चंद्राची पुनर्भेट (डॉ. बाळ फोंडके)

dr bal phondke write isro article in saptarang
dr bal phondke write isro article in saptarang

भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) "चांद्रयान-2' मोहिमेची घोषणा केली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय "अवकाशा'त भारताची मान उंचावेलच; शिवाय वेगवेगळी निरीक्षणंही पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी पडतील. आधीच्या मोहिमेपेक्षा ही मोहीम वेगळी कशी असेल, आधीच्या मोहिमेतून भारतानं काय धडे घेतले आहेत, नक्की कशा प्रकारे चंद्राला भेट दिली जाईल, तंत्रज्ञान कशा प्रकारचं असेल, अभ्यास कोणता केला जाईल आदी सर्व गोष्टींचा वेध.

स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या तटावरून होणारं राष्ट्राला उद्देशून केलेलं पंतप्रधानांचं भाषण हा केवळ उपचार कधीच नव्हता. देशाची अस्मिता फुलवणाऱ्या कार्यक्रमांची घोषणा करण्याचा एक मंच असाच त्याचा वापर केला गेला आहे. गेल्या सत्तर वर्षांमध्ये अनेक पंतप्रधान झाले; पण आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी याला अपवाद केलेला नाही. म्हणूनच यंदा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इसवीसन 2022 पर्यंत, म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापर्यंत, भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करेल, हे निवेदन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनंही (इस्रो) तत्काळ उचलून धरलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनं (नासा) जसं तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी त्या देशालाच नव्हे तर साऱ्या जगाला "येत्या दशकात अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवेल,' असं दिलेलं आश्वासन साकार करून दाखवलं, तसंच इस्रोनंही पंतप्रधानांचा शब्द खरा करून दाखवणार असल्याची ग्वाही दिली आहे. अमेरिकेचे "ऍस्ट्रोनॉट', रशियाचे "कॉस्मोनॉट'; तसंच भारताचे "व्योमनॉट' अवकाशात संचार करतील, असं जाहीर आश्वासन देशाला, नव्हे जगाला दिलं आहे. याबाबतचा त्यांचा आत्मविश्वास सार्थच आहे, हे त्या संस्थेच्या आजवरच्या अनेक यशस्वी मोहिमांनी दाखवून दिलेलंच आहे; पण तो अधोरेखित करणारी आणखी एक घोषणा इस्रोनं केली आहे. गेली काही वर्षं ज्याची दवंडी पिटली जात होती, ते "चांद्रयान-2'चं प्रक्षेपण येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात केलं जाईल, हेही इस्रोनं सांगून टाकलं आहे.

"चांद्रयान-2' या नावातच आपल्या या लाडक्‍या चंदामामाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही हे समजून येतं; पण गेल्या वेळी चंद्राच्या उंबरठ्यालाच शिवून आपण परत आलो होतो. यावेळी मात्र तो उंबरठा ओलांडून थेट घरात प्रवेश करण्याचाच घाट घातला गेला आहे. "चांद्रयान-1'मधून चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धसमुसळेपणानं जाऊन आदळलं होतं. किंबहुना तशीच योजना होती. त्याला तिथं सोडणारं मातायान मात्र काही महिने चंद्राला प्रदक्षिणा घालत राहिलं होतं. साहजिकच चंद्रापर्यंत आपण यान पाठवू शकतो, याची खात्री होण्याशिवाय चंद्राविषयीची फारशी माहिती त्या मोहिमेतून मिळाली नाही. तरीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असल्याची वार्ता त्यानं जगाला ऐकवलीच. हे त्या मोहिमेचं प्रमुख यश मानलं गेलं आहे आणि त्याची जगभर वाखाणणीही झाली आहे.

त्याच वेळी अधिक महत्त्वाकांक्षी अशा दुसऱ्या मोहिमेचा उद्घोष केला गेला. या मोहिमेत नुसतंच चंद्राला "भोज्जा'सारखं शिवून यायचं नव्हतं, तर मातायानातून चंद्रावर अलगद उतरणारं "लॅंडर' आणि त्याच्या पोटातलं चंद्रावर फिरस्ती करणारं "रोव्हर' यांचाही समावेश व्हायचा होता. चंद्रावर हलकेच उतरणाऱ्या यानाला "विक्रम लॅंडर' हे नाव दिलं गेलं आहे. ज्यांनी आपल्या अंतराळ संशोधनाचं बीज पेरलं आणि त्याचा वटवृक्ष होईल याची खातरजमा करून घेतली त्या विक्रम साराभाईंच्या जन्मशताब्दी वर्षात ही उत्तुंग झेप घेत असताना त्या यानाला त्यांचं नाव देणं, हा त्यांचा यथोचित गौरवच आहे.

विक्रम यानाचं चंद्रावर पाऊल
इस्रोजवळ असलेल्या सर्वांत ताकदवान अशा जिओसिन्क्रोनस सॅटेलाईट लॉंच व्हेईकल या अग्निबाणावर बसून चोवीसशे किलो वजनाचं यान अवकाशात प्रक्षेपित केलं जाईल. चंद्रापासून शंभर किलोमीटर अंतरावर पोचलं, की तिथल्या कक्षेत ते चंद्राभवती परिभ्रमण करत राहणार आहे. शाळेत आपल्या मुलाला सोडायला जाणारी आई ज्या बारकाईनं तिथला परिसर न्याहाळत आपलं बाळ सुरक्षित वर्गात पोचेल याची मनोमन खात्री करून घेते, त्याच तत्परतेनं मग हे मातायान जिथं "विक्रम' उतरणार आहे त्या परिसराची पाहणी करून अलगद उतरण्यात "विक्रम'ला काही अडचण तर येणार नाही याची दक्षता घेईल. त्यानंतरच "विक्रम'ला आपल्यापासून अलग करेल. जवळजवळ चौदाशे किलो वजनाचं विक्रम यान जिथं पाण्याचा साठा सापडला त्या दक्षिण ध्रुवापासून केवळ सहाशे किलोमीटर अंतरावर उतरणार आहे. चंद्राच्या विषुववृत्तापासून इतक्‍या दूर आणि दक्षिण ध्रुवाच्या इतक्‍या जवळ आजवर दुसरं कोणतंच यान पोचलेलं नव्हतं. आईच्या पोटातून बालकानं जन्म घ्यावा, तसंच विक्रम यान घिरट्या घालत राहणाऱ्या "ऑर्बिटर' या मातायानाच्या पोटातून बाहेर पडणार आहे. चंद्रापासून तीस किलोमीटर अंतरावर पोचल्यानंतर ते जिथं उतरायचं त्या ठिकाणाची परत एकदा व्यवस्थित पाहणी करणार आहे. न जाणो तिथं काही अडथळा असेल किंवा एखादा कातळ आपलं अणकुचीदार टोक आकाशात मिरवत राहिला असेल तर "प्रथमग्रासे मक्षिकापात' व्हायला नको. त्या पाहणीतून उतरण्याच्या नेमक्‍या ठिकाणाची निश्‍चिती केल्यानंतरच "विक्रम' चंद्रावर पाऊल ठेवेल. त्याच्याही पोटात असलेलं फिरस्ता "रोव्हर' मग चहूबाजूला भटकंती करायला मोकळा होईल. तो एक संपूर्ण चांद्र दिवस तिथं फिरत राहणार आहे. एकच चांद्र दिवस, अशी शंका घेण्यापूर्वी तो काळ धरतीवरच्या तब्बल चौदा दिवसांइतका मोठा असतो, हे ध्यानात घ्यायला हवं. त्यामुळं रोव्हरच्या हाती चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसराची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी भरपूर वेळ असेल. एवढंच नाही, तर तो सगळा वेळ तिथं हवा तितका सूर्यप्रकाश असल्याचाही फायदा होणार आहे. कारण त्याला जोडलेल्या सौरपट्टिकांच्या मदतीनं तो स्वतःला लागणारी ऊर्जाही स्वतःच मिळवणार आहे. त्यानंतरचे चौदा दिवस मात्र तिथं रात्रीचा अंमल असेल. त्या काळात या यानाची काय दशा होणार आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. कदाचित तोवर मिळालेली सर्वच ऊर्जा खर्च झाली नसेल, तर उरलेल्या ऊर्जेवर तेवढा काळ काढणं शक्‍य आहे काय, याचीही चाचपणी केली जाणार असेल.

"रोव्हर'ची फिरस्ती
कानपूरच्या आयआयटीनं त्याची ही फिरस्ती सुकर व्हावी म्हणून त्याच्यावर काही अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवली आहे. अज्ञात प्रदेशात फिरणं सोपं व्हावं यासाठी रोव्हरला त्रिमिती नजर बहाल केली आहे. विशिष्ट प्रकारचे कॅमेरे त्याला परिसराविषयी ही माहिती सतत पुरवत राहतील. अर्थात नुसती माहिती मिळून उपयोग नाही. तिचा वापर करत आपली वाटचाल निर्वेध करण्याचीही गरज आहे. त्यासाठी त्याच्या सहाही चाकांना स्वतंत्र इंजिनं बसवली गेली आहेत. शिवाय ही चाकं कुठं सरळ जायचं, कुठं वळसा घालायचा असे निर्णय स्वतःच घेऊ शकतील, अशी खास यंत्रणाही चार चाकांवर बसवण्यात आली आहे. थोडक्‍यात ही चाकं स्वतःचीच चालक बनणार आहेत. त्या व्यतिरिक्त मुंबईतल्या खड्डेयुक्त रस्त्यांनाही लाजवणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावरून सुखेनैव वाटचाल करता येईल, आतल्या इतर नाजूक यंत्रसामग्रीला धक्काही बसणार नाही, याचीही व्यवस्था केली गेली आहे.
"विक्रम'ही नुसतंच हात चोळत राहणार नाही. तेही चार वेगवेगळी यंत्रसामग्री बरोबर घेऊन जात आहे. त्यातून चंद्रावरच्या चंद्रकंपाविषयीची मौलिक माहिती उपलब्ध होईल. अमेरिकेच्या अपोलो मोहिमेनं दूरवरूनच अशा प्रकारची काही माहिती मिळवली होती; पण आता त्यासंबंधीचा सारा तपशील विक्रम उपलब्ध करून देईल. तसंच चंद्रावरचं तापमान आणि एकंदरीतच उष्णतेची स्थिती यासंबंधीची माहितीही मिळवली जाणार आहे.

खनिजं, मूलद्रव्यं, पाण्याबाबत अभ्यास
हे सगळं होत असताना वर अवकाशात चंद्राला प्रदक्षिणा घालत राहणारं मातायानही आपला वाटा उचलणार आहेच. चंद्रावर कोणकोणती खनिजं आणि कोणती मूलद्रव्यं आहेत, यांचा साग्रसंगीत नकाशाच तयार करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. आपल्या पूर्वसूरीनं, पहिल्या चंद्रयानानं, जो त्या उपग्रहावरच्या पाण्याचा शोध लावला त्याची सखोल माहिती मिळवण्याचंही उद्दिष्ट आहे. ही सगळी माहिती फक्त सांगोवांगीची असणार नाही यासाठी अनेक कोनांमधून त्यांची छायाचित्रं घेण्याची सोय तर "मातायान', "विक्रम' आणि "रोव्हर' तिघांकडेही आहे. यापैकी "विक्रम' आणि भटक्‍या "रोव्हर' त्यांनी घेतलेली छायाचित्रं मातायानाकडे पाठवतील आणि ते यान इमानेइतबारे ही माहिती धरतीवरच्या नियंत्रक कक्षाकडे सुपूर्द करेल.

भक्कम पूर्वतयारी
ही योजना केवळ कागदावरचीच आहे असं नाही. प्रत्यक्षात ती आराखड्याबरहुकूम काम करील याची खात्री करून घेण्यासाठी प्रथम अनेक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली आहे. माहितीचा तपशील अचूक आणि सखोल असावा यासाठी दूर अंतरावरूनही अतिशय सुस्पष्ट चित्रीकरण करण्याची क्षमता असणारे कॅमेरे विकसित करण्यात आले आहेत. भटक्‍या यानाला स्वतःचं संचलन स्वतःच करायचं आहे. त्यासाठी वेगळा नॅव्हिगेशन कॅमेरा बनवण्यात आला आहे. समोरच्या अडथळ्यांची माहिती करून घेऊन त्यानुसार इशारा देणारा कॅमेराही तयार आहे. या दोन्हींच्या मदतीनं रोव्हर कुठं सरळ जायचं, कुठं वळसा घालून पुढं पोचायचं, कुठं वळण घ्यायचं याचे निर्णय घेत वाटचाल करणार आहे. आपल्या मोटारीचा ड्रायव्हर जीपीएसची मदत घेत अनोख्या वाटेवरूनही प्रवास करतो तसाच काहीसा हा प्रकार आहे. मात्र, हा जीपीएस "रोव्हर'चा स्वतःचाच असणार आहे. उंचसखल प्रदेशातून भ्रमंती करताना किती उंचीवर आपण आहोत याचा अचूक अंदाज देणारं अल्टिमीटर, वेग मोजणारं यंत्र, निरनिराळी इंजिनं ही सारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. काही गेली किती तरी वर्षं उपयोगात आहेत. त्यांच्या सुधारित आवृत्त्या बनवल्या गेल्या आहेत, तर काही खास चांद्रयानासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत. ज्या परिस्थितीत, आणि परिसरात, त्यांना काम करायचं आहे त्यांची प्रारूपं बनवून त्या यच्चयावत यंत्रणांची चाचणीही घेतली गेली आहे. विक्रमच्या इंजिनाची तर उंचीवर नेऊन तब्बल 513 मिनिटं चाचणी चालली होती. एवढंच काय; पण चंद्राच्या पृष्ठभागाची नक्कल करणारा खोल खड्ड्यांनी युक्त असलेला खास रस्ताही कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ल्हयातील चालिकेरी गावात त्यासाठी वसवण्यात आला होता.

ही झाली सारी यंत्रसामग्री. तिचं सुकाणू संगणकाच्या हाती; पण त्या संगणकाला कामाला लावणारी "मंत्रसामग्री!' तीही नव्यानंच तयार करायला हवी. तीही करण्यात आली आहे. लग्नघटिका समीप आली आहे. अक्षरशः "चंद्रबलं ताराबलं' अजमावलं जात आहे. त्यातूनच मग 19 जानेवारी ते 6 फेब्रुवारीमधला मुहूर्त गाठण्याची लगबग चालली आहे.

खरं तर हा मुहूर्त या आधीच गाठला जायला हवा होता. कारण पाच वर्षांपूर्वीच त्यानं चंद्राच्या दिशेनं झेप घ्यायला हवी होती. त्यासाठी अकरा वर्षांपूर्वी रशियाबरोबर संयुक्त प्रकल्प राबवण्याचा करार झाला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी आपल्या सरकारनं तो संमत करून अर्थबळाच्या पुरवठ्याचीही सोय केली होती. करारानुसार इस्रोनं "मातायान' आणि "रोव्हर'ची बांधणी करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. "विक्रम'ची उभारणी "रॉसकॉस्मॉस' ही रशियन संस्था करणार होती. त्यासाठीचं वेळापत्रकही उभयतांनी संमत केलं होतं. इस्रोनं आपला शब्द पाळला आणि दोन्ही यानांची बांधणी वेळेवर पूर्ण केली. त्या यानांमध्ये जी उपकरणं ठेवली जाणार होती त्यांची, म्हणजेच साऱ्या पेलोडची, बांधणीही पूर्ण केली; पण दिलेली वेळ उलटून गेल्यावरही रशियानं "विक्रम' विकसित केलं नव्हतं. साहजिकच 2013चा मुहूर्त गाठणं शक्‍य नसल्याचं ध्यानात आल्यावर 2016चा वायदा केला गेला; पण रशियानं कच खाल्ली. 2015पर्यंतही त्यांची तयारी झाली नव्हती. मध्यंतरीच्या काळात मंगळ ग्रहाविषयीच्या रशियाच्या "फोबोस-ग्रॅन्ट' मोहिमेचा बोजवारा उडाला होता. त्यासाठी वापरली जाणारी काही सामग्री चांद्रयानासाठीही वापरायचा त्यांचा मनसुबा होता; पण "फोबोस-ग्रॅन्ट'मधल्याच तांत्रिक त्रुटी ध्यानात आल्यावर रशियानं संपूर्ण चांद्रयान मोहिमेतूनच आपलं अंग काढून घेतलं. ही 2015ची परिस्थिती पाहून आपण संपूर्ण मोहीम- त्यात "विक्रम' विकसित करण्याची कामगिरीही आली- स्वबळावरच चालवण्याचा निर्धार केला. अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, कानपूरची आयआयटी, बंगळूरची लॅबोरेटरी फॉर इलेक्‍ट्रो ऑप्टिकल सिस्टिम्स, अहमदाबादचं स्पेस ऍप्लिकेशन सेंटर यांसारख्या अनेक संस्था इस्रोच्या मदतीला धावून आल्या. निरनिराळ्या उपकरणांचं उत्पादन करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावर घेतली. वेगवेगळ्या यानांच्या रचनाबंधांमध्येही त्यापायी काही बदल करण्यात आले. त्यातून उड्डाणावेळच्या एकूण वजनातही वाढ केली गेली. साहजिकच आयत्यावेळी करण्यात आलेल्या या आमूलाग्र बदलांपायी मूळ वेळ टळून तर गेलीच; पण त्यांची चाचणी घेऊन सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करेल याची निश्‍चिती करण्यासाठी एकाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या. त्यातही काही वेळ गेला. आता मात्र सर्व तयारी झालेली आहे. हवामान, चंद्र आणि पृथ्वी यांच्या भ्रमणकक्षा, वगैरे इतर बाबी ध्यानात घेऊन आताचा जानेवारी-फेब्रुवारीमधल्या पंधरवड्याचा कालखंड ठरवला गेला आहे. नेमका दिवस आणि वेळ शेवटच्या क्षणीच निश्‍चित केली जाईल.

हे उड्डाण यशस्वी होईल याविषयी कोणालाही शंका नाही. आजवरची इस्रोची ख्याती त्याची प्रचीती देत आहे. या मोहिमेची उद्दिष्टं अनेक आहेत. चंद्राविषयीचं अधिक ज्ञान मिळवणं, विशेषकरून त्याच्या ठायी असलेल्या पाण्याची अधिक तपशीलवार माहिती मिळवणं गरजेचं आहे. पृष्ठभागावरचं पाणी गोठलेल्या स्थितीत आणि पातळ पापुद्रयाच्या रूपात असल्याचं समजलं आहेच; पण पृष्ठभागाखाली द्रवरूपातल्या पाण्याचे साठे असावेत, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तो कितपत खरा आहे, यासंबंधीचे विश्वासार्ह पुरावे मिळवण्याचाही इरादा आहे. चंद्रावर, पृष्ठभागावर; तसंच त्याच्या खाली, दुर्मिळ खनिजांचे साठे सापडण्याची शक्‍यताही वर्तवली गेली आहे. त्याचा तपशीलवार नकाशा बनवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. त्या खनिजांचा इथं धरतीवर वापर करणं कितपत व्यवहार्य असेल, याचाही पडताळा त्यापोटी घेता येईल.

स्वबळाबाबतची शिकवण
भलेही या उड्डाणाला उशीर झाला असला, तरी त्यातून आपल्याला काही धडे मिळाले आहेत. पहिली बाब म्हणजे आज कोणत्याही देशाचं सामर्थ्य त्याच्या अद्ययावत तंत्रज्ञान निर्मितीच्या क्षमतेवर अवलंबून असतं. त्यातही काही क्षेत्रं अशी आहेत, की त्यासाठीचं तंत्रज्ञान कोणीही आपल्याला विकतही देत नाही, की प्रेमाखातर बहाल करत नाही. ते स्वबळावरच विकसित करावं लागतं. अंतराळ संशोधन, अणुऊर्जा, लष्करासाठीची आधुनिक यंत्रणा ही त्यातली काही क्षेत्रं. पोखरण 1पासूनच अमेरिकेनं आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी अनेक निर्बंध लादले होते; पण त्यांना भीक न घालता आपण त्या तंत्रज्ञानाचा विकास केला. काही बाबतींत तर इतरांना साध्य न झालेलं तंत्रज्ञान आपण संपूर्णपणे स्वबळावर विकसित केलं आहे. कल्प्पाकम इथला फास्ट ब्रीडर रिऍक्‍टर हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे. एका अर्थी हे निर्बंध आपल्याला छुप्या वरदानासारखेच ठरले. आताही रशियानं माघार घेतल्यावर चांद्रयानाच्या सर्वच अंगांची तयारी आपल्याच वैज्ञानिकांनी करून "हम भी किसीसे कम नही' हे सिद्ध करून दाखवलंच आहे. मंगळयानाची संपूर्ण मोहीम अमेरिकेपेक्षा निम्म्या वेळात आणि एक दशांश खर्चात पहिल्याच प्रयत्नात आपण यशस्वी करून दाखवली आहे. तेव्हा सर्वच प्रकारचं अद्ययावत तंत्रज्ञान स्वबळावर विकसित करण्याला पर्याय नसतो याची खूणगाठ आपण बाळगायला हवी.

रशियानं करार केल्यानंतरही आपलं अंग काढून घेतलं, याला त्यांनी जे "फोबोस-ग्रॅन्ट'च्या अपयशाचं कारण दिलं आहे ते खरं असेलही; पण त्यासाठी विकसित केलेल्या काही तंत्रज्ञानाचं हस्तांतर न करण्याची भूमिका त्यापाठी नसेलही याची काय शाश्वती? "चांद्रयान-1'मध्ये अमेरिकेनं तयार केलेल्या उपकरणापायीच तिथल्या पाण्याचा वेध घेता आला होता. तरीही पहिल्यापासून त्या देशानं "चांद्रयान-2'पासून दूर राहणंच पसंत केलं आहे. त्याचं कारणही अशाच प्रकारचं असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वास्तविक असे अनुभव यापूर्वीही आपण घेतलेले आहेत. तरीही काही वेळा आपण इतर देशांवर नको तितके अवलंबून राहतो. या धोरणाचाही पुनर्विचार करायला हवा.

आपला देश आता तिसऱ्या जगातल्या अविकसित देशांसारखा राहिलेला नाही. कित्येक क्षेत्रांमध्ये आपली गणना विकसित राष्ट्रांमध्ये होते. आपली अर्थव्यवस्थाही आता मजबूत होऊ लागली आहे. आपला विकासाचा दर आजमितीला सर्वात जास्ती आहे. या वस्तुस्थितीचा आपल्याला विसर पडता कामा नये. यासाठीच भविष्याची उत्तुंग स्वप्नं पाहण्याची सवयही आपण आता अंगी लावून घ्यायला हवी. "अंथरुण पाहून पाय पसरावे,' हे तत्त्वज्ञान आता कालबाह्य झालं आहे. उलट अंथरुण अधिक लांबरुंद करण्याची तयारी आपण दाखवायला हवी. त्यासाठीच अशा तंत्रज्ञान विकासाची गरज आपल्याला आहे. ती क्षमताही आपल्याकडे आहे. मात्र "आपण आपुला वैरी' या नात्यानं आपले पाय आपणच ओढत राहतो. तसं करणं आता परवडणारं नाही. ते करंटेपणाचंच लक्षण ठरावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com