कशाला हवीत ही अधिवेशनं! (डॉ. बाळ फोंडके)

डॉ. बाळ फोंडके balphondke@gmail.com
रविवार, 13 जानेवारी 2019

सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात बांधलेल्या तर्कदुष्ट अवैज्ञानिक दाव्यांचं दर्शन घडतानाच दिसून येतं. तिथं केली गेलेली आपल्या प्राचीन वैज्ञानिक संपन्नतेचा दावा करणारी निवेदनं समाजाला स्मरणरंजनात गुंतवून ठेवत देशाला मागं खेचण्याचाच प्रकार आहे.

सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात बांधलेल्या तर्कदुष्ट अवैज्ञानिक दाव्यांचं दर्शन घडतानाच दिसून येतं. तिथं केली गेलेली आपल्या प्राचीन वैज्ञानिक संपन्नतेचा दावा करणारी निवेदनं समाजाला स्मरणरंजनात गुंतवून ठेवत देशाला मागं खेचण्याचाच प्रकार आहे.

देशाच्या अनेक भागांमध्ये ग्रामदैवतांचे वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्यानिमित्तानं तिथं जत्राही भरवल्या जातात. सुरवातीला कदाचित तिथं जमणाऱ्या खऱ्याखुऱ्या भाविकांच्या श्रमपरिहारार्थ या जत्रांचं आयोजन केलं गेलं असेल; पण हळूहळू त्या जत्रांनाच महत्त्व येत गेलं आणि मूळ उद्दिष्ट बाजूला पडून बाजारबुणग्यांचीच गर्दी वाढू लागली. साहजिकच अनेक विक्षिप्त प्रकारांना चालना मिळत गेली. सालाबादप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या "इंडियन सायन्स कॉंग्रेस'च्या अधिवेशनांचीही हीच गत झाली आहे. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात बांधलेल्या तर्कदुष्ट अवैज्ञानिक दाव्यांचं दर्शन घडतानाच दिसून येतं. यंदाच्या फगवाडा इथल्या अधिवेशनाची स्थितीही वेगळी नव्हती. तिथं केली गेलेली आपल्या प्राचीन वैज्ञानिक संपन्नतेचा दावा करणारी निवेदनं समाजाला स्मरणरंजनात गुंतवून ठेवत देशाला मागं खेचण्याचाच प्रकार आहे.
गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. त्याच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधानांची हजेरी हाही एक उपचारच.
पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी हा पायंडा पाडला; पण त्यांची बाब निराळी होती. विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय देशात आर्थिक उन्नती आणि सामाजिक समता प्रस्थापित करता येणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यालाच अनुसरून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या उण्यापुऱ्या वर्षभरात त्यांनी देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञानधोरणाची घोषणा केली होती आणि ते अमलात आणण्यासाठी ठोस पावलंही उचलली होती. जीवनाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या अंगांशी निगडित असलेल्या विषयांवर संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापनाही त्याच काळात झाली. त्यामुळं त्यांची उपस्थिती हा उपचार नव्हता आणि त्या कालखंडातल्या वार्षिक अधिवेशनांमध्ये सादर होणाऱ्या संशोधनाचा दर्जाही विवादास्पद नव्हता. नंतरच्या काळात मात्र याची झपाट्यानं घसरण झाली आहे. आज अणुऊर्जा, अंतराळसंशोधन, औषधनिर्मिती, रासायनिक उद्योग, चर्मोद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये जे काही मौलिक आणि जगन्मान्य संशोधन देशात होत आहे, त्याचं प्रतिबिंब या अधिवेशनात पडल्याचं क्वचितच दिसतं. कारण, आत्मसन्मान राखू इच्छिणारा कुणीही वैज्ञानिक आज या वार्षिक कुंभमेळ्यात आपली हजेरी लावत नाही.

वैज्ञानिक पद्धतीमध्ये "बाबा वाक्‍यं प्रमाणम्‌' या प्रणालीला थारा नाही. जिज्ञासा, प्रयोग, निरीक्षण, मीमांसा, तर्कसंगत भाकीत आणि यातून तयार झालेल्या शोधनिबंधाची समकक्ष तज्ज्ञांकडून केली जाणारी प्रकाशनपूर्व चिकित्सक परीक्षा या वैज्ञानिक पद्धतीच्या सहा पायऱ्या आहेत. यातून कुणाचीही सुटका होत नाही. नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांचेही काही शोधनिबंध या पूर्वपरीक्षेच्या कसोटीला न उतरल्यामुळं नाकारले गेल्याची कित्येक उदाहरणं आहेत. "सायन्स कॉंग्रेस'च्या मंचावर सादर केल्या जाणाऱ्या शोधनिबंधांची अशी कठोर तपासणी होत नाही. त्यामुळेच कुणीही आपापल्या पूर्वग्रहांनुसार कोणतीही विधानं करावीत आणि ती वैज्ञानिक आहेत असा दावा करावा, या प्रकाराला उत्तेजन मिळत गेलं आहे. यापुढं अशी परीक्षा केली जाणार असल्याचं आता जाहीर केलं गेलं आहे; परंतु राजकीय नेते देत असलेल्या आश्वासनांसारखं हे पोकळ निघाल्यास "पहिले पाढे पंचावन्न' अशी अवस्था झाल्याविना राहणार नाही.

निसर्गात आपल्या अवतीभवती अनेक आविष्कार घडत असतात. त्यांची उत्पत्ती कशी होते याविषयी आपण अनभिज्ञ असतो, त्यातूनच ते गूढ उकलण्याची जिज्ञासायुक्त ऊर्मी आपल्याला जागृत करते. काही प्रश्न विचारायला उद्युक्त करते. त्या प्रश्नांची सर्वांना पटतील अशी उत्तरं मिळवण्यासाठी मग आपण प्रयोग करतो. त्या प्रयोगांचा आराखडाच असा असतो की त्यातून मिळू शकणाऱ्या निरीक्षणांची संख्याशास्त्राच्या नियमांनुसार छाननी करता यावी. असं करण्याचं कारण म्हणजे ते निरीक्षण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला' या प्रकारचं असू नये, तर परत परत कितीही वेळा तो प्रयोग केला तरी तेच निरीक्षण हाती लागेल याची खातरजमा करून घ्यायची असते. शिवाय, ते निरीक्षण व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे याचाही निर्वाळा मिळवणं आवश्‍यक असतं. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा साक्षात्कार झाला. त्याच्या माथ्यावर पडलेल्या सफरचंदानं त्याच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर त्यानं शोधलं होतं; पण हा अनुभव केवळ न्यूटनलाच येत नाही. सर्वांनाच तो येतो, म्हणून न्यूटननं शोधून काढलेल्या उत्तराला वैज्ञानिक सिद्धान्त म्हणून मान्यता मिळते. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्या काळातल्या वैज्ञानिक प्रगतीचे जे उल्लेख आहेत असं सांगितलं जातं, त्यात या सर्वमान्य वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब झाल्याचा कोणताही पुरावा नाही.

कौरवांचा जन्म टेस्ट ट्यूबच्या तंत्रान्वये झाल्याचा दावा या अधिवेशनात केला गेल्याचं प्रसिद्धिमाध्यमांनी सांगितलं आहे. त्याची चिकित्सा करायला हवी. आज हे शरीरबाह्य फलनाचं तंत्रज्ञान प्रगत झाल्यानंतरही बीजदात्या स्त्रीच्या अंडकोषांमधून एका वेळी सात-आठपेक्षा अधिक परिपक्व बीजं मिळत नाही. मग महाभारतकाळात एकाच वेळी शंभर बीजं कशी काढली गेली, यासंबंधी काहीही माहिती त्या ग्रंथांमध्ये मिळत नाही. या बीजांचं शुक्रपेशींशी शरीरबाह्य मीलन घडवून त्यातून प्रयोगशाळेतच त्यांचं संवर्धन केल्याशिवाय त्यांचं भ्रूणांमध्ये अवस्थांतर होत नाही. त्या संवर्धनप्रक्रियेचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. साधी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया कशी साधली गेली याचीही माहिती मिळत नाही. त्यातून तयार झालेल्या शंभर भ्रूणांच्या पुढील रुजवणीसाठी शंभर सरोगेट मातांचीही गरज भासली असणार. त्या कुठून मिळाल्या हेही कुठं सांगितलं गेलेलं नाही. आजही अशा रुजवणीच्या यशस्वितेची टक्केवारी कमीच आहे. म्हणजेच शंभराहून अधिक भ्रूणांची निर्मिती आवश्‍यक ठरते. अर्थातच तेवढी बीजंही काढावी लागली असतील. अनेक कच्चे दुवे आहेत. थोडक्‍यात, ही केवळ कविकल्पना आहे. तिला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

विज्ञानकथा म्हणूनही तिची गणना करता येत नाही. कारण, विज्ञानकथेमध्ये कल्पनाविहाराला भरपूर वाव असला तरी ज्या वैज्ञानिक संकल्पनेच्या धाग्याचा आधार घेत कल्पनेचा पतंग उडवला जातो ती भक्कम वैज्ञानिक पायावर उभी असते.
ज्यूल्स व्हर्ननं एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर "चंद्रावर स्वारी' ही चित्तथरारक विज्ञानकथा लिहिली. ती कल्पनेची भरारी असली तरी त्यामागचं विज्ञान वास्तव संकल्पनांवरच आधारित होतं; पण त्यानंतर शंभर वर्षांनी जेव्हा अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर प्रत्यक्ष उतरून "वामनाचं पाऊल' उचललं तेव्हा फ्रेंचानी त्यांना "त्यात काय विशेष? आम्ही तर हे 100 वर्षांपूर्वीच साध्य केलं होतं' असं अभिमानानं सांगितलं नाही. तेच एकोणिसावं शतक सरता सरता एच. जी. वेल्सनं अदृश्‍य माणसाची रोमांचक विज्ञानकथा सांगितली म्हणून ब्रिटिशांनी स्थेल्थ बॉम्बर्स वापरणाऱ्या अमेरिकेला "कसली बढाई मारता? आम्हाला तर हे गेल्या शतकभराहून अधिक काळापासून माहीत आहे,' असं सांगून खिजवण्याचा प्रयत्न केला नव्हता. कारण, फ्रेंच काय किंवा ब्रिटिश काय, त्या समाजांना कल्पनेची भरारी आणि वैज्ञानिक सत्य यांच्यातल्या फरकाची जाणीव होती आणि आहे. स्मरणरंजनात गुरफटून पडण्यापेक्षा विज्ञानानं नव्यानं सादर केलेल्या त्या संशोधनाचं महत्त्व ओळखून आपणही ते आत्मसात करण्याचेच प्रयत्न त्या समाजानं केले.

पंडित नेहरू यांच्यासारख्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केलेल्या पंतप्रधानांनी या "सायन्स कॉंग्रेस'चं उद्‌घाटन करण्याची परंपरा रुजवली. आजही ती पाळली जात आहे; पण त्यापायी विद्यमान पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्याची राजकीय आकांक्षा बाळगणारे आणि आपल्या आचार-विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मागमूस नसलेले राजकारणी तिथं उपस्थित राहू लागले. त्यांची मेहेरनजर आपल्यावर पडावी या उद्देशानं अनेक तथाकथित वैज्ञानिक तिथं येऊन आपले शोधनिबंध सादर करू लागले. त्याचीच ही परिणती आहे.

काही मूठभर नामांकित संस्था वगळल्यास आपल्या बहुसंख्य विद्यापीठांमधून होणाऱ्या संशोधनाच्या दर्जाबद्दल अनेक तज्ज्ञांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. ती रास्त आहे हेच या सुमार दर्जाच्या, खरं तर छद्मविज्ञानाधिष्ठित, संशोधनानं स्पष्ट केलं आहे. याला आपल्या समाजाची "चलता है' ही वृत्तीही कारणीभूत आहे. कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा ध्यास न धरता "जुगाड' करण्याच्या प्रवृत्तीलाच प्राधान्य देण्याची आपली सामाजिक मानसिकता सर्वच क्षेत्रं गढूळ करत आहे. म्हणूनच औषधांच्या पुड्या बांधणाऱ्या कम्पाउंडरला आपण डॉक्‍टर म्हणतो आणि प्रयोगशाळा सहाय्यकाला प्राध्यापकाची पदवी बहाल करतो. त्याविषयी खंतही कुणी व्यक्त करत नाही.

आज सारं जग ज्ञानाधिष्ठित समाजरचनेची कास धरत आहे. आपणही त्याच दिशेनं प्रवास करावा अशी प्रेरणा देण्याची आवश्‍यकता असताना कपोलकल्पित प्रगतीच्या गप्पा ऐकवत भूतकाळातच रममाण होण्याचा संदेश आपण देत आहोत. त्याला विज्ञानाच्या नावानं भरवल्या जाणाऱ्या मेळाव्यातलं व्यासपीठ उपलब्ध व्हावं हे तर अतिशय दुःखद आहे. "कशाला हवीत ही असली अधिवेशनं?' हा सवाल विचारण्याची वेळ आता आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr bal phondke write indian science congress article in saptarang