
आपल्या शरीरामध्ये अवयवांची प्रचंड गुंतागुंत असते. काही असामान्य गोष्ट आली तर त्याचा अनेकांना धक्का बसतो.
दोष ना कुणाचा...
- डॉ. अविनाश सुपे
आपल्या शरीरामध्ये अवयवांची प्रचंड गुंतागुंत असते. काही असामान्य गोष्ट आली तर त्याचा अनेकांना धक्का बसतो. शास्त्रीयदृष्ट्या आपण शांतपणे विचार केला आणि व्यवस्थित उपचार केला तर त्या समस्येवर तोडगा काढता येतो. गुंतागुंतीच्या शरीरात कधीही दोष निर्माण होऊ शकतो आणि यात कोणाचाच दोष नसतो.
मी रजिस्ट्रार म्हणून काम करत होतो त्या वेळी आमच्याकडे सुशील नावाचा एक बावीस वर्षांचा तरुण आला होता. वर्ष होते १९८३. सुशीलला त्याच्या जांघेमध्ये हर्निया होता. त्याच्या हर्नियासाठी शस्त्रक्रिया करायला मी सुरुवात केली तेव्हा नेहमीच्या हर्नियापेक्षा काही तरी वेगळे जाणवले. हर्नियाचे आवरण उघडले तेव्हा तिथे आतडे नव्हते; पण तिथे चरबीच्या बाजूला एक नळीसारखे दिसले. शंका आल्यामुळे मी ते हळूच खेचले आणि बघितले तर तिथे गर्भाशय असल्याचा भास झाला. मी ताबडतोब माझ्या वरिष्ठांना बोलावले. शस्त्रक्रिया करताना लक्षात आले, की गर्भाशयाचा छोटासा अविकसित भाग आणि दोन्ही नळ्या तिथे होत्या. त्याचे पुरुषाचे सर्व अवयव व्यवस्थित होते; पण गर्भाशयाचा थोडासा भाग होता. तो अविकसित होता. मी ताबडतोब ऑपरेशन करून तो भाग काढून टाकला. त्याची शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तो मुलगा आजारातून बरा झाला.
यातला शास्त्रीय भाग असा, की आपल्या शरीरामध्ये ज्या वेळी गर्भाची वाढ होत असते, तेव्हा सुरुवातीस पुरुष आणि स्त्री यांच्या अवयवांची वाढ होत असते. पुढे त्यापैकी एकाची वाढ व्यवस्थित होते आणि दुसरे अवयव लुप्त होतात. काही व्यक्तींमध्ये दोन्ही भाग विकसित होतात आणि ते तृतीयपंथी होतात किंवा काहींमध्ये ते काही प्रमाणात अविकसित राहतात. या रुग्णाच्या विकृतीला Uterine Hernia Syndrome म्हणजे गर्भाशय हर्निया विकृती असे म्हणतात. हा त्याला जन्मतः असलेला एक दोष होता. गर्भाशयाचा आणि त्याच्या नळ्यांचा एक छोटासा भाग तिथे होता, त्याला आपण पॅरा मोलेरियन डक्ट म्हणतो. त्याची वाढ खुंटली होती आणि ती खरे तर लुप्त व्हायला पाहिजे होती, ती पूर्णपणे लुप्त झाली नाही. त्यामुळे हा भाग राहिला होता. त्याचा हर्निया पूर्ण बंद झाला नव्हता.
पुढे आम्ही हा विषय आमच्या शास्त्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केला. आजही तुम्ही इंटरनेटवर ‘युटेराइन हर्निया सिन्ड्रोम’ शोधला तर तिथे हा रिपोर्टस् व अशा प्रकारचे केस रिपोर्टस् मिळतील. यातला दुसरा भाग असा, की हे आम्ही जेव्हा त्याच्या कुटुंबाला सांगितले, त्या वेळी त्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं वादळच निर्माण झालं. अशा प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण असे सांगितले, की पुरुषाच्या पोटात गर्भाशय सापडले आणि गर्भाशयाची शस्त्रक्रिया केली, त्या वेळी त्यांना तो एक मोठा धक्का किंवा आघातच असतो. त्यांना आम्ही हेही समजावून सांगितले, की काळजी करू नका, त्याच्या पुरुषार्थावर काही परिणाम होणार नाही. त्याचे ऑपरेशन केल्यानंतरही त्याची नियमितपणे तपासणी करत असू. आम्ही त्याचे मानसिक समुपदेशनही केले. त्या काळात त्याचा आत्मविश्वास होता, तोही आम्ही अबाधित ठेवला. काही वर्षांनी त्याचे लग्न झाले. त्याला पुढे काहीही अडचण आली नाही आणि त्याला मुलगा झाला. तो मला आनंदाने पेढे द्यायला आला.
थोडक्यात काय, आपल्या शरीरामध्ये अवयवांचे इतके जंजाळ असते, की त्याच्यामध्ये अशी काही असामान्य गोष्ट आली तर त्याचा केवळ शास्त्रीय नाही तर सामाजिक किंवा वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा खूप परिणाम होऊ शकतो, परंतु शास्त्रीयदृष्ट्या आपण शांतपणे विचार केला आणि व्यवस्थित उपचार केला, तर आपण अशा समस्येवर तोडगा काढू शकतो. समस्यांचे निराकरण करू शकतो. माझ्या मते चुकीच्या कल्पनांच्या आहारी न जाता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याने अनेकांचे आयुष्य आपण स्थिरस्थावर झालेले बघू शकतो. गुंतागुंतीच्या शरीरात कधीही दोष निर्माण होऊ शकतो आणि यात कोणाचाच दोष नसतो.
(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)
Web Title: Dr Avinash Tupe Writes Whose Fault Is It
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..