गांधीविचार : आजच्या संदर्भात dr anil rajvanshi writes mahatma gandhi thinkings | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahatma gandhi

गांधीविचार : आजच्या संदर्भात

- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com

गांधीजींचे विचार आजही कसे प्रस्तुत ठरतात यावर एक अखंड ग्रंथ लिहिता येईल. प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले ते द्रष्टे विचारवंत होते. मानवाच्या मूलभूत प्रश्नांवर तसंच भारतासमोरील तत्कालीन समस्यांवर सखोल चिंतन करून ते आपले विचार व्यक्त करत. त्यापैकी काही समस्या विशेषतः सर्वसमावेशक विकासासंबंधींच्या समस्या, आजही पूर्वीइतक्याच प्रस्तुत आहेत.

म्हणूनच सध्या आमच्या समाजात फूट पाडून आमची सामाजिक वीण विदीर्ण करत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याला हात घालून गांधीजींची त्याबाबतची शिकवण आपल्याला कशी उपयुक्त ठरू शकेल, याचा ऊहापोह मी इथं करू इच्छितो.

गांधीजी पराकोटीचे सामोपचारवादी होते. ते नेहमी समोरच्या माणसाच्या दृष्टिकोनाचा विचार करत आणि कोणत्याही समस्येवर सर्व पक्षांना स्वीकार्य ठरेल, असा उपाय शोधून काढत. आपल्या वकिली पेशात असो वा राजकीय कार्यात परस्परविरोधी पक्षांना संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते एकत्र आणत. कोणत्याही बाबतीत विरोधी मतांत तडजोड घडवून आणण्याची क्षमता कशी प्राप्त होते? त्यासाठी दुसऱ्या बाजूच्या भूमिकेबद्दल सहिष्णुता अंगी बाळगण्याची आवश्यकता असते.

आपलाच किंवा बहुसंख्य लोकांचाच दृष्टिकोन दुसऱ्यावर लादण्याची प्रवृत्ती काही कामाची नसते. समेट घडवण्याची क्षमता अंगी येण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतर्मनात पुरेपूर सुरक्षिततेची भावना तर हवीच, शिवाय आपण काढलेला तोडगा सर्वांच्याच सामाईक कल्याणाचा असेल, याबद्दलही त्या व्यक्तीचं मन निःशंक असायला हवं.

गांधीजी निर्भय होते. कोणत्याही गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सुचवत असताना सर्व भारतीयांच्या भल्याचाच विचार नेहमी त्यांच्या मनात असल्यानं असुरक्षिततेच्या भावनेला त्यांच्या मनात थारा नसे. व्यक्तिगत अहंकाराचा तर वाराही त्यांना शिवत नसे. ते नेहमी लांब पल्ल्याच्या उपायांचा शोध घेत असत. त्यामुळे संघर्षरत पक्षांना जीवनाचा उदात्त हेतू समोर ठेवण्याचे आवाहन ते करत आणि त्यात पूर्णपणे यशस्वी होत.

‘बोले तैसा चाले’ हाच त्यांच्या वर्तनाचा मंत्र असल्यानं सर्व भारतीयांवर त्यांच्या सांगण्याचा मोठा प्रभाव पडे. त्यामुळं अपेक्षित परिणाम त्यांना सहज साधता येई. प्रखर बुद्धिमत्तेचं वरदान त्यांना लाभलं होतं. भारतापुढील समस्यांची त्यांना सखोल जाण होती.

यामुळेच आपण सुचवलेले उपाय भारताच्या दृष्टीनं अनुरूप असल्याची पूर्ण खात्री त्यांना असे. तरीही ते उपाय काँग्रेसवर किंवा जनतेवर त्यांनी कधी लादले नाहीत. त्यासाठी त्यांनी नेहमीच सर्वसंमती प्राप्त केली. बव्हंशी लोक त्यांचं म्हणणं मान्य करत असत. हीच तर महान नेत्याच्या महत्तेची निशाणी असते.

आज आपल्या आजूबाजूला असहिष्णुता व्यापलेली आपण पाहत आहोत. विशिष्ट हितसंबंध असलेल्या लोकांचीच मनोकामना पुरवली जात आहे. परिणामी, वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत आणि त्यातून सामाजिक तणाव निर्माण होत आहेत. आपण असं केलं नाही, तर पुढील निवडणुकीत लोक आपल्याला निवडून देणार नाहीत असं भय सत्तारूढ राजकारण्यांच्या मनात आहे. त्या भयापोटीच हे सारं घडत आहे.

आपल्या मतदारसंघाच्या सामाईक हिताची कामे करत राहिलो आणि त्यायोगे बहुतेक सर्व मतदारांना बरोबर घेत राहिलो, तर आपण सहज निवडून येऊ इतकंच काय पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून येऊ ही गोष्ट या राजकारण्यांच्या ध्यानी येत नाही. खरंतर जनहितदक्ष राहून केलेली आवाहनं लोकांच्या हृदयातील सद्विवेकाला भिडली, की ते नेहमीच संबंधितांना अनुकूल प्रतिसाद देतात.

असुरक्षितता ही भीतीची जननी आहे. साऱ्या घडामोडींचा सांगोपांग आढावा घेऊन, समोरील समस्यांची सोडवणूक करणं बुद्धीला जमलं नाही, की मनाला भीती वाटू लागते. परिस्थितीचं सम्यक मूल्यमापन करण्याची अशी असमर्थता जात, वंश किंवा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असत नाही. ती सर्वच प्रकारच्या माणसांत आढळून येते. गरीब असो वा श्रीमंत, बहुतेक सगळीच माणसं असुरक्षिततेनं ग्रासलेली असतात.

गरिबांना भविष्याची असुरक्षितता सतावत असते तर श्रीमंतांना आपली संपत्ती, सत्ता आणि स्रोत वाढतील आणि टिकतील कसे याबद्दलची असुरक्षितता छळत असते. बुद्धी आणि मनोसामर्थ्याच्या जोरावर या असुरक्षिततेचं निर्मूलन केलं गेलं तरच आपण भयमुक्त होऊ शकतो. या स्वरूपाचं मन आणि बुद्धी विकसित होण्यासाठी ‘योग’ सहाय्यभूत होऊ शकतो. एका विशिष्ट विचारावर प्रदीर्घकाळ ध्यान केंद्रित करून हे साध्य होऊ शकतं. यालाच पतंजलीनं ‘संयम’ असं नाव दिलं आहे.

आपल्यापाशी जे काही आहे त्याबद्दल मनोमन कृतज्ञ राहणं आणि आपल्याला जे जे लाभलं आहे, त्याबद्दल सतत समाधानी असणं हा भयातून मुक्ती मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे. आपण ही वृत्ती सातत्यानं बाळगली, की आपलं मन समाधानानं आणि आनंदानं ओतप्रोत भरून जातं.

वेळ येईल त्या त्या वेळी कुणीतरी आपल्याला हात द्यायला उपलब्ध असेल आणि सारं चांगलंच होईल, असा ठाम विश्वास मनात असला, की मनावरची ओझी हलकी होतात आणि असुरक्षितता कमी होते. आपल्या मनातील आवेगी लालसेचे उन्नयन व्हायलाही असे विचार सहाय्यभूत ठरतात.

आपली संधी हुकेल किंवा उद्या आपलं काय होईल, याबद्दलच्या भयापोटीच माणसाच्या मनात अधिकाधिक लोभ उत्पन्न होतो. त्यातूनच भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी राजकारणी पैदा होतात असं मला वाटतं. हे भ्रष्टाचारी राजकारणी मग अहंकारी, आत्मधुंद आणि असहिष्णू बनतात. भारताच्या लोकशाहीचा गाडा ते स्वत:च्या संकुचित स्वार्थाला जुंपतात. आपण आगीशी खेळत आहोत याचं भान त्यांना राहत नाही. पण एकदा का त्या आगीची ठिणगी पेटली, की ती कशी शांत करावी, हे त्यांना मुळीच कळणार नाही.

नकारात्मक शक्ती नेहमीच आपल्या निर्मात्यांच्याही हाताबाहेर जात असतात. ती त्यांची प्रवृत्तीच असते. बऱ्याचदा अशा शक्तींचे निर्मातेही त्या शक्तींचेच बळी ठरतात. यासाठी अशा शक्तींना आपण कधीही मोकाट सोडता कामा नये.

जगाच्या इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. जगातील सगळी युद्धं मुळात छोट्या पातळीवर, छोट्या प्रमाणातच सुरू झाली होती. नंतरच त्याचा भडका हाताबाहेर गेला. दहशत आणि विनाशाचा वारू बेलगाम उधळल्याने अखिल मानवजातीला त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम सोसावे लागले.

गांधीजींनी या बाबतीत आपल्या जीवनात सदैव संयम आचरला आहे. ते रोजच्या रोज नियमितपणे ध्यान करीत. ईश्वरावर आणि उच्चतर शक्तींवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. आपण जे काही साध्य करू शकलो, त्याबद्दल त्यांच्या मनात ईश्वराप्रती, उच्चतर शक्तिप्रती सदैव कृतज्ञता वसे.

त्यामुळंच ते सदैव निर्भय आणि अंतर्मनात सुरक्षित असत. निर्भय असल्यामुळंच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि आपलं राष्ट्र अधिक सुंदर करण्यासाठी ते प्रत्येकाचं मत अजमावून घेत तसेच सर्वांना बरोबर घेत सहिष्णुतेचे नवनवे मार्ग चोखाळू शकले.

लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण पाठ असा, की लहानमोठा असा कोणताही विचार न करता प्रत्येक व्यक्तीला आपापल्या पद्धतीने ती आपला संताप व्यक्त करू देते. बळाच्या जोरावर हा संताप किंवा असंतोष दाबून ठेवल्याचे अत्यंत अनर्थकारी परिणाम होऊ शकतात. कितीही टोकाचे असले, तरी सर्व प्रकारचे मतभेद चर्चेच्या आधारे आणि जनतेचे सर्वसाधारण कल्याण केंद्रस्थानी ठेवून मिटवता येतात, ही गोष्ट गांधीजींनी दाखवून दिली.

एक समाज म्हणून आपल्याला अधिक सहिष्णू आणि सुखी बनता यावे, म्हणून गांधी जयंतीच्या पवित्र दिवशी त्यांची शिकवण ध्यानी घेऊन आपण ती आचरणात आणू या. आपला भारत देश सरस बनवण्याच्या मार्गावरचं हेच योग्य पाऊल ठरेल.

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com