दिवस जीवधन गडावरचा!

पहिल्या टाक्याला प्रवेशद्वार, टाक्याजवळची गुहा आणि एक-दोन उद्ध्वस्त जोती एवढेच काय ते गडावरचे अवशेष. कातळात कोरलेल्या भक्कम पायऱ्या आणि कातळातच घडवलेले दरवाजे हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य.
Dr Amar Adake writes Hadsar Fort trekking day on Jivdhan fort Chhatrapati Shivaji Maharaj
Dr Amar Adake writes Hadsar Fort trekking day on Jivdhan fort Chhatrapati Shivaji Maharajsakal
Summary

पहिल्या टाक्याला प्रवेशद्वार, टाक्याजवळची गुहा आणि एक-दोन उद्ध्वस्त जोती एवढेच काय ते गडावरचे अवशेष. कातळात कोरलेल्या भक्कम पायऱ्या आणि कातळातच घडवलेले दरवाजे हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य.

तळपत्या उन्हात पुराणपुरुष ‘किल्ले हडसर’ उतरून जुन्नरला येईपर्यंत उन्हं कलू लागली होती. पण चावंड किल्ल्यावर जायचं असं ठरलं होतं. आपटाळेमार्गे गडपायथ्याच्या चावंडवाडीत आलो. तोपर्यंत सूर्य अस्ताकडे कलू लागला होता. त्याच्या सोनेरी प्रकाशात चावंडची पश्‍चिमेकडची प्रचंड कातळ भिंत न्हाऊन निघाली होती. मोठं देखणं दृश्‍य होतं. तसं चावंडवाडीतून चावंड माथ्यावर जायला अर्धा ते पाऊण तास पुरतो. गडमाथ्यावर बारमाही ओलं- वाळलं गवत माजलेलं, त्यात अनेक प्रकारची खुरटी झुडपं. माथ्यावर एक देखण्या शिल्पसौंदर्याचं भग्न मंदिर आहे. मंदिराशेजारी आणि थोड्या अंतरावर बांधीव पाण्याची विहीर आणि खोदीव पाण्याची टाकी आहेत. पहिल्या टाक्याला प्रवेशद्वार, टाक्याजवळची गुहा आणि एक-दोन उद्ध्वस्त जोती एवढेच काय ते गडावरचे अवशेष. कातळात कोरलेल्या भक्कम पायऱ्या आणि कातळातच घडवलेले दरवाजे हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य.

इंग्रजांनी या पायऱ्या सुरुंग लावून पाडल्या. मग गडावरचा राबताच संपला. कोण्या एका दुर्गवेड्या वनाधिकाऱ्याने पुन्हा कातळ फोडून अरुंद, जेमतेम पाऊल मावेल अशा पायऱ्या खोदून काढल्या, त्यावरूनच दुर्गात जाता येतं. वाटेत प्राचीन महाद्वारं लागतात. हल्ली या कातळकड्याला घासून जाणाऱ्या प्रवेशमार्गाला लोखंडी रेलिंगचा आधार दिला आहे. मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने आम्ही चावंडच्या माथ्यावर उभे होतो. विलोभनीय गुलाबी रंगाच्या उधळणीने सारं आकाश व्यापलं होतं.

त्या रंगछटेचे ‘माणिकडोह’ जलाशयातील प्रतिबिंब निव्वळ पाहात रहावं असं होतं. समोरचा जीवधन, हडसर हळूहळू अंधाराच्या मुशीत शिरत होते. आमच्या भोवतीही अंधार दाटू लागला. उन्हाळी वाऱ्याच्या सुखद लहरीत आम्ही किल्ला उतरू लागलो. उंच, अनगड पायऱ्या उतरून रेलिंगपर्यंत येईपर्यंत अंधार झाला. त्या अंधारातच कातळ पायऱ्या उतरून चावंड गावात आलो. आता उंच असा चावंड काळाकभिन्न झाला होता.

घाटघर गाडीमार्गाने ‘पूर’ गाव फाट्याने कुकडेश्‍वराच्या प्राचीन मंदिराजवळ पोचलो. ‘कुकडी’ नदीचा उगम याच मंदिराजवळ आहे. अतिशय निसर्गरम्य अशा या परिसरात पाण्याची दोन बांधीव कुंडं, प्रशस्त धर्मशाळा आहे. कुंडांमध्ये बारमाही पाणी असतं. दोन धारांनी वाहणारा प्रवाह मंदिरामागे एक होऊन ‘कुकडी नदी’ म्हणून पुढे वाहात जातो. मंदिराचं प्राचीन बांधकाम अनेक शिल्पाकृतींनी नटलेलं आहे. मंदिराचा हल्लीच जीर्णोद्धार सुरू आहे. हे हेमाडपंती मंदिर पुन्हा नव्याने निर्माण होत आहे. या मंदिराच्या शेजारी एक संन्यस्त पुरुष अनेक वर्षं राहतो आहे. मनोभावे परिसराची निगा राखतो, आल्या-गेल्या भटक्‍यांची सोय पाहतो. त्या रात्री त्यांनी आम्हाला अंगण झाडून दिलं, सतरंजी घालून दिली. अनेक निर्जन ठिकाणच्या मंदिरांत मला असे अवलिये भेटले आहेत. आम्ही डॉक्‍टर आहोत हे कळल्यावर अगदी अवघडून चार दिवस दुखणाऱ्या दाढेसाठी एक वेदनाशामक गोळी मागून घेतली. बस्स! एवढंच काय ते आम्ही त्याच्यासाठी केलं. कुकडेश्‍वराच्या परिसरातील ती शांत झोप कदापिही विसरता येणार नाही.

भल्या पहाटे उठलो. कुंडात स्नान केलं. कुकडेश्‍वराचं प्रसन्न दर्शन घेतलं. आपल्या आयुष्यातील समाधान आणि शांततेचे क्षण कुठे कुठे लिहिलेले असतात कुणास ठाऊक! सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारा जीवधन आता साद घालू लागला. फांगुलगव्हाणमार्गे घाटघर हा रस्ता थेट नाणेघाटाच्या तोंडाशी आणि ‘जीवधनाच्या’ पायथ्याशी येऊन जातो. जीवधन, नानाचा अंगठा, जीवधनाजवळचा ‘वानरलिंगी’ सुळका, नाणेघाट, घाटाच्या तोंडाच्या गुहा, रांजण हे सगळं महाराष्ट्रातल्या तमाम भटक्यांचं स्वप्नशिल्प जणू प्राचीन महाराष्ट्राचं वर्तमान अस्तित्व. नाणेघाट अनेक वेळेला चढून-उतरून झाला होता. तसा तो नेहमीच होतो. पण, जीवधनावर जाऊन बरीच वर्षं झाली होती, त्यामुळे आज जीवधनाचा दिवस होता. खरंतर घाटघर हा जीवधनाचा पायथा जरी असला तरी घाटघरपासून नाणेघाटापर्यंत लांबच्या लांब पठार आहे. या पठारावरून जीवधनाकडे जाताना आणखी एक चार घरांची छोटी वाडी आहे, तीही ओलांडून पुढे आल्यावर सरळ रस्ता नाणेघाटाच्या तोंडाशी जातो, तर डावीकडे उंच जीवधन आहे. अवाढव्य जीवधन वानरलिंगी सुळक्‍यामुळे फारच आकर्षक वाटतो. जीवधन हा नाणेघाटाचा संरक्षक गड, फार प्राचीन किल्ला. शहाजीराजांचा पराक्रम आणि मुत्सद्देगिरी यांचा साक्षीदार असणारा हा किल्ला. शेवटच्या निजामशहाचा अल्पवयीन वंशज ‘मूर्तझा’ याच किल्ल्यावर कैदेत होता. शहाजीराजांनी त्याला कैदेतून सोडवून ‘पेमगिरी’ किल्ल्यावर नेलं आणि त्याच्या नावाने निजामशाहीची द्वाही फिरविली आणि स्वतः निजामशाहीचे सर्वेसर्वा बनले. अल्पकाळची ही तत्कालीन स्वातंत्र्यक्रांतीच होती.

जीवधन, नाणेघाटाचा हा सारा परिसर मला नेहमीच मोहवितो. प्रत्येक ऋतूतलं त्याचं सौंदर्य वेगळं असतं. पावसाळ्यात नाणेघाटाच्या पश्‍चिम अंगाने येणारा सुसाट वाऱ्याचा पाऊस, हिवाळ्यातली पिवळ्या गवतावरून वाहात येणारी बोचरी थंडी, उन्हाळ्यात नानाच्या अंगठ्यावर झोपून गार वाऱ्यात निरखलेलं चांदण्याचं आकाश... अशा किती आठवणी या परिसराच्या आहेत. हल्ली नाणेघाटात खानावळी, रस्ता अशा साऱ्या सोयी झाल्या आहेत. पण, एक काळ संध्याकाळ झाली की उत्तुंग कडे, प्रचंड पठारं आणि खोल दऱ्या यांचीच सोबत असायची. तरीही या निर्जन जागी एका झोपडीत एक माणूस रहायचा ‘तुकाराम’ त्याचं नाव. त्या विस्तीर्ण पठारावर त्याची एकच झोपडी. झोपडीतच त्याच्या गायी, कुत्री. त्याची झोपडी हा आमचा आधार. दिवसभर गायी पठारावर चरायच्या, रात्री झोपडीत बंद वाघाच्या भीतीने, तरीही कधी कधी झोपडीवर वाघ यायचाच. कुत्र्यांनी भुंकून भुंकून पठार डोक्‍यावर घेतलं की समजायचं वाघ फिरतोय. वाघाच्या अशा अनेक गोष्टी तो सांगायचा. त्याच्या गायीचं तूप तो विकायचा. तेवढाच हातभार. गरज असो नसो, त्याचं तूप घ्यायचो. बऱ्याच वेळेला त्याच्या झोपडीतच आमचा मुक्काम असायचा. पहिल्यांदा जीवधन त्यानेच मला दाखवला. आजही त्यालाच शोधत होतो; पण त्या गर्दीत तो सापडतच नव्हता.

शोधाशोध करता करता त्याचा मुलगा भेटला. त्याला ओळख सांगितली. तो वनखात्यात होता. वडिलांची चौकशी केल्यावर म्हणाला, ‘‘हल्ली वारा, पाऊस सोसवत नाही म्हणून गावातल्या घरात ठेवलंय. बाबा इथून हलायलाच तयार नव्हता.’’ विनवणी केल्यावर तो आपल्या मुलाला पाठवायला तयार झाला. आजोबांच्यानंतर आता नातू किल्ला दाखवत होता. दहा-बारा वर्षांचं पोरगं. रविवार शाळेला सुटी असल्यामुळे इकडं आलं होतं. जीवधनावर जाताना नेहमी वाटाड्या बरोबर असावा. पायथ्याशी आणि उतारावर बरीच दाट झाडी आहे. झाडी संपल्यावर डोंगर उजव्या हाताला ठेवून वळसा घालून किल्ल्यावर वाट जाते. नेमकं आपण वानरलिंगी सुळक्‍याकडे जातो आणि फसतो.

वयाच्या मानाने पोरगं फारच हुशार निघालं. किल्ल्याची खडानखडा माहिती होती. त्याच्या दमदार पावलांमागे आम्ही खेचल्यासारखे जात होतो. जीवधन किल्ल्यावर जायचा मार्ग प्रशस्त, कोरीव पायऱ्यांचा, अंगच्या महाद्वाराचा आहे. खरंतर जीवधन एक अजोड दुर्गशिल्प आहे. गडावर जाणारी कातळ पायऱ्यांची प्राचीन वाट सन १८१८ नंतर ब्रिटिशांनी उद्‌ध्वस्त केली, महाद्वार जमीनदोस्त केलं, त्यामुळे आपण जीवधनावर जाताना एक-दोन ठिकाणी दगडांतल्या खोबण्यांच्या आधारे वर चढावं लागतं, त्यामुळे थोडी दुर्गमता आली आहे. या अवघड वाटेने वर आल्यावर महाद्वारातून किल्ल्यात प्रवेश होतो. महाद्वारावर मंगल कलश, चंद्र-सूर्य यांचं शिल्प कोरलेलं आहे. किल्ल्यावर जागोजाग पाण्याची टाकी आहेत. तट-बुरुजांचे अनेक उद्‌ध्वस्त अवशेष आहेत. एका टेकडीवर ‘जिवाई’ देवीची मूर्ती आहे. किल्ल्याच्या पश्‍चिमेकडील टेकडीजवळ एक उत्तम बांधकाम, हे या गडाचं वैशिष्ट्य आहे. डोंगर पोखरून दगडात केलेलं हे बांधकाम धान्य कोठार, प्राचीन लेणी असावीत. याच्या दारावर उत्तम गजलक्ष्मी शिल्प आहे. असा बहुअंगांनी, चहूबाजूंनी हा किल्ला तुकारामच्या नातवाने दाखविला.

दिवस चांगलाच वर आला होता. आम्ही घामाने निथळत होतो. तुकारामचा नातू काळासावळा, त्याच्या पायाकडे लक्ष सारखं जात होतं. तो आमच्याबरोबर अनवाणीच फिरत होता. त्याला दगड टोचत नव्हते, की तापलेली माती भाजत नव्हती. आमचे बुटातले पायही गरम होत होते. जीवधन उतरून खाली आलो. पोराच्या बापापाशी पोचलो. पोरगं सुसाट पळालं नाणेघाटाच्या दिशेने. त्याच्या बापाच्या हातात बिदागी सरकवली. तोही काही बोलला नाही. म्हटलं पोराला चांगलं पायातलं घे. तो हसला. आम्ही परतीला वळलो. मनात सारखं यायचं, अशी किती अनवाणी, कोवळी पावलं महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत भटकताहेत किल्ल्या-किल्ल्यांवर भेटताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com