आयुर्वेद, एक संजीवन शास्त्र

अनेक आयुर्वेदाचार्यांनी वर्षानुवर्षे आयुर्वेद उपचार पद्धती पडताळून पाहिली.
Ayurveda
AyurvedaSakal
Summary

अनेक आयुर्वेदाचार्यांनी वर्षानुवर्षे आयुर्वेद उपचार पद्धती पडताळून पाहिली.

- डॉ. अविनाश सुपे

अनेक आयुर्वेदाचार्यांनी वर्षानुवर्षे आयुर्वेद उपचार पद्धती पडताळून पाहिली. या आयुर्वेदाचे आवश्‍यक ते प्रशिक्षण घेतले तर ही उपचार पद्धत एक संजीवन शास्त्र ठरू शकते...

एखादा रुग्ण येतो त्या वेळी आम्ही वैद्यकीय शास्त्राप्रमाणे उत्तमातील उत्तम उपचार देण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक वर्षांपूर्वी असेच तीन रुग्ण केईएममध्ये आले. हे टाटा कंपनीत इंजिनिअर होते. सांगलीमध्ये राहणारे. हे सगळे जण हिमालयामध्ये ट्रेकिंगला गेले होते आणि त्या मोहिमेत वादळामध्ये ३६ तास बर्फात अडकून राहिले. ते जगले तर खरे; परंतु त्या वेळी त्यांच्याकडे योग्य साधने नसल्यामुळे त्यांच्या पायांना फ्रॉस्ट बाईट (हिमबाधा) झाली. यात बर्फात फार काळ राहिल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्ताभिसरण होत नाही. आपण गरम कपडे घालून पायांना संरक्षण दिले नाही तर बोटांच्या बाजूचा भाग काळा पडू लागतो. शरीराचा तो भाग सडू लागतो. यालाच आपण गँगरीन म्हणतो. तसे त्यांना झाले होते.

तिघांच्या पायाचा काही भाग व बोटे काळी पडली होती. ते उपचारांसाठी जिथे जिथे गेले तिथे सर्वांनी त्यांना बिलो नी ॲम्प्युटेशन म्हणजे गुडघ्याखालील पाय काढून टाकणे (बाधित भागाचे विच्छेदन) हा उपचार सुचवला होता. ते इंजिनिअर होते आणि अशी बोटे किंवा पाय कापून घेण्याची त्यांची तयारी नव्हती. ते आमच्या युनिटमध्ये आले. आम्ही नेहमीचे सर्व उपचार केले. त्यामुळे त्यांचा रक्तपुरवठा थोडा वाढला, पण दहा दिवस झाले तरी त्यांच्या पायामध्ये फार फरक झाला नाही. त्यामुळे ॲम्प्युटेशन करावे लागेल, असे आमचे सर्वांचे मत होते.

डॉक्टर समसी यांनी आयुर्वेदाचाही अभ्यास केला होता. त्यांच्या गुरूंनी त्यांना काही वनऔषधे असलेली पाने दिली होती. त्या वनस्पतीची पाने एकत्र घोटून त्याचा लेप लावण्याची ही पद्धत होती. डॉक्टर समसी यांनी त्या इंजिनिअरबरोबर याबाबत चर्चा केली. त्यांनी असे उपचार एक शेवटचा उपाय म्हणून करण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे डॉक्टर समसी रोजचा राऊंड संपला की लेप लावून त्या तिघांचे ड्रेसिंग करत असत. ते बघून आम्हाला थोडे हसू येत असे. डॉक्टर समसीसारखे अत्यंत अनुभवी ॲलोपॅथीचे प्राध्यापक इतक्या गंभीर परिस्थितीतील या रुग्णांवर चिकाटीने हा प्रयोग करत होते, पण डॉक्टर समसी अत्यंत मोकळ्या मनाने आणि विश्वासाने उपचार करत होते. सर म्हणत होते, की उपचार करून बघायला काय हरकत आहे? या औषधाची पडताळणी होईल. त्यांचा गुरूंवर विश्वास होताच. त्याशिवाय यात धोकाही नव्हता. कारण ॲलोपॅथीप्रमाणे पाय कापणे अनिवार्य होते. हा प्रयोग त्यांनी महिनाभर नियमितपणे केला. हळूहळू पायाचा काळेपणा निघून गेला. त्यांच्या बोटाचा अगदी थोडा भाग काढावा लागला; पण त्यांचे पाय वाचले. ते इंजिनिर्स चालत घरी गेले. देवाने दिलेल्या शरीराचा प्रत्येक भाग किती महत्त्वाचा आहे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आनंद काय असतो हे आम्ही त्या निमित्ताने पाहिले. धडधाकट शरीर हा देवाने दिलेला अमूल्य खजिना आहे आणि तो जपला पाहिजे. ते तीन इंजिनिअर्स अत्यंत आनंदी आणि भारावून गेले. डॉक्टर समसीबद्दल तर त्यांना प्रचंड आदर वाटला.

आपली भारतीय विविध औषधशास्त्र परंपरा किती थोर आहे, याची आम्हाला जाणीव झाली. अनेक आयुर्वेदाचार्यांनी वर्षानुवर्षे पडताळून पाहिलेले व अनेक युगे चालू असलेले हे पारंपरिक ज्ञान व उपचारांचे शास्त्र किती श्रीमंत आहे, याचीही प्रचिती आली. आज आयुर्वेदाचा योग्य तो उपयोग केला जात नाही. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदाचार्याच्या सल्ल्याने या उपचार पद्धतीचा वापर केला पाहिजे. डॉ. रवी बापट आणि प्रख्यात लेखिका डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी आयुर्वेदाच्या प्राचीन शास्त्रात संशोधन होत राहण्यासाठी केईएम रुग्णालयात आयुर्वेद रिसर्च सेंटर स्थापन केले. डॉ. डहाणूकर यांनी एक अभ्यासपूर्ण लेख ब्रिटिश पार्लमेंटमध्येदेखील सादर केला होता. नवीन पिढीतील आयुर्वेदिक डॉक्टर्सनी याबाबत पुढाकार घेऊन या पुरातन शास्त्राविषयी आदर बाळगून, योग्य ते संशोधन करून यथायोग्य वापर केला पाहिजे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com