद्याखाली मुंबईत संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. "पवारांसह 71 नेते ईडीच्या रडारवर' अशा स्वरुपाच्या मथळे लोकांचे लक्ष वेधून घेतले. खरे पाहता, सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने हे मोठे हत्यार ठरणार होते. 

माजी केंद्रीय अर्थ व गृहमंत्री पी. चिदंबरम, कर्नाटकचे कॉंग्रेसचे नेते शिवकुमार यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई सुरू आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची चौकशी झाल्यानंतर ते गप्पच बसले. अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ईडीच्या चौकशीतून कोंडी होऊ शकेल, असा अंदाज होता. 

पवारांची खेळी पलटवली 
मात्र, ही खेळी एकहाती पलटवली, ती शरद पवार यांनी. "ईडी'समोर चौकशीला स्वतःहून 27 सप्टेंबरला हजर राहण्याचे त्यांनी त्याच दिवशी 24 सप्टेंबरला पुण्यात जाहीर केले. "छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकू देणार नाही,' असा त्यांचा खणखणीत इशारा. राज्यात ठिकठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांची आंदोलने. शरद पवार 27 सप्टेंबरला "ईडी'समोर जाण्याची तयारी असताना, 'ईडी'ने घेतलेली माघार. पोलिस आयुक्तांची पवारांना विनंती. आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेत ईडी कार्यालयाकडे जाण्याचे पवारांनी टाळले. ते गेले थेट पुण्यातील पुरग्रस्त भागाच्या पाहणीला.  ज्यांच्यावर कारवाई झाली, ते पवारच खेळी पलटविण्यात यशस्वी ठरले. लोकांची सहानुभूती त्यांना मिळाली. सत्ताधारी भाजपला माघार घ्यावी लागली. चारही दिवस प्रसिद्धीचा झोत पूर्णपणे राहिला तो पवार यांच्यावरच. त्यानंतर काल रात्रीपासून रंगले ते अजित पवार यांच्या आमदार पदाच्या राजीनाम्याचे नाट्य. 

अजित पवारांचे नाट्य 
मूळात, तीन आठवड्यावर निवडणूक आली असताना, त्या आमदार पदाला काय महत्त्व राहिले होते. पण, मग अजित पवारांची नेमकी खेळी काय यांवरील तर्कवितर्काच्या बातम्यांनी वृत्तवाहिन्यांवर धुमाकूळ घातला. शरद पवार यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद घेत गृहकलहाच्या कथित बातम्यांचे खंडन केले. शनिवारी दुपारपर्यंत या चर्चा रंगतच राहिल्या. अजित पवार यांनी शनिवारी (ता. 28) दुपारी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते त्यांच्यासोबत होते. 

बारामतीत पूरपरिस्थितीत लोकांना मदत केल्यानंतर, अजित पवार थेट मुंबईत दाखल झाले व त्यांनी कोणाशीही न बोलता राजीनामा सादर केला. त्यानंतर, त्यांचा ठावठिकाणा कोणालाच नव्हता. त्यांनी आज पत्रकार परिषदेत अप्रत्यक्ष हल्ला केला तो ईडीने तक्रार दाखल करण्याच्या वेळेवर. संचालक मंडळात सर्वच पक्षाचे नेते असताना, केवळ मलाच टार्गेट केल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीला सामोरे जाताना, त्यांनी सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळविली. त्यांनी राजीनामा का दिला, यांसह असंख्य प्रश्‍न अनुत्तरीत राहिले, तसेच राज्य सहकारी बॅंक व सिंचन घोटाळा हे निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचे मुद्दे होऊ नयेत, याचीही काळजी त्यांनी घेतली. 

राष्ट्रवादीने 24 ते 28 सप्टेंबर यादरम्यान मतदारांची सहानुभूती त्यांच्या बाजूने वळविण्याचा जोरदार प्रयत्न केला. किमान त्यांच्या कार्यकर्त्यांत तरी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उद्यापासून अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत आघाडी, युती यांच्या घोषणा, त्यांच्यातील वाद. वेगवेगळ्या पक्षांतील बंडखोरी, नाराजी यांमुळेच राजकीय वातावरण रंगणार आहे. त्यामुळे, गेल्या महिन्यांभरात भाजपने निर्माण केलेल्या वातावरणावर पाणी टाकण्याचे काम गेल्या चार-पाच दिवसांत राष्ट्रवादीने केले, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्यामुळे लढण्याची एकाअर्थी उर्मी मिळाली, हेच खरे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale writes about Sharad Pawar and NCP