युद्ध-शतक

काही शतकांपूर्वी लढली गेलेली सारी युद्धे ही मानवी श्रद्धेच्या प्रश्नाशी म्हणजेच धर्मांशी संबंधित होती. एकोणिसाव्या शतकात मुख्यत: राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नांशी संबंधित होती.
global war
global warsakal
Summary

काही शतकांपूर्वी लढली गेलेली सारी युद्धे ही मानवी श्रद्धेच्या प्रश्नाशी म्हणजेच धर्मांशी संबंधित होती. एकोणिसाव्या शतकात मुख्यत: राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नांशी संबंधित होती.

काही शतकांपूर्वी लढली गेलेली सारी युद्धे ही मानवी श्रद्धेच्या प्रश्नाशी म्हणजेच धर्मांशी संबंधित होती. एकोणिसाव्या शतकात मुख्यत: राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नांशी संबंधित होती. गेल्या शतकात युद्धे विचारप्रणाली आणि आर्थिक हितसंबंधांच्या मुद्द्यांवर लढली गेली. आजच्या शतकात आपल्याला लढावी लागणारी वेगळ्या प्रकारची युद्धे क्षितिजावर दिसू लागली आहेत. ही युद्धे असणारेत पर्यावरणाविरुद्ध किंवा पर्यावरणासाठी...

सन २००० च्या सुरुवातीला जगाच्या सर्व खंडांतील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि चेतना होती. त्या वर्षाची सुरुवात म्हणजे केवळ एका नव्या वर्षाचा आरंभ नव्हता; तर तर एका नव्या शतकाचा आणि एका नव्या सहस्रकाचाही तो आरंभ होता. या नव्या शतकाचे ऐतिहासिक वैशिष्ट्य वर्णन करण्यासाठी अनेक नावे सुचवली गेली; परंतु त्यापैकी सर्वाधिक मान्यता पावले ते ‘ज्ञानाचे शतक’ हे नाव. आज मात्र त्या नावाने या शतकाचा उल्लेख फारसा केला जात नाही. सारे जग आज होमो सेपियन्स- म्हणजे मानवी प्रजातीच्या भवितव्याबद्दल अतिशय साशंक झालेले दिसते. आजच्या टप्प्यावर तरी भविष्य संघर्षमय दिसत आहे. आपल्या भोवती नवनवीन युद्धांच्या आघाड्या उभ्या राहताना दिसत आहेत.

अगदी अलीकडेच कर्नाटकातील अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या एका चमत्कारिक बातमीपासून आपण सुरुवात करू. कर्नाटकातील पश्चिम घाटातील ‘हत्तींची मार्गिका’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रदेशात सुमारे आठशे हत्ती फिरत असतात. बातमी अशी होती, की या हत्तींनी आता त्या प्रदेशातील मानवी वस्त्यांविरुद्ध पद्धतशीरपणे युद्ध सुरू केले आहे. मानवी रहिवासी आणि हत्तींमधील या संघर्षाची नोंद वनखात्याने सन २०१४ पासूनच केली आहे. या ‘युद्धात’ आजपर्यंत अनेक माणसं जखमी झाली आहेत आणि अनेक हत्तींना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आहे. युद्धातील दोन्ही पक्षांतील तणाव अतिशय तीव्र होत चालला आहे. हसन जिल्ह्यातील वनखात्याने या प्रदेशातील माणसांना हत्तींच्या आगमनाविषयी सावध करण्यासाठी त्यांच्या शरीरावर विशिष्ट प्रकारचे सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. हत्तींच्या प्रवेशाबरोबर या सेन्सरमुळे सूचना देणारे भोंगे वाजू लागतील आणि त्या प्रदेशातील माणसं सुरक्षा-घरांत स्वसंरक्षणासाठी आसरा घेऊ शकतील. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हवाई हल्ला करण्यासाठी हिटलरची लष्करी विमाने लंडनवर घिरट्या घालू लागली की स्वत:चा बचाव करण्यासाठी लंडनचे नागरिक भुयारी ट्युब स्टेशन्समध्ये आसरा घेत असत, त्याची आठवण झाली.

भारताच्या जंगलातील हत्तींविषयी या बातम्या वाचण्यापूर्वीच आपण ऑस्ट्रेलियातील जंगलात पसरलेल्या वणव्यांच्या बातम्या वाचल्या होत्या. ऑस्ट्रेलियात जवळजवळ एक लाख १० हजार चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात या आगी पसरल्या होत्या आणि त्यात ३९ माणसांचा मृत्यू झाला होता. मानवी वस्त्यांना वेढणाऱ्या अशा जंगल आगींची किंवा वणव्यांची समस्या काही केवळ ऑस्ट्रेलियापुरती मर्यादित नाही. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पूर्व आफ्रिका आणि दक्षिणपूर्व आशियामध्येही अशा वणव्यांच्या घटना वारंवार घडताना दिसतात.

हत्तीबरोबर युद्ध आणि जंगलांना लागणाऱ्या आगी अशा चमत्कारिक बातम्या कमी आश्चर्यकारक ठराव्यात अशी आणखी एक चमत्कारिक बातमी हार्वर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्राचे प्राध्यापक एव्ही लोएब यांनी दिली आहे. त्यांचा असा दावा आहे, की २०१७ मध्ये पृथ्वीच्या बाह्य अवकाशात एक नवी वस्तू तरंगताना आढळून आली. ही वस्तू नैसर्गिकपणे आढळणारी कोणती अवकाश वस्तू नाही; तर कोणत्या तरी अज्ञात ठिकाणाहून अन्य बुद्धिमान प्रजातीकडून अवकाशात सोडण्यात आली आहे. लोएब यांनी ‘बाह्य अवकाश : पृथ्वीबाह्य बुद्धिमान प्रजातीच्या पहिल्या खुणा’ या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले आहे. आपल्या पुस्तकात पृथ्वीवरील मानवजातीला सावध करताना लोएब असा इशारा देत आहेत, की पृथ्वीबाह्य अवकाशातील माणसासारख्या अन्य प्रजातीचे अस्तित्व नाकारणे ही मानव जातीसाठी अत्यंत घातक चूक ठरू शकते. लोएब ज्या अवकाश-वस्तूचा उल्लेख करतात त्याला ‘औमुआमुआ’ असे नाव देण्यात आले आहे. एका आदिम जमातीच्या भाषेतील हा शब्द आहे. लोएब असे म्हणतात, की ही अवकाश वस्तू ज्या भ्रमण कक्षेतून फिरत आली आहे, त्याला गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू होत नाहीत. या अवकाश वस्तूच्या हालचालीत आणि भ्रमणात एक प्रकारची ‘गुरुत्वाकर्षण-अतिरिक्त शक्ती’ प्रदर्शित होत आहे. लोएब यांचा ठाम दावा आहे, की ही वस्तू म्हणजे एक सौरऊर्जेवर चालणारे अवकाशयान आहे. या अवकाशयानाच्या पृष्ठभागावर लावलेल्या मोठ्या आरशांद्वारे आवश्यक सौरऊर्जेची निर्मिती केली जाते. लोएब म्हणतात, की पृथ्वीबाह्य अवकाशात मानवसदृश प्रजातीचे अस्तित्व हा विषय आता काही केवळ वैज्ञानिक कथेतील कल्पना किंवा फक्त वैज्ञानिक चित्रपटातील कल्पना नाही.

इस्राईलमधील एका प्राध्यापकांनी तर मानवी प्रजातीसाठी अस्वस्थकारक ठरणारी बातमी आणली आहे. जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठात प्रा. इदान सेगेव्ह आणि त्यांच्याबरोबरचा वैज्ञानिकांचा ग्रुप कृत्रिम पद्धतीने मानवी मेंदूच्या पेशींची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्या संशोधनातून तयार झालेले उत्पादन सर्वांत कल्पक आणि बुद्धिमान माणसांच्या तोडीची बुद्धिमत्ता असलेल्या मशीन्समध्ये वापरले जाईल. जगातील अनेक सरकारे आजच कृत्रिम बुद्धिमत्तेचा बेसुमार वापर करून आपल्याच देशातील नागरिकांवर पाळत ठेवत आहेत. आता पुढच्या काही दशकांत कृत्रिम-बुद्धिमत्ता, बुद्धिमान-मशीन्स आणि या वैज्ञानिक प्रगतीचा वापर करणाऱ्या सत्ताधारी माणसांचा मिळून ‘नवा शासक वर्ग’ निर्माण होणार असेच चित्र इस्राईलचे शास्त्रज्ञ आपल्यासमोर मांडत आहेत.

कोरोना व्हायरस या रोगसाथीने वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक दर्जाच्या ऑक्सिजनचा तुटवडा ही एक मोठी बातमी म्हणून पुढे आली, पण कोविड-१९ महामारीच्या आधी थोडेच दिवस आपण पाहिले होते की दिल्लीच्या हवेत ऑक्सिजनची पातळी पुरेशी नसल्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो; म्हणून दिल्लीतील शाळांत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ही एक बहुधा अनुत्तरित ठरलेली समस्या आहे. या समस्येवर जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्था काही तोडगा शोधत आहेत. असा तोडगा सापडेपर्यंत तिकडे वर्ल्ड-फूड-प्रोग्रॅमचे डेव्हिड बिसली यांनी समस्त मानव जातीला आणखी एक कडक इशारा दिलेला आहे. ते म्हणतात, आज रोजी जगातील ८३ कोटी नागरिकांनी म्हणजे दर दहा माणसांतील एका माणसाने अन्न सुरक्षा गमावली आहे. शेती आणि मासेमारी हे दोन अन्न उत्पादनाचे मार्ग म्हणून, उपजीविका साधन म्हणून निवडण्याची संधी आज उपलब्ध नाही. भारतातील शेतकऱ्यांच्या असंतोषाकडे सरकारतर्फे केले जात असलेले सततचे दुर्लक्ष म्हणजे केवळ भारत सरकारच्या अंगभूत उद्दामपणाचे लक्षण नाही, तर शेती हा घटक एकूण अर्थव्यवस्थेच्या प्राधान्यक्रमात किती नगण्य स्थानी पोहचला आहे याचे हे निदर्शक आहे.

सर्व मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या तशा अतिशय विसंगत वाटणाऱ्या या आपत्ती आपल्याला नेमके काय दर्शवतात? काही शतकांपूर्वी लढली गेलेली सारी युद्धे ही मानवी श्रद्धेच्या प्रश्नाशी म्हणजेच धर्मांशी संबंधित होती. एकोणिसाव्या शतकात लढली गेलेली युद्धे मुख्यत: राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नांशी संबंधित होती. गेल्या शतकात लढली गेलेली युद्धे विचारप्रणाली आणि आर्थिक हितसंबंधांच्या मुद्द्यांवर लढली गेली. आजच्या शतकात आपल्याला लढावी लागणारी वेगळ्या प्रकारची युद्धे क्षितिजावर दिसू लागली आहेत. त्या युद्धांचे प्रकार आणि स्वरूपच वेगळे असेल. ही युद्धे असणारेत पर्यावरणाविरुद्ध किंवा पर्यावरणासाठी. ही युद्धे असणारेत निसर्गाच्या उत्क्रांतीच्या शक्तींबरोबर; वेगळ्या अमानवी स्वरूपाच्या बुद्धिमत्तेशी. अशी बुद्धिमत्ता, जी सजीव आणि निर्जीव अशा एका वेगळ्याच प्रकारच्या वस्तुमान आणि गतिनियमांच्या संदर्भ चौकटीतील असतील.

खेदाचा भाग म्हणजे देशोदेशीची सरकारे मात्र अजूनही त्याच जुन्या सामाजिक राजकीय रचनेच्या कल्पनेत अडकलेली आहेत; अजूनही त्याच जुन्या धर्माधारित विभाजनवादी राजकीय विचारप्रणालींच्या आणि संकुचित राष्ट्रवादाच्या मानसिक चौकटीत अडकलेली आहेत.

‘विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेवर आधारित लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या काही मोजक्याच विचारकांनी मानवी प्रजातीसमोर दिसणाऱ्या या नव्या प्रकारच्या युद्धांना मानवाला कसे तोंड देता येईल, यासाठी आवश्यक विचार सुरू केला आहे. त्यासाठीच्या आधारभूत नव्या राजकीय व्यवस्थेचा विचार सुरू केला आहे. अर्थात, या लोकांचा आवाज आज तरी क्षीण आहे आणि वेळ तर आपल्या हातातून वेगाने निसटत आहे. मानव जातीसमोर अक्षरश: अभूतपूर्व अशी युद्धे उभी ठाकली आहेत. वेळ अशी आहे, की आज संपूर्ण मानव जातीने एकत्र यायला हवे. डेमोक्रसी (‘डेमोस’ म्हणजे ‘लोक’) पासून ‘कॉसमॉक्रसी’ (‘कॉसमॉस’ म्हणजे ‘विश्व’)कडे होणाऱ्या दीर्घ प्रवासातली पहिली पावले पुढे टाकली पाहिजेत. वेळ आलीय...

(लेखक भाषाशास्त्रज्ञ असून, भारतीय बोलीभाषेचे संशोधक आहेत.)

अनुवाद : प्रमोद मुजुमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com