परीक्षेवर बोलू काही...

हल्ली कोणतीही परीक्षा म्हटली की अनेकांच्या घरात तणावपूर्ण वातावरण असते. बऱ्याच वेळा मुलांपेक्षा त्यांचे पालक अधिक चिंताग्रस्त असतात; परंतु पूर्वीएवढ्या आता परीक्षा कठीण नाहीत.
Exam
ExamSakal
Summary

हल्ली कोणतीही परीक्षा म्हटली की अनेकांच्या घरात तणावपूर्ण वातावरण असते. बऱ्याच वेळा मुलांपेक्षा त्यांचे पालक अधिक चिंताग्रस्त असतात; परंतु पूर्वीएवढ्या आता परीक्षा कठीण नाहीत.

- डॉ. अविनाश सुपे

हल्ली कोणतीही परीक्षा म्हटली की अनेकांच्या घरात तणावपूर्ण वातावरण असते. बऱ्याच वेळा मुलांपेक्षा त्यांचे पालक अधिक चिंताग्रस्त असतात; परंतु पूर्वीएवढ्या आता परीक्षा कठीण नाहीत. पास होण्याचे प्रमाणदेखील खूप चांगले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांवर अपेक्षेचे ओझे न टाकता त्यांना अधिकाधिक सकारात्मक कसे ठेवता येईल, याबाबत प्रयत्न करायला हवेत. परीक्षेच्या काळात योग्य आहार, पुरेशी झोप घ्या. अभ्यास आणि परीक्षेला संकट मानू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते, हा माझा अनुभव आहे.

साधारणपणे कुठलीही परीक्षा म्हटली की तणाव हा येणारच. हल्ली तर दुसरी किंवा तिसरीची घटक चाचणी असली, तरी घरातले वातावरण बदलते. टीव्ही बंद, मोबाईल बंद, घरात वर्दळ नको, पार्टी नको, खेळ नको, वगैरे वगैरे... बऱ्याच वेळा मुलांपेक्षा आई-वडील अधिक तणावग्रस्त असतात. जसजशी दहावीची परीक्षा जवळ येते, तेव्हा आठवीपासूनच स्पेशल क्लास लावणे, अधिकाधिक अभ्यास आणि दहावीच्या परीक्षेवेळी कसे बाहेरगावी जाता येणार नाही याचीच चर्चा, अभ्यास एके अभ्यास असे तणावपूर्ण वातावरण असते. हे वातावरण अभ्यासाला, मुलांच्या मनस्वास्थ्यासाठी पोषक असणार का?

वैद्यकीय परीक्षांची परिस्थिती आणखी वेगळी असते. अभ्यासक्रम इतका प्रचंड असतो की तो पूर्ण होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यात सतत वाढणाऱ्या ज्ञानाची भर पडत असते. एवढ्या मोठ्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्न आपल्याला येतील, याची अजिबात शाश्वती नसते. पूर्वी १०० पैकी १०० प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ५० घेऊन पास होऊ किंवा फारतर ७५ मिळवून विशेष प्रावीण्य मिळवू, असे ध्येय होते. जेव्हा रुग्णाला तपासून निदान करून उत्तर देण्याची परीक्षा असते, तेव्हा एक्स-रे, रिपोर्ट्स, सिटी स्कॅन मशीन वापरायला मिळत नाहीत. सुपर स्पेशालिटीच्या परीक्षेवेळी तरी त्या मिळतात; पण एमबीबीएस, एमएसला मिळत नाहीत. खूप वेळा वेगळे रुग्णालय असते, कधी कधी परराज्यात परीक्षा असते.

माझी डीएनबी परीक्षा हैदराबादला होती. वेगळे वातावरण, भाषेचा प्रश्न, दुभाषा असे अनेक ताण मनावर घेऊन या परीक्षा द्याव्या लागतात. एखाद्या वेळी विद्यार्थी रुग्णाला काही प्रश्न विचारतो आणि त्यावरून निदान लिहितो; मात्र ज्या वेळी परीक्षक येतो तेव्हा रुग्ण वेगळेच सांगतो, त्यामुळे निदान बदलते आणि परीक्षेला वेगळेच वळण मिळते. परीक्षा सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत चालतात. मुलांना या वेळी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. सतत तहान लागणे, लघवीला जावे लागणे, शौचाचा त्रास, धडधड, घामाघूम होणे, तत-पप होणारे विद्यार्थी मी पाहिले आहेत. सर्व येत असूनही तणावामुळे उत्तर देता येत नाही, अशी स्थिती येते. आमच्या वॉर्डात एमएस परीक्षेच्या वेळी केईएम रुग्णालयात एका विद्यार्थ्याचा तणावामुळे मृत्यू झाला होता. तणावाचा हृदयावर, मेंदूवर इतका परिणाम होतो, की त्याचे दूरगामी परिणाम होतात. यावर काही उपाय आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितले होते.

आम्ही एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेच्या तणावाखाली होतो. आमचे एक डॉ. नायर म्हणून खूप छान शिक्षक होते. ते म्हणत, ‘‘परीक्षा म्हणजे युद्ध असले, तरी तुम्ही मनाला खंबीर होण्याची सूचना द्या. पूर्ण झोप घ्या, उत्तम नाश्ता करा. कोणत्याही गोळ्या न घेता, रात्रभर न जागता तुम्ही परीक्षेला गेले पाहिजे. रात्रभर जागून शेवटच्या दिवशी अभ्यास करून फार फरक पडत नाही. अभ्यास पूर्ण वर्षात करायचा असतो. १२ ते ६ नीट झोप, अंघोळ करून ताजेतवाने होऊन, नीट खाऊनच परीक्षेला शांत आणि उत्साही मनाने जा. आमच्या परीक्षा संध्याकाळपर्यंत चालत. त्या वेळी रक्तातील साखर कमी झाल्याने कधी कधी गोंधळल्यासारखे वाटते. यावर उपाय म्हणून जवळ चॉकलेट ठेवा आणि ती खा. म्हणजे शरीरातील साखर कमी झाली, तरी त्रास होणार नाही. वाईट निकालासाठी मनाची तयारी ठेवा आणि उत्तम निकालासाठी तयारी करा. नापास होऊ, सीट मिळणार नाही, ठीक आहे; पण मी प्रयत्न करणार, अशी मनाची तयारी ठेवा. नीट सच्चेपणाने प्रयत्न केले आणि मनोधैर्याने परीक्षेला सामोरे गेलात, तर यश तुमचे आहे.’’ आम्ही त्यांच्या सूचना मनापासून पाळत असू.

माझ्या एमएस परीक्षेच्या तीन दिवस आधी माझे वडील मला भेटायला वसतिगृहामध्ये आले. मी अनेक पुस्तकांच्या मध्ये बसून अभ्यास करत होतो. ते बोलले आणि गेले. त्यांनी डब्यातून मला एक चिट्ठी पाठवली. त्यात हाच मुद्दा होता. त्यांनी लिहिले होते. ‘मला माहीत आहे तू खूप अभ्यास करीत आहेस. अपयश आले तरी काळजी करू नकोस. मला खात्री आहे तू ज्या प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न करीत आहेस, त्यामुळे तुला यश नक्की मिळेल.’ त्या वेळी एमएसचा निकाल २० ते ३० टक्के लागायचा. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मुद्दा मी लक्षात ठेवला. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. यश-अपयशाचा विचार करायचा नाही. ते पत्र आजही मला स्फूर्ती देते आणि आयुष्यात पुढेही आलेल्या अनेक तणावावर मी त्या पत्रामुळे मात केली.

आज पूर्वीएवढ्या परीक्षा कठीण नाहीत. पास होण्याचे प्रमाणदेखील खूप चांगले आहे, तरी चांगल्या क्रमांकासाठी तणाव मात्र तेवढाच आहे. त्यामुळे अशा परीक्षांना जाणीवपूर्वक सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे आवश्यक आहे. सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करा. पालकांनी आपल्या पाल्याची इतरांशी तुलना करू नये. सततच्या काळजीमुळे मुलावर ताण येतो. अपयशाचा विचार डोक्यातून काढून टाका. योग्य आहार, झोप घ्या. एका वेळी एका विषयाचा विचार करा. योगा करा, आवडीचे काम करा, अभ्यास आणि परीक्षेला संकट मानू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते, हा माझा अनुभव आहे.

परीक्षायाः कृते शुभकामना

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com