महिमतगड आणि सिद्धेश

महिमतगड... बरेच दिवस हे नाव मनात घोळत होतं. मार्लेश्‍वर परिसरातून कुंडीमार्गे प्रचितगडाला जाताना उजव्या हाताचा गर्द हिरवा डोंगर म्हणजे ‘महिमतगड’ एवढीच त्याची ओळख.
Dr Amar Adke writes Siddhesh journey towards Mahimatgad
Dr Amar Adke writes Siddhesh journey towards Mahimatgadsakal

महिमतगड... बरेच दिवस हे नाव मनात घोळत होतं. मार्लेश्‍वर परिसरातून कुंडीमार्गे प्रचितगडाला जाताना उजव्या हाताचा गर्द हिरवा डोंगर म्हणजे ‘महिमतगड’ एवढीच त्याची ओळख. तेव्हापासून तो मनात रेंगाळत होता. त्यावर जायचा बेत इतर मोहिमांमुळे मागे पडत होता; पण एकदा ठरवलं की जायचंच. तशी योग्य वेळ साधली असं नाही; पण योग मात्र जुळून आला. सहकाऱ्यांना तयार केलं. सगळं जमेपर्यंत जूनचा शेवटचा आठवडा उजाडला. तशी ही अवेळच. कोल्हापुरात पावसाने अजून हुलकावणी दिली असली, तरी डोंगरदऱ्या आणि जंगलात तो सुरू झाला होता. धुकं आणि वाऱ्याचा खेळ सह्याद्रीत रंगू लागला होता, जमीन निसरडी झाली होती; पण जाऊयाच असं ठरलं.

एका रविवारी भल्या पहाटे निघालो. मलकापूरमार्गे आंबा घाटाच्या तोंडाशी आलो. तुरळक धुकं आणि पावसाच्या हलक्‍या सरी जाणवू लागल्या. आंबा घाट थोडा उतरून कळकदरा फाट्यापाशी आलो. येथून उजव्या हाताला वळून नवीन निसर्गरम्य वाटेने देवरूखला न जाता थेट मार्लेश्‍वरला जाता येतं. डोंगरदरीतल्या या वाटेने कोंकणी वाड्या ओलांडत मार्लेश्‍वर फाट्यापाशी आलो. इथून अवघ्या दोन किलोमीटरवर उजव्या हाताला मार्लेश्‍वर आणि डाव्या हाताला ‘कुंडी’कडे जाणारा रस्ता. आम्ही कुंडीच्या रस्त्याला लागलो. या रस्त्याच्या थेट टोकाला असणारं कुंडी गाव म्हणजे महिमतगडाचा पायथा एवढंच डोक्‍यात, त्यामुळे वाटेतल्या वाड्या-वस्त्यांवर कुंडीचीच चौकशी करत जाऊ लागलो. अखेर एक-दोन गावांनंतर कुंडी येणार हे कळलं. आमच्यातलं कुणीच महिमतगडावर यापूर्वी गेलं नव्हतं, त्यामुळे एका बऱ्यापैकी मोठ्या वाडीत एका किराणा दुकानात महिमतगडाची चौकशी केली. वाडीचं नाव ‘निरगुडवाडी.’ तिथं कळलं महिमतगडावर जाण्यासाठी कुंडीपर्यंत जाण्याची गरज नाही, ‘बेलारी’मधून जाणं सोयीचं. बुद्रुक आणि खुर्द अशी बेलारीची दोन गावठाणं.

दुकानदाराबरोबरची महिमतगडाची आमची चर्चा लक्षपूर्वक ऐकत बाहेर एक चुणचुणीत मुलगा उभा होता. तो जवळ आला. दुकानदार एकदम म्हणाले, ‘‘हे बघा! हे पोरगं बेलारीचंच आहे, तिकडंच चाललंय. तिथपर्यंत रस्ता दाखवेल तुम्हाला.’’ त्या पोराची म्हणजे ‘सिद्धेश गुरव’ची ही आमची पहिली ओळख.

तो उत्साहाने आमच्याबरोबर यायला तयार झाला. महिमतगडावर येतो म्हणाला. गडाची खडान्‌खडा माहिती होती त्याला. तिथल्या देवीचं गुरवपण त्यांच्या घरात होतं. एव्हाना बेलारी आलं. गावकरी गाडीभोवती जमा झाले. महिमतगडाची चौकशी केली. सिद्धेशला म्हटलं, ‘‘येणार असलास तर घरी नीट सांगून ये.’’ पाच मिनिटांत येतो असं सांगून गडी टेकावरच्या घरात पळत गेला. गावकरीही म्हणाले, ‘‘घेऊन जा, सगळी माहिती आहे त्याला.’’ एवढ्यात सिद्धेश तयार होऊन आला. आठवणीने दोन नारळ त्याने घ्यायला लावले. गडाकडे जाणाऱ्या नवीन सडकेने निघालो. गडाची पायवाट सुरू झाली. मग चढ सुरू झाला. पाऊस भुरभुरू लागला. डोंगरदऱ्यातलं धुकं जागोजाग दिसू लागलं. निसर्गाची नयनमनोहर हिरवीगार रूपं समोर येऊ लागली. उजवीकडे ढगातून महिमतगड डोकावू लागला. त्याचा बुलंद बुरूज खुणावू लागला. त्याचा अवाढव्य विस्तार नजरेत येऊ लागला.

आजूबाजूच्या दऱ्यांतलं वारं घोंघावू लागलं. निसर्ग क्षणाक्षणाला बदलू लागला. त्या भान हरवून टाकणाऱ्या आसमंतात मनोमन खंत वाटू लागली - इतका निसर्गसुंदर गिरिदुर्ग आपण इतके दिवस का पाहिला नाही? हिरव्यागार डोंगरवाटांनी किल्ल्याच्या महाद्वाराजवळ आलो. उजव्या हाताचा बलदंड बुरूज कड्यावर छाती काढून उभा होता. त्याला वळसा घालून छोटेखानी महाद्वारात पोचलो. पडत्या पावसात महाद्वारातून प्रवेश केला आणि आश्‍चर्यचकित झालो. पाण्याची अनेक सुबक खांबटाकी, त्याला जोडून गुंफा असं प्राचीनत्वाची साक्ष देणारं स्थापत्य किल्ल्यावर होतं. बांधून काढलेल्या माच्या, कधी एकेरी - कधी नाळयुक्त तटबंदी, चोहोबाजूंनी तुटलेले कडे आणि निसर्गसौंदर्याचं अनमोल वरदान लाभलेला हा वैभवसंपन्न गिरिदुर्ग इतका दुर्लक्षित, उपेक्षित का, असा प्रश्‍न वारंवार मनाला सतावत होता.

सिद्धेश अपार उत्साहाने किल्ला दाखवत होता, त्याचा दंतकथात्मक इतिहास सांगत होता. त्यातून त्याची किल्ले आणि निसर्गाची ओढ जाणवत होती. दुर्गावरच्या चतुर्भुजा देवीचा सिद्धेश गुरव. त्याने मनोभावे देवीला अभिषेक घातला. नैवेद्य दाखवून आरतीला सुरुवात झाली. तेवढ्यात पावसाची तुफान सर आली. त्या चंद्रमौळी देवळातली पावसाच्या संगीतातली ती आरती आयुष्यभर विसरता येणार नाही. दुर्गावरचा खोल दरीच्या टोकावरचा ‘टकमक कडा’, सर्वोच्च अशी निशाण टेकडी, महादेव - हनुमंत मंदिरं असं दुर्गदर्शन. मग पोटोबा करून आम्ही परतीची वाट धरली. एव्हाना दिवस मावळतीकडं झुकला होता. पाऊलवाटेच्या उतारावर हणमंत नलवडेंचा फोन वाजला. घाईघाईत कुणाला तरी समजावत त्याने फोन माझ्याकडं दिला. मी फोन घेतला. गावचा पोलिसपाटील बोलत होता. मी अवाक होऊन सिद्धेशकडं पाहत राहिलो. त्याचे आई-वडील घाबऱ्याघुबऱ्याने तक्रार करत पोलिसपाटलाकडे गेले होते. ‘‘पोरगं मामासंगट जातो म्हणून सांगून घरातनं गेलंय; पण मामाबरोबर नाही. कोणतरी गडावर घेऊन गेलंय’’ पोलिसपाटील सांगत होता, ‘‘पोलिसात वर्दी द्या म्हणतात.’’ आम्हाला काहीच समजेना. खरंतर पोलिस पाटलाच्या घरावरूनच सिद्धेशसह आलो होतो. सिद्धेशलाही घरात जाऊन सांगून यायला सांगितलं होतं. आम्ही सिद्धेशलाच विचारलं, ‘‘हे काय चाललंय?’’ घाबऱ्या-घाबऱ्या तो म्हणाला, ‘‘साहेब तुमची काय चूक नाही. मीच घरात खोटं सांगून आलो. कारण मला किल्ल्यावर जायचं होतं. आम्हा पोरांना भीतीनं कोणी किल्ल्यावर पाठवत नाही. कारण अशीच कोणी मुंबईकडली माणसं किल्ल्यावर जायच्या निमित्तानं आली. किल्ला दाखवायला वर गेलेली पोरं एक-दोन वेळेला लवकर परत आलीच नाहीत.’’ एकदा काहीतरी अघटित घडल्याचं त्याच्या सांगण्यातून समजलं, त्यामुळे अख्ख्या गावाला काळजी वाटत असल्याचं जाणवलं. डोंगरभटक्‍यांची वाड्या-वस्त्यांवरली विश्‍वासार्हता कुणीतरी वाईट वर्तनाने संपविली होती हे मात्र नक्की. किल्ल्याच्या ओढीने सिद्धेशने केलेलं धाडस आम्हाला भलत्याच संकटात घेऊन गेलं होतं. आम्हाला त्याने सांगितलेल्या घटनांवरून त्याच्या आई-वडिलांच्या काळजीचा, वाड्या-वस्त्यांवरच्या निष्पाप जिवांच्या चिंतेचा उलगडा झाला. हणमंताने सिद्धेशलाच फोनवर घरच्यांशी बोलायला लावलं आणि आश्‍वस्त केलं.

आम्ही गावात पाऊल ठेवलं आणि तडक सिद्धेशच्या घरी गेलो. मनात भीती होतीच; पण पोराच्या काळजीने सैरभैर झालेली पाणावलेल्या डोळ्यांची आई आणि बावरलेला त्याचा बाप बघून आम्हाला कसंतरीच झालं. आम्ही हात जोडून त्यांची माफी मागितली. त्यांना गहिवरून आलं. क्षणात नूर पालटला. सिद्धेश आई-वडिलांच्या कुशीत शिरला. माणसांना माणसांची आणि आमचीही ओळख पटली. सिद्धेशचे आई-वडील जेवल्याशिवाय आम्हाला सोडेनात. विश्‍वास-अविश्‍वास यांत माणुसकीचं अंतर असतं याचं प्रत्यंतर आम्हाला येत होतं. आयुष्यात पहिल्यांदाच भेटलेली माणसं माणुसकीच्या नात्याने घट्ट जोडली गेली. आम्ही सिद्धेशला शाळेसाठी काही देऊ केलं. नम्रपणे नाकारत ते म्हणाले, ‘‘साहेब, तुमच्यासाठी गडावरच्या देवीला अभिषेक करतो.’’ श्रद्धा म्हणून अभिषेकाचे अकरा रुपये बळेबळेच त्यांना दिले. त्यांच्या घरातून बाहेर पडताना याच मोहिमेत बरोबर असलेला माझा मुलगा अद्वैत मला आठवू लागला. डोंगर, जंगलात थोडा जरी नजरेआड झाला तरी शंभर हाका मी मारायचो. तो दिसल्याशिवाय चैन पडायची नाही. प्रत्येक बाप मुलांच्या बाबतीत इतका हळवा असतो, हे मला रानवाटांवरच उमगलं ! या रानवाटांवरच माझं जीवन घडत गेलं. रानवाटा हेच माझं खरं जगणं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com