मंगळयात्रेची उत्कंठावर्धक कहाणी

विज्ञानाच्या वाटचालीवर आधारलेले भविष्यकाळाचे पडसाद वैज्ञानिक कादंबरी किंवा कथांमध्ये उमटलेले असतात. त्यामध्ये अनेक वैज्ञानिक संकल्पना सहजतेने डोकावतात.
Dhoomyan Book
Dhoomyan BookSakal

विज्ञानाच्या वाटचालीवर आधारलेले भविष्यकाळाचे पडसाद वैज्ञानिक कादंबरी किंवा कथांमध्ये उमटलेले असतात. त्यामध्ये अनेक वैज्ञानिक संकल्पना सहजतेने डोकावतात. साहाजिकच वाचकांच्या मनामध्ये ललित अंगाने सादर केलेलं वैज्ञानिक साहित्य औत्सुक्य निर्माण करते. मराठीतील वैज्ञानिक साहित्यात सातत्याने लेखन करणाऱ्यांमध्ये डॉ. पंडित विद्यासागर यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांची ‘धूमयान’ ही चौथी कादंबरी असून त्यामध्ये मंगळ ग्रहावर चार अंतराळवीरांनी केलेल्या भ्रमंतीचे पडसाद उमटले आहेत. या मोहिमेचा हेतू हा मंगळावर सजीवांच्या मंगळावरच्या दीर्घकाळ वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे, हा असतो.

मंगळग्रहावर आयर्न ऑक्साइडचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे तो लालसर दिसतो. तो सूर्यापासून सुमारे २४ कोटी कि. मी. आणि पृथ्वी पासून ३.९ कोटी कि.मी. दूर आहे. मंगळाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. मंगळावरचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणा पेक्षा सुमारे अडीच पटीने कमी आहे. पृथ्वीवर ज्याचे वजन १०० किलोग्रॅम भरते त्याचे मंगळावर वजन ३८ कि. ग्रॅ. भरेल! तसेच येथे कार्बन डायॉक्साईडचे प्राबल्य जास्त असून ऑक्सिजनचे प्रमाण अल्प आहे. नायट्रोजन आणि अरगॉन सुमारे १.९ टक्के आहे. मंगळावरचे वातावरण विरळ आहे. परिणामी वातावरणाचा दाब पृथ्वीवर आहे त्याच्या फक्त एक टक्का आहे. याचा अर्थ मंगळावरील परिस्थिती पृथ्वीशी तुलना केली तर विपरीत आहे. तरीही या लालग्रहावर हरितगृहामध्ये वनस्पतींची लागवड करता येणं शक्य आहे. मंगळाचे तापमान अतिशीत आहे. सजीवांसाठी काहीसे अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते. याची वैज्ञानिक शहानिशा करणे आवश्यक आहे. या मंगळ-मोहिमेवर भारताच्या चार अंतराळवीरांची निवड होते. या प्रकल्पाचे किंवा मोहिमेचे नेतृत्व शिस्तप्रिय व्यक्तीकडे असणं गरजेचं होतं. साहजिकच सैन्यदलाचा अनुभव असलेले लष्करी अधिकारी कमांडर सोनीं यांची निवड करण्यात येते. मंगळ मोहिमेमध्ये काटेकोरपणे निवड झालेले त्यांचे तीन सहकारी आहेत. ते म्हणजे वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्राचे अद्ययावत ज्ञान असलेल्या डॉ. मायरा, भूशास्त्रज्ञ डॉ. धनंजय आणि भौतिकशास्त्रज्ञ आणि संगणक तज्ज्ञ डॉ. संजय. हे चौघे मंगळावर पदार्पण करतात. त्यांच्या मुक्कामात एका मागोमाग अनेक नाट्यमय घटना घडतात.

वनस्पतीच्या संदर्भात संशोधन करण्यासाठी मंगळवीरांना तेथे हरितगृह उभारायचे आहे. मंगळावरच्या मातीत सेंद्रिय घटक नाहीत. पाण्याची कमतरता आहे. अशा परिस्थितीत वनस्पतींची लागवड करता येण्याची शक्यता कितपत आहे? मंगळावर धुळीची वादळे होतात. सूर्यप्रकाशाला अडथळा येतो. मग पिकांना प्रकाश संश्लेषणासाठी पुरेसा प्रकाश मिळणार का, अशा समस्या उपस्थित होतात. मंगळावर जैविक आणि अजैविक घटक परस्परांशी जोडलेले असतात. वनस्पती देखील गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत संवेदनशील असतात. वनस्पतींची मुळे जमिनीच्या आत म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढत असतात. मुळाच्या पेशींमध्ये गुरुत्वाकर्षणाला प्रतिसाद देणारे कण असतात. ते गुरुत्वाकर्षणा मुळे खालच्या बाजूला ओढले जातात. त्यांचा स्पर्श जेव्हा पेशींच्या आवरणाला होतो, त्या वेळी वाढ कोणत्या दिशेने व्हायला हवी हे मुळांना समजते.

मंगळावर अन्न-धान्य उगवण्यासाठी सर्व घटकांचे निरीक्षण करणं क्रमप्राप्तच होतं. यासाठी त्यांचे वैज्ञानिक प्रयोग सुरू होतात. डॉ. मायरा आणि धनंजयच्या अनेक शंकांचे उत्तरे देताना डॉ. संजय अनेक शक्यतांचा विचार मांडतात. वनस्पतींच्या वाढीसाठी कार्बन डायॉक्साईड, पाणी, प्रकाश या घटकांचा विचार करत असताना काही पर्यायांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ प्रकाशासाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा विचार केला जातो. त्या प्रकाशाची तरंग लांबी ४०० ते ७०० नॅनोमीटर असली म्हणजे झाले! वनस्पती पाण्याचे विघटन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे रासायनिक बंध सहजपणे मोडून काढतात. ही किमया सहजपणे साध्य होण्यासाठी अजून संशोधन करावे लागेल. हायड्रोजन पासून ऊर्जा मिळाली तर आपल्याला हवी आहे. कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेमधून ऊर्जा आणि पाणी मिळवता येईल आणि प्रदूषण पण होणार नाही! हायड्रोजनची निर्मिती विशिष्ट शैवालाच्या साहायाने करता येईल. मंगळावर हायड्रोजनचा उपयोग करून ऊर्जा प्राप्ती करणे गरजेचे आहे. कारण रात्री प्रकाशाविना आणि अधून मधून होणाऱ्या धुळीच्या वादळामुळे सौर ऊर्जेचा स्रोत सतत मिळवता येईलच, असे नाही.

प्रत्यक्ष मंगळावर रोव्हर वरून प्रवास करताना धनंजयला माती आणि खडकांचे नमुने गोळा करायचे असतात. तेवढ्यात त्याला दूरच्या टेकडीवर काळ्या ठिपक्या सारखी द्रोण सदृश्य हालचाल दिसते. रोव्हर सपाट रस्त्यावरून जात असते. तरीही अचानक गतीचा जोर वाढतो. संदेशयंत्रणेत बरीच खरखर ऐकू येते. धनंजयने दुर्बिणी मधून निरीक्षण केल्यावरही काहीच दिसले नाही. मग तो भास होता का? वाचकांना या बाबत उत्कंठा वाढते. धूमयान या कादंबरीमध्ये वैज्ञानिक तथ्य आणि कल्पनाविलास यांचा सुरेख संगम डॉ. विद्यासागर यांनी खुबीने साधलेला आहे. काही गूढ वाटणाऱ्या घटना लेखकाने सहजतेने सादर केल्या आहेत.प्रयोग करत असताना प्रयोगशाळेत वैज्ञानिक मंडळी एकमेकात नेमका-नेटका आणि तर्कशुद्ध संवाद साधत असतात. छोट्या-मोठ्या निरीक्षणाची चिकित्सा करत असतात.

प्रयोगामधून मिळणाऱ्या माहितीचे शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण आणि पृथक्करण केल्यावर ते निष्कर्षांच्या जवळपास येतात. संशोधकांना यश मिळवण्यासाठी जाणकारांच्या मताचा विचार आणि आदर करावा लागतो. सामान्य वाचकांच्या हे लक्षात येईल. कोणत्याही विषयात संशोधन करण्याच्या काही पद्धती असतात. त्याची छानशी झलक धुमयान वाचताना येते. चौघे ‘मंगळवीर’ आंतरविद्याशाखीय असल्यामुळे त्यांच्या मधील संवाद आपोआप बहुआयामी होऊन जातो. उदाहरणार्थ डॉ. मायरा सहजतेने प्रश्न विचारतात "सूर्यशलाका (सोलर फ्लेअर) म्हणजे काय?" अशा विविध प्रश्नांची उत्तरे कादंबरी वाचताना सहजतेने मिळत जातात. वैज्ञानिक संकल्पना आपोआप उलगडल्या जातात. हरितगृह परिणाम, प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसिस), उत्क्रांतीवाद, दीर्घनिद्रा (हाइबरनेशन), न्यूट्रिनो, संमोहनशास्त्र, कृष्णविवर, डार्क मॅटर, जैवसंगणक, द्रोण, लेसर गन अशा काही विषयांच्या संकल्पना ‘धूमयान’ मध्ये सुबोध रीतीने स्पष्ट झाल्या आहेत. धूमयान ही औत्सुक्यवर्धक कादंबरी आहे. तरीही ती रहस्यमय किंवा गूढ कादंबरी नाही. विद्यासागर स्वतः वैज्ञानिक असल्यामुळे त्यांच्या कथावस्तूला वैज्ञानिक बैठक आहे. आधुनिक वैज्ञानिक विषयांना स्पर्श करत जाणारी ही गोष्ट आहे.

पुस्तकाचं नाव : धूमयान

लेखक : डॉ. पंडित विद्यासागर

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

(०२०-२४४५२३८७)

पृष्ठं : १३८

मूल्य : २०० रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com