वैद्यकीय आदर्शाचा ‘चिरंजीव’ वेध

काही वर्षांपूर्वी आग्र्याला झालेल्या एका भव्यदिव्य कार्यक्रमात डॉ. केतन यांना ‘डॉ. ढोलकिया पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं.
book kanakanane
book kanakananesakal
Summary

काही वर्षांपूर्वी आग्र्याला झालेल्या एका भव्यदिव्य कार्यक्रमात डॉ. केतन यांना ‘डॉ. ढोलकिया पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं.

वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय आणि आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे मणक्याचे प्रसिद्ध सर्जन डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर. डॉ. केतन हे केवळ उत्कृष्ट डॉक्टर नव्हते, तर ते त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे एक वैद्यकीय आदर्श बनून राहिले आहेत. कोणताही आदर्श हा नेहमीच चिरंतन राहत असतो, तो कधीच नामशेष होत नसतो. त्याचप्रमाणे डॉ. केतन शरीराने जरी जनमानसात नसले तरी त्यांच्या डॉक्टरी ज्ञानामुळे, कौशल्यामुळे ते जीवितच आहेत, असे म्हणणे उचित ठरेल. नामवंत ऑर्थो सर्जन म्हणून ते त्यांच्या क्षेत्रात नाव कमावून होतेच, परंतु त्यांनी आपल्या विषयावर लिहिलेल्या विविध शोधलेखांमुळेही ते चर्चेत होते. जवळजवळ त्यांनी चाळीसएक शोधनिबंध लिहिले आहेत. अनेक वैद्यकीय सेमिनार, कॉन्फरन्स, लेक्चर्स यांमधे डॉ. केतन सतत व्यस्त असत. जगातील बहुसंख्य देशांमधे त्यांनी भ्रमंती केली होती. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांच्या कार्यकारणीमधे त्यांनी मानद पदं भूषवली होती. यामध्ये महाराष्ट्रातील ऑर्थोपेडिक असोसिएशन, बॉम्बे ऑर्थोपेडिक असोसिएशन या संस्थांचाही समावेश आहे.

काही वर्षांपूर्वी आग्र्याला झालेल्या एका भव्यदिव्य कार्यक्रमात डॉ. केतन यांना ‘डॉ. ढोलकिया पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. अशा अत्यंत कार्यकुशल, सामाजिक बांधीलकी जपणा-या, कुटुंबवत्सल असणा-या, पेशंट्सना देवदूत असणा-या डॉ. केतन यांचा अकाली मृत्यू वैद्यकीय क्षेत्राला आणि शारीर वेदनेलाही पोरकं करून गेला. कार्यरत असणा-या या तरुण डॉक्टरचा मृत्यू हा त्याचे कुटुंबीय, वैद्यकीय क्षेत्र, मित्रपरिवार, पेशंट या सगळ्यांनाच अतिशय चटका लावून गेला. या गुणी डॉक्टरांचे अनुभव पुस्तकरूपाने लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांच्या अनुभवकथनाचे पुस्तक तयार करण्याचे काम ते हयात असतानाच सुरू झाले होते. डॉक्टरांचे शाळेतले मित्र अभय इनामदार यांनी शब्दांकनाची जबाबदारी उचलली. त्यांच्या मुलाखती सुरू झाल्या. पुस्तकाची प्रक्रिया सुरू झाली. डॉ. केतन वेळ मिळेल तसं अभयना माहिती देत होते. त्यांचे वैद्यकीय शिक्षण, सर्जरीचे अनुभव, पेशंट्सचे आलेले अनुभव, मित्रपरिवार या माहितीपर्यंत मुलाखती झाल्या होत्या, परंतु कुटुंबविषयक, व्यक्तिगत जीवनविषयक बोलायचे राहून गेले. जणू काही नियतीनेच ठरवले की, डॉ. केतन हे भावी पिढीसाठी एक उत्तम वैद्यकीय आदर्श म्हणून स्थिर राहायला हवेत. त्यामुळे त्यांचे ‘कणाकणाने’ हे आत्मकथन म्हणजे एका डॉक्टरने लिहिलेले वैद्यकीय विषयावरचे उत्तम मार्गदर्शकच आहे असे म्हणायला हवे.

या पुस्तकात कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थ्याने आपल्या विषयाविषयी, करियरसंबंधीच्या निर्णयाविषयी कसा विचार करायला हवा, त्यासंबंधी काय करायला हवं याचं प्रत्यक्ष दर्शन घडतं. पोस्टग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करायचं यासंबंधी डॉ. केतन स्वतःशीच बोलताना दिसतात. “पुढे जाऊन काय करायचं हे नक्की माहीत नव्हतं, पण मी माझ्या मनात ते काम कसं असावं ह्याचा एक फ्लो चार्ट तयार केला होता. स्वतःला तशा प्रकारे तयार करण्यासाठी वाटतंय ते एका कागदावर उतरवून काढलं होतं. मनात विचार चालला होता. एमबीबीएसला गेलास ना तू? तसे अनेकजण जातात! मग तू वेगळं काय करणार आहेस? तुझी ही ‘हसीन गलती’ निस्तरायला तू अजून मोठी चूक केलीस आणि एमएस केलंस. आता कामाला कधी कशी आणि कुठून सुरुवात करशील तू? बरं १५ वर्षं काम करूनही त्याचा मोबदला हवा तसा मिळेलच असं नाही. तुला मिळणारं यश आणि त्याचा मोबदला ह्यांचं प्रमाण व्यस्त असलं तर? अशा सगळ्या प्रश्नांची काल्पनिक उत्तरं मी शोधायचा प्रयत्न करत होतो. विचार करत होतो. माझं शिकणं आणि जगण्याची धडपड आता कुठे सुरू झाली होती!” डॉक्टरांचे हे आत्मचिंतन म्हणजे प्रस्तुत पुस्तकाचा ‘कणा’ आहे. हेच चिंतनविचार पुढच्या पिढीला दिशा देणारे आहेत. कारण डॉक्टर या अनुभवातून पार पडून एक यशस्वी सर्जन बनले. त्यांच्या या अनुभवाच्या रस्त्यावरून विद्यार्थी गेले तर नक्कीच एक उत्तम कर्तृत्ववान व्यक्ती बनू शकतील असा विश्वास ‘कणाकणाने’ या पुस्तकातून मिळतो. हेच खरं तर या पुस्तकाचं मोल आहे.

अभय इनामदार यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. त्यांनी योजलेल्या सहजसाध्या मनाला भिडणा-या भाषेमुळे केतन यांचे विचार अगदी काळजाला हात घालतात. केतन यांच्या कार्यप्रवासाचा वाचक हा एक भाग बनून जातो. जणू काही तो स्वतःही केतन यांच्याबरोबरीने अनुभव घेत आहे असा भास वाचकाला होत असतो. पुस्तकाची मांडणी अतिशय शिस्तबद्ध आहे. सुरुवातीची चार प्रकरणे केतन यांच्या आत्मकथनाची आहेत. त्यानंतर त्यांचे आईवडिल, भाऊ, सासूसासरे यांचे लेख आहेत. केतन यांच्या कथनासाठी योजलेली शीर्षके देखील अतिशय समर्पक अशी आहेत. ‘आकार’, ‘खरी सुरुवात’, ‘अनुभव’, ‘पुढे काय’? या शीर्षकांमधूनही केतन यांचा प्रवास जाणवतो. त्यांचे सर्जरीचे अनुभव, पेशंट्सबरोबर असलेले नातेसंबंध, त्यांच्याविषयीची त्यांची बांधीलकी याविषयीचे सर्व अनुभव वाचकाला भारावून टाकतात. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांमधून कुटुंबातले केतन यांचा परिचय होतो. वडिलांच्या लेखातून केतन यांनी स्वतःविषयी न सांगितलेल्या गोष्टी समजतात. त्यांचा व्यासंग, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा स्वभाव या सा-याची ओळख अॅड. श्रीपाद खुर्जेकर यांनी अतिशय अभिमानाने करून दिली आहे.

केतन यांची आई जया खुर्जेकर यांनी लिहिलेला लेख केतन यांच्या डॉक्टर होण्याची पूर्वपीठिका सांगतो. केतन यांच्या आईला झालेला अपघात हा त्यांच्या डॉक्टर होण्याला कारणीभूत ठरला. तसंही त्यांच्या आईला वाटत होतं, की केतन यांनी डॉक्टर व्हावं. खरं तर केतन यांनी डॉक्टर होण्याआधी लॉ कॉलेजमधे पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु आईचा अपघात झाला आणि केतन यांच्या डॉक्टर होण्यावर नियतीने जणू काही शिक्कामोर्तबच केले. केतन यांचे भाऊ हर्षद यांनी आपल्या भावाविषयी लिहिताना केतन यांचं स्पाईन सर्जरी आणि रिसर्च सेंटरचं स्वप्न अपुरं राहिलं याविषयी खंत व्यक्त केली असली तरी डॉक्टर म्हणून तो ‘हाडाचा डॉक्टर’ कसा होता याविषयी सांगितलं आहे. शेवटी केतन यांच्या सासूबाईंनी आपल्या आदर्श जावयावर लेख लिहिला आहे. केतन यांच्या पत्नी देवारती या रेडिओलॉजिस्ट आहेत. मुली तेजसी आणि ऋषिदा अजून शिक्षण घेत आहेत. आपल्या बाबांच्या स्मृती मनात जपत त्या यशस्वी वाटचाल करत आहेत.

अकाली मृत्यूने डॉ. केतन यांना शरीराने जरी सगळ्यांपासून दूर नेलं असलं तरी वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि कुटुंबात त्यांच्या वात्सल्यपूर्णतेने ते चिरंजीवच आहेत. कारण पुढे येणा-या पिढीसाठी ते एक उत्तम प्रेरणा देणारे वैद्यकीय आदर्श आहेत. म्हणूनच त्यांना ‘कैलासवासी’ डॉ. केतन याऐवजी ‘चिरंजीव’ डॉ. केतन खुर्जेकर असंच म्हणणं उचित ठरतं.

पुस्तकाचं नाव : कणाकणाने

लेखन : डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर.

शब्दांकन : अभय इनामदार

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

पृष्ठं : १७४, मूल्य : २५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com