वैद्यकीय गोपनीयता

एका रुग्णाची एचआयव्हीची टेस्ट झाली. ती सकारात्मक आल्यानंतर तो हताश झाला. अश्रू अनावर झाले.
Medical Privacy
Medical Privacysakal
Summary

एका रुग्णाची एचआयव्हीची टेस्ट झाली. ती सकारात्मक आल्यानंतर तो हताश झाला. अश्रू अनावर झाले.

- डॉ. अविनाश सुपे

एका रुग्णाची एचआयव्हीची टेस्ट झाली. ती सकारात्मक आल्यानंतर तो हताश झाला. अश्रू अनावर झाले. तो विवाहित होता आणि त्याची पत्नी गरोदर असल्याने तिचीही टेस्ट करून घेण्याविषयी त्याला सुचवले, तेव्हा या आजाराविषयी पत्नीला सांगू नका, असा त्याचा आग्रह होता. आजाराची गोपनीयता ठेवणे हा त्याचा वैयक्तिक अधिकार होता. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नात्यात ‘गोपनीयता’ महत्त्वाची असते; अन्यथा विश्‍वासाला तडा जातो. हा विश्‍वास कायम ठेवून, एचआयव्ही पॉझिटिव्ह आलेल्या रामरतनबाबत काय झाले, त्याची ही गोष्ट...

रामरतन (नाव बदलले आहे.) बाह्यरुग्ण विभागात आला होता. टॅक्सी ड्राईव्हर होता. अनेक वर्षे टॅक्सी बाहेरगावी घेऊन जायचा. मागील तीन महिन्यांपासून त्याला अंगदुखी, ताप, वजन कमी होणे आणि कफ वाढलेला खोकला ही लक्षणे अँटीबायोटिक्सला प्रतिसाद देत नसताना पाहिले होते. एक्स-रेवर त्याच्या उजव्या मध्यभागी फुप्फुसावर डाग होता आणि थुंकी एएफबी क्षयसाठी सकारात्मक होती. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तीन वर्षांपूर्वी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याचा खुलासा केला होता. ‘‘पण मी लाजवंती (नाव बदलले आहे)शी लग्न केल्यानंतर थांबलो. डॉक्टर, मी तिच्याशी विश्वासू, एकनिष्ठ आहे.’’ आम्ही त्याला सर्व समजावून त्याची संमती घेऊन त्याची तपासणी करण्याचे ठरवले आणि एचआयव्ही स्क्रीनिंग चाचणीचा आदेश देण्यात आला. ती सकारात्मक आली. त्यानंतर पुष्टीकरण चाचणी घेण्यात आली आणि तीदेखील सकारात्मक आली. सीडीसीची संख्या <१०० होती.

रामरतन त्याच्या एचआयव्ही चाचणीच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी आला होता. त्याचे सांत्वन केल्यानंतर आणि टीबी आणि एचआयव्हीसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतर, आम्ही त्याला सांगितले की, त्याने त्याच्या पत्नीला चाचणीसाठी आणले पाहिजे. ‘अजिबात नाही, सर!’ असे स्पष्ट प्रत्युत्तर देत तो म्हणाला, ‘ते शक्य नाही. माझा अपमान होईल. लाजवंती मला सोडून जाईल. मी माझ्या बाळाला कधीही पाहू शकणार नाही. मी आमच्या समाजात बहिष्कृत होईन. मी माझ्या पत्नीशिवाय जगू शकत नाही, डॉक्टर. मी तुम्हाला विनंती करतो, असे करू नका.’

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासू नातेसंबंधात ‘गोपनीयता’ महत्त्वाचे आहे. जेव्हा डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णांमध्ये परस्पर विश्वासाची योग्य अपेक्षा असते, तेव्हा विश्वासाचे नाते निर्माण होते. रामरतनचा पॉझिटिव्ह रिपोर्ट व त्याला झालेला आजार हा त्याचा वैयक्तिक प्रश्न होता. डॉक्टरने हा अहवाल इतरांपासून गोपनीय ठेवणे, हे योग्यच होते. एचआयव्हीसारख्या आजारात ते कसोशीने पाळले पाहिजे; परंतु इथे प्रश्न रामरतनच्या बायकोचा व त्यांना होणाऱ्या अपत्याचा आहे. शास्त्रीयदृष्ट्या त्यांची तपासणी होऊन जर त्यांनादेखील एचआयव्ही लागण झाली असेल, तर त्यांना योग्य उपचारांची गरज आहे. आज उपलब्ध असलेल्या चांगल्या औषधांमुळे असे रुग्ण अनेक वर्ष आनंदाने जगू शकतात; परंतु सामाजिकदृष्ट्या त्याची भीती खरी आहे. आजही अशा आजाराबद्दल समाजाचा दृष्टिकोन फार बदललेला नाही. नियमाप्रमाणे गोपनीयता पाळणे आवश्यक आहे; परंतु इतर दोन जीवांच्या धोक्याचाही विचार केला पाहिजे. अशा वेळी एचआयव्ही सेंटरमधल्या समाजसेवकांचे कौशल्य पणास लागते. आमच्या समुपदेशकाने त्याला समजावून सांगितले की, त्याच्या बायकोला त्यानेच सांगितले पाहिजे. त्याने तसे सांगितले व समुपदेशकाने त्या दोघांना एकत्र बसवून सर्व आजार व उपचाराची माहिती दिली. दोघांचीही तपासणी करून योग्य ती औषधे व उपचार सुरू केले.

आम्ही त्यांना समजावले की, कुठलाही आजार घरातल्यांपासून लपून राहू शकत नाही. बाकी गोपनीयता बाळगली जाईल, हा विश्वास आम्ही त्यांना दिला. तुम्ही फक्त घरातल्यांना विश्वासात घ्या. तुम्ही बरे व्हाल; पण तुमच्या पत्नीची तपासणी तिच्या स्वास्थ्यासाठी आणि बाळासाठी गरजेची आहे. जर तिने किंवा तुमच्या समाजाने तुम्हाला नाही स्वीकारले तरी माणूस म्हणून पत्नीचा जीव वाचविणे तुमचे कर्तव्य आहे.

रामरतन तयार झाला. त्याच्या पत्नीने समजूतदारपणा दाखविला. रामरतन उपचारामुळे बरा झाला. काही महिन्यांनंतर त्याची बायको प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुदैवाने त्याची टेस्ट पॉजिटिव्ह नव्हती. रामरतन व त्याची बायको दोघेही आता नियमित औषधे घेतात व ते आनंदात आहेत. रामरतन समजूतदारपणामुळे प्रत्येक आघाडीवर जिंकला.

वैद्यकीय गोपनीयता या संकल्पनेंतर्गत रुग्णाच्या उपचारादरम्यान प्राप्त झालेली सर्व माहिती डॉक्टर राखून ठेवतात. रुग्णाच्या उपचाराबाबतची गोपनीयता अत्यंत महत्त्वाची आहे. अशी नाजूक आणि गोपनीय माहिती फक्त रुग्ण, डॉक्टर, आरोग्य सेवा किंवा आरोग्य विमा कंपनी यांच्यामध्येच असावी. डॉक्टर व इतरांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी (उद्‍वाहन, हॉस्पिटलमधील उपाहारगृहे किंवा संमेलने) येथे रुग्णाचे नाव घेऊन चर्चा करू नये.

आरोग्य सेवा प्रदात्याला दिलेली रुग्णाची वैद्यकीय माहिती इतरांना सांगता येत नाही, जोपर्यंत रुग्णाने अशी माहिती उघड करण्यास संमती दिलेली नसते. वैद्यकीय नोंदी किंवा माहिती पूर्णपणे उघड न करणे अत्यंत दुर्मिळ असले, तरी डॉक्टर जेव्हा इतरांना वैद्यकीय माहिती देतात आणि त्यांच्या केस स्टडींपैकी संदर्भ देतात तेव्हा गोपनीयतेचे सामान्य उल्लंघन होते. ही माहिती व्यावसायिक जर्नल्समध्ये प्रकाशित झाली, तरीही रुग्णाची ओळख कधीही उघड केली जात नाही आणि ती कोणत्याही प्रकारे दिसल्यास रुग्णाला खटला भरण्याचा अधिकार आहे.

बहुतेक वैद्यकीय बिले आरोग्य विमा कंपनीद्वारे अदा केली जातात. अशा परिस्थितीत, आरोग्य म्हणून माहिती गुप्त ठेवणे खूप कठीण आहे. विमा कंपन्या तसेच वैद्यकीय प्रयोगशाळा, संशोधक इत्यादींद्वारे नोंदी पाहता येतात. या सर्व संस्थांनी गोपनीयतेची काळजी घेतली पाहिजे.

डॉक्टरांच्या मते भारतात एचआयव्हीबद्दल जागरुकता फारच कमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील (एआरटी) सेंटरचे डॉक्टर संजीव सिन्हा यांच्या मते, ‘‘लोकांच्या मनात आजही या आजाराबद्दल भीती आहे. या भीतीमुळेच लोक तपासणी करायला जात नाहीत. जे तपासून घेतात पण समाजाच्या भीतीने औषधोपचार टाळतात.

एचआयव्हीचा संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या रोगामुळे आतापर्यंत ३.५ कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एचआयव्हीची लागण हे एड्‌सचं सगळ्यात मोठं कारण आहे. या विषाणूची बाधा झालेले एकूण ३.७ कोटी लोक जगभरात आहे. त्यापैकी ७० टक्के लोक एकट्या आफ्रिका खंडात आहेत.

बऱ्याच ठिकाणी नोकरी करता एचआयव्ही टेस्ट करणं अनिवार्य आहे. गरोदर महिलांनीसुद्धा ही टेस्ट करावी, म्हणजे त्यांच्या मुलांना हा रोग होणार नाही. आईपासून मुलाला या रोगाचं संक्रमण होऊ नये म्हणून बाजारात औषधं उपलब्ध आहेत. उत्तम समुपदेशन आणि जनजागृती याद्वारे आपण याबाबत प्रगतिपथावर आहोत. समाजाच्या प्रतिक्रियांचा बाऊ न करता योग्य औषधोपचार करणे समाजाच्या हिताचे असते.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com