बोरबेटचा धाकलू !

कधीतरी नेमका गडबडीत असताना मोबाईल वाजतो... त्याच गडबडीत तो उचलला जातो... नंबर कुणाचा आहे हे न बघताच कानाला लावला जातो आणि पलीकडून ओळखीचा आर्द्र आवाज कानात शिरतो.
Dhakalu
DhakaluSakal
Summary

कधीतरी नेमका गडबडीत असताना मोबाईल वाजतो... त्याच गडबडीत तो उचलला जातो... नंबर कुणाचा आहे हे न बघताच कानाला लावला जातो आणि पलीकडून ओळखीचा आर्द्र आवाज कानात शिरतो.

कधीतरी नेमका गडबडीत असताना मोबाईल वाजतो... त्याच गडबडीत तो उचलला जातो... नंबर कुणाचा आहे हे न बघताच कानाला लावला जातो आणि पलीकडून ओळखीचा आर्द्र आवाज कानात शिरतो. मोबाईल उचलला हे बरं वाटतं, कारण पलीकडचा आवाज बोरबेटच्या धाकलू बोडेकरचा असतो. एक-दोन आठवड्यांतून असा फोन येतोच... फोनवर ‘‘ सायेब... कसं हायसा? सगळं ठीक हाय न्हवं? इकडं कवा येतायसा?’’ एवढी वाक्‍यं ठरलेली. या वाक्‍यांमधल्या अर्थापलीकडचा ओलावा मला या माणसाशी घट्ट बांधून ठेवतो.

कोल्हापूर जिल्ह्यातला कोकणाला लागून असलेला गगनबावडा तालुका. सह्याद्रीच्या माथ्यावरच्या अफाट पावसाचा प्रदेश. जंगल आणि त्यातल्या वाड्या-वस्त्यांचा प्रदेश. गगनगडाच्या पायथ्यापासून पूर्व-पश्‍चिम आणि उत्तर-दक्षिण असे अफाट जंगल. याच जंगलातल्या एका वाडीवजा गावातला हा धाकलू.

कोल्हापुरातून गगनबावड्याला निघालं, की गगनबावड्याच्या अलीकडे ‘सांगशी फाटा’ लागतो. त्या रस्त्याने घनदाट झाडीच्या, चढाच्या, मोकळ्या पठाराच्या वाटेने काही किलोमीटर गेलं, की उजव्या हाताला ‘बोरबेट’ हे घनदाट अरण्याच्या तोंडावरचं गाव. मोरजाई नावाच्या सड्याच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाच्या हद्दीला दाजीपूरचं अभयारण्य बेमालूम येऊन टेकतं. या अरण्य आणि पठाराच्या सहवासामुळे वन्यजिवांचा मुक्त संचार या परिसरात असतो. गेल्या पाच-दहा वर्षांत हत्तीही अगदी हक्काने मुक्काम करतो. जणू त्यानं आपला मार्ग आखून घेतलाय.

म्हणूनच भल्या पहाटे धाकलूचा फोन वाजतो, ‘सायेब मानबेटातनं हत्ती वर सरकलाय. पदमसतीच्या वरच्या अंगानं मोरजाईच्या पायथ्यानं त्यो सांगशीत कवा जाईल हो? भातकापणी हाय. रानात जायलाच पाहिजे!’ जणू त्या हत्तींची आणि माझी जुनी मैत्री असल्यासारखी हा या अरण्यपुत्रांचा प्रश्‍न. त्यांचा दृढविश्‍वास. आमच्या सायेबास्नी अशी जंगली श्‍वापदं कोणत्या वेळी कोणत्या मार्गाने ये-जा करतात हे पक्कं ठाऊक. गेल्या चाळीस वर्षांच्या भटकंतीत मी फक्त हेच मिळवलं. जंगलाचा आणि जंगलातल्या माणसांचा विश्वास त्यातलाच हा बोरबेटचा धाकलू मामा.

बोरबेट ते दाजीपूर म्हणजे निसर्गाचा नितांत सुंदर आविष्कार, नितळ जंगलाचे रमणीय रूप. जणू सृष्टीला पडलेले निसर्गसुंदर स्वप्न! हे जंगल मला नेहमीच मोहवतं, बोलवतं. किती वेळा गेलो कुणास ठाऊक ! पण पुन्हा-पुन्हा जावेसे वाटते.

साऱ्या ऋतूत गेलो, वेळी-अवेळी गेलो, दिवसा गेलो, रात्री गेलो, कधी मुक्काम ‘मोरजाई पठार'', "कधी पद्‌मसती, कधी जुना टॉवर, कधी मुक्काम नाही. थेट बोरबेटने दाजीपूर. ही आनंदयात्रा गेली अनेक वर्षे सुरू आहे.

आता आठवतही नाही. तेव्हापासून गेली कित्येक वर्षे नोव्हेंबरच्या दुसऱ्या रविवारी बोरबेट ते दाजीपूर हमखास जातो. भल्या सकाळी बोरबेटहून निघायचं आणि कलत्या संध्याकाळी दाजीपुरात पोचायचं. बरोबर असतो आमचा जंगलमित्र ‘धाकलू बोडेकर.’

किमान वीस-बावीस वर्षे झाली. हा बोरबेटचा धाकलूमामा या जंगलाचा आमचा वाटाड्या आहे. त्याचं आणि आमचं मैत्र जीवाभावाचं बनून गेलं आहे. गेली कित्येक वर्षे तो आहे तसाच आहे. मध्यम उंची, काटक बांधणी, भरघोस पण टोकदार काळ्याभोर मिश्‍या, डोक्‍यावर टोपी, अर्धी चड्डी, लांब हाताचा ओपन शर्ट असा खास कोकणी ठेव. कोकणी हेलाचं जंगली बोलणं आणि जंगलातलं तुरू-तुरू चालणं! थोडा अधिकच गप्पिष्ट ! वय वर्षे पासष्ट; पण गडी अजूनही ठणठणीत. जंगलाची खडान्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌खडा माहिती. पण आपल्याच तंद्रीत जंगल चालणारा. कधी-कधी त्याला रोखावं लागतं. तसा मनाचा सच्चा. या जंगलात फिरताना तो बरोबर असायलाच हवा हा अलिखित नियम. आता त्याच्याकडे मोबाईल आहे. फोन केला की विचारतो, केव्हा येणार?

धाकलूमामाचं बोरबेटचं स्वच्छ सारवलेलं घर. मातीच्याच दोन पायऱ्या चढून आलं, की शेणमातीनं सारवलेलं अंगण. त्यातलं मातीनं लिंपलेलं तुळशी वृंदावन. अंगणात बसून प्यालेला धाकलूमामाच्या हातचा चहा. हा सारा आनंदसोहळा असतो. धाकलूमामासारखी अनेक जीव लावणारी माणसं रानवाटांवर, जंगलात, कुडाच्या घरात, सारवलेल्या अंगणात, वाड्या-वस्त्यांवरच्या देवळात भेटली. नात्यापेक्षाही जवळची झाली. साल्हेरपासून बांद्यापर्यंत, ताडोबापासून दांडेलीपर्यंत डोंगरदऱ्यात माझे हे गणगोत विखुरले आहेत. ते माझ्या भटकंतीचं संचित आहे.

भल्या पहाटे कोल्हापुरातून बोरबेटसाठी निघायचं. आपल्याबरोबर धाकलूचंही जेवण घ्यायचं. अजून अंधार आहे तोवर धाकलूच्या घरी थडकायचंय. तो वाटच पाहत असतो. त्याच्या अंगणात ऐसपैस बसायचं. धाकलू ताज्या दुधाचा फर्मास चहा करतो. त्या थंडीत चहाची गोडी वेगळीच लागते. चहा घेईपर्यंत थोडं उजाडायला लागतं. तोपर्यंत धाकलू तयार. मग आमची पलटण निघते ‘मोरजाईच्या पठारावर.'' मोरजाईच्या दर्शनाला या पठारासारखा अप्रतिम निसर्गसुंदर सडा महाराष्ट्रात फार थोड्या ठिकाणी अनुभवण्यास मिळतो. त्याच्या सर्व बाजूंनी सृष्टिसौंदर्य. गगनबावडा, दाजीपूरचा आसमंत भान हरपून टाकतो. पठारावरचं भन्नाट वारं, पावसाळ्यानंतर फुलणाऱ्या निळ्या - पिवळ्या सीतेची आसवं, पिवळी सोनळी अशा रानफुलांनी सजलेला, वाऱ्यावर डोलणारा सडा हे अप्रतिम दृश्‍य असतं. मोरजाईच्या प्राचीन गुंफा मंदिराकडे जाताना लागणाऱ्या मोकळ्या सड्यावरच्या प्राचीन दगडी चौकटी पठाराला वेगळंच सौंदर्य देतात. एका अखंड दगडात कोरलेलं ‘मोरजाई मंदिर'' म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. किमान पंधराशे वर्षांपूर्वीचं हे गुहामंदिर प्राचीन वास्तूकलेचा अमूल्य ठेवा आहे. अठरा हातांची मयूरवाहिनी देवी म्हणजे "मोरजाई''. अखंड पाषाणात कोरलेले सभामंडप, गर्भगृह तसेच मंदिर दीपमाळा, समाधी, अनेक सतीशिळा- अर्थात लढताना धारातीर्थी पडलेल्या स्त्रीयोद्‌ध्यांच्या स्मृतिशिळा ही सारी मंदिराची वैशिष्ट्ये. तीनही ऋतूत मोरजाई पठाराचं सौंदर्य विलोभनीय असतं. पावसाळ्यातलं दाट धुकं, उन्हाळा - हिवाळ्यातला सूर्यास्त तर अवर्णनीय.

मोरजाईचं सौंदर्य अनुभवून पठार उतरून निघायचं ‘पद्‌मसती''कडे. विरळ जंगलातून पद्‌मसतीपर्यंत तासा-दीड तासात पोचायचं. इथं एकमेव घर, पाटलांचं. तोच आधार. इथं पाणी मुबलक. मोकळ्या रानात बसून पोटभर नाश्‍ता करायचा. तुडुंब पाणी प्यायचं. मग शिरायचं डंगात म्हणजे घनदाट जंगलात. पद्‌मसतीच्या पाटलांनी आता वस्ती सोडलीय. ते ढासळू लागलेलं घर आणि गोठा बघून कससंच होतं.

इधून पुढची भर जंगलातली गच्च कारवीतली, अस्ताव्यस्त वेलींमधली, प्रकाशासाठी आकाशाकडे झेपावणाऱ्या झाडांच्या पायथ्यांमधली, दऱ्यांमधली, चढ-उताराची चार तासांची थरारक वाटचाल हा अरण्य अनुभूतीचा रोमांचकारी ठेवा असतो. पद्‌मसतीपासून जंगलवाटेने ‘पाट्याचा डंग.’ त्या घनदाट जंगलातलं "जळवाचं पाणी'' असे अस्पर्श जंगल टप्पे पार करत अचानक जंगलातून आपण बाहेर पडतो. तो समोर प्रचंड पठार, तलाव. त्याच्या शेजारीच नवीन बायसन टॉवर.'' घनगर्द जंगलयात्रेनंतरचा हा थोडा विश्रांतीचा टप्पा. स्वच्छ पाण्यानं ताजेतवाने होऊन पोटभर जेवण्याचा उद्योग इथं करायचा.

इथून पुढं खरंतर थेट दाजीपुरापर्यंत मातीची चांगली सडक आहे; पण त्या वाटेनं जाईल तो धाकलू कसला! सडक सोडायची आणि उजव्या हाताला थेट गर्द जंगलात शिरायचं. ‘हडकीच्या सड्याच्या'' वाटेला लागायचं. पुन्हा तोच अनुभव घनदाट जंगल, डोईएवढी कारवी, चिलटं, झाडांच्या मुळ्या यांतून सरळ एका कड्याच्या टोकावर जायचं आणि तेथून खड्या उतारानं सरळ खाली उतरायचं. खाली मोकळ्या रानात आल्यावर पाठीमागं वर पाहायचं आणि स्वतःशीच म्हणायचं, ‘‘अरे ! हा कडा उतरून आलो. मग फिरून आलेल्या मातीच्या पक्‍क्‍या सडकेला लागून दुसऱ्या गेटपाशी पोचायचं. मग सरळ डावीकडे पहिल्या गेटकडे न जाता उजवीकडे ‘ठक्‍याची वाडी'' या ‘कोकरे''च्या वस्तीकडं निघायचं ते शिवगडाला जाण्यासाठी.

‘शिवगड'' दाजीपूरच्या जंगलातला देखणा ‘गिरीदुर्ग’. कोकणातून फोंड्याकडून येणाऱ्या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला टेहळणीचा किल्ला. कोकरेच्या झापापासून पुढे निघायचं. अंजन, उंबर, जांभूळ यांच्या जंगलातून चालू लागायचं. उजवीकडे कारवीपलीकडं कडा आहे हे ध्यानात ठेवून. जंगल संपलं, की लागतं विस्तीर्ण पठार. त्याच्या उजव्या बाजूला कड्याशेजारी आहे ‘डगवाईचं ठाणं.'' त्याच्या थोडं अलीकडून कड्यात उतरणारी वाट आहे. या वाटेनं खाली उतरलं, की समोर दिसतो ‘शिवगड''. मग कडा डावीकडे ठेवून दाट रानातून जाणाऱ्या वाटेनं गडाच्या पायथ्याला जायचं. मग थोडी एकेरी चढण चढून ढासळलेल्या बुरूज आणि तटबंदीमधून शिवगडात प्रवेश करायचा. एक सतीशिळेचा चौथरा. कदाचित प्रासादाचा चौथरा, निशाण बुरूज एवढेच अवशेष शिवगडावर आहेत. पश्‍चिमेकडच्या बुरुजावरून तळकोकण, फोंडा घाटाचे विहंगम दृश्‍य दिसते. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उंबराजवळ दगड फोडून तयार केलेली नैसर्गिक पाणीसाठवण रचना हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य.

शिवगडाहून परतताना आता दुपार टळून संध्याकाळची लालसर प्रभा आकाशात दाटू लागलेली असते. दिवसभर भान हरपून भटकणारी पावले रेंगाळू लागतात. अजून पहिले गेट तसे दूरच. दमलेला काफिला त्या दिशेने निघालेला असतो. अंधार दाटू लागतो. इकडे धाकलूची घाई सुरू असते. त्याला फोंड्याला जाणारा गाडी गेटवर पकडायची असते. तिथनं परत वैभववाडी मार्गे बावड्याला पोचायचं असतं. फारच उशीर झाला तर कोकणात पोराकडं थांबायचं हे त्याचं गणित. त्या अंधारात गडबडीत धाकलू गाडीत चढतो. चढताना दहा वेळेला सांगतो जपून जावा. धाकलूची गाडी दिसेनाशी होते तरी कितीतरी वेळ त्याची पळापळ, बडबड डोळ्यांसमोरून हालत नाही. अशा अनेक धाकलूंमुळे जंगलं माझे मित्र बनली.

(सदराचे लेखक गड -दुर्ग यांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com