हायवे संमोहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Avinash Supe writes many horrific accidents Mumbai-Pune Expressway

स्त्यांवरील अपघात यावर स्वीडनमध्ये सखोल अभ्यास

हायवे संमोहन

- डॉ. अविनाश सुपे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजवर अनेक भीषण अपघात झाले. त्यात राजकीय नेते, प्रसिद्ध कलावंत यांचे पहाटेच्या वेळी जीव गेले. माझ्या एका सहकाऱ्याची गाडी लोणावळ्याजवळ उलटली. त्याचा मुलगा दीड महिना अतिदक्षता विभागात होता. हे अपघात उत्तररात्री किंवा पहाटे होतात. सकाळी चार ते सहाची वेळ ही गाढ निद्रेची असते. त्यामुळे एक प्रकारची धुंदी डोळ्यावर असते. अशा वेळी अपघात होतो. त्याचे कारण हायवे संमोहन हे असू शकते. हे रोड हिप्नोसिस (हायवे संमोहन) म्हणजे काय, ते जाणून घेऊ.

स्त्यांवरील अपघात यावर स्वीडनमध्ये सखोल अभ्यास करण्यात आला. आपल्याकडे मनमानी पद्धतीने वाहने चालविली जातात. शिस्तीचा अभाव असतो; पण तरीही पुणे, लुधियाना, मुंबई उपनगरात होणारे अपघात त्यामानाने जीवघेणे नसतात. मृत्यूचे प्रमाण कमी असते. आरसे तुटणे, दिवे फुटणे असेच खूप वेळा होते; कारण रस्ते गच्च भरलेले असतात. अगदीच डम्परने गाडीला किंवा माणसांना ठोकर दिली तर मृत्यू होतात. आता मोठमोठे रस्ते भारतभर बनविले जात आहेत. या रस्त्यांवर वेगमर्यादा निश्चित केलेली असते, तरीही ती पाळली जात नसल्याने अपघातात नाहक प्राणहानी होते.

मी पहिल्यांदा जेव्हा युरोपला गेलो तेव्हा हायवे रस्त्यावर आम्ही ६० किलोमीटर अंतर केवळ १५-१६ मिनिटांत संपविले. मला फार कौतुक वाटले होते. युरोपमध्ये काही ठिकाणी वेगमर्यादा नाही, पण कमालीची शिस्त आहे; मात्र अमेरिका या खंडप्राय देशात लांबच लांब रस्ते आहेत, वेगमर्यादा आहे, कॅमेरे लावलेले असतात, मोठा दंड आहे; तरीही अपघात होतात. खूप वेळा हे अपघात रोड हिप्नोसिसमुळे होतात.

एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे रस्ते खूपच लांब, सरळसोट, एकमार्गी, आजूबाजूला सारखे दृश्य असणारे असतात. कित्येक तास तुम्ही कंटाळवाणा प्रवास करीत असता. काही देशात गाड्या स्वयंचलित असतात. आजूबाजूला आवाज जाऊ नये म्हणून पडदासदृश प्लास्टिक लावलेले असते. अशा वेळी वाहनचालकाला केवळ वाहने आणि समोरचा रस्ता दिसत असतो. त्याच त्याच दृश्यामुळे, वेगामुळे त्याला एक प्रकारचे संमोहन होते, बधिरता येते. हिप्नोसिस म्हणजे साधारणत: जाणीव असलेल्या अवस्थेचा अंतर्भाव, ज्यामध्ये एक व्यक्ती स्पष्टपणे आपल्या ऐच्छिक कृतीची शक्ती गमावते. त्यामुळे त्याच्यासमोर काही अचानक आले, की अपघात होतो. हे रोड हिप्नोसिस टाळण्यासाठी काही खबरदारी प्रवाशांनी घेणे फार गरजेचे आहे.

‘रोड हिप्नोटिझम’ उल्लेख १९२१ मध्ये एका लेखात केला होता : एका स्थिर बिंदूकडे टक लावून पाहत असताना ट्रान्ससारख्या स्थितीत वाहन चालवणे. वॉल्टर माइल्सच्या ‘स्लिपिंग विथ द आइज ओपन’ या १९२९ च्या अभ्यासातदेखील या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यात असे सुचवले होते की, वाहनचालकांना त्यांचे डोळे उघडे ठेवून आणि वाहून नेणे चालू ठेवून झोप येणे शक्य होते. ‘महामार्ग संमोहन’ हा शब्द जी. डब्ल्यू. विल्यम्स यांनी १९६३ मध्ये तयार केला होता. काही सिद्धांतकार मानतात की, चेतना संमोहन पृथक्करण विकसित करू शकते. हायवे संमोहनाच्या उदाहरणात, चेतनेचा एक प्रवाह कार चालवित आहे, तर दुसरा इतर बाबी हाताळत आहे. हायवे संमोहन अंतर्गत ड्रायव्हिंगमध्ये घालवलेल्या वेळेशी संबंधित आंशिक किंवा पूर्ण स्मृतिभ्रंश समाविष्ट असलेल्या ड्रायव्हरसाठी विकसित होऊ शकतो.

भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये कित्येक चालक दिवस-रात्र गाडी चालवितात. रात्रीचा प्रवास करत असताना पल्ला गाठण्यासाठी डोळ्यावर झापड आली तरी तशीच गाडी चालवत राहतात. सकाळी चार ते सहाची वेळ ही गाढ निद्रेची असते. त्यामुळे एक प्रकारची धुंदी डोळ्यावर असते. अशा वेळी लक्ष एकदम विचलित होऊ शकते. डुलकी लागून गाडीचा ताबा जाऊ शकतो. त्यामुळे लांबचा प्रवास शक्यतो एकट्याने टाळावा.

हायवे संमोहनची काही लक्षणे

▶ तंद्री लागणे

▶ एकाग्रता कमी होणे किंवा मानसिक धुके

▶ मनात भरकटकणारे विचार येणे

▶ मनात स्तब्ध भावना येणे

▶ मंद प्रतिक्रिया होणे

▶ जड पापण्या किंवा डोळे वारंवार लुकलुकणे

हायवे संमोहन टाळण्यासाठी उपाय

१. ड्रायव्हरने प्रवास करण्यापूर्वी पुरेशी झोप घेतलेली असावी

२. प्रवास करतेवेळी ड्रायव्हर शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या सक्षम हवा.

३. रोड हिप्नोसिसमध्ये स्वत:चे संरक्षण करण्यासाठी दर दोन-अडीच तासांनी ड्रायव्हरने गाडी थांबवून चहा, कॉफी किंवा पाणी प्यावे. शक्य असल्यास पाच-दहा मिनिटे विश्रांती घ्यावी. पाच-सहा मिनिटे चालावे किंवा बोलून आपल्या सहकाऱ्यासोबत मन मोकळे करावे.

४. वाहन चालवताना काही ठिकाणी तसेच इतर वाहनाची रहदारी लक्षात ठेवावी.

५. रोड हिप्नोसिस सहसा उत्तर रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळेस घडत असल्याने त्यावेळचा प्रवास टाळावा

६. गाडी चालवत असताना कधी अधून मधून कंटाळा आल्यास गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्यावा आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे पाहत ड्रायव्हिंग करण्यास सुरुवात करावी.

७. एक्स्प्रेस हायवे किंवा घाटाच्या रस्त्यावर जर वाहन चालकाला झोप येत असेल किंवा तो पेंगतो आहे, असे आपल्या लक्षात आले, तर गाडी बाजूला किंवा थांब्यावर उभी करावी. वेगळ्या चालकाने गाडी चालवावी किंवा विश्रांतीनंतर काही तासांनी पुढे जावे.

८. चालकाच्या बाजूच्या सीटवर बसून गप्पा मारणे, गाणी ऐकणे, चांगले कार्यक्रम रेडिओवर लावून ते ऐकावते जरूर करावे. चालकाच्या बाजूच्या सीटवर बसून ढाराढूर झोपू नये तसेच घोरू नये. ड्रायव्हरलाही त्यामुळे झोप येते. सतत जागरूक राहावे. झोप अनावर झाली, तर गाडी बाजूला लावून झोप काढावी.

रस्ते बनविताना अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेतलेली असते. चालकाला त्रास होईल इतके अडथळे रस्त्यात ठेवता येत नाहीत. दिव्यांची नीट योजना असणे आवश्यक असते. आत्ताच्या रस्त्यांवर विभाजकावर झाडे लावलेली असतात जेणेकरून समोरून येणाऱ्या गाड्यांचा प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर येऊ नये. आता भारतभर रुंद हजारो किलोमीटरचे रस्ते बनविण्यात येत आहेत. अशा वेळी रोड हिप्नोसिस (हायवे संमोहन)चा धोका वाढण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर वेगमर्यादा, वळणे, धोके यांचे फलक असतात. त्या सूचना जर चालकांनी काटेकोरपणे पाळल्या आणि बाकीची काळजी सहप्रवाशांनी घेतली, तर अपघातांचे प्रमाण निश्चित कमी होईल.