स्मरण भारतीय असंतोषाच्या जनकाचे...

आपला देश स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात पदार्पण करीत असून, नुकतीच लोकमान्य टिळक यांची शंभरावी पुण्यतिथी साजरी झाली.
Lokmanya Tilak
Lokmanya TilakSakal

आपला देश स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात पदार्पण करीत असून, नुकतीच लोकमान्य टिळक यांची शंभरावी पुण्यतिथी साजरी झाली. लोकमान्यांनी आपलं आयुष्य ‘स्वराज्य’ या संकल्पनेची व्याख्या करण्यात, ती संकल्पना स्पष्ट करण्यात आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीयांच्या मनात आकांक्षा निर्माण करण्यात व्यतीत केलं. लोकमान्य भारताची ओळख बनले व ते आपल्याला कायमच समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी प्रेरित करीत राहिले आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपल्यासाठी लोकमान्यांचा दृष्टिकोन, त्यांची स्वप्ने आणि आशा पुन्हा चेतवण्याची व अमलात आणण्याची संधी आहे.

श्री अरबिंदो यांची १५०वी जयंती याच वर्षी सुरू झाली आहे व ते क्रांतिकारी देशप्रेमाच्या पहिल्या टप्प्यात लोकमान्यांचे जवळचे राजकीय सहकारी होते. त्यांनी टिळकांचे वर्णन, ‘‘अशी व्यक्ती ज्यानं लोकशक्तीच्या आत्म्याला जागृत केलं व जागृत आत्म्यांना प्रतिसाद दिला, त्याचबरोबर त्यांना अभिप्रेत संवेदना, इच्छा आणि भावना यांना कोणत्या दिशेनं न्यायचं आहे, हेही सुनिश्चित केलं. ते त्यांच्या पाठीराख्यांबरोबर त्यांच्यातील एक होऊन, त्यांच्याशी समरस होऊन मार्गक्रमण करीत राहिले, त्यांच्याशी साधेपणानं वागत, कुटुंबातील घटक मानत व्यवहार करीत राहिले. त्यामुळंच लोकमान्य त्यांच्यासोबतच्या लोकांना एकत्र बांधून ठेवू शकले. त्यांनी केवळ शिक्षित लोकांचंच नव्हे, तर व्यापारी, उद्योजक, गावकरी आणि शेतकऱ्यांचंही नेतृत्व केलं.’’ लोकमान्य टिळकांनी ठेवलेला वारसा कोणता, याबद्दल अरबिंदो लिहितात, ‘‘लोकमान्यांनी लोकांमध्ये एक नवं, शक्तिशाली, स्वावलंबी राष्ट्रीय चैतन्य, पुनःजागृत राजकीय मन, स्वातंत्र्याबद्दलची आस आणि कृती व एक शुद्ध राष्ट्रीय हेतू रुजवला. टिळकांनी शांत, संयमी व दृढ साहसी, अटळ ध्येयवादी, लवचीक मन असलेला, देशसेवेला वाहून घेतलेला नेता, असे असामान्य गुण आपल्या कार्यातून प्रदर्शित केले. त्यांनी आपल्या ताकद आणि प्रभावाचा वापर केवळ आणि केवळ मातृभूमीची सेवा करण्यासाठी अविरतपणे केला.’’

लोकमान्यांच्या राजकीय, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील अथक आणि कष्टप्रद कार्यातून त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. त्याच्या जोडीला अक्षय ऊर्जेचा स्रोत व उत्साहाचं प्रतीक म्हणून ते लोकांसमोर आले. त्यांच्या विरोधकांनी त्यांचं वर्णन ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असं केलं, तर लोकांनी त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी बहाल केली.

नाबागोपाल मित्रा आणि ऋषी राजनारायण बोस यांनी हिंदू मेळ्यांचं आयोजन करीत हिंदूंना जागृत करण्याचं काम केलं होतं, तर टिळकांनी सुरू केलेल्या ‘शिवजयंती’ व ‘गणेशोत्सवा’चा राजकीय परिणाम अधिक खोलवर, दूरगामी झाला. त्यांचा या उत्सव सुरू करण्यामागील उद्देशाला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली.

शिवजयंती उत्सवाला बंगाली क्रांतिकारी राष्ट्रवाद्यांमध्ये मोठी मान्यता मिळाली. लोकमान्य टिळक २४ जून १९०६च्या ‘मराठा’मध्ये म्हणतात ‘‘शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश कोणा एका समाजाविरुद्ध नव्हता, तर शिवाजी महाराजांना ज्या गोष्टींनी स्वराज्याची प्रेरणा दिली, त्या गोष्टी समाजात पुन्हा चेतवण्याचा होता, असं म्हटलं आहे. कोणी अशी कल्पनाही केली नव्हती, की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना आज प्रत्येकानं आपल्या आयुष्यात अमलात आणण्यास अत्यंत योग्य ठरेल. शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून दिलेली प्रेरणा पुढील अनेक पिढ्यांचा प्रेरणास्रोत बनून राहणार आहे.’’ शिवजंयती उत्सवाला बंगालमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उत्सव सुरू करण्यात राजा सुबोधचंद्र मल्लिक, बंगालमधील राष्ट्रीय शिक्षण चळवळीचे जनक ब्रह्मबांधब उपाध्याय, ‘संध्या’ या प्रखर राष्ट्रवादी वर्तमानपत्राचे संपादक मोतीलाल घोष, ‘अमृत बझार पत्रिका’चे संपादक आदी आघाडीच्या राष्ट्रवादी नेत्यांचा सिंहाचा वाटा होता.

कोलकत्यामध्ये ४ जून १९०६ या दिवशी ‘शिवजयंती’ व स्वदेशी वस्तूंच्या प्रदर्शनाची भव्य सुरवात झाली. यावेळी स्वतः लोकमान्य टिळक, जी. एस. खापर्डे, डॉ. बी. एस. मोंजी, अश्विनीकुमार दत्त उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाचं उद्‍घाटन करताना टिळकांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केलं व हा एक ‘राजकीय महोत्सव’ असल्याचं जाहीर केलं. या वेळी बोलताना टिळक म्हणाले, ‘‘रत्नागिरीच्या शिवाजी महाराजांच्या मंदिरावर आता ‘वंदे मातरम हे शब्द कोरले गेले आहेत. ‘शिवजयंती’ हा प्रेरणादायी ‘राजकीय महोत्सव’ असून, तो आता देशभर पसरलाच पाहिजे. कालीमाता बंगालमधील प्रमुख देवता आहे व हीच देवी शिवाजी महाराजांची रक्षणकर्ती होती. आपण शिवाजीमहाराजांचा विचार भवानी मातेशिवाय करूच शकत नाही.’’

श्री अरबिंदो, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय या चौघांनी कॉंग्रेसचं नेमस्त धोरण उधळून लावलं, कॉंग्रेसी चळवळ या कचखाऊ गटापासून मुक्त केली आणि ती लोकाभिमुख, लोकांशी निगडीत व्हावी यावर भर दिला. ही चळवळ लोकांच्या स्वातंत्र्याप्रती असलेल्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारी असावी, अशी इच्छा या चौघांनी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या कोलकाता इथं १९०६ मध्ये झालेल्या २२ व्या अधिवेशनात ‘लाल-बाल-पाल’ यांनी आपलं म्हणणं जोरकसपणे मांडलं व सर्वप्रथम बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य व राष्ट्रीय शिक्षण हे ठराव मांडले. त्यांनी भारताला ‘पूर्ण स्वातंत्र्य’ किंवा ‘विनाअट स्वराज्या’च्या मागणीला पाठिंबा दर्शविला. हे ठराव भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील निर्णायक टप्पा ठरले. याच वर्षी कॉंग्रेसच्या धोरणांत ऐतिहासिक बदल घडले व टिळकांनी लोकांसमोर बहिष्कार, स्वराज, स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षणाची तत्त्वं मांडण्यासाठी देशभर वादळी दौरे केले.

लोकमान्यांनी त्यांच्या विनम्र, तरीही जोरकस आणि थेट शैलीमध्ये नव्या पक्षाचे सिद्धांत मांडले. ‘‘तुमचे उद्योगधंदे पूर्णपणे नष्ट केले गेले आहेत, हे परदेशी सत्तेचं काम आहे, तुमची संपत्ती लुटून देशाबाहेर नेली जात आहे आणि तुम्हाला कोणतीही मनुष्य जात पोचणार नाही अशा खालच्या स्तराला नेऊन ठेवलं गेलं आहे. या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढू शकेल असा दुसरा कोणता उपाय आहे का? यावर ‘बहिष्कारा’शिवाय दुसरा उपाय नाही. मी सांगतो, तुम्ही तुमचं बळ एकत्र करून तयार व्हा, संघटनेची ताकद दाखवा आणि त्यानंतरच कामावर जा. असं केल्यास तुमच्या मागण्या ब्रिटिश अमान्य करू शकणार नाहीत. हेच ‘राजकारण’ आहे. तुमच्या मागण्या अमान्य झाल्यास तुम्ही लढण्यासाठी तयार आहात का? तुम्ही तयार असल्यास, तुमच्या मागण्या मान्य होतील याची खात्री बाळगा. मात्र, तुम्ही तयार नसल्यास तुमच्या मागण्या कायमस्वरूपी अमान्य होतील, हेही लक्षात ठेवा. आपण सशत्र नाही, मात्र आपल्याकडं बहिष्काराचं शक्तिशाली राजकीय अस्त्र आहे. स्वतःचं सरकार हे आपलं ध्येय आहे, आपल्याला आपल्या प्रशासन यंत्रणेवर ताबा मिळवायचा आहे.’’

शोध ‘स्वराज्या’चा...

टिळकांच्या राजकीय कृतींमध्ये इतिहासतज्ज्ञ आर. सी. मुजुमदार यांना चार प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळल्या आहेत. पहिली, देशाच्या सांस्कृतिक वारशाविषयी अटळ प्रेम आणि समर्पणाची भावना व भविष्यातील सर्व घडामोडी याच भक्कम पायावर उभ्या राहतील, हा विश्वास. दुसरी, मोठा त्याग करावा लागला, तरी आपल्यास संपूर्ण स्वराज्य मिळेपर्यंत आपले असलेले अधिकार अबाधित ठेवणं, यावर त्यांनी भर दिला. तिसरी, टिळकांनी स्वराज्याची व्याख्या केवळ प्रशासनातील बदल नव्हे, तर आपलं स्वतःचं ‘आदर्श राष्ट्र’ अशी केली. चौथी, त्यांनी आपल्या भाषणांतून लोकांना स्व-मदतीची शिकवण व राजकीय आंदोलनाची दिशा दिली. टिळकांनी स्वराज्याच्या शोधाकडं आध्यात्मिक नजरेतून पाहिलं. ‘‘स्वराज्य म्हणजे तुमच्या कठोर मेहनतीची नैसर्गिक निष्पत्ती,’’ असे वर्णन त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. कर्मयोगी ‘स्वराज्या’साठी प्रयत्न करतो, तर ज्ञानयोगी तळमळ करतो. मग स्वराज्य म्हणजे नेमकं काय? ते स्वत्वात एकवटलेलं आयुष्य आहे आणि ते स्वतःवरचा अवलंबून आहे, असे टिळक म्हणतात.

श्री अरबिंदो लोकमान्यांच्या कायमच समर्पक राहिलेल्या वारशाबद्दल बोलताना भावुक होऊन लिहितात, ‘टिळकांचं नाव राष्ट्रनिर्माते म्हणून इतिहासामध्ये नमूद झालं आहेच. जोपर्यंत देशाला स्वतःच्या भूतकाळाबद्दल अभिमान आहे आणि भविष्याबद्दल आशा आहेत, तोपर्यंत टिळकांच्या नावाचं स्मरण कृतज्ञतापूर्वक केलं जाईल.’’ लोकमान्यांच्या मृत्यूला शंभर वर्षे होऊन गेल्यानंतर व देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षं होत असताना त्यांच्या कार्याची समर्पकता, प्रेरणा आणि वारसा आपल्यामध्ये भारताच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची आणि देश महान बनण्यासाठीची प्रेरणा नव्यानं चेतवण्याचं काम करीत राहील...

(सदराचे लेखक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशनचे संचालक आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com