dr chaitanya kunte
dr chaitanya kunte

नैया मोरी नीके नीके चालन लागी (डॉ. चैतन्य कुंटे)

संगीताचं जग कलेच्या स्तरावर मनोज्ञ, सुंदर असलं तरी त्याची व्यावहारिक वाट ही ("साथीदार कलाकारां'च्या बाबतीत तरी) काही रमणीय नव्हे; किंबहुना संवेदनशील माणसाला ती अंतर्यामी दुखावत जाणारीच आहे, याचा अनुभव मला येत गेला. व्यावहारिक फायद्यासाठी स्वत:च्या विचारमूल्यांना मुरड घालत तडजोड करणं मला मानवणारं नव्हतं.

मी इयत्ता सातवीत असतानाची गोष्ट...शाळेतून घरी आलो आणि रेडिओवरच्या हिराबाई बडोदेकर यांच्या "होरी खेलो मोसे नंदलाला'तल्या समेच्या तार षड्‌जानं मला अक्षरशः जागीच खिळवलं. माझे कान शाळकरी वयातच सुरांतलं वेगळेपण शोधू लागले आणि इयत्ता नववी-दहावीत मी संगीत शिकू लागलो. माझे आई-वडील संगीत मनापासून ऐकत आणि "जे कार्यक्षेत्र निवडाल त्यात शिखर गाठा' अशी त्यांची भूमिका असल्यानं आवडीचं कोणतंही क्षेत्र निवडण्याविषयी त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. काही वर्षं शशिकांत भंडारे यांच्याकडं हार्मोनिअम आणि अंजली मनोहर यांच्याकडं मी सतार शिकलो. इतिहास व भारतविद्या या विषयात बीए आणि एमए, पुरातत्वशास्त्रात एम. फिल. करताना माझा संगीताचा अभ्यास सुरूच होता. छोट्या मैफलींमध्ये हार्मोनिअम साथ करणं, सतारवादन करणं सुरू होतं. मैफलींत अनेक कलाकारांचे अद्भुत आविष्कार ऐकता ऐकता संगीताची सखोल तालीम घेण्याची इच्छा प्रबळ झाली. पाहत-ऐकत होतो त्यांत डॉ. अरविंद थत्ते हे कलाकार आणि एक माणूस म्हणूनही काही निराळे आहेत असं जाणवलं. त्यांनी संगीतक्षेत्रातले त्यांचे विचार स्पष्ट केले आणि "ते पटत असतील तरच शिकवेन,' असं सांगितलं. तोपर्यंतच्या शिक्षणामुळं आणि वाचनामुळं तयार झालेल्या माझ्या बौद्धिक चौकटीला हे विचार अर्थातच पूर्णत: पटणारे असल्यानं सन 1996 मध्ये अरविंददादांकडं माझं संगीतशिक्षण सुरू झालं. आरंभीची तीन-चार वर्षं विविध रागांत व लयींत केवळ पलटे फिरवून हाताची व बुद्धीची मशागत झाली. सकाळी सलग दोन-तीन तास हे पलटे फिरवणं चाले, कधी कधी सायंकाळीही एक-दोन तास रागविस्तार व गतकारी ते शिकवत. माझं विद्यापीठीय शिक्षण (आणि "त्या शिक्षणातही उत्तमच असायला हवं,' हा दृष्टिकोन), बौद्धिक-मानसिक स्तरावरच्या अनेक घडामोडी आणि उपजीविकेची धडपड यांच्या व्यापातून अरविंददादांनी सांगितलेला रियाज करणं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अपेक्षित असं वाजवून दाखवणं ही तारेवरची कसरतच असायची. अनेकदा तीव्र निराशेचे क्षण येत. मात्र, क्वचित एखादी गोष्ट हातातून चांगली वाजली की अरविंददादांचं हलकंसं स्मितही मोठा दिलासा, हुरूप देऊन जाई! त्यांनी माझ्यावर अतोनात कष्ट घेतले...एका अनघड दगडातून एक सुघड सांगीतिक व्यक्तित्व घडवण्याचं पूर्ण श्रेय त्यांना जातं. बुद्धिप्रामाण्यानंच कोणतंही तत्त्व स्वीकारणं आणि मग त्या तत्त्वाशी तडजोड न करणं, तसंच कलावंत म्हणून जगत असतानाच संवेदनशील माणुसकीही अबाधित ठेवणं याचे संस्कार त्यांनी माझ्यावर केले. या पाथेयावर माझी संगीतमुशाफिरी सुरू आहे! हार्मोनिअम या वाद्यावर रागसंगीताचा सकस आविष्कार करण्याचा अरविंददादांचा वारसा पुढं चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नेहमीच करतो.

मी अल्प काळ मधुसूदन पटवर्धन, मोहन दरेकर यांच्याकडं गायनही शिकलो; पण ग्वाल्हेर घराण्याचे बुजुर्ग गायक मोहनराव कर्वे यांच्याकडं अधिक गांभीर्यानं गायकीची तालीम घेतली. कर्वेबुवांनी मला पितृवत्‌ प्रेमानं शिकवलं. एका हातात तंबोरा व दुसऱ्या हातात डग्गा घेऊन अगदी पारंपरिक पद्धतीनं ही तालीम होई. या तालमीत अनेक रागांचे प्रकार, दुर्मिळ-जुन्या बंदिशी, ठुमऱ्या यांचं भांडार त्यांनी खुलं केलं. "संगीतात जिथून जे मिळेल तिथून ते शिकून घे' असं खुल्या मनाच्या थत्ते आणि कर्वे या दोन्ही गुरूंचं सांगणं अनुसरत बाळासाहेब पूँछवाले, वसंतराव राजूरकर, दिनकर कायकिणी, रामाश्रय झा यांच्या शिबिरांतूनही मी विद्येचे कण जमवत गेलो. बीए होण्याच्या सुमारास घरातली आर्थिक घडी विस्कटली होती; त्यामुळं पुढच्या वाटचालीसाठी लगेच कमावतं होणं गरजेचं होतं. मग तीन-चार वर्षं इतिहासाचं अध्यापन केलं. जोडीला संगीतशिकवण्या आणि कथक नृत्याच्या व मराठी भावगीतांच्या कार्यक्रमांतही साथ करत होतो. त्या काळात जो मिळेल तो कार्यक्रम वा शिकवणी स्वीकारणं गरजेचंच होतं. त्यातून अनेक कडू-गोड अनुभव येत गेले. इतिहास-पुरातत्व आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी काम करणं हे वेळ आणि बौद्धिक-मानसिक चौकट या दोन्ही बाबतींत अत्यंत तणावपूर्ण होतं. अशातच सन 2002 मध्ये "टप्पा गायकी' या विषयातल्या संशोधनासाठी मला केंद्र सरकारची पाठ्यवृत्ती मिळाली. आता इतिहास आणि संगीत या दोहोंपैकी एकच काहीतरी निवडणं अपरिहार्य होतं. अर्थातच माझ्या सर्जनशील मनानं संगीताची निवड केली.

हार्मोनिअमवादक या नात्यानं मला भीमसेन जोशी, दिनकर कायकिणी, यशवंतबुवा जोशी, बबनराव हळदणकर, शरद साठे, छन्नूलाल मिश्रा, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे असे बुजुर्ग कलाकार; तसंच राजन-साजन मिश्रा, उल्हास कशाळकर, राशिद खॉं, व्यंकटेशकुमार, श्रुती सडोलीकर, अश्विनी भिडे-देशपांडे, वीणा सहस्रबुद्धे, आरती अंकलीकर आदी आघाडीच्या कलाकारांना संगत करण्याचं सद्भाग्य लाभलं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, जपान, दुबई आदी विदेशांतही कलाप्रस्तुती करता आली.

संगीताची तालीम, रियाज आणि प्रस्तुती हे सुरू असतानाच त्याच्या शास्त्रपक्षाचाही अभ्यास मी गंभीरपणे करत होतो. ज्येष्ठ संगीतशास्त्री डॉ. अशोक दा. रानडे यांना सन 1996 मध्ये काही शंका मी पत्राद्वारे कळवल्या. त्यांचं अत्यंत प्रोत्साहन देणारं पत्रोत्तर आलं व त्यांच्याशी संपर्क सुरू झाला. पुढं त्यांच्या अनेक शिबिरांत सहभागी झालो आणि त्यांचा प्रत्यक्ष सहवास मला मिळाला. त्यांचं संस्कृती-संगीतशास्त्रातलं भरीव काम मला खुणावत होतं. डॉ. रानडे यांच्याकडून प्रथम संस्कृती-संगीतशास्त्र आणि सन 2009 पासून गायन शिकण्याचंही भाग्य मला लाभलं. मैफलींच्या वर्तुळापलीकडंही अस्तित्वात असलेल्या संगीताच्या व्यापक जगाचं भान रानडेगुरुजींनी मला दिलं. संगीतपरंपरेचं खरं आकलन होऊ लागलं आणि माझ्यातल्या संगीतसंशोधकाला एक नेमकी दिशा मिळाली. संगीत या विषयात डॉक्‍टरेटसाठी संशोधन करण्याविषयी रानडेगुरुजींशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी "प्रार्थनास्थळांतील संगीत ः एक संगीत-संस्कृतीशास्त्रीय अभ्यास' हा विषय सुचवला. ललित कलाकेंद्राच्या तेव्हाच्या विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांच्या पाठिंब्यामुळं मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली केलेल्या या संशोधनासाठी सन 2017 मध्ये मला डॉक्‍टरेट प्राप्त झाली. संगीताचं जग कलेच्या स्तरावर मनोज्ञ, सुंदर असलं तरी त्याची व्यावहारिक वाट ही ("साथीदार कलाकारां'च्या बाबतीत तरी) काही रमणीय नव्हे; किंबहुना संवेदनशील माणसाला ती अंतर्यामी दुखावत जाणारीच आहे, याचा अनुभव मला येत गेला. व्यावहारिक फायद्यासाठी स्वत:च्या विचारमूल्यांना मुरड घालत तडजोड करणं मला मानवणारं नव्हतं. आपलं स्थान टिकवण्यासाठी मतलबीपणे फसवं गोड वागून कार्यक्रम मिळवत राहणं, दुटप्पीपणाचं धोरण ठेवत गटबाजी करणं आदी बाबी संगीतावरच पोट भरणाऱ्या कलावंतासाठी अपरिहार्य ठरतात हे खरं; पण वर्षानुवर्षं असं करत राहण्याचा माझा पिंड नव्हता. त्यामुळं संगीतक्षेत्र हे मला "साधना व व्यासंग' म्हणून जेवढं भावलं तेवढं "व्यवसाय' म्हणून रुचलं नाही. अर्थातच सरसकटपणे सगळ्यांना हार्मोनिअमची साथ करत राहण्यापेक्षा कलाकार व व्यक्ती म्हणून माझं गोत्र जुळेल अशा निवडक मंडळींना साथ करणं मी पसंत केलं आणि संगीतातली स्वत:ची नवनिर्मिती आणि संशोधन याच्याकडं मी अधिक लक्ष देऊ लागलो. "संगीत-व्यावसायिक' म्हणून आलेल्या अनुभवांनी मला खूप शिकवलं...माझ्या आधीच्या काहीशा हळव्या, आत्मकेंद्री स्वभावाला पैलू पडत गेले आणि व्यावहारिक जगाला तोंड देण्यासाठी मी सक्षम झालो. अर्थात माझी हळवी बाजू संगीतातल्या नवनिर्मितीसाठी उपयोगीच ठरली!

"बंदिशकार' म्हणून माझा प्रवास विद्यार्थिदशेतच सुरू झाला होता. सन 1994 मध्ये "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'मधल्या निसर्गसौंदर्यातून पहिली बंदिश स्फुरली...एक सहजोद्गार म्हणून! तेव्हापासून तीव्र भावानुभवाचं रूपांतर बंदिशीत होणं ही माझी सहजक्रिया बनली आहे. ज्या ज्या रागाला मी गुरूंच्या तालमीत सामोरा जात असे, त्यात बंदिश बांधण्याचा प्रयत्न मी करे आणि मग ती एक स्वाभाविक प्रक्रियाच बनून गेली, बंदिशी आपोआप घडू लागल्या. "सुहाना कानडा', "श्‍यामल कल्याण', "बिलास कल्याण',"वाणी कल्याण' असे नवे रागही निर्माण झाले. अनेक नर्तक-कलाकार बंदिशींसाठी मला हक्कानं सांगतात. या सगळ्याचं फलित म्हणजे तीनशेहून अधिक बंदिशींची रचना माझ्याकडून झाली. या बंदिशींची पेशकश "सुरन गाओ सरस,' "संप्रति,' "नितही रहे गूँजन', "संगीतधारा,' "प्रात समये,' "सूर चैतन्याचे' अशा कार्यक्रमांतून झाली. काही बंदिशी "सृजन प्रथम,' "सृजन द्वितीय,' "रसिया,' "स्मरणतरंग,' "टप्पेदी बहार,' "राग निरागस' या सीडीज्‌मधून प्रसिद्ध झाल्या. अनुराधा कुबेर, पुष्कर लेले, राहुल देशपांडे, अपूर्वा गोखले, सानिया पाटणकर, कल्पना झोकरकर, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे-देशपांडे हे कलाकार माझ्या बंदिशींत रस घेऊन मैफलीत त्यांचं गायन करतात, ही मला त्यांची मोठी दाद वाटते. लवकरच माझ्या निवडक 100 बंदिशींचं पुस्तकही प्रकाशित होत आहे.

रागसंगीताखेरीज मराठी भावसंगीत, संस्कृत-प्राकृत साहित्य स्वरबद्ध करणं, नृत्यसंरचना आणि नाटकांचं संगीत, संकल्पनाधारित मैफली, "सुदर्शन संगीत सभा' उपक्रम, "स्वरगंगा' वेबसाईटसाठी राग-बंदिशकोश बनवणं हे मी पादाक्रांत केलेले वेगळे प्रांत. त्याविषयी सांगण्यासाठी निराळा लेखनप्रपंच मांडावा लागेल. संगीतविचार मांडणारे अनेक लेख, "छंदोवती,' "पुण्यस्वर' असे संपादित विशेषांक आणि "महाराष्ट्राचे शिल्पकार-चरित्रकोश संगीतखंड' एवढी सामग्री प्रकाशित झाली आहे. "स्वरस्मृती' व "मर्मज्ञ' या कर्वेबुवा आणि रानडेगुरुजी यांच्या स्मृतिग्रंथांच्या संपादनाद्वारे या गुरुद्वयीला मी मानवंदना वाहिली. सन 2011 मध्ये गुरू डॉ. अशोक दा. रानडे यांच्या निधनामुळं अपूर्ण राहिलेलं त्यांचं कार्य पूर्णत्वाला नेण्याची मोठी जबाबदारी गुरुमाता हेमांगिनी रानडे यांनी अत्यंत विश्वासानं माझ्यावर सोपवली; त्यामुळं "संगीतसंगती' व "पाश्‍चात्य संगीतसंज्ञा कोश' या त्यांच्या ग्रंथांचं संपादन मी केलं आणि सन 2014 मध्ये "महाराष्ट्र कल्चरल सेंटर'च्या सहयोगानं "डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज्‌' या संगीतसंग्रह-अभ्यासकेंद्राची स्थापना केली. माझं सृजनात्मक काम थोडं बाजूला ठेवून केवळ गुरुऋणातून उतराई होण्याच्या शुद्ध भावनेतून हे सगळं करण्याचं समाधान मोठं आहे.

माझ्या गुरूंखेरीज एक सर्जनशील कलाकार म्हणून रविशंकर, कुमार गंधर्व, रोहिणी भाटे, मालिनी राजूरकर हे मला नेहमीच प्रेरणास्रोत वाटतात. प्रसिद्धीच्या मागं न लागता संगीताची सृजनात्मक वाट शांत-संयतपणे चालणारे विजय बक्षी, कुमुदिनी काटदरे असे लोक भेटले की दिलासा मिळतो. माझ्या या प्रवासात अनेक बुजुर्ग कलाकारांचे आशीर्वाद मला मिळाले. स्नेह्यांची व संगीतमित्रांची वेळोवेळी साथ मिळाली. अजित सोमण, संजय पंडित, शुभांगी रवींद्र दामले, प्रमोद काळे, सुनीता खाडिलकर, सुधा पटवर्धन, सुहास दातार, शुभांगी बहुलीकर आणि हेमांगिनी रानडे यांचा स्नेह व मार्गदर्शन मिळालं. माझ्या सर्व उपक्रमांत माझी पत्नी श्रुती हिची मला अविरत साथ-सोबत आहे. तिच्याशिवाय हा प्रवास केवळ अशक्‍य होता!
गोविंदराव पटवर्धन स्मृती पुरस्कार, केशवराव भोळे संगीतकार पुरस्कार, वसंतोत्सव पुरस्कार, दि. गो. दातार संगीतशिक्षक पुरस्कार, रोहिणी भाटे नृत्य-संगीतकार पुरस्कार यांमुळं अधिक मोठं संगीतक्षितिज गाठण्याची उमेद मला मिळाली.
चांगले गुरू मिळाल्यानं की काय, मला चांगलं शिकवताही येतं! सौमित्र क्षीरसागर, देवेंद्र देशपांडे, लीलाधर चक्रदेव हे माझे विद्यार्थी आज व्यावसायिक कलाकार आहेत, याचं मला समाधान आहे. सन 1999 पासून पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रात मी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काही विषय शिकवत होतो. मात्र, सन 2016 मध्ये मी "संगीताचे प्राध्यापक' हे पद स्वीकारलं आणि त्यामुळं आता माझ्या संगीतवाटचालीत एक वेगळं पर्व सुरू झालं आहे. मैफली, नवनिर्मिती, संशोधन यांच्या जोडीनं विद्यापीठीय अध्यापन करताना या टप्प्यावरची भावस्थिती काहीशी "नैया मोरी नीके नीके चालन लागी' अशी आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com