शतकोत्तरी रक्तदान

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मी ते १२६ वेळा केल्यामुळे मला ‘शतकी दाता’ हा पुरस्कार मिळाल्याचा सार्थ अभिमान आहे.
Blood Donation
Blood Donationsakal
Summary

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मी ते १२६ वेळा केल्यामुळे मला ‘शतकी दाता’ हा पुरस्कार मिळाल्याचा सार्थ अभिमान आहे.

- डॉ. अविनाश सुपे

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मी ते १२६ वेळा केल्यामुळे मला ‘शतकी दाता’ हा पुरस्कार मिळाल्याचा सार्थ अभिमान आहे. मी स्वतः प्रथम रक्तदान करून कित्येक रक्तदान शिबिरांचे उद्‌घाटन केले आहे. आयुष्य दुर्मिळ आहे आणि आपण कोणाचा तरी जीव वाचविण्यास मदत केली, याचे समाधान आपले जगणे समृद्ध करत असते.

कोणत्याही मोठ्या रुग्णालयात रक्तपेढी हा महत्त्वाचा घटक असतो. जिथे रक्तपेढी नसते तिथे रक्त साठवण्यासाठी एक खोली असते. तिथे दुसऱ्या रक्तपेढीतून रुग्णांसाठी आणलेले रक्त असते. मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात, त्यावेळी खूप रक्तस्राव होण्याची शक्यता गृहीत धरून रक्त तयार ठेवले जाते. नवीन उपकरणांमुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी होतो, तरी रक्त तयार ठेवणे क्रमप्राप्त असते.

साधारण १९७५ मध्ये रक्तदान म्हणजे काय, याची मला कल्पना नव्हती. मी नुकताच वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालो होतो. वय १८-१९ वर्षांचे. माझा वर्गमित्र डॉ. सुरेश सुंदर एनएसएसमध्ये काम करीत होता. तो एकदा मला म्हणाला, ‘‘अविनाश, चल आपण रक्तदान करूया.’’ मनात थोडी धाकधूक होती; पण हिंमत करून त्याच्या सहयोगाने एकदा रक्त दिल्यावर मनातली भीती गेली; मग मात्र मी दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने रक्तदान शिबिरात जाऊन रक्त देत असे. रक्त देऊन सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन काम करावे लागे. निवासी डॉक्टर असताना शुक्रवार हा इमर्जन्सी वार आणि सोमवार-बुधवार ऑपरेशन दिवस होते. सर्वसाधारणपणे रक्तदान शिबिरे रविवारी होतात.

सोमवारी सकाळी रक्तपेढीत रक्त उपलब्ध नसायचे आणि त्यामुळे ऑपरेशन्स पुढे ढकलावी लागायची. अशा वेळी आमचे शिक्षक डॉ. रवि बापट, डॉ. समसी, डॉ. पंड्या आम्हाला रक्तपेढीत घेऊन जायचे आणि रक्त द्यायला लावायचे. आम्ही सर्व निवासी डॉक्टर्स रक्त देत असू. डॉ. समसी यांचा तर बी-निगेटिव्ह असा दुर्मिळ ब्लड ग्रुप होता. ते एका वेळी दोन बाटल्या रक्त देत असत. त्यांनी आम्हाला धडा घालून दिला होता की, आपण रक्तदान केले पाहिजे.

१९८७ मध्ये आम्ही यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती. तेव्हा रक्तपेढीत जाऊन विचारले की, आम्हाला १५-२० बाटल्या रक्त लागले, तर तुम्ही उपलब्ध करून देऊ शकाल का? त्यावेळी अद्ययावत उपकरणे नव्हती.

त्यामुळे एका रुग्णाला इतके रक्त लागू शकत होते. ते म्हणाले, ‘‘हो, पण तेवढे तुम्ही गोळा करून दिले पाहिजे. मोठे ऑपरेशन असले, की नातेवाईकांना रक्तदान करायला सांगितले जाते. रक्तपेढीने हे करायला पाहिजे; पण रुग्णसंख्या एवढी प्रचंड असते की, त्यांना ते शक्य होत नाही. रक्त तयार करता येत नाही. ते कोणीतरी द्यावेच लागते. त्यामुळे आम्ही नातेवाईकांना समजावून तयार करायचो. रुग्णांभोवती नातेवाईकांची गर्दी झाली, की गर्दी कमी करायला त्यांना रक्त द्यायला सांगायचो. त्या वेळी अर्धेअधिक नातेवाईक पळून जायचे.

आम्ही जेव्हा यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमावेळी रक्तपेढीत गेलो, तेव्हा डॉ. मॅडम मुख्य होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘अविनाश, तुम्ही सर्वांनी तीन महिन्यांनी रक्त दिले पाहिजे.’’ त्यांचे शब्द माझ्या मनाला लागले आणि तेव्हापासून म्हणजे १९८७ पासून मी दर तीन महिन्यांनी रक्त देऊ लागलो. त्यामुळे केवळ मीच नाही, तर माझ्या युनिटमधील प्रत्येक जण रक्तदान करू लागला. एकदा माझ्या आईचा अस्थिभंग झाला आणि कळले तिचे हिमोग्लोबिन कमी आहे. तिला रक्त द्यावे लागले. मी रक्त दिले; पण माझ्या सहकाऱ्यांनीही उत्स्फूर्त रक्तदान केले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझी आई बरी झाली आणि सर्व धावपळीचे सार्थक झाले.

लोकांमध्ये रक्तदानाबाबत कमजोरी येते. पुरुषार्थ कमी होतो, असे काही गैरसमज आहेत, भीती आहे. ते गैरसमज दूर करून रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले पाहिजे. रक्तदानाच्या आरोग्यदायी फायद्यापासून अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जनजागृती करण्याची गरज आहे. हृदयाचे आरोग्य सुधारते, लाल पेशीमध्ये वाढ होते, कॅलरिज बर्न होऊन वजन घटते, अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात येते व कॅन्सरचा धोका कमी होतो.

रक्तदान प्रक्रियेपूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी होते. त्यामुळे तुम्ही आरोग्याची योग्य रीतीने देखभाल करू शकता. त्यामुळे दर तीन किंवा सहा महिन्यांनी किंवा निदान वर्षातून एक वेळ तरी प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. शरीरात चार ते पाच लिटर रक्त असते. प्रत्येकाचे फक्त ३५० एमएल रक्त घेतले जाते. हे रक्त ४८ तासांत पुन्हा तयार होते. रक्त दिल्यावर ५/१० मिनिटे बसून राहावे. कॉफी आणि बिस्किट्स शिबिराकडून दिले जाते. ते घेऊन आपण काम करू शकतो.

मी १२६ वेळा रक्त दिल्यामुळे मला मानाचा ‘शतकी दाता - सेन्चुरिअन डोनर’ हा केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. राज्य सरकार व महानगरपालिकेनेसुद्धा अनेक सन्मान केले. मी स्वतः प्रथम रक्तदान करून कित्येक रक्तदान शिबिरांचे उद्‌घाटन केले आहे. आयुष्य दुर्मिळ आहे आणि आपण कोणाचा तरी जीव वाचविण्यास मदत केली, हे समाधान सर्वात मोठे आहे.

१८ ते ६५ वयात नियमित रक्तदान केल्यास १८८ वेळा रक्तदान करता येते. मी अधिष्ठाता असताना कामामुळे किंवा बाहेरगावी जावे लागल्यामुळे मी हा पल्ला गाठू शकलो नाही. हे जे रक्त दिलेले असते, त्याचा थेंब आणि थेंब वापरला जातो. रक्ताचे घटक अलग करून गरजेप्रमाणे ते रुग्णाला दिले जातात. हे विज्ञानाचे वरदान आहे. त्यामुळे फक्त आपला कोणी नातेवाईक आजारी झाला, की रक्तदान करण्याचा विचार न करता सर्वांनी नियमित रक्तदान करायला हवे.

रक्तदानामुळे शरीर आणि मन दोहोंवर सकारात्मक परिणाम होतो. १८ ते ६५ या वयोमर्यादेत कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असल्यास महिलादेखील रक्तदान करू शकतात. हे केवळ दान नाही, तर सहजसाध्य समाधान आहे व प्रत्येकाने हे समाधान मिळवले पाहिजे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com