कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

आमच्या लहानपणी सरकारी वसाहतीमध्ये सर्वच उत्सव फार उत्साहात साजरे व्हायचे. त्यातही होळी, धुळवड आणि दहीहंडीला मुलांचा फार जोश असायचा.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

- डॉ. अविनाश सुपे

उत्सव आणि उत्साह हा आनंदासाठी असावा, कोणाचे निष्पाप आयुष्य त्यासाठी पणाला लागू नये. एखाद्या राजकीय पक्षाला, व्यक्तीला किंवा सामाजिक संघटनेला फायदा होताना एखाद्या तरुण मुलाचे आयुष्य वाया जाणे हे योग्य नाही. यासाठी सावधानता, सुसूत्रता आणि सुरक्षितता ही त्रिसूत्री आपण अंगिकारली पाहिजे.

आमच्या लहानपणी सरकारी वसाहतीमध्ये सर्वच उत्सव फार उत्साहात साजरे व्हायचे. त्यातही होळी, धुळवड आणि दहीहंडीला मुलांचा फार जोश असायचा. तयारी काही दिवस आधीच सुरू होत असे. खाडीजवळून लाकडे गोळा करून सुकवणे आणि भरीला बाहेरून लाकडे आणून दणक्यात होळी पेटवली जायची. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी सकाळपासून सुरू व्हायची. राख आणि विविध रंगाने रंगलेल्या मुलांना पालकसुद्धा ओळखू शकणार नाहीत, असा अवतार होत असे. मग जवळच्या टाकीच्या पाण्याने किंवा समुद्रस्नानाचा आनंद घेत आम्ही मूळ रूपात येत असायचो. असाच उत्साह दहीहंडीत असायचा. त्यावेळीसुद्धा आम्ही दोन ते तीन मजल्यापर्यंत हंडी बांधून ती रितसर फोडली जायची. मी उंच आणि बारीक असल्यामुळे हंडी फोडत असे.

पुढे मोठा होऊन केईएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभाग, शल्यचिकित्सा विभागात आल्यावर या दोन्ही सणांचे वेगळेच रूप मी पाहिले. आपत्कालीन विभाग, शल्यचिकित्सा विभागात हे दोन उत्सव म्हणजे विलक्षण गर्दी आणि धावपळीचा दिवस-रात्र असायची. निवासी डॉक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्याच रविवारी माझ्या वॉर्डमध्ये ५० नवीन रुग्ण आले होते. होळी सुरू झाल्यावर आमच्याकडे जळलेल्या, भाजलेल्या केसेस येऊ लागत. कोणाचा हात, कोणाचा पाय, कोणावर निखारा पडलेला, कोणाचे कपडे पेटले असे रात्रभर काम सुरू असे. ड्रेसिंग, इंजेक्शन्स, लहान मुलांना दाखल करून घेणे, नोंदी ठेवणे, अशी अनेक कामे असत.

दुसऱ्या दिवशी वेगळाच माहोल असे. धुळवडीच्या दिवशी सकाळी थोडी उसंत मिळते न मिळते तोपर्यंत डोळ्यात रंग गेलेले, कानात रंग गेलेली मुले येऊ लागत. मोठ्यांची सकाळी कमी गर्दी असे. यामध्ये मारामारीमुळे जखमा, डोके फुटणे, फ्रॅक्चर इत्यादी रुग्ण असतात. दारूची किंवा भांगेची नशा जशी उतरू लगे तसतसे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येऊ लागत आणि संध्याकाळी, रात्री पुन्हा धावपळ सुरू होई. दहीहंडीच्या वेळी पडझड झाल्यामुळे फ्रॅक्चर व मार लागलेले रुग्ण येतात.

पूर्वी दहीहंडी हा उत्सव जास्त करून मुंबई, पुणे येथे असे, पण आता तो सर्व शहरे आणि गावागावांतून सुरू झाला आहे. या वर्षीपासून त्याला खेळ म्हणून सरकार मान्यता प्राप्त झाली आहे. आता तो फार उत्साहाने आणि चुरशीने खेळला जातो. पूर्वीच्या काळी त्याला धार्मिक स्वरूप होते आणि लहान मुलांना कृष्णाच्या कपड्यात सजवून तो साजरा करीत. घरी किंवा अंगणात छोटी हंडी बांधून ती फोडली जात असे. आता त्याला व्यावसायिक रूप आले. क्रेनने हंडी बांधली जाते. यासाठी अनेक संघ, संस्था मुलांना गोळा करून त्यांना ट्रकमधून शहरभर फिरवले जाते. राजकीय पक्षदेखील त्यांना भरपूर साह्य करतात. ट्रकमधून खाण्याच्या पुड्या, जेवण, पाणी आणि टी-शर्ट वाटली जातात. हा आता खर्चिक सोहळा झाला आहे. लाखो रुपयांची उलाढाल होते. हजारो रुपयांची बक्षिसे वाटली जातात, पण काही वेळा पुढचे चित्र फार विदारक असते.

दहीहंडीच्या दोन दिवस आधी केईएम रुग्णालय आणि इतर सरकारी रुग्णालयांत खास कक्ष तयार केला जातो. येणाऱ्या रुग्णांवर तात्काळ इलाज करण्यासाठी वेगळे कक्ष, रक्त आणि इतर सर्व सामग्री तयार ठेवली जाते. शल्यचिकित्सा विभागात सर्वांच्या कामाच्या वेळा निश्चित केल्या जातात. दहीहंडीच्या दिवशी संध्याकाळपासून विविध प्रकारचे रुग्ण म्हणजे तरुण मुले येऊ लागतात. हाताचे, पायाचे हाड मोडलेले, बेशुद्ध झालेले किंवा मार लागलेले. सर्वात वाईट म्हणजे उंचावरून पडल्यामुळे मान दुमडून पक्षाघात झालेले. क्वड्रॉप्लेजिया (Quadripledgia) म्हणजे मानेच्या खाली हाता-पायामध्ये संवेदना नष्ट झालेले, पाठीच्या कण्याला दुखापत झालेले असे दोन ते तीन तरी जखमी मुले प्रत्येक वर्षी मोठ्या रुग्णालयात येतात. ही सर्वात वरच्या फळीतील मुले असतात. खालच्या फळीतील मुलांवर वरची मुले अंगावर पडल्यामुळे होणारे अपघात असतात.

नेहमीचे दृश्य आहे की, पहिल्या दिवशी त्या मुलाला ५० ते ६० मुलांचा घोळका घेऊन येतो. जसजसा वेळ जाऊ लागतो तसतसे हळूहळू सर्व निघून जातात. दुसऱ्या दिवशी राजकारणी, समाजकारणी येतात. सर्व खर्च सरकारी रुग्णालयातर्फे केला जाईल आणि इतर सर्व मदतीची आश्वासने देऊन निघून जातात. डीनना भेटून विशेष लक्ष देण्याची आणि उपचार मोफत करण्याची सूचना करतात. त्यांचे जे संघ असतात त्यांचीही मदत तुटपुंजी असते. काही दिवस गेल्यानंतर जेव्हा रुग्णाच्या परिस्थितीत फार सुधारणा होत नाही, असे दिसते तेव्हा इतरांचे येणे कमी होत जाते आणि त्या मुलाच्या जवळ फक्त त्याची गरीब आई किंवा बहीण रात्रंदिवस उभी असते. एकुलता एक मुलगा हा असा आजारी पडतो व कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यावेळी त्याची मदत कोणीही करत नाही. अशा रुग्णांना भेटताना त्यांच्या चेहऱ्यावरची अगतिकता मनाला खोलवर जखम करून जाते. माझ्या रुग्णालयाच्या सर्व काळात आयुष्यातून उठलेली अनेक मुले पाहिली आहेत. या वर्षीसुद्धा एका मुलाचा मृत्यू आणि काही मुलांना जखमा झाल्या. कोणाच्या सामाजिक, राजकीय फायद्यासाठी हे पैशांचे खेळ कोणाचा बळी घेऊन खेळले जातात तेव्हा वाटते समाजाने सावध होणे गरजेचे आहे.

सण, उत्सव जरूर साजरे करावेत, त्यातील धाडस हे समजून घेऊन करणे आवश्यक आहे. आपण सावध असले पाहिजे. प्रत्येक वेळी अशा खेळांमध्ये अशा घटना होऊ शकतात, याची जाणीव ठेवून यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा योग्य रकमेचा विमा काढला पाहिजे. केवळ विमा उतरवून काम संपत नाही. या इजा कशा टाळू शकू हे पाहिले पाहिजे. आगीपासून वाचण्याचे जसे नियम आहेत तसे हेल्मेटचा वापर, जमिनीवर मॅट, प्रशिक्षण या सर्व गोष्टी सणापूर्वी बंधनकारक करायला हव्यात. त्यांना याबाबतचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले गेले पाहिजे. बऱ्याच वेळा बक्षिसाचे पैसे या मुलांना मिळतही नाहीत. असे जीवावर बेतणारे अपघात झाले तर त्याबद्दलची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या सर्वांबाबत मुलांनी, आयोजकांनी जागरूक व्हावे, एक व्हावे.

दिवाळीत होणारे अपघातदेखील आपण या २१व्या शतकात तरी टाळणे आवश्यक आहे. उत्सव आणि उत्साह हा आनंदासाठी असावा, कोणाचे निष्पाप आयुष्य त्यासाठी पणाला लागू नये. एखाद्या राजकीय पक्षाला, व्यक्तीला किंवा सामाजिक संघटनेला फायदा होताना एखाद्या तरुण मुलाचे आयुष्य वाया जाणे हे योग्य नाही. यासाठी सावधानता, सुसूत्रता आणि सुरक्षितता ही त्रिसूत्री आपण अंगिकारली पाहिजे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)