esakal | आपण धडा घेणार का ? (डॉ. अरुण अडसूळ)
sakal

बोलून बातमी शोधा

Dr-Arun-Adsul

शाळा आता सुरू होतील, पण महाविद्यालयाचे त्रांगडे अजून सुटलेले नाही. काहीजणांच्या परीक्षा झाल्या त्याचा निकाल लागला तरी काही नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. महाविद्यालयीनं स्तरावरच्या शिक्षणाबाबत आणि तिथल्या परीक्षांबाबत आता सरकारला आणि शिक्षणक्षेत्रातल्या धुरिणांना वेगळा विचार करावा लागेल. याबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी केलेलं चिंतन...

आपण धडा घेणार का ? (डॉ. अरुण अडसूळ)

sakal_logo
By
डॉ. अरुण अडसूळ saptrang.saptrang@gmail.com

शाळा आता सुरू होतील, पण महाविद्यालयाचे त्रांगडे अजून सुटलेले नाही. काहीजणांच्या परीक्षा झाल्या त्याचा निकाल लागला तरी काही नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. महाविद्यालयीनं स्तरावरच्या शिक्षणाबाबत आणि तिथल्या परीक्षांबाबत आता सरकारला आणि शिक्षणक्षेत्रातल्या धुरिणांना वेगळा विचार करावा लागेल. याबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी केलेलं चिंतन...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या देशात या वर्षीच्या मार्चमध्ये कोरोनाची चाहूल लागली अन् सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं. सरकारनं आपल्या परीनं सर्व ते प्रयत्न करण्यास सुरुवात केली. साथीच्या भीतीनं जनतेनं सरकारच्या सर्व आदेशांचं पालन केलं. लॉक -डाऊनमुळं वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे प्रश्न डोके वर काढू लागले,  विशेषतः ज्या क्षेत्रात काही बाबतीत विनाविलंब  कालबद्ध कृती करणे गरजेचे होते त्या क्षेत्रात प्रश्नांचे रूपांतर समस्येत होत गेले. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही.

शिक्षण क्षेत्रात अध्ययन - अध्यापन आणि परीक्षा या बाबतीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मागील शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा, प्राप्त परिस्थितीत कशा पार पाडायच्या यावर अनेक मतप्रवाह आले. ब-याच  विद्यापीठांच्या संबंधित अधिकार मंडळांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीनं परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पर्याय म्हणून  शिक्षण क्षेत्रातील  काही अनुभवी व्यक्तींनी तोंडी परीक्षा घेण्यात याव्यात असे सुचवले होते, कारण विद्यापीठांच्या संबंधित अधिकार मंडळांनी घेतलेला ऑनलाइन परीक्षेचा निर्णय काही गृहीतकांवर आधारीत होता, असे त्यांचे मत होते.

एकाच बाबतीत अनेक व्यक्ती जेव्हा आपली गुणवत्ता अजमावून पाहण्याची अपेक्षा करतात तेव्हा ‘परीक्षा’ घेण्यात येते. ओघानेच यामध्ये गुणवत्तेच्या पातळीची तुलना होते. सहजीवनात सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखावयाचे असेल तर या मूल्यमापनाची पद्धती जाणीवपूर्वक अचूक आणि न्याय्य असली पाहिजे. तात्पर्य परीक्षा हा विषय सामाजिकदृष्ट्या   संवेदनशील असल्यानं गांभीर्यपूर्वक हाताळणे अत्यावश्यक असते. या बाबतीत परीक्षार्थींचा वयोगट विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.  संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत वयोगटानुरूप  मानसशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावत असते.

अध्ययन - अध्यापन प्रक्रिया जशी  ज्ञानदानाबरोबरच व्यक्तीच्या व्यक्तित्वाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असते, तशी व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यातही मोलाची कामगिरी  बजावते. परीक्षा घेण्याचा मूळ उद्देश हा सदर व्यक्तीच्या  ज्ञानाच्या आणि कौशल्य पातळीत काही सकारात्मक वाढ झाली आहे का? याची पडताळणी करणे हा असतो, आणि म्हणून परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ज्ञानार्जन, कौशल्यार्जन करू इच्छिणरांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. अन्यथा भविष्यात अनर्थ अटळ ठरतो.

कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात विद्यापीठ परीक्षा, हा विषय अचूक पद्धतीने  हाताळणे ही जबाबदारी परीक्षेशी संबंधित असणाऱ्या कार्यालयांची / विभागांची होतीच पण शिक्षणसंस्थेमधील सर्व घटकांची आणि शिक्षित पालकांचीही होती. या जबाबदाऱ्यां संबंधितांनी योग्य पद्धतीने पार पाडल्या असत्या तर परीक्षा प्रामाणिकपणे  दिल्याचं सात्त्विक समाधान जसे परीक्षार्थींना मिळाले असते तसे परीक्षा न्याय्य पद्धतीने पार पाडल्याचे आंतरिक  समाधान विद्यापीठ आणि  शैक्षणिक संस्थेमधील जबाबदार घटकांनाही मिळाले असते.

परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठांनी घोषित केला तो तीन गृहीतकांवर आधारीत होता.
१) सर्व परीक्षार्थींकडे आवश्यक  सुविधा उपलब्ध आहेत.
२) सदर परीक्षा - पद्धतीचे परीक्षार्थींना तसेच इतर घटकांना पुरेसे ज्ञान आहे.
३) सर्व परीक्षार्थी आपल्या भूमिकेचा धर्म योग्य पद्धतीने  निभावतील.
परीक्षा पद्धत घोषित होताच काही परीक्षार्थींनी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी केल्या आणि चूक लक्षात येताच पर्याय म्हणून  ज्यांना ऑफलाइन पध्दतीनं परीक्षा द्यावयाची आहे त्यांची त्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल असे विद्यापीठांनी  घोषित केले. तात्पर्य एकाच वर्गातील परीक्षार्थींची दोन  वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्यात आली, आणि परीक्षा "न्याय्य पद्धतीने" पार पाडल्याचे दाखवून दिले.

‘ज्या परीक्षार्थींनी आपले संपूर्ण ‘ज्ञान’ आणि ‘कौशल्य’ पणाला लावून ऑनलाइन परीक्षा दिली त्यांनीही सात्त्विक समाधानाचा'' निखळ आनंद मिळविला. ऑफलाइन परीक्षांचे आयोजन आणि व्यवस्थापन अचूक पद्धतीने पार पडल्याचे सर्वज्ञात आहेच. तात्पर्य परीक्षा देणारे आणि परीक्षा घेणारे दोन्ही घटक जबाबदारीतून मुक्त झाले. परीक्षा/मूल्यमापन शब्दांशी आपणाकडून कसलीच प्रतारणा न होता आणि मूलभूत उद्देशाला कसलाच धक्का न लागता, आपण यशस्वी ठरलो. संबंधित परीक्षांचे निकाल जाहीर झाले, ऑनलाइन परीक्षा दिलेले परीक्षार्थींचे सर्व श्रम कामी आले, पर्यवेक्षक नसतानाही परीक्षा यशस्वी पद्धतीने हाताळता येतात आणि गुणवत्तेत फरक पडू शकतो हे विद्यापीठांना आणि  शैक्षणिक संस्थांना कळून चुकले. 

सर्व परीक्षार्थींच्या या परीक्षा आपल्याला ‘तोंडी परीक्षा’ पद्धतीने घेणे सहज शक्य  होते. महाविद्यालयांत सूत्रबद्ध पद्धतीने अत्यंत अचूक नियोजन करून कामाचे योग्य वाटप करून आणि ''स्पर्धा परीक्षांची तार्किकता'' वापरून हे शक्य होते. शैक्षणिक संस्थेमधील सर्व घटकांना आपले योगदान देता आले असते. परीक्षार्थींना आपल्या गुणवत्तेची सत्य पातळी समजली असती. झाल्या प्रकाराच्या ज्या पद्धतीच्या चर्चा होत आहेत या झाल्याच नसत्या.  आभासी गुणवत्ता  कुणालाच  समाधान देत नाही, पण हे वेळ निघून गेल्यावर समजते.

काळाच्या ओघात ऑनलाइन परीक्षा पद्धत आपणाला स्वीकारावीच लागेल यात तीळमात्रही शंका नाही, पण या नव्याने येवू घातलेल्या  परीक्षा पद्धतीचे सर्व थरावर आकलन होणे गरजेचे वाटते. सुविधा बाहेरून  पुरविण्यात येतील पण विश्वासार्हता ‘आतूनच’ अपेक्षित असेल. जबाबदारीतून मुक्त झाल्याचे सात्त्विक समाधान कुणाला मिळाले ? सर्व थरावर साधनशुचिताविरहित व्यवहार फक्त पाळला गेला,आणि तोही  शिक्षणक्षेत्रात, हे केवळ सत्य.

पण यातून आपल्याला खूप शिकण्याची संधी मिळाली. संवेदनशील परिस्थितीत हा नवा प्रयोग करणे योग्य होते का?. पर्यवेक्षक व नियंत्रण नसताना ऑनलाइन परीक्षा घेणे योग्य होते का? योग्य नियोजन करून सर्व परीक्षार्थींची ऑफलाइन  परीक्षा  घेणे शक्य नव्हते का? परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन, अधिकार मंडळाचा यथोचित मान राखून, शिक्षण  क्षेत्रातील इतर अनुभवी  व्यक्तींशी खुली चर्चा करणे शक्य नव्हते का? गृहीतकांची खातरजमा/पडताळणी न करता निर्णय घेणे योग्य होते का ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला  बरेच काही शिकवून जातील. परिस्थिती निभावून नेली असली तरी, संभाव्य परिणाम कालौघात संबंधितांना वेळोवेळी जाणीव करून देत राहतील असे वाटते.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top