आरोग्यउपचाराचा खर्च वजा बाकी!

आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या अशा आजाराचे निदान होते, की त्याच्या उपचारासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालावी लागते.
Health Treatment Expenditure
Health Treatment Expendituresakal
Summary

आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या अशा आजाराचे निदान होते, की त्याच्या उपचारासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालावी लागते.

- डॉ. अविनाश सुपे

आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या अशा आजाराचे निदान होते, की त्याच्या उपचारासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालावी लागते. त्यातही जगण्याची शक्यता किती, यावर प्रश्‍नचिन्ह लागते. काही रुग्ण आणि नातेवाईक घरदार विकून उपचार करतात; पण रुग्ण वाचत नाही. उपचारात सर्व संपत्ती खर्च झालेली असते. त्यामुळे रुग्णांच्या मागे असणाऱ्याच्या वाट्याला अकाली गरिबी येते...

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एकदा ओपीडीमध्ये होतो. आमच्या रुग्णालयात काम करणाऱ्या एक वरिष्ठ प्राध्यापिका माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, की सर मला तुमचा सल्ला पाहिजे. त्यांना मी विचारले, काय सल्ला हवा आहे? त्या म्हणाल्या, ‘माझे वडील आता ८७ वर्षांचे आहेत. त्यांना पुढच्या टप्प्यातला मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे. आता तो यकृत आणि संपूर्ण आवरणात पसरला आहे. त्यात त्यांची दोन वेळा सर्जरीही झाली आहे. आता तो एवढा पसरला आहे, की त्यातून ते बरे होण्याची शक्यता अगदी कमी आहे... त्यांना मधुमेह व रक्तदाबसुद्धा आहे. त्याना हृदयविकाराचा एक झटका येऊन त्यांची अँजिओप्लास्टीसुद्धा झाली आहे.’ मी विचारलं, आता पुढे काय शंका आहेत? त्या म्हणाल्या, ‘डॉक्टरांनी वडिलांना किमोथेरेपी देण्यास सांगितले आहे. त्या प्रत्येक किमोथेरेपीची किंमत अडीच लाख रुपये आहे. १२ ची सायकल आहे. मला कल्पना आहे, की यातून ते जगणार नाहीत, परंतु हे करत असताना त्यांचे सर्व पैसे जर खर्च झाले, तर माझ्या आईसाठी काहीही पैसे राहणार नाहीत. त्यांच्यासाठी सर्व करायला पाहिजे; पण ते करून फारसा फायदा होणार नाही. अशा वेळी मी वडिलांना काय सल्ला द्यावा आणि ते माझ्याकडून किंवा इतरांकडून पैसे घ्यायला तयार नाहीत.’

अशा प्रकारचे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येतात. बरेचदा रुग्ण डायलिसीसवर असतो किंवा एखाद्या रुग्णाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालेली असतात. डायलिसीसमध्येच त्यांचे खूप पैसे खर्च होतात. घर विकले जाते. बँक बॅलन्स संपतो. अशा वेळी रुग्णाचा काही महिन्यांनी मृत्यू होतो; पण, जे मागे राहिलेले असतात त्यांच्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही. रुग्णाचे नातेवाईक गरीब होतात. अनेकांनी त्यांची घरे, शेतजमिनी विकल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळातही आपण हे अनुभवले आहे.

आपल्या जवळच्या माणसाला काही झाले तर त्यांनी जगावे ही इच्छा असते आणि ती योग्यच आहे. परंतु हे सर्व करत असताना त्याच्या जवळच्या व्यक्तींनी आणि रुग्णांनीही आजाराची दिशा कुठे आहे, हे ओळखणे गरजेचे आहे. या आजारात किती टक्के यश आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर व आपल्या कुटुंबीयांच्या पुढच्या भवितव्यावर काय परिणाम होणार, याची जाणीव असली पाहिजे. एखाद्याचा आजार खूप जास्त ताणला जातो. काही वेळा तर असे होते, की व्यक्ती उपचारांमुळे काही महिने अधिक जगते; परंतु तो काळ वेदनेचा असतो. बहुतांश काळ रुग्णालयात किंवा आयसीयूमध्ये जातो. अशा गंभीर आजारात, एखादी व्यक्ती किती जास्त जगते त्याचबरोबर कशी जगते, याचाही विचार व्हावा. अर्थात, यात त्या व्यक्तीला कमीत कमी त्रास झाला पाहिजे. सर्व प्रकारचे लक्षणीय/ वेदनाशामक उपचार मिळाले पाहिजेत.

आता प्राध्यापिकेच्या वडिलांना मोठ्या आतड्याचा कर्करोग पुढच्या अवस्थेत होता. त्यांना किमोथेरेपी दिली किंवा नाही दिली तर त्यात फक्त एक किंवा दोन टक्के फरक पडतो. तोही काही दिवसांसाठी. याव्यतिरिक्त किमोथेरेपीचे दुष्परिणाम वेगळेच. मग अशा परिस्थितीमध्ये आहे ते सर्व खर्च करूनही जीव वाचणार नाही. पुढे प्राध्यापिकेच्या आईला आर्थिक अडचणींमध्ये दिवस काढावे लागतील.

जास्त काळ जगणे कठीण आहे, म्हणून महागडे उपचार टाळणे कुठल्याही नातेवाईकांसाठी कठीण असते. भावनाविवश व्हावे लागते. डॉक्टरला तर ते अजूनच कठीण असते. उपचार सुचवले तर उगाचंच महागडी औषधे दिल्याबद्दल टीका होते आणि न दिल्यास जीव वाचवण्याची संधी घालवली असेही आरोप होण्याची शक्यता असते. अशा वेळी डॉक्टर प्रोटोकॉलप्रमाणे सुचवतात, परंतु समजूतदार व्यक्तींनी आणि कुटुंबीयांनी याची चर्चा करून सारासार विचार करूनच योग्य निर्णय घेतला पाहिजे. काही वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टर हा सल्ला देत असत. कारण त्याला कुटुंबाची पूर्ण माहिती असे, पण आज त्यांची संख्या ही बोटावर मोजण्याएवढी राहिली आहे. आर्थिक चिंता नसेल तर अशा केसेसमध्ये उपचार नक्कीच चालू ठेवावेत; परंतु जर माहिती असेल, की यश मिळण्याची फारशी शक्यता नाही, त्या वेळेस समजून-उमजून निर्णय घ्यायला हवा.

(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com