प्रेग्नन्सीमध्ये शरिरात होणारे 'हे' दहा बदल, माहित आहेत का?

preganat-woman.jpg
preganat-woman.jpg

प्रेग्नन्सी हा एक अद्‍भुत अनुभव असतो. एका नव्या जिवाला या जगात आणण्यासाठी तुमच्यात कितीतरी बदल घडतात. या सृजनतेपेक्षा दुसरे काही सुंदर असेल, तर ते क्वचितच असावे. स्त्रीशिवाय ही उत्तम कलाकृती केवळ अशक्य आहे...अशी शक्ती मिळाल्यावर त्यासोबत जबाबदारीही येते. जबाबदारीसाठी जागरूक आणि सक्षम होणे हे महत्त्वाचे आहे.

प्रेग्नंट असताना एक स्त्री असंख्य बदलांमधून जाते. यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा देखील समावेश असतो. तुम्ही आई होताना त्याचबरोबर तुमचे शरीरही बदलत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाबतीत घडणाऱ्या बदलांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. 

१) स्तनाग्रांभोवती पुटकुळे येणे (मॉन्टगोमेरी ट्यूबरकल्स) - 
हा बदल पहिल्या तीन किंवा दुसऱ्या तीन महिन्यांत पहिल्यांदा दिसून येतो. मॉन्टगोमेरी या ग्रंथी स्तनांपाशी असतात आणि त्या स्तनपानाच्या वेळी दूध येण्यासाठी मदत करतात. या ग्रंथीमुळे स्तनांवर छोट्या पुटकुळ्या येतात. याचे मुख्य कारण तुमची स्तनाग्रे स्वच्छ राहावीत, त्यावरील ओलावा टिकून राहावा व स्तनपानावेळी त्यांवर कोणतेही संक्रमण होऊ नये, हे असते. स्तनपानाचा कालावधी संपल्यावर ही पुटकुळे आपोआप निघून जातात. या पुटकुळ्या नाजूक असतात. त्यांना फोडण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न करू नये, यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

२) शिरा सुजणे - 
तुम्हाला तुमच्या शरीरातील काही शिरा सुजलेल्या दिसतील. या नसा सुजून त्वचेवर दिसायला लागतात. हे विशेष करून तुमच्या पायांवर दिसू लागते, याचे कारण अचानक वाढलेले वजन, हे असते. या नसांचा रंग निळा-जांभळा असतो, परंतु यात घाबरण्यासारखे किंवा दुखण्यासारखे काही नसते. शक्यतो, तुम्ही आराम करा आणि पायांवर जास्त वजन पडणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे परिस्थिती अजून बिघडणार नाही. 

३) शारीरिक संबंधामध्ये बदल - 
गरोदरपणामुळे तुमच्या कामवासनेत बदल घडतो. तुमची प्रणय इच्छा कमी होऊ शकते. शरीरातील संप्रेरकांच्या बदलांमुळे असे होते. हा संप्रेरकीय बदल तुमच्यापैकी काहींसाठी तुमच्या विवाह जीवनाचा सर्वांत कामुक काळ देखील ठरू शकतो. हे बदल व्यक्तिगत असतात. 

४) लघवीचे प्रमाण वाढणे - 
तुमच्या शरीरात झालेली रक्तवाढ आणि रक्ताभिसरण तुम्ही गरोदर राहिल्यावर तुमच्या किडनीवर दाब आणतात आणि यामुळेच तुम्हाला सारखेसारखे लघवीला जावे लागते. याचे अजून एक कारण म्हणजे गर्भाशयाचा आकार वाढत असल्यामुळे देखील किडनीवर दाब येतो व वारंवार लघवी लागते. असे असले तरीही तीन महिन्यांनंतर हे कमी होते. पण काही जणींना संपूर्ण गरोदरपणाच्या काळात हा त्रास होऊ शकतो. त्या वेळी डॉक्टरी सल्ला घ्यावा. 

५) त्वचा काळवंडणे - 
‘मिलानोसिस्ट’ एक प्रकारची पेशी आहे जी शरीरात ‘मिल्यंनीन’ तयार होण्यासाठी कारणीभूत असते. गरोदरपणात प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाच्या वाढीमुळे या पेशीच्या कार्याची गती वाढते. उन्हात गेल्यामुळे या पेशींचे कार्य अजूनच जास्त गतीने घडते ज्यामुळे त्वचा लवकर काळी पडते. प्रसूती झाल्यावर तुमचा जुना आणि मूळ रंग परत येतो. प्रसूतीनंतर चेहऱ्यावर उजाळा देखील दिसू लागतो. 

६) स्तनांमधील बदल - 
स्तनाग्रांवरील पुटकुळ्यांप्रमाणेच तो भाग काळा पडल्याचेही जाणवेल. याच बदलांचा भाग म्हणून तुमचे स्तन नंतरच्या काळात गोल आणि आकाराने चमकदार, मोठे होतील. 

७)केसांमधील बदल - 
सामान्यपणे स्त्रियांचे दररोज सरासरी ७०-१०० केस गळतात, पण प्रेग्नन्सीमध्ये शरीरातील एस्ट्रोजन या संप्रेरकाची पातळी वाढते. या वाढलेल्या पातळीमुळे तुमचे केस गळणे जवळपास नाहीसे होऊन जाते. हेच तुमच्या अचानक दाट आणि चमकदार झालेल्या केसांचे रहस्य आहे. असे केस गरोदरपणाच्या संपूर्ण काळात राहतात ज्याने तुमच्या सौंदर्य देखील वाढते. 

८) जेवणातील आवडीनिवडीमध्ये विलक्षण बदल - 
प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यांत एक प्रकारची खारट आणि धातूसारखी चव जिभेवर सारखी जाणवते. हे गरोदरपणाचे एक सामान्य लक्षण आहे. कदाचित यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते, खास करून जेवताना. पण काळजीचे काही कारण नसते, कारण हे काही आठवड्यांसाठीच असते. नंतर हे निघून जाते. 

९) बद्धकोष्ठ - 
प्रेग्नन्सीमध्ये बद्धकोष्ठ ही एक अशी गोष्ट आहे, ज्यापासून तुम्ही दूर पळू शकत नाही. याची करणे संप्रेरकीय बदलांपासून ते आहारविषयक सवयींपर्यंत आहेत. एस्ट्रोजनची वाढलेली पातळी आणि तुमच्या बाळासाठी तुम्ही घेत असलेल्या लोहाच्या गोळ्यांमुळे हा बदल घडतो. सोबतच तुम्हाला होणाऱ्या कोरड्या उलट्यांमुळे तुमच्या आहारात जे बदल होतात, त्यामुळे देखील बद्धकोष्ठ उद्‍भवतो. काही दिवसांतच हा त्रास नाहीसा होईल. तंतुमय (फाइबरयुक्त) पदार्थांचा अन्नात समावेश केल्यास हा प्रश्‍न सुटू शकतो. 

१०) पोटावरील स्ट्रेच मार्क्स - 
या बदलास ‘लिनिया निग्रा’ असे म्हटले जाते. हे पोटाची त्वचा ताणली गेल्यामुळे येणारे व्रण असतात. या बारीक पांढऱ्या रेषा असतात, ज्या पोटाच्या वरच्या भागापासून ते ओटीपोटापर्यंत येतात. त्या हळूहळू काळ्या पडत जातात. स्तनाग्रांचे काळे पडणे, पोटावर व्रण येणे या सर्वांमागे शारीरिक बदल कारणीभूत असतात. पण याच्या मुळाशी संप्रेरकांचे बदल दिसतात. हे सुद्धा प्रसूतीनंतर नाहीसे होईल. 
या सर्व बदलांसाठी संयम आणि थोडासा धीर बाळगायला हवा. हे सर्व बदल केवळ प्रसूतीपर्यंतच टिकणार आहेत आणि तुम्ही सफलतेने यांना सामोरे जाऊ शकता. तुम्हाला तुमच्या सहनशीलतेची आणि तुमच्यातल्या शक्तीची कल्पना यानंतर जाणवत राहते. तीच सहनशक्ती पुढील प्रवासाची वाट पाहत राहते. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com