रसाळगडाचा तुकाराम!

चार दशकांहूनही अधिक काळ झाला सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि डोंगर शिखरांवर फिरतोय. डोगरकपाऱ्यांमधल्या त्या आडवाटाच माझी जीवनवाट केव्हा बनली हे कळलंच नाही.
rasalggad tukaram
rasalggad tukaramsakal
Summary

चार दशकांहूनही अधिक काळ झाला सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि डोंगर शिखरांवर फिरतोय. डोगरकपाऱ्यांमधल्या त्या आडवाटाच माझी जीवनवाट केव्हा बनली हे कळलंच नाही.

चार दशकांहूनही अधिक काळ झाला सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि डोंगर शिखरांवर फिरतोय. डोगरकपाऱ्यांमधल्या त्या आडवाटाच माझी जीवनवाट केव्हा बनली हे कळलंच नाही. या वाटांवरचे माझे सोबतीच सगे-सोयरे कधी बनले हेही कळलं नाही; पण त्यांच्या संगतीत फिरलो, फिरतच आहे.

खरंतर आता किल्ल्यांपर्यंत जाणाऱ्या वाटा बऱ्याच ठिकाणी पूर्ण बदलून गेल्या आहेत. दोन-तीन दशकांपूर्वी ज्या पाऊलवाटांवरून घनगर्द झाडीतून आसपास नजर ठेवत गडपायथ्यांपर्यंत जावं लागायचं. तिथं आता गाडी-रस्ते झालेत. दाट जंगलात, उंच डोंगरमाथ्यावर, विस्तीर्ण पठाराच्या बेचक्‍यात आपलं एकटेपण जपणाऱ्या वाड्या-वस्त्या आता पक्‍क्‍या सडकेने जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीत आता बाहेरच्या जगाचा शिरकाव होऊ लागलाय; पण या वाटांवरचे आणि वाड्यांमधले जुने दिवस अजूनही माझ्या मनात रुंजी घालताहेत. उष्ण, उन्हाने काहिली होणाऱ्या वातावरणातली, आल्हाददायक थंडीतली, गच्च धुक्‍यातली, कोसळणाऱ्या पावसातली या वाटांवरची पायपीट आणि वाड्यांवरची वस्ती अजूनही मनाच्या गाभाऱ्यात तशीच ताजीतवानी आहे.

बऱ्याच दिवसांनंतर रसाळ - सुमार - महिपत साद घालू लागला. होय! पाच-सहा वर्षं जाणं झालंच नव्हतं. गडावरचा संसार पाठीवर बांधला आणि रसाळगडाच्या द्वारी जाऊन पोचलो. पहिल्या दारात उभा राहिलो; पण मागे वळून पाहिल्याशिवाय राहवेना. मागच्या रसाळवाडीत माझी नजर कुणाला तरी शोधत होती. रसाळवाडीचा तुकाराम मनात दाटून आला होता. त्याच्याबरोबरची रसाळ - सुमार - महिपतगडाची दुर्गयात्रा आठवू लागली. मिटल्या डोळ्यांसमोर ती जशीच्या तशी उभी राहिली.

बरीच वर्षे झाली त्याला, खेडहून आमचे दुर्गमित्र नितीन दिवटेंचा निरोप आला. या वर्षी श्री शिवजयंतीला रसाळगडावर यायचं आमंत्रण स्वीकारलं. एका अटीवर- रसाळगडावर जरूर येईन; पण पुढे रसाळ - सुमार - महिपतगड मोहीम करणार. एक-दोन चांगले वाटाडे योजून ठेवा. इकडे या मोहिमेची हुरहुर सुरू झाली. रसाळ - सुमार - महिपत मोहीम करून खूप दिवस झाले होते. पुन्हा एकदा त्या दुर्गम मोहिमेचा रोमांच अनुभवता येणार होता.

भल्या पहाटे कोल्हापुरातून निघालो. कऱ्हाड - चिपळूण मार्गे खेडला पोचलो. संयोजक वाटच पाहत होते. नाश्‍ता करून रसाळगडासाठी प्रस्थान ठेवले. हल्ली रसाळगडाच्या घेऱ्यातून अगदी गडपायथ्यापर्यंत म्हणजे दक्षिणेच्या कड्यापर्यंत वाहन जाते. पेठ रसाळगड, झापवाडी, निमणी, घेरा रसाळगड या पश्‍चिमेकडच्या वाड्या-वस्त्या तर रसाळवाडी हा थेट पूर्वेकडचा गडपायथा म्हणजे रसाळगडाचा घेरा. उजव्या हाताला रसाळगड ठेवून पश्‍चिमेकडच्या उतारावरून गडाच्या पहिल्या दरवाजात पोचलो. अजून कार्यक्रमाला वेळ होता. थोडं गड दर्शन केलं. पहिल्या दरवाजाच्या डाव्या हाताचं पाण्याचं टाकं पाहिलं, स्थानिक लोक याला ‘स्वर्गाचं पाणी'' म्हणतात. दुसऱ्या दरवाजातून किल्ल्यात शिरलो. तटबंदी पूर्वेकडील माची, खांबटाकं, तोफा, धान्यकोठार असं गडदर्शन करून गडदेवता श्री झोलाईदेवीच्या मंदिरात पोचलो. या परिसरातच बालेकिल्ला आहे.

मुख्य शिवजयंती सोहळा साजरा झाला. दुर्गावरची शिवजयंती हा एक रोमांचकारी अनुभव असतो. सोहळ्याचा महाप्रसादही घेतला. आता आमचे सारे लक्ष पुढील मोहिमेकडे लागले. संयोजक त्यांच्या गडबडीत वारंवार आठवण करून देऊ लागले. कारण एव्हाना दुपारचे अडीच वाजून गेले होते. पुढे सुमार आणि महिपत ही सात-आठ तासांची भर जंगलातली चाल होती. संयोजकांनी योजलेल्या वाटाड्यांनी अशा भरउन्हात सुमारगडाकडे येण्यास साफ नकार दिला. आम्हाला वेड्यातच काढले. आम्ही अस्वस्थ झालो. आमची नाराजी दिवटे सरांना जाणवली. त्यांनी धावपळ करून एक माणूस उभा केला. ‘तुकाराम'' नाव त्याचे. राहणारा रसाळवाडीचा.

आयुष्यभराच्या कष्टानं, रानावनातल्या फिरण्यानं उन्हानं रापलेला तुकाराम पाहताक्षणीच मनात घर करून गेला. त्याच्या डोळ्यातलं कारुण्य आत कुठंतरी जाणवू लागलं. पाच-दहा मिनिटांत जवळचा झाला. तसा अबोल वाटला; पण जंगल आणि परिसराचा पक्का जाणकार. त्यानं एवढंच विचारलं, ‘पावणं रातीचं दरी-जंगलात चालणार नव्हं!’

सगळ्यांचा निरोप घेऊन त्याच्यापाठोपाठ आम्ही सुमारगडाकडे झपाझप चालू लागलो. त्याचा वेष डोक्‍याला पांढरी टोपी, गळ्यात रुमाल, पॅंट-शर्ट, काखेत पिशवी, हातात काठी आणि पायात साधे स्लीपर्स... त्याच्या पायांकडे बघून आमचे ट्रेकिंगचे बूट आम्हाला टोचू लागले. गड्याची चाल अशी झपाट्याची की त्याला गाठताना आमची धावपळ व्हायची. कारवीचं रान, वाळलेल्या गवताची डोंगरउताराची वाट गर्द जंगलातल्या चढाच्या पाऊलवाटा यामधून झपाट्यानं त्याच्यामागून आम्ही जात होतो. तणाव होता तो अतिशय दुर्गम असा सुमारगड सूर्यास्ताच्या आत चढायला हवा आणि परत महिपतगडाकडे जाणाऱ्या खिंडीत यायला हवं याचा. चारही बाजूंनी ताशीव कडे असणारा उंच सुमारगड सातत्यानं नजरेसमोर होता. आता उन्हं मावळतीकडे जायला लागली होती. सुमारगडाच्या कड्याच्या ऐन पायथ्याशी उभे होतो. डोंगर चढून कड्याला भिडून, कड्याच्या डावीकडून अरुंद, दिवसाही धोकादायक असणाऱ्या वाटेने, कड्याला वळसा घालून दरीच्या तोंडाशी कडा चढून सुमारगडावर जावे लागणार होते. कदाचित गडावरच अंधार होणार होता आणि त्या अंधारातच खोल दरीकडची कड्याची वाट उतरावी लागणार होती. कड्याला घासून अत्यंत अरुंद वाटेनेच अंधारात दरीच्या वरच्या अंगाने परत खिंडीत यावे लागणार होते.

गडी हिमतीचा निघाला. बिनदिक्कत कड्याला भिडला. त्याच्यामागे आम्ही त्या अवघड चढाईने सुमारगडावर पोचलो. एव्हाना सूर्य मावळला. गड उतरू लागलो. अंधार दाटू लागला. कातळकड्यावरच्या मुळ्यांच्या आधाराने तळात उतरणे हा एक थरार होता आणि तुकाराम ज्या सराईतपणे उतरत होता ते पाहून या कड्या-कपाऱ्यांवरच्या माणसांना सह्याद्री किती परिचित आहे हे समजले. सुमारगडावर दिवसाही जाणे हे भल्याभल्यांना आव्हान असते. तो सुमारगड निव्वळ तुकारामच्या धैर्याने मिळालेल्या आत्मविश्‍वासावर आम्ही अंधारात उतरून आलो. खिंडीत पोचल्यावर तुकारामचे चक्क पाय धरले. तो संकोचला. रात्रीचे आठ वाजले होते. महिपतगड पायथ्याच्या ‘वाडीबेलदार''पर्यंत पोचण्यासाठी अजूनही किऽऽर्र जंगलातून किमान तीन तासांची अवघड पायपीट होती; पण त्या घनदाट जंगल आणि दऱ्यांमध्ये तुकारामच आमचा तारणहार होता. आम्ही वाडीबेलदारच्या दिशेने चालू लागलो. रात्रीचं जंगल, पायतळीचा वाळलेला पाचोळा, रातकिडे आणि अन्य अनाकलनीय आवाज, आसमंतभरची शांतता, ती भेदणारा पायाखालचा पाचोळा तुडविताना होणारा आवाज आम्ही सारेच कातर होतो. स्थिर होता फक्त तुकाराम. त्या अशांत जंगलात तोच आमच्या जीवनमरणाचा सूत्रधार होता.

तणीव कमी व्हावा म्हणून त्यास बोलतं करण्याचा प्रयत्न केला. आता तो आमचा निव्वळ वाटाड्या नव्हता. त्याक्षणी तो आमचा सर्व शक्तिमान मित्र होता. तो बोलत होता. त्याची पत्नी खूप वर्षांपूर्वी वारली. एकुलत्या एक मुलीला यानं एकट्यानं वाढवलं. तिची आईही तोच अन्‌ बापही तोच. तुटपुंजी शेती, घरापुरते भात यायचे. चरितार्थासाठी दुसऱ्यांकडे राबून मुलीला मोठं केलं. तिचं लग्न केलं. नुकतंच तिचं बाळंतपण केलं. मुलगी परत सासरी गेली. हा घरी एकटाच असतो. राबून खातो. तिला बापाची काळजी. मुलीनं मोबाईल घेऊन दिला. तिचा तीन-चारदा फोन येऊन गेला. हा मोठ्यानं सांगायचा, ""बाळ, काळजी करू नकोस. उद्या दुपारपर्यंत येतो.'''' जीवनाचं हे विलक्षण अंग पाहत होतो.

आता कुत्र्यांच्या भुंकण्याचा एकसारखा आवाज दुरून येऊ लागला. म्हणजे वाडीबेलदार जवळ आली. एव्हाना रात्रीचे अकरा वाजून गेले होते. वाडीच्या पायथ्याच्या पाणवठ्यावर पोचलो. निश्‍चिंत झालो. जेवलो. मारुती मंदिरात पथारी पसरली. भल्या पहाटे काकड्याला जाग आली. आवरून महिपतगडावर पोचलो. विस्तीर्ण माथ्याचा, घनदाट जंगलाचा, महिपतगड पाहून वाडीबेलदार ओलांडून तीन तासांच्या कठीण पायपिटीनंतर कलत्या दुपारी "वाडी जैतापुरा''त पोचलो. वाहन घेऊन आलेल्या दिवटे सरांबरोबर परत खेडकडे निघालो.

आता वेळ होती तुकारामला निरोप देण्याची. अस्वस्थ वाटू लागलं. त्याला जवळच रसाळवाडी फाट्याला सोडायचं होतं. रसाळगडापासून तो पैशांविषयी काही बोललाच नव्हता. रसाळवाडी फाट्यावर तो उतरला. काहीतरी देणं आवश्‍यक होतं. किती द्यायचे? तो काहीच बोलला नाही. जे योग्य वाटलं ते दिलं. तो काहीच बोलला नाही. राहवलं नाही. आणखी थोडं दिलं. तरीही तो काहीच बोलला नाही. फक्त हात हातात घेऊन त्यानं नमस्कार केला. काही न बोलता वळला. पाठमोरा रसाळवाडीकडे चालू लागला. समोर रसाळ - सुमार - महिपतगडाची उत्तुंग डोंगररांग होती. भरउन्हात, अंधाऱ्या रात्री, भल्या पहाटे हे उत्तुंग डोंगर तुकाराममुळेच पार करू शकलो होतो. त्या उत्तुंग डोंगरांच्या पार्श्‍वभूमीवर पाठमोरा तुकाराम दिसत होता. तोही तेवढाच उंच वाटत होता. कितीतरी वेळ पाठमोरा तुकाराम पाहत होतो. त्या डोंगररांगेत दिसेनासा होईपर्यंत.

(सदराचे लेखक दुर्ग - गडांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com