
कुटुंब कल्याण आणि परिवार नियोजन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कमी मुले म्हणजे स्त्रीचे उत्तम आरोग्य आणि छोट्या परिवाराची नीट काळजी, देखभाल.
छोटी कुटुंबं सुखी होतील!
- डॉ. अविनाश सुपे
कुटुंब कल्याण आणि परिवार नियोजन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कमी मुले म्हणजे स्त्रीचे उत्तम आरोग्य आणि छोट्या परिवाराची नीट काळजी, देखभाल. प्रत्येक कुटुंब सुखी राहावे आणि राष्ट्राचा आर्थिक विकास झपाट्याने व्हावा, जीवनमान सुधारावे, राष्ट्रीय उत्पन्नाची दरडोई वाढ व्हावी यासाठी पुन्हा कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा पाठपुरावा करायला हवा. जर कुटुंब नियोजन केले नाही, तर सर्वच सुविधा कमी पडतील. राष्ट्राच्या उभारणीसाठी, बळकटीकरणासाठी हा कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.
आपला भारत लोकसंख्येबाबत दुसऱ्या स्थानावर आणि चीन पहिल्या क्रमांकावर होता. गेल्या काही वर्षांत चीनची लोकसंख्या हळूहळू कमी झाली; परंतु आपली लोकसंख्या वाढतेच आहे. याचे कारण चीनने उचललेली पावले, आखलेली धोरणे. अर्थात ही धोरणे मानवतावादी नसतील; पण राष्ट्रहिताच्या दृष्टीने त्यांनी कठोर निर्णय घेतले. त्यामानाने आपण याबाबत फार काही केले नाही व आपली लोकसंख्या २०५० पर्यंत वाढतच राहणार आहे. २०५० नंतर लोकसंख्या कमी होईल (कदाचित ‘हम दो हमारा/ हमारी एक’ यामुळे) असे वर्तवले जाते.
अफाट लोकसंख्येमुळे आपण अनेक समस्यांना तोंड देत आहोत. १९६० साली देशात कुटुंब नियोजन कार्यक्रम जोमाने राबवला जात होता. १९६०-७० मध्ये गर्भपात कायद्याने मान्य केला व त्यामुळेसुद्धा लोकसंख्या नियंत्रण होण्यास मदत होते; पण आणीबाणीच्या काळात कुटुंब नियोजन सक्तीने केले गेले. अत्याचार झाले, त्यामुळे राजकीय पाठिंबा गेला आणि आरोग्यदृष्ट्यासुद्धा कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा वेग मंद होत गेला. गेली ३०-४० वर्षे या विषयावर राजकीय पक्ष फारसे भाष्य करत नाहीत. त्यामुळे कुटुंब नियोजन हा राष्ट्रीय कार्यक्रम जरी असला, तरी तो फार जोमाने राबवला जात नाही.
भारतातील चित्रपट हे नेहमीच तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब असतात. गेल्या १०० वर्षांच्या चित्रपटांचा अभ्यास करता गेल्या काही वर्षांत गावातील जनतेच्या आणि गरिबांच्या समस्या वाढल्या, त्यावर अनेक चित्रपट आले. टॉयलेट, सॅनिटरी पॅड्स यावर चित्रपट-राष्ट्रीय कार्यक्रम आले. जनजागृती झाली, लाखो शौचालये बांधली गेली. या समस्यांवर काम केले जाऊ लागले.
हल्लीच्या काळातदेखील हळूहळू कुटुंब नियोजनाचा प्रसार करण्यासाठी नवीन चित्रपट येऊ लागले आहेत. वाढती लोकसंख्या आपल्या देशाला घातक आहे. त्यासाठी समाजामध्ये जाणीव निर्माण करणे व कुटुंब नियोजनाचा प्रसार करणे आवश्यक आहे. काही चित्रपटांत लहान मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न कधी कधी टोकाचा वाटतो. सातवी-आठवीच्या वर्गातील मुलांना लैंगिक शिक्षणाचा किती फायदा, किती परिणाम होतो सांगणे कठीण आहे.
मी केईएमचा अधिष्ठाता असताना सामाजिक संस्थेच्या मदतीने पथक स्थापन करून ग्रामीण भागात व झोपड्यांमधील १२ ते १५ वर्षांच्या मुलींना लैंगिक शिक्षण देऊन त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे शिक्षण देत असू. तो कार्यक्रम खूप यशस्वी झाला. मुंबईतील छोट्या छोट्या झोपडपट्टी वस्तीत जाऊन आम्ही हा कार्यक्रम नियमितपणे राबवला. मी त्याला खूप पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. अजूनही काही ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे.
आपली लोकसंख्या ज्या वेगाने वाढते आहे ती पाहता भारत सरकारने कुटुंब नियोजन हा विषय पुन्हा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी ‘हम दो और हमारा एक या दो’ या घोषवाक्याचे पालन निष्ठेने आचरणात आणले पाहिजे. काही देशांत वृद्धांची संख्या इतकी वाढली, की त्यांची काळजी घ्यायला तिथे तरुणांची कमतरता जाणवली; पण आपल्या देशात ५०-६० वयाची १५ टक्के जनता आहे आणि लहान मुलांची लोकसंख्या ३५ टक्के आहे.
१०-१५ वर्षांनंतर तरुण लोकसंख्येचा स्फोट होईल. जर कुटुंब नियोजन केले नाही, तर सर्वच सुविधा कमी पडतील. राष्ट्राच्या उभारणीसाठी, बळकटीकरणासाठी हा कार्यक्रम राबवणे फार गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालये येथे प्रकल्पासाठी हा विषय देऊन मुलांना याबाबत जागरुक करीत राहायला हवे. कुटुंब कल्याण आणि परिवार नियोजन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कमी मुले म्हणजे स्त्रीचे उत्तम आरोग्य आणि छोट्या परिवाराची नीट काळजी, देखभाल. प्रत्येक कुटुंब सुखी राहावे आणि राष्ट्राचा आर्थिक विकास झपाट्याने व्हावा, जीवनमान सुधारावे, राष्ट्रीय उत्पन्नाची दरडोई वाढ व्हावी यासाठी पुन्हा कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा पाठपुरावा करायला हवा.
जनजागृतीचे कार्यक्रम चित्रपटाद्वारे यशस्वीरीत्या पण कलात्मकतेने आणि कौशल्याने मांडले पाहिजेत. चित्रपट घरात एकत्रितपणे पाहिले जातात, चर्चिले जातात. त्यामुळे ते संयमाने चित्रित केले पाहिजेत. पूर्वी टीव्हीवर कंडोमची जाहिरात आली की ती सर्वांसमोर बघणे हा अनेकांना अडचणीचा भाग होता. आज जरी हे थोडेफार बदलले असले, तरी या संवेदनशील विषयांवर चित्रपट काढताना ते नाजूकपणे व काळजीपूर्वक मांडले पाहिजेत. चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. सामाजिक बदलासाठी चित्रपट नक्कीच उपयोगी पडतात. त्यामुळेच अशा चित्रपटांची आज आपल्याला जास्त गरज आहे.
(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)