तृणमूलचे ‘हिंसक’ राजकारण

भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाला नसला, तरी पक्षाने तृणमूल कॉंग्रेस आणि ममता बॅनर्जींना जोरदार टक्कर दिली.
Violence
ViolenceSakal

भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाला नसला, तरी पक्षाने तृणमूल कॉंग्रेस आणि ममता बॅनर्जींना जोरदार टक्कर दिली. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हिंसाचार आपल्याला पाहायला मिळाला, त्यांनी भाजपच्या उमेदवारांवर हल्ले केले, मतदारांना धमकावले आणि त्यांना मतदानापासून रोखले. असे असूनही भाजपची कामगिरी चांगली झाली.

खरेतर, तृणमूल कॉंग्रेस एवढी बेचैन झाली होती, की त्यांच्या बाईकवरून फिरणाऱ्या गॅंग पश्चिम बंगालमधील ग्रामीण भागात हत्यारे घेऊन फिरत होत्या व भाजपच्या समर्थकांना किंवा जे भाजपला मतदान करतील अशा ग्रामस्थांना पोलिंग बुथपासून दूर राहण्यासाठी धमकावत होत्या.

अनेक गावांमध्ये हिंदू पुरुष व महिलांना, तसेच वृद्धांना दहशत दाखवून मतदानापासून रोखले गेले. मी स्वतः बोलापूर या ग्रामीण मतदारसंघातील एक उमेदवार होतो आणि मी माझ्या डोळ्याने तृणमूल कॉंग्रेसने ग्रामीण भागात आक्रमक पद्धतीने पसरवलेली दहशत पाहिली आहे. माझ्यावर तृणमूलच्या मुस्लिम पाठीराख्यांच्या जमावाने हल्ला केला होता. हे लोक शेजारच्या गावातील हिंदू महिला व पुरुषांना मतदान करण्यापासून रोखत होते. मी तेथे ठाम उभा राहिलो व या लोकांना मतदान करू देण्याचा आग्रह करू लागल्याने हा जमाव व त्यांचे नेते माझ्यावर चिडले. मी अगदी थोडक्यात बचावलो, मात्र हिंदू मतदारांना मतदान करता येईल हे मी सुनिश्चित केले. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नसल्याने या गोष्टीची, खरेतर सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा झाली नाही व तिला पुरेशी प्रसिद्धी मिळाली नाही. अशा घटना पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी घडल्या, मात्र मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय व राज्यातील माध्यमांनी त्याकडे दुर्लक्षच केले.

भाजपने संपूर्ण प्रचारादरम्यान प्रशासन आणि बदलाचा सकारात्मक अजेंडा लोकांसमोर ठेवला. त्यामध्ये ‘शोणार बांगला’च्या व्हिजनबद्दल चर्चा केली होती व पश्चिम बंगालला देशातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून कसे समोर आणता येईल हे सांगितले होते. पक्षाच्या आमदारांची संख्या २०१६ मधील तीन या संख्येवरून थेट ७७ वर गेली असून, आम्ही राज्य विधानसभेतील महत्त्वाचा विरोधी पक्ष बनलो आहोत. गेल्या दशकभरात तृणमूल कॉंग्रेसला कोणी विरोधच करीत नव्हते, आता ही स्थिती संपली आहे. भाजपसाठी हा पश्चिम बंगालमध्ये खरोखरीच ऐतिहासिक क्षण आहे. हा क्षण अनेक दशकांच्या संघर्षातून आला आहे. आम्ही जिंकलो नसलो, तरी आम्ही एक सक्षम विरोध पक्ष म्हणून आलो आहोत. आम्ही लोकशाही मार्गाने तृणमूल सरकारला विरोध करण्यास आणि त्यांना उघडे पाडण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही पश्चिम बंगालच्या नागरिकांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी काम करणार आहोत.

मात्र, या जोरदारपणे लढल्या गेलेल्या निवडणुकीनंतर जे घडले, ते अनपेक्षित आणि अभूतपूर्व होते. भाजप मोठ्या अपेक्षा असूनही निवडणुकीत पराभूत झाला, तरीही पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आणि राज्यातील आजपर्यंत सर्वांत चांगली कामगिरी नोंदवली. तृणमूलने मात्र विजयाचे विनयाने स्वागत करण्याऐवजी राज्यभर हिंसाचार मुक्तहस्ते पसरवला व भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले. मी हा लेख लिहीत असताना पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ३० कार्यकर्त्यांनी जीव गमावला असून, हजारो जण बेघर झाले आहेत. विशेष म्हणजे, आसाम, तामिळनाडू, केरळ, पद्दुचेरी या निवडणुका झालेल्या एकाही राज्यात हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाहीत. पश्चिम बंगाल वगळता या प्रत्येक राज्यांनी निकालांचे लोकशाही पद्धतीने आणि शांतपणे स्वागत केले. अशा प्रकारचा हिंसाचार भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत कधीही पाहायला मिळालेला नाही.

अनिर्बंध हिंसाचाराची मालिका

तृणमूल कॉंग्रेसने हिंसाचाराने स्वतःचे या आधीचे विक्रम २०२१ च्या निवडणुकांनंतर मोडीत काढले. अनेक मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांवर प्रचारादरम्यान आणि मतदानाच्या वेळी हल्ले केले गेले. प्रत्येक टप्प्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा अवलंब केल्याचे दिसले. ममता बॅनर्जी प्रचारादरम्यान अनेकदा लोकांना निवडणूक आयोगाने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी नेमलेल्या केंद्रीय पथकांविरोधातच हिंसाचार करण्यासाठी चिथावणी देत असल्याचे ऐकायला मिळाले. ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात बोलताना शिवराळ आणि असंसदीय भाषा वापरली. (त्यांनी या दोघांसाठी दुर्योधन आणि दुःशासन, रावण आणि दानव, खोटारडे असे शब्द वापरले.) त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या विरोधातही शिवराळ भाषा वापरली. (त्यांच्याविरोधात नड्डा, फड्डा, चढ्ढा असे शब्द वापरले.), त्यांनी निवडणूक आयोगाचा उल्लेख कायमच भाजपचे एजंट असा केला, त्यांनी निवडणूक आयोगाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ममता बॅनर्जी यांचे एक प्रमुख शिलेदार व बिरभूम जिल्ह्यातील तृणमूलचे अध्यक्ष अनुब्राता मोंडल यांनी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना ‘निवडणुकीच्या दिवशी भयंकर खेळ होणार आहे’ (भयंकर खेला हाबे), अशा धमक्या दिल्या होत्या. मोंडल यांच्यावर जनभावना भडकणारी विधाने करणे, हिंसाचार करणे व प्रक्षोभक भाषा वापरून लोकांना मतदानापासून वंचित करण्याचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांनी मोंडल यांना लगाम लावण्यासाठी काहीही पावले उचलली नाही, उलट शांत राहात त्यांच्या धमक्यांना प्रोत्साहनच दिले. मतमोजणीच्या दिवशी (२ मे २०२१) जेव्हा मतमोजणी अंतिम टप्प्यात आली व तृणमूल कॉंग्रेसचा विजय निश्चित झाला, तेव्हा त्यांच्या पक्षाच्या बाईक-गॅंग व कार्यकत्यांची टोळकी बाहेर पडली व त्यांनी अनेक गावांमध्ये हिंसाचार पसरवण्यास सुरूवात केली, जाळपोळ केली आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यास सुरवात केली. भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर हाकलले गेले. पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागांत घरे आणि झोपड्या जाळल्या गेल्या. भाजपचे पाठिराखे आणि पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी सेवा देणाऱ्यांना लक्ष्य केले गेले, त्यांची वर्कशॉप आणि दुकाने लुटून उद्ध्वस्त करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांना तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यालयांमध्ये बोलावून माफी मागण्यास भाग पाडले गेले, त्यांना थुंकी पुसण्यास चाटायला लावण्यासारख्या गंभीर घटनाही घडल्या.

पश्‍चिम बंगालचा ‘काश्‍मीर’ नको!

शहरी भागांत भाजपच्या समर्थक आणि सदस्यांना शोधून त्यांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली, महिलांविरोधात अपशब्द वापरून धमक्या दिल्या गेल्या. अनेक प्रकरणांमध्ये भाजपच्या समर्थकांना तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची सक्ती केली गेली किंवा तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पुन्हा मूळ पक्षात येण्यासाठी जबरदस्ती केली गेली. अनुसूचित जाती व जमाती या हल्ल्यांच्या केंद्रस्थानी होते, कारण ते या निवडणुकांत भाजपच्या बाजूने खंबीरपणे उभे होते. पश्चिम बंगालच्या विधानसभेतील अनुसूचित जाती व जमातींच्या ६४ आमदारांपैकी ३५ भाजपचे आहेत, तर १६ आदिवासी समाजाच्या आमदारांपैकी ९ भाजपचे आहेत. यावरूनच हेच स्पष्ट होते की, ममता बॅनर्जी यांचे ‘मा-माटी-मानुष’ सरकार भाजपच्या बाजूने असलेल्या समाजांना धडा शिकवण्याचेच काम करीत आहे. अनेक प्रकरणांमध्ये असेही दिसून आले आहे, की भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन नाकारण्यात येते आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना ठराविक रक्कम देण्याचे कबूल केल्यासच त्यांच्या घरी परतण्याची परवानगी दिली जात आहे. काहींनी याची तुलना मुघल राजवटीत हिंदूंकडून वसूल केल्या जाणाऱ्या जिझिया कराशी केली आहे. काही प्रकरणांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना घरी परतून त्यांच्या शेतातील पिकाची कापणी करण्यापासून रोखण्यात आले आहे. भाजप कार्यकर्त्यांना सक्तीने माफी मागायला सांगितले जात आहे, त्यांच्या निवडणूक काळातील सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करायला भाग पाडले जाते आहे, भाजपचे समर्थक असलेल्या छोट्या दुकानदारांना लक्ष्य केले जात असून, त्यांना शेजारील आसाम राज्यामध्ये स्थलांतरित होण्यास भाग पाडले जात आहे.

तृणमूल कॉंग्रेसचा हा हिंसाचार धक्कादायक व अभूतपूर्व असून, त्यातील आक्रमकता व क्रूरता अनपेक्षित आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक वेदनादायी बुद्धिजीवी लोकांचे मूग गिळून गप्प बसणे आहे. हे लोक नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध बोलताना अत्यंत कंठाळी असतात आणि विखारी भाषा वापरतात. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने सुरू केलेल्या मृत्यूच्या तांडवाकडे मात्र ते डोळेझाक करीत आहेत. ममता बॅनर्जी यांचे सहकारी पक्ष असलेले महाविकास आघाडी, त्यांचे डाव्या आघाडीतील समर्थक, कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि राष्ट्रीय जनता दलासारखे पक्षही तृणमूल कॉंग्रेसच्या या हिंसक आणि लोकशाहीविरोधी वर्तणुकीविरोधात चकार शब्द काढायला तयार नाहीत. याचे कारण त्यांना राजकीय फायदा उठवण्यातच अधिक रस आहे. अनेक जणांनी काश्मीरमध्ये भूतकाळात घडलेल्या घटनांची संगती सध्या पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या घटनांशी जोडली आहे. ते प्रश्न विचारत आहेत, की आजच्या पश्चिम बंगालची स्थिती भूतकाळातील काश्मीर प्रमाणेच होईल का, जेथे अतिरेकी हल्ले, वांशिक कत्तली दररोजच घडत होत्या. पुढील पाच वर्षांतील सर्वांत मोठा संघर्ष पश्चिम बंगालला काश्मीरच्या मार्गाने जाण्यापासून वाचविणे, हाच आहे. हा संघर्ष तीव्र, निर्णायक आणि दृढनिश्चयाने करावा लागणार आहे.

(सदराचे लेखक ‘डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशनचे संचालक आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com