कर्करोगाचा स्वभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Avinash Supe writes about nature of cancer

कर्करोग लवकर ओळखला गेला आणि त्यावर उपचार केले गेले, तर रुग्ण जास्त काळ जगतात. प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्करोगदेखील वेगळा असतो.

कर्करोगाचा स्वभाव

- डॉ. अविनाश सुपे

कर्करोग लवकर ओळखला गेला आणि त्यावर उपचार केले गेले, तर रुग्ण जास्त काळ जगतात. प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्करोगदेखील वेगळा असतो. जर बायोप्सी आणि विविध मार्करचा अभ्यास केला, तर आपल्याला कर्करोगाच्या स्वरूपाचा अंदाज येतो. त्यानुसार उपचार घेतल्यास कर्करोगाशी लढून आपण सामान्य जीवन जगू शकतो.

ही घटना आहे १९८६ ची. एका शाळेतील सुनीता नावाच्या शिक्षिका आमच्या युनिटमध्ये उजव्या स्तनात जडपणा असल्यामुळे माझ्याकडे आल्या. त्यांची तपासणी केली तेव्हा कळले की, त्यांच्या उजव्या स्तनात चार सेंमी एवढी मोठी गाठ आहे. पुढील तपासणी आणि सायटोलॉजीवर कळले की, तिला स्तनाचा कर्करोग आहे. सर्व चाचण्यांनंतर तिला शस्त्रक्रियेसाठी नेले. कर्करोगासह स्तन काढून टाकले. ऑपरेशननंतर तिला आवश्यक केमोथेरपीदेखील देण्यात आली. केमोथेरपीच्या १२ चक्रानंतर ती बरी झाली आणि ती शाळेत परत जाऊ लागली.

सुनीता दर वर्षी आणि नंतर दर दोन वर्षांनी आमच्याकडे पाठपुरावा करत असत. नियमितपणे बोन स्कॅन, मॅमोग्राफी स्कॅन आणि इतर चाचण्या करायच्या. सकारात्मक वृत्तीच्या व आनंदी होत्या आणि या आजारासोबत चांगल्या पद्धतीने जगत होत्या. पुढे २००३ च्या सप्टेंबरमध्ये, त्यांनी सांगितले की, त्यांच्या दुसऱ्या स्तनात आणखी एक गाठ आहे. तपासणी केली आणि आढळले की दुसऱ्या स्तनांमध्येदेखील कर्करोग आहे. आम्ही त्या स्तनावरदेखील शस्त्रक्रिया केली आणि नंतर पुन्हा केमोथेरपी दिली. त्या पुन्हा दोन वर्षांनी बऱ्या झाल्या आणि आजपर्यंत आमच्याबरोबर आहेत. त्या आमच्याकडे नियमितपणे येतात. जवळजवळ ३६ वर्षे उलटून गेली. आता निवृत्त झाल्या आहेत आणि आयुष्याचा आनंद त्या त्यांचे मुले आणि नातवंडांसोबत घेत आहेत.

दरम्यानच्या काळात २००७ मध्ये त्यांचा नवरा आमच्याकडे आला आणि त्याच्या पोटात दुखत होते आणि अस्वस्थता होती म्हणून आम्ही त्याची एंडोस्कोपी केली. स्कोपीमध्ये त्याच्या पोटात गाठ झाल्याचे दिसून आले. बायोप्सी घेतल्यावर लक्षात आले की, त्याची बायोप्सी पोटाचा कर्करोग दाखवत होता. इतर आवश्यक तपासणीनंतर त्याला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले आणि पोटाचा तो भाग पुरेसा काढून टाकण्यात आला. महिनाभरानंतर केमोथेरपी सुरू झाली, मात्र त्याची प्रकृती झपाट्याने खालावली आणि सहा महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. त्याला कोणतेही व्यसन नव्हते. आता प्रश्न येतो की, एका रुग्णाचा कर्करोग सहा महिन्यांत झपाट्याने वाढतो आणि मृत्यूला कवटाळतो. दुसरा रुग्ण दोन कर्करोगावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ३६ वर्षांनंतरही आनंददायी जीवन जगतो.

आपण हे समजून घेतले पाहिजे की, कर्करोगाची अवस्था, प्रकार आणि जैविक वर्तन ( Biological behaviour) असते. प्रत्येकाला माहीत आहे की, जर कर्करोग लवकर ओळखला गेला आणि त्यावर उपचार केले गेले, तर रुग्ण जास्त काळ जगतात. प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्करोगदेखील वेगळा असतो. असे अनेक प्रकारचे कर्करोग आहेत जे चांगले वागतात आणि काही वाईट वागतात. जर तुम्ही बायोप्सी आणि विविध मार्करचा अभ्यास केला, तर आपल्याला कर्करोगाच्या स्वरूपाचा अंदाज येतो. जर कर्करोग well differentiated, low grade आणि त्यांचे लवकर निदान झाले, तर ते हळूहळू वाढतात व रुग्ण अनेक काळ जगतो. त्याविरुद्ध काही कर्करोग खूप वेगाने वाढतात आणि रुग्ण काही महिन्यांत मृत्यूला कवटाळतात.

उदाहरण द्यायचे झाले, तर स्तनाचा कर्करोग, थायरॉईड पॅपिलरी, त्वचेचा कर्करोग यांचे लवकर निदान झाले आणि त्यावर योग्य उपचार केले गेले, तर ते रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात; पण अन्ननलिका किंवा पोटाच्या कर्करोगासारखे इतर कर्करोग उशिरा आढळल्यास रुग्ण फार काळ जगू शकत नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, आपल्या देशात पोटाचा कर्करोग खूप उशिरा आढळतो आणि तेथे रुग्णांचा मृत्यू तीन ते सहा महिन्यांत होतो. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये, बरेच बदल झाले आहेत आणि नवीन उपचारांमुळे रुग्ण जास्त काळ जगू शकतात. जेव्हा कर्करोग आढळतो तेव्हा हार मानू नये. योग्य ऑन्कोलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. नवीन उपचार महाग आहेत; परंतु अनेक संस्था आणि ट्रस्ट रुग्णालये सवलतीच्या दरात औषधे देतात जी सामान्य माणसाला परवडतील.

एके काळी, रक्ताच्या कर्करोगात ल्युकेमिया आणि लिम्फोमासारखे आजार म्हणजे मृत्यू समजत असत. ल्युकेमिया हा काही दिवसांत जवळजवळ मृत्यू मानला जात होता; परंतु आज नवीन उपचारांमुळे ८५ ते ९० टक्के ल्युकेमिया रुग्ण बरे होतात. सामान्य माणसासारखे जगतात. त्यामुळे जेव्हा एखाद्याला कर्करोगाचे निदान होते तेव्हा निराश होऊ नका. आशा सोडू नका. प्रत्येक कॅन्सरचा स्वतःचा एक स्वभाव असतो आणि आपण त्याकडे आपल्या विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. सर्व तज्ज्ञांबरोबर निर्णय घेतला पाहिजे आणि शेवटी त्यांच्या निर्णयानंतर त्यानुसार आपण उपचार केले पाहिजेत.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Web Title: Dr Avinash Supe Writes About Nature Of Cancer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..