शिक्षणावर बोलू काही... पुस्तकांशी दोस्ती करूया!

books
books

जगप्रसिद्ध आणि सर्वेक्षणक्षेत्रात अग्रणी असलेल्या गॅलप या सर्वेक्षण संस्थेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात 2019 मध्ये अमेरिकेतील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला वेळ वाचनालयात व्यतीत केला असल्याचे म्हटले आहे. वाचनालय पहिली पसंती राहिली तर चित्रपट, संगीत आणि नाटक दुसरी पसंती राहिली. अमेरिकेसारख्या देशात मॅकडोनॉल्ड्‌सच्या तुलनेत वाचनालये जास्त का आहेत, याचे उत्तर यावरून मिळते. इंटरनेटच्या युगात जिथे बहुतांश लोक मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाला चिकटून आढळत असतानाच अमेरिकन नागरिकांनी पुस्तक वाचनास जास्त महत्त्व दिले. हे तथ्य आपल्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. आम्ही पाश्‍चिमात्य राष्ट्राचे अनुकरण करण्यात नेहमीच आघाडीवर असतो. मात्र, वाचनसंस्कृतीच्या बाबतीत आपल्याकडे दिसणारे चित्र निराशादायी आहे.
भाषेवर प्रभुत्व असेल, तर विद्यार्थ्यांची इतर विषयांत प्रगती चांगली असते. भाषा समृद्ध करायची असेल, तर वाचनाला पर्याय नाही. आज अभ्यासक्रमाची पुस्तके वगळता अवांतर वाचनाचा प्रकार दुर्मीळ होत चाललाय. जवळपास प्रत्येक शाळेत ग्रंथालय आहे; पण त्याचा वापर किती होतो, हा संशोधनाचा विषय ठरावा. एकीकडे आजची पिढी मोबाईलवर व्यस्त आहे, अशी ओरड आपण करताना त्यांच्या हातातला मोबाईल काढून आपण पुस्तक देतो का? हा खरा प्रश्‍न आहे. मुले अनुकरण करतात. आज जिथे पालकांच्या हाती पुस्तके नाहीत तिथे ती मुलांच्या हाती येतील, अशी भाबडी अपेक्षा आपण कशी करू शकतो?
शिक्षण विभागात मला आजवर कुठेच विभागाचे स्वतंत्र ग्रंथालय आढळले नाही. ते असावे, असा कुठलाही नियम नाही. पण, ते असू नये अशाही कुठल्या सूचना नाही. शाळा तपासताना जेव्हा आपण ग्रंथालय तपासतो तेव्हा आपल्या कार्यालयाचे तरी कुठे ग्रंथालय आहे, अशी कायम रुखरुख असायची. म्हणूनच तीन वर्षांपूर्वी आपल्या कार्यालयात मी "बुक बॅंक'ची संकल्पना मांडली. जेणेकरून कार्यालयीन कर्मचारी आणि येणाऱ्या शिक्षकांना त्याचा लाभ व्हावा.
काही वर्षांपूर्वी नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके शाळांना वितरित करण्यात आली होती. त्यांचा दर्जा आणि आकार पाहता ती शिक्षकांसाठी होती. मात्र, त्यातील पुस्तकांचे वाचन करणारे शिक्षकही मर्यादितच होते. मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजवायची असेल, तर आधी पालकांना वाचनासाठी पुस्तक हाती घ्यावे लागेल. त्याशिवाय तुमचे मूल पुस्तक हाती घेणार नाही. तुमच्या हातात जर पुस्तकाऐवजी मोबाईल असेल, तर तुमचे मूलसुद्धा तुमच्याकडे मोबाईलसाठी हट्ट धरणार, यात तिळमात्र शंका नाही. तुमच्या फावल्या वेळेत सुट्टीच्या दिवशी मुलांना सोबत घेऊन बसा. एखादं छानसं मुलाच्या वयोगटानुसार पुस्तक निवडा आणि वाचनाचा आनंद द्या. आज घडीला पुस्तकांची कमतरता नाही. खूप छान पुस्तके उपलब्ध आहेत. कमतरता आहे ती ही पुस्तके आवडीने वाचणाऱ्यांची.
शाळेतही विद्यार्थ्यांना जर वाचनाची गोडी लावायची असेल, तर केवळ आठवड्यातून एकदा त्यांच्या नावावर पुस्तक देऊन ग्रंथालयाच्या नोंद रजिस्टरची पाने भरून हे होणार नाही. शिक्षकालाही आधी पुस्तकांवर त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. त्यांना काय आवडलं, किती आत्मसात झालं. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने कसे व्यक्‍त होतात, या साऱ्याच गोष्टींचा सांगोपांगी विचार करावा लागेल. यातून निश्‍चितच त्यांची भाषा समृद्ध होऊन इतर विषयांतही त्यांची प्रगती होण्यासाठी या वाचनाची मदत होईल. विद्यार्थ्यांवर अप्रत्यक्षपणे चांगले संस्कार नक्कीच रुजतील. प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकामागे किती पुस्तके असावीत, याकडे प्रशासनाने लक्ष घालताना त्या पुस्तकांचा दर्जा आणि शाळेतील ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांना होणारा लाभ यावरही लक्ष केंद्रित करावे लागेल.
खरेतर वाचनाचं व्यसन कधीही चांगलं. आजही वाचनालयात गेल्यावर जुने सवंगडी पाहिले की, त्यांची वाचनाची भूक आणि वाचनाच्या व्यसनाचं कौतुक करावसं वाटतं. तुमचं घर कितीही लहान किंवा मोठं असलं तरी खरी शोभा छोटेखानी ग्रंथालयानेच येणार. जितक्‍या भक्तिभावाने आपण घरामध्ये देवघर असावं, यासाठी प्रयत्न करतो तेवढ्याच श्रद्धेने छोटंसं का असेना, स्वतःचे बुकशेल्फ, किंवा ग्रंथालय नक्कीच असू द्या.
वर्धा जिल्ह्यातील काही शिक्षकमित्र पुस्तकदोस्ती अभियान चालवतात. सचिन सावरकर आणि त्यांचे सहकारी मित्र विवेक बोंदोडे, संजय भगत, शैलेश जाधव, प्रवीण नारायणे, बाबाराव महाजन, गणेश चंदनखेडे या अवलीया लोकांनी वर्धा जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांत पुस्तकदोस्तीचे शिबिरं घेऊन आठ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला. पदरचे पैसे खर्च करून तसेच लोकसहभागातून दोन हजारांपेक्षा जास्त पुस्तके गोळा केली. त्यांचा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यास नक्कीच लाभदायी ठरतो आहे. त्यामुळे अभिरुचीसंपन्न समाज घडविण्यासाठी आणि वाचनसंस्कार रुजवण्यासाठी इतकेच करूया. चला... पुस्तकाशी दोस्ती करूया.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com