पावनखिंडीच्या वाटेवरची माणसं...

जंगलाच्या कुशीत वसलेल्या वाटेवरच्या वाड्या-वस्त्या अपवाद वगळता आता रस्त्याने जोडल्या गेल्या आहेत, ज्यांना पूर्वी चार-पाच मैलभर जंगल उतरल्याशिवाय रस्ता दिसायचा नाही.
Pawankhind Agriculture
Pawankhind AgricultureSakal
Summary

जंगलाच्या कुशीत वसलेल्या वाटेवरच्या वाड्या-वस्त्या अपवाद वगळता आता रस्त्याने जोडल्या गेल्या आहेत, ज्यांना पूर्वी चार-पाच मैलभर जंगल उतरल्याशिवाय रस्ता दिसायचा नाही.

पन्हाळा आणि त्याच्या पश्‍चिमेची ‘मसाई’ पठारांची रांग बघितली, की मन खूप मागे जातं. जवळपास ४० वर्षं ! या मसाई पठारांच्या कुशीतून केलेल्या त्यावेळच्या पावनखिंड मोहिमा आठवतात. पावसात चिंब भिजलेल्या त्या वाटेवर हळव्या वाड्या-वस्त्या आठवतात. घरातल्या चुलीपाशी उबेला बसलेली पोरं आठवतात. कांबळ्यावर मुटकुळं करून झोपलेली, डोक्‍याला कुंच्या घातलेली शेंबडी पोरं आठवतात. आजकाल पन्हाळा - पावनखिंड मोहिमांचं स्वरूप बदलून गेलंय, त्यातली दुर्गमता थोडी कमी झालीय; पण एकेकाळी असं नव्हतं. ही मोहीम म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचा थरार होता.

जंगलाच्या कुशीत वसलेल्या वाटेवरच्या वाड्या-वस्त्या अपवाद वगळता आता रस्त्याने जोडल्या गेल्या आहेत, ज्यांना पूर्वी चार-पाच मैलभर जंगल उतरल्याशिवाय रस्ता दिसायचा नाही. खोतवाडीतून पिशवी, रिंगेवाडीतून शाहूवाडी, माळवाडीचा कच्चा रस्ता आणि एखाददुसरा आडमार्ग... बस्स, एवढाच काय तो वाहतुकीच्या भूगोलाशी या वाड्यांचा संपर्क. राजदिंडीपाशी पन्हाळा सोडला, की थेट पांढरेपाण्याशीच रस्ता आणि वाहनं दिसायची.

वाटेतल्या वाड्या-वस्त्यांना स्वतःची एक ठेवण होती, इथल्या माणसांची एक जीवनशैली होती. आता जोडलेल्या रस्त्यांनी त्यांचं वेगळेपण कुठं वाहून गेलंय कुणास ठाऊक? अगदी मसाई पठाराच्या पायथ्याच्या म्हाळुंग्यातली माणसं आणि पोरंसुद्धा आमच्याकडे नवलाईनं बघायची. तसं आम्ही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक असायचो. राजदिंडीतून बाहेर पडून तुरूळवाडी, म्हाळुंगे, मग मसाई पठार इथपर्यंत थोडाफार जगाचा संपर्क असायचा. पुढे मात्र जंगल, कडे, प्रेरणादायी इतिहास आणि आपणच.

अवघ्या मोहिमेत मार्गावरल्या वाड्यांचा खूप आधार असायचा. गच्च हिरवाईत लांबवर निथळलेली लालभडक छपरं दिसली, की बरं वाटायचं. वाडीतल्या कुत्र्यांना लांबून चाहूल लागायची. भातखाचरांच्या बांधावरून वाडीत शिरताना कुठून-कुठून पोरं टणाटणा उड्या मारत गोळा व्हायची. तशी ती आजही येतात. पोरं हात पसरून म्हणायची, ‘ओऽ गोळ्या द्या... ओऽ गोळ्या द्या...’ आम्ही कोल्हापुरातून चॉकलेट - गोळ्यांचे पुडे घेऊन यायचो, मुलांना वाटायचो. कधी-कधी चॉकलेट-गोळ्या अपुऱ्या पडायच्या, संपायच्या, मुलांना देऊ शकायचो नाही. त्यावेळचे त्यांचे केविलवाणे चेहरे आणि पसरलेले हात हताशपणे मिटणं पाहू शकायचो नाही. मिळालेली चॉकलेट बरीच मुलं लगेच खायची नाहीत. घरी कुठंतरी वळचणीला ठेवायचीत, पुन्हा कधी मिळतील सांगता येत नाही म्हणून. मग कधीतरी त्यांना आठवायचं; पण तोपर्यंत मुंग्यांनी आतलं चॉकलेट खाल्लेलं असायचं आणि वरचा कागद तसाच असायचा!

पावसाळ्यातल्या पाण्यावर पिकणारे भात हे इथलं उत्पन्न. वाड्यांच्या वरच्या अंगाला ही भातखाचरं. आखीव-रेखीव बांधाने बंदिस्त, भातलावणीच्या चिखलगुठ्ठ्याला रेडेच टिकायचे. हे रेडे इतके बुजरे, की बांधावरून आम्ही चाललो, की बुजून उधळायचे. त्यांचा मालक आम्ही पुढे जाईपर्यंत वेसण घट्ट धरून ठेवायचा. डोक्‍यावर इरली घेऊन पारंपरिक गीतांच्या तालावर चाललेली भातटोचणी बघत राहावी अशी असायची. इथल्या पावसाला, थंड हवेला, सततच्या धुक्‍याला नांगराचा लोखंडी फाळ टिकायचा नाही, तो भक्कम लाकडाचा असायचा. इतर वेळी अंगणात, कुडाला लागून तो व्यवस्थित ठेवलेला असायचा. कधी-कधी लाकडाचीच खोबण करून त्यात तेल घालून तो ठेवलेला असायचा.

अशातच एका मोहिमेमध्ये मांडलाईवाडीजवळ पोरं खेळत होती. त्यांचे खेळ ते काय ! दगड, माती, झाडं, अवजारं असे नैसर्गिकच. कसा कुणास ठाऊक, अचानक एका पोराच्या हातावर, बोटांवर लाकडी नांगराचा फाळ पडला. बोट चेचलं, फुटलं, रक्तबंबाळ झालं. पोराच्या ओरडण्याने बाप धावत आला. बोट बघितलं, गच्च दाबून धरलं. पोरगं वेदनेने ओरडत होतं. बापाने कसलासा पाला, काही पिवळसर फुलं कुठूनतरी आणली. सगळं गोमूत्रात चेचलं. ती चटणी नांगर पडलेल्या बोटावर लावली. घरातलंच एक फडकं घट्ट बांधलं. पोरगं तो हात वर धरून पुन्हा खेळायला लागलं. त्या उपचारांकडे आम्ही विस्मयाने पाहत होतो. एवढी मोठी जखम आमच्या पोराबाळांना झाली असती, तर आम्ही काय धावपळ केली असती.

कसले-कसले उपचार केले असते. या रानातल्या पोरांना त्याचं कसलं कौतुक! जखमेचं बोट वर धरून खेळणारं ते पोरगं डोळ्यांसमोरून हलेना. पंधराच दिवसांनी पुन्हा त्याच वाटेवरून पावनखिंडीकडे जाण्याचा योग आला. तेच पोरगं हुंदडत होतं! हाताला पट्टी-बिट्टी काही नव्हती. मी त्याच्याजवळ गेलो. होय, पोरगं तेच. त्याची बोटं पाहिली. भरलेल्या जखमांच्या खुणा बोटावर होत्या. जुळा भाऊ तर नाहीना ! खात्री करून घेतली. त्याच्या बापाला विचारलं, ‘‘एवढ्या लवकर पोरगं कसं बरं झालं?’’ रानातला तो बाप उद्‌गारला, ‘‘सायेब, ह्यो सर्कशीतला वाघ न्हवं, रानातला हाय. रानचा वारा पिऊन जंगलातल्या वाघागत घट्टमुट्ट असत्यात आमची पोरं.’’ माझ्या डोळ्यांसमोर पिझ्झा खाणारी, उठता-बसता गाडीवरून फिरणारी, एवढ्या-तेवढ्या कारणाने आजारी पडणारी आमची पोरं तरळू लागली.

या वाड्या-वस्त्यांवरची एक पिढी मी पावनखिंडीच्या वाटेवर पाहिली. लहान मुलं जशी गोळ्या मागायची तशी मोठी माणसं, म्हातारीकोतारीही गोळ्या मागायची. पण कसल्या? ती मागायची, ‘‘टकुऱ्याच्या गोळ्या द्या.’’ ‘टकुऱ्याच्या गोळ्या’ म्हणजे वेदनाशामक गोळ्या! अशी साधी गोळी आणायलाही त्यांना चार-पाच मैल जंगलवाट तुडवायला लागायची. पावनखिंडीच्या वाटेवर माणसांच्या जगण्याचं असं विस्मयकारक दर्शन व्हायचं.

या वाटेवर ‘म्हसवडे’ या वाडीपाशी एक म्हातारी मला नेहमी भेटायची. भेटायची कसली शिव्याच द्यायची. मी आल्याची चाहूल तिला कशी लागायची कोण जाणे! आम्ही भातखाचरांच्या बांधावरून वस्तीकडे यायला लागलो, की ती अवतरायची, आरडाओरडा करायची, शेलक्‍या शिव्या द्यायची. का? तर बांधावरून येताना बांध फुटतात, आमचे पाय भातखाचरांत पडतात, माणसं घसरून खाचरांत पडतात, खाचरांतल्या भाताच्या रोपांचं मातेरं होतं. एकापाठोपाठ एक येणाऱ्या माणसांमुळे भातखाचरांची नासधूस होते. तिचं म्हणणं असं, की एका माणसाचा वर्षाचा भात तुटतो ! तेव्हापासून ठरवलं, की पावनखिंड मोहिमेत चालताना भाताचं एक रोपही पायाखाली तुडवलं जाता कामा नये. तिचं हे शिव्या देणं अनेक वर्षं सुरू होतं. मलाही त्याची सवय झाली. तिच्याशी एक अनामिक नातं तयार झालं. ती भेटाविशी वाटू लागली. हळूहळू तिच्या शिव्याही कमी होऊ लागल्या.

एखाद्या वर्षी जायला थोडा उशीर झाला तर पोराबाळांना विचारू लागली, ‘अजून दाढीवाला आला न्हाई व्हयं...’’ मीही तिला भेटू लागलो. नमस्कार करू लागलो. रानात राबणारी ही म्हातारी माझ्या डोळ्यांसमोर थकत गेली, तिचं बाहेर पडणं बंद झालं, डोळे मंदावले. फिरताना पोराबाळांचा आधार लागू लागला. पण, माझी वाट बघत ती दारात बसू लागली. मलाही तिला भेटल्याशिवाय चैन पडेना. काही वर्षांपूर्वी तिचे डोळे गेले, तरीही नुसत्या चाहुलीवरून, आवाजावरून ती मला ओळखू लागली. पावनखिंडीच्या वाटेवर रानातल्या माणसांची अशी घट्ट नाती निर्माण झाली. जणू रानवाटेवर मला आईच मिळाली. प्रतिवर्षी तिला भेटतो; पण तिचा निरोप घेताना फार जड जातं. जणू आपलं माणूस आडरानात सोडून आल्याची हूरहूर लागते. नुसती माणसंच नाही, तर या वाटेवर मुक्‍या प्राण्यांनीही मला सोबत दिली. बरीच वर्षं झाली या गोष्टीला.

एका मोहिमेत मसाई मंदिराच्या पुढच्या बाजूला अचानक एक कुत्रं आलं, ते बरोबर येत राहिलं. पांढरंशुभ्र, बळकट, लालभडक डोळ्यांचं. वाड्या-वस्त्यांवरली कुत्री त्याच्या अंगावर यायची; पण ते इतकं आक्रमक की त्यांनाच पळवून लावायचं.

सारखं माझ्या बरोबर-बरोबर राहायचं. मी चाललो की दोन पावलं माझ्यापुढे असायचं, मी थांबलो की थांबायचं. वाटेवरून थोडा इकडं-तिकडं भरकटलो की भुंकून पुन्हा मूळ वाटेवर आणायचं. आंबेवाडीत रात्री मुक्कामाच्या वेळी माझ्या शेजारीच झोपलं. दोन दिवसांत काही म्हणून खाल्लेलं मला आठवत नाही. अगदी पावनखिंडीपर्यंत आलं. धारातीर्थाचं पूजन करेपर्यंत थांबलं. मग एकदम वेगाने खिंड चढून वर जाऊ लागलं. आम्ही थांबविण्याचा प्रयत्न केला; पण दोन दिवस माझ्याशी लगट करून असणारं ते कुत्रं आता आम्ही त्याच्या मागे जाताना, त्याला थांबविताना आमच्यावरच त्वेषाने भुंकू लागलं. आम्ही थांबलो आणि पाहिलं वरच्या झाडीत मिनिटाभरात ते लुप्त झालं. पुन्हा कुणालाच ते दिसलं नाही. ते धारातीर्थाच्या पूजनावेळी अस्वस्थ आणि हळवं झाल्याचं माझ्यासकट सर्वांनीच पाहिलं होतं. पावनखिंड चराचरांत अशी भरून राहिलेली मी अनुभवलीय.

शिवकालीन फरसबंद वाट दाखविणारा पांढरेपाण्याचा सुरेश रेडीज, वय विचारल्यावर दोन वर्षं सांगणारा खोंदल्याचा म्हातारा मला याच वाटेवर भेटला. दोन वर्षं म्हणजे शंभरावर दोन असं मला नंतर कळलं. आयुष्यातले अनेक जिवाभावाचे मित्र मला याच वाटेने दिले, शिवचरित्राचा रोमांचकारी इतिहास मला याच वाटेने शिकविला. चाळीस वर्षं झाली. प्रत्येक वर्षी जातोय; पण प्रत्येक वर्षी तोच रोमांच, तोच थरार अनुभवतोय. प्रतिवर्षी त्याच उत्साहाने जातो. भारावून टाकणारा इतिहास त्याच आवेशाने कथन करतो. सुरुवातीला माझ्याबरोबर असणारे आता मुलांचे बाप बनलेयत. ती मुलंही मोठी झालीयत. ती आता माझ्याबरोबर असतात. उद्या त्यांचीही मुलं येतील, त्यांच्याबरोबरही मी असेन. मी या मोहिमेला जातच राहणार आहे. जिवात जीव असेपर्यंत! इच्छा एवढीच, की शिवरायांच्या प्रेरणेने आयुष्याच्या अंतापर्यंत ही मोहीम घडावी.

(सदराचे लेखक दुर्ग- गडांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com