
एके उत्तर रात्री ३ वाजून २३ मिनिटांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियात जाहीर करून टाकलं, की ते कॅनडा देश अमेरिकेत सामील करून घेणार आहेत. एका मध्यरात्री त्यांनी निर्णय घेतला, की अमेरिकेच्या संरक्षण आणि आर्थिक हितासाठी ते ग्रीनलँड देश ताब्यात घेतील. पनामा कालवाही ट्रम्प यांना ताब्यात घ्यायचाय. खरोखरच पनामा कालवा ताब्यात आला तर अमेरिकेची प्रगती होणार आहे काय? ट्रम्प यांचा अश्वमेधाचा घोडा तयार आहे. घोडा जिथं जिथं जाईल तिथली जमीन ट्रम्प राजाच्या मालकीची होईल. त्यांचा अश्वमेधाचा घोडा दिल्ली वा मुंबईत पोचला तर काय होईल?
८२ किमी लांबीचा पनामा कालवा पनामा या देशाच्या मालकीचा आहे. या कालव्यामुळे दक्षिण अमेरिकेला वळसा घालावा लागत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे, की कॅनडा, चीन, मेक्सिको, भारत इत्यादी देश त्यांचा माल अमेरिकेत विकून अमेरिकेला लुबाडत आहेत. तसंच पनामा कालव्यातून जाणाऱ्या अमेरिकन बोटींकडून अव्वाच्या सव्वा वाहतूक शुल्क घेऊन पनामा अमेरिकेचं आर्थिक शोषण करीत आहे. पनामाने शुल्क कमी करावं, न कमी केल्यास पनामाचा कालवा (म्हणजे देशच) अमेरिका लष्करी बळ वापरून ताब्यात घेईल.