आधुनिक मनूची नौका? (डॉ. बाळ फोंडके)

आधुनिक मनूची नौका? (डॉ. बाळ फोंडके)

‘येत्या १०० वर्षांत मानवप्राण्याचा सर्वनाश होणार आहे,’ असा इशारा देत ‘या सर्वनाशापासून बचावासाठी आणि तगून राहण्यासाठी मानवानं पृथ्वी सोडून परग्रहांवर वस्ती करावी,’ असं स्टीफन हॉकिंग यांनी सुचवलं आहे. बीबीसी या वाहिनीवर होत असलेल्या एका चर्चासत्रात त्यांनी ही सूचना केली आहे. हॉकिंग हे ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि विश्वरचनावैज्ञानिक आहेत; त्यामुळं साहजिकच त्यांच्या या ‘भविष्यवाणी’ची दखल घेतली जात आहे. काय सांगितलं आहे, यापेक्षा ते कुणी सांगितलं आहे, याला आपण सगळेच जास्त महत्त्व देत असतो. मात्र, हवामानबदलापायी हॉकिंग यांच्याइतकं हडबडून जाण्याची खरोखरच आवश्‍यकता आहे काय, याचा शांत डोक्‍यानं विचार व्हायला हवा. त्यांच्या भाकिताला भावनिक प्रतिसाद देण्याऐवजी विवेकपूर्ण प्रतिक्रिया द्यायला हवी.

‘येत्या चोवीस तारखेला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी जगाचा अंत होणार आहे,’ अशी भविष्यवाणी लिहिलेले फलक हातात घेऊन चौकामध्ये उभे राहणारे वेडेपीर आपल्याला नेहमी भेटत असतात. तसा तो खरोखरच होणार असेल, तर त्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतरही आपण काय करू शकतो, हा विचार त्यांनाही सुचत नाही आणि तो आपल्यालाही करावासा वाटत नाही. अमुक वेळेला मोठी भरती येणार आहे किंवा वादळाचा तडाखा बसणार आहे, असा इशारा जेव्हा हवामानखात्याकडून देण्यात येतो, तेव्हा तो खरा असल्याची खात्री आपल्याला असते, तसंच त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी आपल्याला करता येते; पण जगबुडीच होणार असेल तर त्यापासून स्वतःला कसं वाचवता येईल? म्हणूनच अशा भाकितांची फारशी दखल घेतली जात नाही.

पण आता मात्र ‘येत्या १०० वर्षांत मानवप्राण्याचा सर्वनाश होणार आहे आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पृथ्वी सोडून इतरत्र कुठंतरी मुक्काम हलवावा लागेल,’ या इशाऱ्यापायी किमानपक्षी प्रसारमाध्यमं खडबडून जागी झालेली दिसताहेत आणि ही खळबळजनक माहिती आपल्या वाचका-प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची अहमहमिका लागली आहे. कारण, एकतर आपण सगळेच काय सांगितलं आहे, यापेक्षा ते कुणी सांगितलं आहे, याला जास्त महत्त्व देत असतो. त्यानुसार ही भविष्यवाणी ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि विश्वरचनावैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी केल्यामुळं तिची दखल घेतली जात आहे. बीबीसी या वाहिनीवर होत असलेल्या एका चर्चासत्रात हॉकिंग यांनी ही सूचना केली आहे.

वास्तविक, असं भाकीत करणारे ते पहिलेच वैज्ञानिक नाहीत. यापूर्वीही इतर ख्यातनाम वैज्ञानिकांनी अशा प्रकारची भयसूचक विधानं केली होती. सात वर्षांपूर्वीच २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ फ्रॅंक फेन्नेर यांनीही ‘येत्या १०० वर्षांत धरती उजाड होऊन वस्ती करण्यालायक राहणार नाही,’ अशी भीती व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी वेगानं होणाऱ्या हवामानबदलाचं कारण पुढं केलं होतं. हॉकिंग यांनी त्याच्याच जोडीला वाढत्या उल्कावर्षावांचा दाखला दिला आहे. फेन्नर यांच्या त्या भाकिताची उपेक्षाच केली गेली. ‘उतारवयातल्या बुद्धिभ्रमाची बाधा त्यांना झाली आहे,’ असंही त्या वेळी म्हटलं गेलं. आज हॉकिंग यांच्या भवती असलेल्या वलयामुळं तशी संभावना करण्याचं धारिष्ट्य कुणी दाखवणार नाही; परंतु त्यांच्या वक्तव्याचीही वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्याची आवश्‍यकता मात्र आहे.

मानवजातीच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त करणारी अशा प्रकारची निराशावादी चित्रणं यापूर्वीही रेखाटली गेली आहेत. १९६० च्या दशकात काही विचारवंतांनी एकत्र येऊन ‘क्‍लब ऑफ रोम’ची स्थापना केली होती. मनुष्यजातीच्या भवितव्याविषयी चिंता वाटून त्यासंबंधीचं प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यासाठी प्रामुख्यानं रॉबर्ट माल्थस याच्या सिद्धान्ताचा वापर करण्यात आला होता. माल्थसनं म्हटलं होतं ः ‘लोकसंख्येची वाढ भूमितीश्रेणीनं होत असताना अन्नधान्याचं उत्पादन मात्र अंकगणितीश्रेणीनंच वाढतं. यात असलेल्या तफावतीपायी नजीकच्या भविष्यकाळात अन्नान्नदशा होऊन मनुष्यजातीत मोठ्या प्रमाणावर भूकबळी पडतील, हाहाकार माजेल.’

माल्थसचा लोकसंख्यावाढीविषयीचा अंदाज तसा प्रत्यक्षात उतरलाही होता; पण त्याची दखल घेत निरनिराळ्या देशांनी योजलेल्या उपायांमुळं लोकसंख्यावाढीचा वेग रोखण्यातही काही प्रमाणात यश मिळालं आहे. युरोप, अमेरिका, जपान या भूभागांमध्ये तर लोकसंख्या घटत असल्याचं सध्या दिसत आहे. आता त्याचीच चिंता त्या देशांना लागली आहे. भारत आणि चीन या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांमध्येही लोकसंख्यावाढीचा वेग मंदावतो आहे आणि येत्या २० ते २५ वर्षांमध्ये या देशांमधली लोकसंख्याही स्थिर होऊन घटण्याच्या दिशेनं मार्गक्रमणा करू लागेल, अशी चिन्हं आहेत. त्यामुळंच ‘क्‍लब ऑफ रोम’नं  १९७२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘लिमिट्‌स टू ग्रोथ’ या ग्रंथातलं भाकितं खरी ठरलेली नाहीत. आज बहुतांश जगात अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. नजीकच्या भविष्यात त्यात बदल होण्याची शक्‍यताही दिसत नाही. त्यात तंत्रज्ञानाच्या मदतीनं अन्नधान्याच्या उत्पादनात सतत वाढ होत आहे. वाढत्या तोंडांमध्ये घास घालण्याची क्षमता त्यानं मिळवलेली आहे.
ज्या काळात माल्थसनं आपल्या सिद्धान्ताची पायाभरणी केली होती, त्या काळात तो सिद्धान्त आजच्या हवामानबदलाच्या परिणामांबद्दलच्या अटकळींएवढाच भयावह होता. औद्योगिकीकरणानंतर जगाची लोकसंख्या झपाट्यानं वाढत होती. आजही हवामानबदल होत असल्याच्या, धरतीचं तापमान वाढत असल्याच्या खुणा आपल्याला स्पष्टपणे दृग्गोचर होत आहेत. तेव्हा हवामानबदल होत आहे, याविषयी फारशी शंका राहिलेली नाही.

प्रश्न आहे तो त्याचा जो वेग आज दिसतो आहे, तो तसाच राहणार आहे का याचा. हवामानबदलाची जी कारणमीमांसा केली जाते, तीनुसार दोन मतप्रवाह आजही वैज्ञानिकांमध्ये प्रचलित आहेत. काही जणांचं- कदाचित बहुतेकांचं- म्हणणं असं आहे, की भयानक वेगानं झालेलं आणि होत असलेलं औद्योगिकीकरण, तसंच माणसाची असीम उपभोगलालसा यापोटीच हवामानबदलाचं संकट अंगावर येऊन कोसळलेलं आहे; पण निदान काही वैज्ञानिकांना हे मान्य नाही. ‘भूतकाळातल्या हवामानाचा दाखला देत अशा प्रकारचे हवामानबदल औद्योगिकीकरणपूर्व काळातही नैसर्गिकरीत्याच झाले होते,’ असं ते सांगत आहेत. ‘आजवर झालेल्या हिमयुगांच्या आवर्तनाकडं लक्ष वेधत दोन हिमयुगांच्या मधल्या काळातही धरतीचं तापमान चढं राहिलं होतं, याचा विसर पडता नये,’ असा त्यांचा प्रतिसिद्धान्त आहे. म्हणूनच यापुढंही हवामानबदलाचा वेग असाच सतत वाढत जाईल, याविषयी त्यांनी शंका प्रदर्शित केली आहे.

कारणं काहीही असोत, आजवर जो बदल झाला आहे, त्याचे परिणाम झाल्यावाचून राहणार नाहीत; पण त्यांची मात्रा माणूस हतबल होण्याइतकी प्रभावी असेल का, हा कळीचा मुद्दा आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची घोडदौड आज सुरू आहे. प्रत्यही नवनवे शोध लागत आहेत. आजच्या समस्यांवरचे तोडगे नुसतेच दृष्टिपथात येत नसून, ते प्रत्यक्षातही उतरत आहेत. ज्या खनिजइंधनाच्या अतिवापरापोटी धरतीचं तापमान वाढलेलं आहे, त्याला पर्याय शोधले जात आहेत, सापडत आहेत आणि त्यांच्या प्रत्यक्ष वापरालाही सुरवात होत आहे. खनिजइंधनांच्या वापरातून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रियो किंवा अलीकडंच पॅरिस इथं भरलेल्या जागतिक परिषदांमध्ये या उपाययोजनांसंबंधी सर्वसंमती मिळवण्याच्या दिशेनं आणि त्या अंगीकारण्याच्या दिशेनं वाटचाल होत आहे. ती वेगानं व्हावी, याविषयी दुमत नाही; पण या प्रकारचे, अंगीकारलेल्या जीवनशैलीत होणारे, आमूलाग्र बदल एका रात्रीत होत नसतात. त्यांची गती संथच असते. याबाबतीत क्रांतीचा आग्रह धरण्याऐवजी उत्क्रांतीची अपेक्षा अधिक सार्थ ठरावी. त्यामुळं हवामानबदलापायी हॉकिंग यांच्याइतकं हडबडून जाण्याची खरोखरच आवश्‍यकता आहे काय, याचा शांत डोक्‍यानं विचार व्हायला हवा. त्यांच्या भाकिताला भावनिक प्रतिसाद देण्याऐवजी विवेकपूर्ण प्रतिक्रिया द्यायला हवी.

हॉकिंग यांनी मांडलेला उल्कावर्षावाचा मुद्दाही तितकाच पोकळ वाटतो. आजही प्रत्येक क्षणाला धरतीवर अवकाशातून उल्कावर्षाव होतच असतो. काही विशिष्ट कालावधीत त्याचा जोर वाढतो आणि रात्रीच्या वेळी असा धुवाँधार उल्कावर्षाव आपल्याला सहजगत्या दिसतो. यातल्या बहुतेक उल्का पृथ्वीच्या वातावरणात शिरल्या शिरल्या जळून खाक होतात. ज्या जमिनीपर्यंत पोचतात, त्यांचं आकारमानही जेमतेमच असतं. प्रचंड उंचीवरून आल्यामुळं त्यांच्या आघातमात्रेत वाढ झालेली असली, तरी धरतीचं फार मोठं नुकसान करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. ६५ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महाभयंकर उल्कापातापायी डायनोसॉरची प्रजाती - त्या काळी सर्वत्र भरभराटीला आलेली - नष्ट झाली; पण त्यानंतरच्या काळात तशा प्रकारचं उल्काताडन झालेलं नाही. त्यामुळं पुढच्या १०० वर्षांमध्ये अशा प्रकारचा उत्पाती उल्कावर्षाव होण्याची भीती हॉकिंग यांना का वाटते, हे अनाकलनीय आहे.

या निराशावादी भाकितावर मात करण्यासाठी जो तोडगा हॉकिंग सुचवत आहेत, तोही असाच तर्कदुष्ट वाटतो. ‘स्वतःला वाचवण्यासाठी आणि तगून राहण्यासाठी मानवानं धरती सोडून परग्रहांवर वस्ती करावी,’ असं त्यांनी सुचवलं आहे. पहिली बाब म्हणजे, मानवजातीच्या सद्यप्रकृतीला मानवेल असा परग्रह अजूनही सापडलेला नाही. तो सापडला तरी तिथपर्यंत सदेह पोचण्यासाठीचं तंत्रज्ञान अजूनही विकसित झालेलं नाही. अवकाशयुगाची प्रस्थापना होऊन आज ६० वर्षं झाली आहेत. या कालावधीत आपण म्हणजे मानवानं जेमतेम आपल्या चंद्रापर्यंत सदेह जाण्याइतपत मजल मारली आहे. सौरमंडळातल्या इतर ग्रहांपर्यंत आपण अजून पोचलेलोही नाही; वस्ती करण्याची बाब तर दूरच राहिली. अशा परिस्थितीत धरतीसमान परग्रहावर मोठ्या संख्येनं वस्ती करण्याची क्षमता येत्या  १०० वर्षांत आपण प्राप्त करू शकू का, या प्रश्नाचं सयुक्तिक उत्तर प्रत्येकानं आपापल्या मतीप्रमाणे द्यावं.

ते होकारार्थी असलं तरी त्याहूनही एक मोठा सवाल आपल्यापुढं उभा ठाकतो. आज पृथ्वीवर माणूस राहतो, तगतो तो संपूर्णपणे स्वतंत्र एखाद्या बेटासारखा नाही. इथल्या सजीव-निर्जीव सृष्टीशी त्याचं अतूट नातं आहे. त्यांच्यामध्ये एक पर्यावरणीय नेटवर्क प्रस्थापित झालेलं आहे. कित्येक खनिजांचा देहबांधणीला उपयोग होतो. रक्तासाठी लोह लागतं, हाडांसाठी कॅल्शियम. इतरही खनिजं लागतात. इथले  सूक्ष्मजीव जमिनीची मशागत करून वनस्पतींच्या वाढीला मदत करतात. एवढंच नव्हे तर, आपल्या शरीरात कायमचं वास्तव्य करून राहणारे काही सूक्ष्मजीव अन्नपचनात कळीची भूमिका पार पाडतात. वनस्पतींच्या योगदानाबद्दल काय सांगावं! इतर सगळ्याच सजीवांचं ते प्राथमिक अन्न आहे. प्राण्यांचीही आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होत असते. दुभती जनावरं दूध पुरवतात. कोंबड्यांसारखे पक्षी अंडी देतात. शेळी, मेंढी, बैल, डुक्कर या प्राण्यांचा तर खाद्यपदार्थांसाठी थेट उपयोग होतो. एकट्या मानवानं स्थलांतर केलं, तर त्या परग्रहावर तो तगू शकेल? त्यासाठी या सगळ्याच सजीव-निर्जीव सृष्टीचा लवाजमा साथीला घेऊनच जाणं योग्य नाही का ठरणार? आणि ते करायचं तर मग एकट्या मानवानं सदेह त्या परग्रहापर्यंत मजल मारून भागणार नाही. पुरातन काळातल्या महाप्रलयापासून वाचण्यासाठी मनूनं किंवा नोहानं एक होडी बांधून त्यातून प्राण्यांचं स्थलांतर घडवून आणलं होतं, अशा दंतकथा प्रचलित आहेत. हॉकिंग यांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे, मानवजात नष्ट होण्याचं संकट टाळण्यासाठी, त्यांनीच सुचवलेल्या उपाययोजनेनुसार, आज एक आधुनिक मनूची नौका बांधून तीतून यच्चयावत सजीव-निर्जीव सृष्टीचा गोतावळा बरोबर घेऊन ती परग्रहापर्यंत वाहून न्यायला हवी! हे कसं साध्य करता येईल, याचा तपशील हॉकिंग यांनी दिलेला नाही. तो दिला तरी तसं करणं हा ‘तुघलकी निर्णय’ ठरण्याचीच जास्त शक्‍यता आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com