दहशतवाद आणि रुग्णधर्म

मुंबईत डिसेंबर १९९२ आणि १९९३ च्या जानेवारीमध्ये दंगली झाल्या. १९९३ च्या दंगलीच्या वेळी शनिवारी दुपारी घरी जाताना परळच्या बसस्टॉपवर जाळपोळ सुरू असल्याचे मी पाहिले.
Doctor
DoctorSakal
Summary

मुंबईत डिसेंबर १९९२ आणि १९९३ च्या जानेवारीमध्ये दंगली झाल्या. १९९३ च्या दंगलीच्या वेळी शनिवारी दुपारी घरी जाताना परळच्या बसस्टॉपवर जाळपोळ सुरू असल्याचे मी पाहिले.

- डॉ. अविनाश सुपे

दंगल असो, युद्ध असो, त्यात जखमी झालेले रुग्णालयात येतात, तेव्हा सामाजिक द्वेष, वैयक्तिक विचारसरणी, आजूबाजूची परिस्थिती यांची गणिते दूर ठेवून आपल्या पेशाशी एकनिष्ठ राहून माणसाचे प्राण वाचवणे, हेच ध्येय असायला हवे. आपण रुग्णधर्मच पाळला पाहिजे.

मुंबईत डिसेंबर १९९२ आणि १९९३ च्या जानेवारीमध्ये दंगली झाल्या. १९९३ च्या दंगलीच्या वेळी शनिवारी दुपारी घरी जाताना परळच्या बसस्टॉपवर जाळपोळ सुरू असल्याचे मी पाहिले. माझ्या लक्षात आले, की खूप रुग्ण आता रुग्णालयात येत असतील. मी घरी जाण्याचा रस्ता सोडला आणि परत आमच्या अपघात विभागात परत गेलो. तिथे काम करायला लागलो. त्या दिवशी आमच्याकडे रुग्णांचा इतका ओघ होता की, जवळजवळ १८० रुग्ण मी तपासले आणि अदमासे ५० रुग्णांवर आम्ही शस्त्रक्रियाही केल्या. थकून अपघात विभागात जरा बसलो असताना रात्री दीड वाजता एक माणूस धावत येत असल्याचे दिसले. अपघात विभाग आणि रुग्णालयाचे मुख्य द्वार यात ४० ते ५० फुटांचे अंतर असले, तरी समोरचे सरळ दिसते.

धावत येत असलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे जीपमधून साधारण दहा-बारा जण हातामध्ये तलवारी घेऊन धावत येत होते. ती व्यक्ती धावतच रुग्णालयात आली. आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्या लोकांना थांबविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या हातात तलवारी होत्या आणि आमच्या रक्षकांकडे लाकडी दंडुके! त्यामुळे सुरक्षा रक्षक थोडे हबकले होते. तो माणूस धावताना पायऱ्यांवर अडखळला आणि पडला. अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांतील एक-दोघांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले आणि एक मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारला. ते लोक जीपमधून पळून गेले. तेवढ्यात मागून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. आम्ही ताबडतोब पुढे गेलो. परिस्थितीचा अंदाज घेतला आणि कोणी नाही बघून त्याला पटकन अपघात विभागामध्ये आणले आणि तत्काळ त्याच्यावर उपचार व शस्त्रक्रिया सुरू केली. आता तिथे आमची सक्षम टीम असल्यामुळे ताबडतोब त्याला आवश्यक तो उपचार आणि सेवा मिळाली. त्याची डोक्याची कवटीही फुटली होती. पुढे त्याच्या मेंदूच्या कवटीचे ऑपरेशन करायला लागले. त्याला ठिकठिकाणी कापले होते, तिथे टाके वगैरे मारून त्याची प्रकृती स्थिर केली. त्या वेळी परिस्थिती इतकी प्रक्षोभक होती की बाह्यरुग्ण विभागातही दोन-तीन भोसकण्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे त्याला वॉर्डमध्येसुद्धा एका विशिष्ट वेगळ्या खोलीत आम्ही ठेवले. तो मुलगा विशिष्ट जमातीचा असला, तरी तो तिथे असताना आम्ही त्याच्या प्रकृतीची काळजी घेतली आणि तो बरा होऊन घरी गेला.

ज्या वेळी दंगली होतात त्या वेळी आम्ही डॉक्टर/परिचारिका / आरोग्य कर्मचारी म्हणून कुठल्याही व्यक्तीला हा या जमातीचा आहे किंवा धर्माचा आहे, असा कधीही फरक करत नाही. आमचे एकच ध्येय असते की हा जो कोणी पेशंट आहे, तो हिंदू असो, मुस्लिम असो अथवा ख्रिश्चन असो, नाहीतर कोणत्याही जाती-जमातीचा असो, त्याचे प्राण वाचवायचे. हे करतानासुद्धा मला आठवतंय की समाजामध्ये त्या वेळी एवढी परिस्थिती आणीबाणीची आणि प्रक्षोभक होती की, सर हा या जमातीचा आहे, याला कशाला वाचवायचं, असा प्रश्न काहींना पडू शकत होता; परंतु मी आमच्या टीमला हेच सांगितले की बाबा, हा रुग्ण आहे. रुग्ण वाचला पाहिजे आणि त्याला असं मरू दे किंवा अशा प्रकारची भावना कधीही असू नये. त्या वेळी इतकी वाईट परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्येसुद्धा माझ्या टीमने त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि त्या रुग्णाला वाचवले, सांभाळले.

अशा प्रकारे ज्या वेळी समाजामध्ये द्वेष असतो किंवा दोन समाजांमध्ये एक प्रकारची तेढ किंवा जातीय वैमनस्य किंवा इतर गोष्टींचा आग्रह असतो, तो आपल्या ट्रीटमेंटमध्ये, उपचारांमध्ये कुठेही येता कामा नये. मला वाटतं, डॉक्टरांनी या सगळ्या भावना दूर ठेवून रुग्णाला रुग्ण म्हणून, एक माणूस ज्याला उपचाराची गरज आहे, म्हणूनच बघणे आवश्यक आहे. ती दंगल असो, युद्ध असो की इतर काही कारण असो. अर्थात उपचार कसा करायचा, याला शास्त्रीय आधार आहे. त्यात जखमींची अवस्था याप्रमाणे वर्गीकरण करून उपचार करायचे असतात; पण सामाजिक द्वेष, वैयक्तिक विचारसरणी, आजूबाजूची परिस्थिती यांची गणिते दूर ठेवून आपल्या पेशाशी एकनिष्ठ राहून माणसाचे प्राण वाचवणे, या ध्येयाशी मन स्थिर ठेवले पाहिजे. हा पेशा मानवतेशी निगडित आहे. दंगली धार्मिक असोत; पण आपण रुग्णधर्म पाळला पाहिजे.

(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com