रुग्णालयातील माणुसकी

सायन, केईएमसारख्या रुग्णालयांत विविध आजारांसाठी रुग्ण दाखल होतात. योग्य उपचारांनंतर ते बरेही होतात; मात्र काही नातेवाईक रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरवतात.
Doctor
DoctorSakal
Summary

सायन, केईएमसारख्या रुग्णालयांत विविध आजारांसाठी रुग्ण दाखल होतात. योग्य उपचारांनंतर ते बरेही होतात; मात्र काही नातेवाईक रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरवतात.

- डॉ. अविनाश सुपे

सायन, केईएमसारख्या रुग्णालयांत विविध आजारांसाठी रुग्ण दाखल होतात. योग्य उपचारांनंतर ते बरेही होतात; मात्र काही नातेवाईक रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरवतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुलींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांकडून अशा रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते.

सायन रुग्णालय हे अत्यंत वर्दळीचे रुग्णालय असून दररोज अपघात, मानवी आघात, नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीचे अनेक रुग्ण उपचारांसाठी येत असतात. २०१४ मध्ये जेव्हा मी सायन रुग्णालयाचा अधिष्ठाता असताना कल्याणजवळ कुठे तरी इमारत कोसळल्याने अनेक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात आले. डोक्याला दुखापत, बरगडी-पाय फ्रॅक्चरसह जखमी असलेले ते दुर्दैवी रुग्ण होते. सामान्यतः अशा रुग्णांवर रुग्णालयांद्वारे उपचार करून त्यांना घरी पाठवले जाते किंवा रुग्ण स्थिर झाल्यावर किंवा बरे होण्यासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले जाते. सदर इमारत दुर्घटनेतील रुग्णांमध्ये सविता नावाची एक आठ वर्षांची अतिशय गोड मुलगी होती. तिच्या हातावर आणि चेहऱ्यावर किरकोळ जखमा झाल्या होत्या. तिला कल्याण पोलिसांनी सर्व जखमींसह सायन रुग्णालयात आणले होते. आम्ही या मुलीवर आवश्यक ते उपचार केले आणि ती बरी झाली. या दुर्घटनेत तिचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तिची आई आणि भावाचा मृत्यू झाला होता आणि तिचे वडील मेंदूला दुखापत आणि फ्रॅक्चरसह गंभीर जखमी झाले होते. तिचे वडील वाचले, पण मेंदूला जबर मार लागल्याने त्यांना स्वतःची काळजी घेणे शक्य नव्हते. आमच्या रुग्णालयामध्ये या मुलीची काळजी घेण्यासाठी कोणीही आले नाही.

केईएम आणि सायनसारख्या रुग्णालयांमध्ये अनेकदा असे घडते, की रुग्णांच्या भेटीसाठी, त्यांच्या शुश्रूषेसाठी कोणी नातेवाईक येत नाहीत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधण्यापर्यंत ते आमच्या वॉर्डमध्येच राहतात. आमचे कर्मचारी (परिचारिका, डॉक्टर आणि इतर कर्मचारी) आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता विभाग विविध प्रकारच्या देणग्या आणि इतर संसाधनांच्या मदतीने या रुग्णांची काळजी घेतात, परंतु अशाप्रकारे रुग्णांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्था मोजक्याच असल्या, तरी सायन रुग्णालयामध्ये अत्यंत चांगला वैद्यकीय सामाजिक कार्य विभाग कार्यरत आहे. ते अशा रुग्णांना खूप मदत करतात. मुलांच्या वॉर्डमधील आमच्या परिचारिकांनी सविताची काळजी घेण्यास सुरुवात केली, कारण जवळपास दोन महिने झाले तरी कोणीही तिला भेटायला आले नव्हते.

अनेक वृत्तपत्रांनी याबाबतची बातमी प्रसिद्ध केली. या टप्प्यावर आम्हीही विचार करत होतो, की या मुलीचे काय करावे, आपण तिला पोलिसांकडे पाठवू या का, ते या अबोध मुलीला बाल कल्याण केंद्रात पाठवतील आणि तिची तिथे योग्य काळजी घेतली जाईल की नाही, असे अनेक प्रश्न आम्हाला पडत होते. एके दिवशी सकाळी वॉर्डातील एक नर्स माझ्याकडे आली. ती विवाहित होती आणि तिला १० वर्षे गर्भधारणा होऊ शकली नव्हती. तिला मूल हवे होते, पण तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘सर, मी या वॉर्डमध्ये या मुलीसोबत जवळपास दोन महिने काम करत आहे आणि तिच्याशी माझी खूप जवळीक निर्माण झाली आहे. मला या मुलीला दत्तक घ्यायचे आहे.’ तिच्यासोबत अनेक नर्स आल्या आणि त्यांनीही मला सांगितले, की ती या मुलीची काळजी घेत आहे आणि तिला या मुलीला दत्तक घ्यायचे आहे.

कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक मुलीची काळजी घेण्यासाठी किंवा ताबा घेण्यासाठी आले नसल्याने आम्ही तिला कुणाच्याही स्वाधीन करू शकत नाही. आमच्यासाठी ही अतिशय अवघड परिस्थिती होती. अनेकदा मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करून तिला बाल कल्याण केंद्र किंवा बालसुधारगृहात नेण्यासाठी द्यावे लागते. त्या वेळी अनेक नियम, कायद्यांचे पालन करावे लागते. याबाबत २०१५ पासून बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा लागू झाला आहे. त्यानुसार प्रकरण पोलिस आणि बालकल्याण समितीकडे पाठवावे लागले. बालकल्याण समितीच्या प्रक्रियेस आठ ते नऊ महिने लागतात, कारण त्यांचे स्वतःचे नियम आणि प्रक्रिया आहेत. मुलं दत्तक घेण्यासाठी पालक सक्षम आणि स्थिर आहेत का ते पहिले जाते.

सामान्यतः मुलाचे वय पाहता दत्तक घेणारे पालक आणि मूल यांच्यातील फरक २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे किंवा विशेषत: मुलाच्या वयानुसार पालकांच्या वयाची बेरीज ९०-११० वर्षांपेक्षा जास्त नसावी अशी काळजी घेतात. आमची परिचारिका सर्व निकष पूर्ण करत होती आणि आमच्या वैद्यकीय सामाजिक विभागाने तिला योग्य प्रक्रियेचे पालन करण्यास मदत केली. आमची परिचारिका खूप सकारात्मक होती. ती आणि आम्ही या सर्व प्रक्रियेतून गेलो आणि आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तिने मुलीला दत्तक घेतले. ती आता खूप आनंदी आहे आणि मला वैयक्तिकरीत्या खूप आनंद वाटतो, की आम्ही मुलीला मदत करू शकलो.

सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांना काही कारणास्तव नातेवाईकांकडून सोडून दिले जाते किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. काही वेळा या रुग्णांना त्यांचे कुटुंब नसते किंवा लहान घर किंवा संसाधनांची कमतरता असते. अनेक वेळा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अनेक महिने रुग्णांना आमच्या रुग्णालयात ठेवले जाते. वॉर्डांची क्षमता मर्यादित आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही या रुग्णांच्या सर्व गरजांची पूर्तता करू शकत नाही. ज्या आजारासाठी ते आले आहेत, त्यातून ते बरे होतात; मात्र बरे झाल्यावर कुटुंबीयांनी त्यांना सोडून दिल्याने त्यांना कुठे पाठवायचे ही एक मोठी समस्या बनते. सवितासारख्या मुलीला कोठेही पाठवले जाऊ शकते, या चिंतेमुळे आम्ही तिच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करत होतो. अशा रुग्णांची काळजी घेणाऱ्या काही संस्था आहेत; परंतु गरजेनुसार त्यांच्याकडे कमी संसाधने आहेत. सरकारी बालकल्याण किंवा बाल सुधार केंद्रांचे कठोर नियम, प्रदीर्घ प्रक्रिया आणि इतर मर्यादा असतात. अशा रुग्णांची काळजी घेणाऱ्या संस्थांना विविध कंपन्यांकडून सीएसआरद्वारे मदतीची गरज आहे, जेणेकरून लोकांना मुले दत्तक घेण्यास ते मदत करू शकतील.

सवितासारख्या प्रकरणांमध्ये आपण आवश्यक आणि योग्य सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. त्यासोबतच समाजात चांगली जागरुकता निर्माण केल्यास अशा अडचणी सोडवता येतात. सविताकडे आता नवीन घर आणि कुटुंब आहे, जे तिच्या शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी घेते. तिचे मूळ काय, आई-वडील कोण होते अशा प्रश्नांमध्ये न अडकता या परिचारिकेच्या कुटुंबीयांनी केलेल्या पुरोगामी आणि मानवतापूर्ण विचाराबद्दल, आमच्या परिचारिकेचे आणि तिच्या कुटुंबियांचे मी खूप अभिनंदन करतो. त्यांनी समाजासाठी आदर्श घालून दिला आहे, सुशिक्षित आणि सुजाण समाजाचे ते पथदर्शक आहेत.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com