सिगारेटसह कोणताही धूर धोक्‍याचाच

डाॅ. अनिल मडके
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

फक्‍त सिगारेटचाच धूर नाही तर कोणत्याही धुरामुळे आपल्याला सीओपीडी उद्‌भवू शकतो. वयाच्या चाळिशीनंतर किंवा आजकाल त्याआधीसुद्धा गाठणारा हा आजार धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. सिगारेट, विडी, चिलीम, हुक्‍का, गुडगुडी अशा कुठल्याही प्रकारे धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सीओपीडी होतो. अभ्यास असे सांगतो की, धूम्रपान करणाऱ्या प्रत्येक चौथ्या माणसाला सीओपीडी होतोच. ९० टक्के मृत्यूसुद्धा धूम्रपानाशी निगडित असतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्‍तींना धोका जास्त असतोच; पण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्‍तींनाही हा रोग होऊ शकतो.

फक्‍त सिगारेटचाच धूर नाही तर कोणत्याही धुरामुळे आपल्याला सीओपीडी उद्‌भवू शकतो. वयाच्या चाळिशीनंतर किंवा आजकाल त्याआधीसुद्धा गाठणारा हा आजार धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. सिगारेट, विडी, चिलीम, हुक्‍का, गुडगुडी अशा कुठल्याही प्रकारे धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सीओपीडी होतो. अभ्यास असे सांगतो की, धूम्रपान करणाऱ्या प्रत्येक चौथ्या माणसाला सीओपीडी होतोच. ९० टक्के मृत्यूसुद्धा धूम्रपानाशी निगडित असतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्‍तींना धोका जास्त असतोच; पण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्‍तींनाही हा रोग होऊ शकतो.

सध्या शहरात जागोजागी कचरा पेटविला जातो. रस्त्यावरील धूळही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सर्व प्रकारची प्रदूषणे वाढताहेत. येथेच याचे मूळ असून या रोगाचे धोके ओळखूनच १५ नोव्हेंबर हा दिवस जगभर याच्या जागृतीसाठी साजरा केला जातो. सी.ओ.पी.डी. म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्‍टिव पल्मोनरी डिसीज. क्रोनिक म्हणजे दीर्घकाळ टिकणारा, साथ-सोबत करणारा. ऑब्स्ट्रॅक्‍टिव म्हणजे श्‍वसनात अडथळा निर्माण करणारा. पल्मोनरी म्हणजे फुप्फुसांचा आणि डिसीज म्हणजे विकार. आपल्याला श्‍वसनात अडथळा निर्माण करणारा आणि दीर्घकाळ टिकणारा फुप्फुसांचा विकार म्हणजे सीओपीडी असे सोप्या भाषेत म्हणता येईल.

बऱ्याचदा दमा आणि सीओपीडी या दोन आजारांमध्ये फरक आहे  हे लोकांना लक्षात येत नाही. ते दम्यावरील देशी-विदेशी उपचार कोणाच्या तरी सल्ल्याने घेत राहतात. तथापि सीओपीडी म्हणजे दमा नव्हे समजून चला. दम्याच्या तडाख्यातून तर सुटलो, असा अगदीच सुटकेचा श्‍वास सोडण्याचे मात्र कारण नाही. कारण सीओपीडी हा श्‍वसनाचा आजारही गंभीर आहे. ग्रामीण भागातील हवा स्वच्छ असते म्हणतात. परंतु ग्रामीण भागात आणि शहरातील उपनगरात आजही चुलीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

चुलीचा वापर करणाऱ्या घरातील स्त्रीला आणि कुटुंबीयांना चुलीच्या धुरामुळे सीओपीडी होऊ शकतो. पाणी तापवण्यासाठी बंब वापरला जातो. त्यातून निघणारा धूरही तितकाच धोकादायक असतो. हल्ली थंडी पडू लागली आहे. त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटवल्या जातात. त्यांचा धूरही असाच धोकादायक असतो. ज्या व्यक्‍ती धुळीच्या किंवा धुराच्या किंवा विविध प्रकारच्या रसायनांच्या प्रक्रियांच्या सानिध्यात सातत्याने येतात, त्यांना सीओपीडीचा विकार जडू शकतो. धूर सततची नाकातोंडात जात असेल तर या व्यक्‍तींना भविष्यात सीओपीडी गाठू शकतो.

सीओपीडीचे निदान करण्यासाठी पल्मोनरी फंक्‍शन टेस्ट नावाची, फुप्फुसांची कार्यक्षमता चाचणी केली जाते. या चाचणीद्वारे सीओपीडी आहे का आणि तो कमी, मध्यम की तीव्र स्वरूपाचा आहे. या विषयी माहिती मिळते.

उपचार 

तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार वेळेवर घेणे  निकडीचे असते. ही औषधे श्‍वासवाहिन्या रुंद करतात. श्‍वासवाहिन्यांच्या आतील थरात आलेली सूजन कमी करतात आणि श्‍वासवाहिन्यांचे स्नायू सैल करतात. आहारात दूध-डाळी असे प्रथिनयुक्‍त अन्नघटक, भरपूर फळे, पालेभाज्या यांचा वापर करावा. आहार सावकाशीने घ्यावा. घाई करू नये. पोट भरभरून न जेवता दोन घास कमी खावे. स्थूलपणा असल्यास वजन कमी करावे. या उलट शरीरयष्टी कृश असल्यास वजन प्रमाणित कोष्टकानुसार वाढवावे. नियमित व्यायाम, योगासने, विशेषत: प्राणायाम केल्याने सीओपीडीचा त्रास कमी  होतो. सीओपीडीच्या रुग्णांना वारंवार फ्लूसारखे विकार होत असतात. यासाठी त्यांनी आपल्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने फ्लू आणि न्यूमोनिया होऊ नये यासाठी लस घ्यावी.

( लेखक छातीरोग तज्ज्ञ आहेत)

anms@rediffmail.com

Web Title: Dr. Anil Madake article