आंबेडकरी चळवळ : सांस्कृतिक-सांगीतिक

दलित बहुजन जनसमुदाय मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्ष दूर ठेवला गेला होता. त्यांना आता त्यांचे हक्क-अधिकार मिळाले आणि लाखोंच्या संख्येनं ‘भीम जयंती’ वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करत असतो.
dr babasaheb ambedkar jayanti 2024
dr babasaheb ambedkar jayanti 2024Sakal

- चंद्रकांत कांबळे

दलित बहुजन जनसमुदाय मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्ष दूर ठेवला गेला होता. त्यांना आता त्यांचे हक्क-अधिकार मिळाले आणि लाखोंच्या संख्येनं ‘भीम जयंती’ वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करत असतो.

बाबासाहेबांप्रती आभार प्रकट करण्याच्या हेतूनं अभिवादन करण्यासाठी लाखोंचे जत्थे ठिकठिकाणच्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला आणि पुतळ्यांना पुष्प अर्पण करतात. आंबेडकरी चळवळ केवळ सामाजिक व राजकीय नसून, त्याहून अधिक शक्तिशाली,

परिणामकारक आणि महत्त्वपूर्ण म्हणजे सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी आणि निरंतर प्रबोधनात्मक आहे. बाबासाहेबांचे विचार किती लोकांपर्यंत आणि कसे पोहोचणार होते? त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर गाव-खेड्यातल्या वस्ती-तांड्यातल्या अनभिज्ञ अडाणी लोकांना बाबासाहेब कसे कळणार होते?

वृत्तपत्रासारखं माध्यम बाबासाहेबांनी वापरलंच, मात्र तत्कालीन दलित साक्षरतेच्या प्रमाणात वृत्तपत्र आंबेडकरी विचार जनमानसात रुजविण्यासाठी संयुक्तिक पर्याय ठरणारं नव्हतं. बाबासाहेब स्वतःच म्हणाले होते,

माझ्या भाषणापेक्षा एका शाहिरांचं प्रबोधन अधिक प्रभावशाली आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर भीम गीतांना सुरुवात झाली. गावो-गावी अनेक प्रबोधनात्मक भजनी मंडळं तयार झाली, आणि भीम जयंती,

धम्मचक्र प्रवर्तन दिन, बुद्ध जयंती, रमाई जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनात्मक वैचारिक मंथन म्हणून गाऊ लागली, नवं लिहू लागली, अनेक गायक, गीतकार, संगीतकार, प्रबोधनकार, शाहिरी जलसेकार तयार झाले.

भारतीय सांस्कृतिक परिघात भीम गीतं या नवीन गीतप्रकाराची सुरुवात झाली. दलितांच्या जीवनात लोककला परंपरेनं होतीच मात्र त्याला स्वातंत्र्यानंतर दलित नवस्वातंत्र्याचं आणि स्वाभिमानाचं बळ मिळालं आणि नवीन सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे,

मिलिंद शिंदे, विष्णू शिंदे, प्रकाश पाठणकर आणि सुरेश भट्ट. अस्सल लोककलेचा बाज असलेली मंडळी स्वयंस्फूर्तीने भीम गीते लिहू आणि गाऊ लागली. लोककवी वामनदादा कर्डक, प्रताप सिंग आणि अनेक दलित गीतकारांनी भीम गीते लिहिली आहेत. या पहिल्या पिढीतील कलाकारांनी आपल्या वेदना, पिळवणूक, कष्ट, अस्पृश्यता, भेदभाव, अन्याय, अत्याचार आपल्या गीतांतून प्रकर्षाने, निर्भीडपणे व्यक्त केला आहे.

बाबासाहेबांचे विचार भीम गीतांच्या माध्यमातून ऐकून जागृत झालेली आणि पोसलेली एक पिढी तयार झाली आहे. ज्या पद्धतीनं आंबेडकरी विचार जनमानसात रुजविण्याचे काम वक्ते, अभ्यासक, विचारवंत,

साहित्यिकांनी आपापल्या शक्तीनं केलं, अगदी तसेच किंबहुना त्याहून जास्त भीम शाहिरांनी, भीम गीतांनी, जलसाकरांनी नोंद घेण्याइतपत जाणीव जागृती करून चळवळीला यशस्वी रीत्या प्रभावी केलं आहे. भीम गीतांची महत्त्वपूर्ण खासियत केवळ एका गीत प्रकारात अडकले नाहीत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि लोकसंगीतांमध्ये आंबेडकरी जाणिवा लिहिल्या-गायल्या जात आहेत.

सुगम गीत प्रकारात शिंदे घराणं प्रसिद्ध आहे. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे, आल्हाद शिंदे चौथी पिढी आंबेडकरी सांगीतिक प्रबोधनात्मक वारसा चालवत आहे.

तसेच विठ्ठल उमप, प्रकाश पठणकर, नंदेश उमप, विष्णू शिंदे, पुष्म देवी, अनिरुद्ध वनकर, राहुल साठे, अशोक निकाळजे आदींचं योगदान अनन्यसाधारण आहे. यासोबतच गाव-तांड्यावर असलेली भजनी मंडळं अज्ञात असून त्यांचे योगदान अतुलनीय आहे.

बाबासाहेबांचा असा कोणताही जीवन प्रसंग नाही, जो भीम गीतांत व्यक्त झाला नाही. माता रमाई, भीमाई, पिता रामजी यांचे आभार भीम गीतांत आले आहेत. बाबासाहेबांच्या प्रत्येक कठीण प्रसंगात तो कसे धीराने झुंजले,

सत्याग्रही राहून लढले, कसे विजयी होत राहिले, किती अभ्यास केला, रमाईचे कष्ट, रामजी बाबांची अभिलाषा, आणि भीम कसा झाला भारताचा घटनाकार... एकूणच बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन संघर्ष आंबेडकरी गीतांत ऐकायला मिळतो. तत्कालीन राजकारण आणि समाजकारण अगदी तटस्थतेनं पाहायला मिळतं, महात्मा गांधी, पंडित नेहरू, कस्तुरबा गांधी, जिना आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे संदर्भानं येतात.

रवीश कुमार यांनी शाहीर संभाजी भगतांची मुलाखत घेत असता, आपलं मत व्यक्त केलं होतं. ''ज्याप्रमाणे भीम गीते मानव मुक्तीचा मोकळा श्वास घ्यायला शिकवतात, त्याप्रमाणेच ते बाबासाहेबांप्रती आभार प्रकट करतात. एक प्रकारचा भीम गीतांनी संगीत क्षेत्रात ‘आभार रस’ निर्माण केला आहे. आंबेडकरी प्रबोधनात्मक गीतांत समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता मूल्ये ठिकठिकाणी जाणवतात.

स्वाभिमान, अभिमान, जाणीव, जागृती, विद्या, करुणा जीवन मूल्यं अंगीकारायला शिकवतात तर गुलामी, सलामी, मुजरे, चाखरी सोडायला प्रवृत्त करतात. आंबेडकरी कलावंतांची मंडळं सांस्कृतिक चळवळ अतिशय परिणामकारकतेनं करत आहेत.

आंबेडकरी समाज बाबासाहेबांना आपला मसिहा मानतो. कारण या समूहाची स्थिती काखेत लेकरू, हातात झाडू, डोईवर शेणाची पाटी, कपडा ना लत्ता, खरखंट भत्ता, फजिती होती माय मोठी, अन् माया भीमानं... भीमानं माय सोन्यानं भरली ओठी - आंबेडकरी गायिका कडुबाई खरात गीत वायरल झाल्याने त्या प्रसिद्धी झोतात आल्या आहेत.

आज त्यांच्या कार्यक्रमाला लाखोंचा जनसमुदाय गर्दी करतो. प्रसिद्ध शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी बाबासाहेबांचा पोवाडा गायला आहे. विठ्ठल उमप, बापू पवार, किशोर सासवडे, प्रेम धंदे, आदर्श शिंदे आणि आनंद शिंदेंचे नातू आल्हाद शिंदे यांनी आंबेडकरी पोवाडा गायला आहे,

पोवाडा शूरवीरांच्या गाथा सांगणारा कलाप्रकार मात्र भीम शाहिरांनी विषमतेला शत्रू मानून पोवाड्याची रचना केली, इतकाच नाही तर पुरुषांची मक्तेदारी असणारा कलाप्रकार शिवभीम शाहीर सीमा पाटील यांनी ही गायला आहे.

पोवाडा, पाळणा, भूपाळी, गझल, कव्वाली, भजन, जलसा, रॅप, सुगम आणि शास्त्रीय संगीताच्या आणि लोकगीतांच्या अनेक फॉर्ममधून भीम गीते विविध गायकांनी गायली लिहिली आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील पी. एचडी स्कॉलर आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे आणि स्मिता राजमाने यांनी आंबेडकरी संगीताचा वारसा डिजिटल फॉर्ममध्ये संग्रहित करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलंय.

भीम गीत प्रकारांमध्ये ''पाळणा'' गीत प्रकार गायला जातो. यात बाबासाहेबांच्या जन्मोत्सवाचं वर्णन प्रकर्षानं गायलं जातं. छगन चौगुले यांनी गायलेला पाळणा कॅसेट ''जयंती भीमरायाची'', दीप्ती शिंदे यांचा ''बाळ भीमाचा पाळणा''... त्या काळी या कॅसेट प्रसिद्ध झाल्या होत्या.

जालिंदर ससाणे आणि आनंद शिंदे यांचा भीम पाळणा प्रसिद्ध आहे. भूपाळी एक लोककला प्रकार आहे. प्रामुख्याने सकाळी सकाळी ही गीते गायली जायची, जात्यावर धान्य दळतेवेळी बायका ''जात्यावरची ओवी'' आणि ''भूपाळी'' गायली जायची.

पहिली भीम भूपाळी सत्यशोधकी जलसाकार हरी भाऊ तोरणे यांनी १९३३ मध्ये लिहिली आणि बाबासाहेबांचे वृत्तपत्र ''जनता'' मध्ये छापली होती, विशेष म्हणजे बाबासाहेबांनी वाचली होती. साधनाताई खरात या भीम भूपाळी गायिका प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा आणि गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. या भक्ती संप्रदायांची स्वतंत्र भजनी मंडळं आहेत. संतांच्या विचारांची भजनी मंडळं असल्यामुळे आध्यात्मिक आणि प्रबोधनात्मक गीते गायली जायची मात्र समकालीन भजनी मंडळांनी आंबेडकरी गीतांना सामावून घेतले आहे.

विशेष म्हणजे त्यांना ऐकणारी जनता दलितेतर आहे. बहुजन समाजात बाबासाहेबांचा विचार आता बहुजन लोककलावंत पोचवत आहेत. समकालीन भजनी मंडळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्या विचारांसोबतच फुले-शाहू-आंबेडकरी विचार मांडताना दिसत आहेत.

सत्यपाल महाराज स्वतंत्र कलावंत तसेच नव्या पिढीतील तुषार सूर्यवंशी सप्त खंजिरी वादक, प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. गझल हा काव्यातील काव्य. अतिशय प्रगल्भ प्रतिभेचा कवीच गझल काव्याला हाताळतो. मात्र भीम शाहिरांनी गझल काव्यप्रकाराला वंचित नाही ठेवलं, आनंद शिंदे यांनी गझल ''जय भीमवाला आगे आगे बढता है'' ही गझल सुरेख गायली आहे.

आंबेडकरी विचार गझलेतून प्रसारित करण्यात कवी, गझलकार सुरेश भट्ट, रमेश सरकाटे, रवींद्र जाधव, शरद काळे आणि वामनदादा यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. गझल आणि कव्वाली आंबेडकरी संगीतावर सुफी संगीताचा परिणाम दिसून येतो.

भीम कव्वाली आनंद शिंदे यांनी गायलेली कव्वाली ''मैं तो भीम का दिवाना हूँ'' पावणेसहा कोटींहून अधिक लोकांनी युट्युबवर पहिली-ऐकली आहे. भीम कव्वाली राहुल साठे यांनी ''भले भले ते पुढारी करतात भीमाला सलामी'' युट्युबवर सव्वाकोटींहून अधिक लोकांनी पाहिली-ऐकली. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी महात्मा फुलेंनी ''सत्यशोधकी जलसा'' या स्टँडिंग परफॉर्मन्स कलाप्रकाराची सुरुवात केली.

त्याला प्रेरित होऊन बाबासाहेबांचे कार्यकर्ते एन. टी. बनसोडे यांनी पहिला आंबेडकरी जलसा पुण्यातून सुरुवात केला, तत्पूर्वी सत्यशोधकी जलशामध्ये बाबासाहेबांवर गीते गायला सुरुवात हरीभाऊ तोरणे यांनी भीम भूपाळी लिहून आणि गाऊन केली होती.

जलशाचे स्वरूप असे होते की, चार ते बारा (स्त्री-पुरुष भेद नाही) कलाकारांचा ताफा टाळ, ढोलकी, तंतूंना, डफ, खंजिरी, हार्मोनियम आणि हलगी सुरुवातीला भीम बुद्ध वंदना गीत, सवाल जवाब, कथाकथन, चिकित्सा आणि बोध.

आंबेडकरी जलसा आंबेडकरी समाजात खूप लोकप्रिय आहे, जलसाकार मंडळी उच्च शिक्षित आणि प्रामुख्याने तरुण मंडळी आहेत. समकालीन जलसाकार शाहिरी जोडपं शीतल साठे आणि सचिन माळी आजही महाराष्ट्रभर आपली कला जलाशाच्या माध्यमातून सादर करत आहेत. त्यांचे नवयान जलसा नावाने युट्युबवर चॅनल लोकप्रिय आहे.

जलसाकार मंडळी जनजागृती दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि भीमजयंतीला अनेक शहरांमध्ये तत्परतेने करत आहेत. बुद्धाचा समतेचा संदेश जनमानसात रुजविणे, फुलेंचा सत्यशोधनाचा मार्ग आणि बाबासाहेबांचा विद्यावान होण्याचा संदेश सार्वत्रिक जलसाकार मंडळी करत आहेत. संभाजी भगतांचे शाहिरी जलाशासाठी वेगळं महत्त्व आहे.

असंख्य आंबेडकरी लोककलावंत आपापल्या कुवतीने समता स्थापित करण्याच्या मार्गावर चालत आहेत. आंबेडकरी चळवळ मी अगोदर म्हणालो, त्याप्रमाणे केवळ राजकीय नव्हे तर, अधिकांशी सामाजिक आणि सांस्कृतिक आहे. दलित साहित्य, नाटके, जलसे, भीम गीते, प्रबोधनात्मक कार्यक्रम या चळवळीची अविभाज्य अंग आहेत.

शास्त्रीय संगीत प्रामुख्यानं ब्राह्मणवादी वर्चस्व असणारा कला प्रांत. लोककला जोपासली पिढ्यानपिढ्या वृद्धिंगत केली आणि आजही बहुजन समाज करत आहे. शास्त्रीय संगीत ही साधनेची आणि रियाजाअंती सध्या होणारी कला आहे.

हा प्रांत दलित सोडा बहुजनांसाठी असाध्य राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंबेडकरी गीते शास्त्रीय संगीताच्या प्रकारात येथील संगीत शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय मोहड यांच्या संकल्पनेतून निर्माण करत आहे.

बाबासाहेबांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठाने ''गीत भीमायन'' या शास्त्रीय संगीताची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे संकल्पक आणि बंदिशी निर्माते डॉ. संजय मोहड, संगीत संयोजक नरेंद्र भिडे तसेच गायक कविता कृष्णमूर्ती,

हरिहरन, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, राधूनंदन पणशीकर, साधना सरगम, बेला शेंडे या प्रसिद्ध कलावंतांनी गीते गायली आहेत आणि ही सगळी गीते वामनदादा कर्डक यांची आहेत. जिज्ञासू विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील गीतं ऐकू शकता.

डॉ. संजय मोहड म्हणाले, की बाबासाहेब हा शास्त्रीय गायनाचा विषय आहे. विद्यापीठाच्या संकेत स्थळावर त्यांनी निर्माण केलेल्या आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायकांनी गायलेल्या अनेक बंदिशी उपलब्ध आहेत. डॉ. संजय मोहड पहिले कलावंत आहेत, जे फुले-शाहू-आंबेडकरी विचार शास्त्रीय संगीतातून लोकांपर्यंत पोचवत आहेत. त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. स्टेज कार्यक्रमामध्ये अंशतः शास्त्रीय मिलाफ करणाऱ्या आणि भीम गीते गाणाऱ्या जाधव सिस्टर्स प्रसिद्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com