वर्तमान आणि भूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Present and Past

कोरोना विषाणूचे उद्दिष्ट मानवी प्रजातीचा संहार. त्यामुळे २०२० हे वर्ष कोरोना विषाणू वर्ष ठरले.

वर्तमान आणि भूत

आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात इतकं काही घडतंय की भविष्यात एखाद्या इतिहासकाराला सन २०२० सालाचे यथार्थ चित्रण करणे मोठे आव्हानात्मक ठरणार आहे. याक्षणी भूतकाळातील स्मृती जागविण्यासाठी आवश्यक उसंत मिळणे अवघड आहे. कधी-कधी अशा रीतीने ‘बाजूला सारलेल्या’ स्मृती वर्तमानातील कथानकांच्या विश्वासार्हतेविषयी, त्यांच्या अन्वयार्थाबद्दल नवेच प्रश्न निर्माण करतात.

कोरोना विषाणूचे उद्दिष्ट मानवी प्रजातीचा संहार. त्यामुळे २०२० हे वर्ष कोरोना विषाणू वर्ष ठरले. हे वर्ष अ‍ॅन्थ्रोपोसीन आरंभचे म्हणजे मानवाच्या निसर्ग संहाराच्या आरंभाचे वर्ष, असे शास्त्रज्ञांनी अधिकृतरीत्या घोषित केले. असे गुंतागुंतीचे आहे या वर्षाचे मुख्य कथानक! अर्थात या दोन टोकांच्या अंतिम संगरांच्या मुख्य कथानकाच्या पोटात आणखी उपकथानकेही दडलेली आहेत. जगातील अनेक देशांत सुरू असलेल्या अतिउजव्या विचारांच्या सत्तधाऱ्यांविरुद्ध सुरू असलेले लोकशाहीवाद्यांचे लढे; स्थिर नागरिकांच्या समाजात ‘भटक्या’ आणि ‘स्थलांतरित’ मानवी समूहांना सामावणाऱ्या व्यापक नागरिकत्वाच्या संकल्पनेत समाविष्ट करण्यासाठी सुरू असलेले लढे; धर्माधारित शासन संकल्पनेला छेद देणाऱ्या सर्वधर्म समावेशक संकल्पनेवर आधारित शासन व्यवस्थेसाठी सुरू असलेले लढे- अशी अनेक उपकथानके! याशिवाय लिंगभेद, वर्गीय संघर्ष, भाषिक अस्मिता आणि इतिहास अशा अनेक मुद्द्यांवर असलेले लढे; अशी आणखीही अनेक उपकथानके.

आजच्या जगात कोणाला बरोबर पंचाहत्तर वर्षांपूर्वी काय घडले होते, हे आठवायला वेळ मिळण्याची शक्यता नाही. पण सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वी दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी दुसरे महायुद्ध निर्णायकरीत्या जिंकलं. अ‍ॅडॉल्फ हिटलरने आपले आयुष्य संपवले. त्यावेळेस पिटर कुम्ब्जने ‘बर्जेन-बेल्सन’ या छळछावणीतील कैद्यांची मुक्तता केली होती आणि त्याला असे आढळून आले होते की, या छळछावणीतील ज्यू आणि अन्य बंद्यांमध्ये विषमज्वराची मोठी साथ पसरली आहे. त्यांनी अशी माहिती नोंदली आहे की, या साथीमुळे या छळछावणीत दरदिवशी किमान ३०० माणसे मृत्युमुखी पडत आहेत. या छळछावणीच्या आवारात दहा हजारांपेक्षा अधिक प्रेते पडून आहेत. या प्रेतांचे दफन करणाऱ्या सैनिकांजवळ किमान सुरक्षा देणारे हातमोजेही नव्हते. ही घटना आपल्याकडील लॉकडाऊनची आठवण करून देईल अशी.

फ्रेंच कादंबरीकार आणि विचारवंत अल्बर्ट कामूची १९४७ साली गॅलिमार्द पब्लीशर्सने प्रसिद्ध केलेली ‘ला पेस्ते’ ही कादंबरी. १९४८ साली या कादंबरीचे ‘दि प्लेग’ या नावाने प्रसिद्ध झालेले स्ट्युअर्ट गिल्बर्ट यांनी केलेले इंग्रजी भाषांतर. ही एक अगदी छोटेखानी कादंबरी होती; पण या कादंबरीने जगात खळबळ उडवून दिली होती. तरुण कामू या कादंबरीवर वयाच्या एकोणतिसाव्या वर्षापासून काम करत होता. त्याला ‘प्लेगमुक्ती’ करण्याबाबत कादंबरी लिहायची होती. कामूनी लिहिलेल्या प्लेग कादंबरीत त्याच्या देशातील म्हणजे अल्जेरियातील साथीच्या रोगांच्या प्रदीर्घ इतिहासाचा आधार घेतला होता; पण त्याच्या वाचकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की कामू प्रत्यक्षात फॅसिझमबद्दल भाष्य करत आहे. १९५७ साली कामूच्या या कादंबरीला नोबेल पारितोषिक मिळाले; पण नोबेल पारितोषिकापेक्षा ४४ वर्षीय अल्बर्ट कामूसाठी या कादंबरीला मिळालेले आणखी मोठे यश म्हणजे पुढील अनेक पिढ्यांतील या पृथ्वीतलावरील अस्तित्वाच्या संघर्षात अडकलेले तरुण तात्विक आधारासाठी अपरिहार्यपणे त्याच्या साहित्याकडे वळले...

‘दि प्लेग’चा नायक ओरान शहरातील डॉ. बर्नार्ड रिक्स. हा डॉक्टर अस्तित्ववादाचा सिद्धांत अमर करणारी भूमिका घेतो. ती म्हणजे ‘मी जिथे आहे तिथे आणि जे करू शकतो ते करीन’. पंचाहत्तर वर्षांपूर्वी बर्जेन-बेल्सेन छळछावणीच्या दुर्गंधानी गुदमरणाऱ्या युरोपमधील आपल्या वाचकांना कामू सांगत होता ‘नाही, सुटका नाही. ऐका, आपल्याला फक्त लढत रहायचंय!’

मला आठवणारे आणखी एक पुस्तक आहे. ते म्हणजे एरिक ब्लेअरची राजकीय बोधकथा. हा एरिक ब्लेअर म्हणजे तसा थोडासा आपला बिहारीबाबू. त्याचा जन्म बिहारमधील मोतीहारीचा. इंग्लिश वडील आणि फ्रेंच-बर्मी मिश्र वंशीय आईच्या पोटी जन्मलेल्या एरिकला शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले. कसेतरी आपले शालेय शिक्षण पूर्ण करून एरिक इंडियन इम्पीरियल पोलिस सेवेत भरती झाला आणि त्याने ब्रह्मदेशात नेमणूक मिळवली. ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातील हवामान न मानवल्यामुळे त्याची प्रकृती ढासळली आणि एरिकला भारत सोडून जावं लागलं. नाहीतर एरिक ब्लेअरने इंडियन इम्पिरियल पोलिस सेवेत आपली कारकीर्द पूर्ण केली असती. पण आजारपणामुळे भारत सोडावा लागला आणि पत्रकार म्हणून आणि ‘जॉर्ज ऑरवेल’ या टोपण नावाने नवी कारकीर्द सुरू करणे त्याला भाग पडले. पण ही घटना फक्त त्याच्यासाठीच नाही तर जगाच्या साहित्यिक इतिहासासाठीही अत्यंत उपकारक ठरली.

जॉर्ज ऑरवेलची ‘अ‍ॅनिमल फार्म’ १९४५ साली प्रसिद्ध झाली. या कादंबरीचे फ्रेंच भाषांतर १९४७ साली म्हणजे कामूची ‘प्लेग’ कादंबरी प्रसिद्ध झाली त्याच वर्षी प्रसिद्ध झाले. कामूच्या कादंबरीचा विषय पश्चिम युरोपमधील फॅसिझम हा होता, तर ऑरवेलच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’चा विषय सोविएत रशियातील एकछत्रीय कम्युनिझम हा होता. त्याने या कादंबरीला जाणीवपूर्वक ‘युनियन देस रिपब्लिक सोशलीसीतेस अ‍ॅनिमलेस’ असे उपशीर्षक वापरले होते. या शब्दांचे लघुरूप युआरएसए असे होते. आणि ‘यूरास’ या लॅटिन शब्दाचा अर्थ अस्वल असा आहे. अस्वल हा प्राणी रशियाचे सांस्कृतिक चिन्ह मानले जाते. जॉर्ज ऑरवेलने या पुस्तकाच्या फ्रेंच भाषांतर प्रसिद्धीस होणाऱ्या विलंबाबद्दल आपली नाराजी ऑर्थर कोस्लरला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली होती. तो म्हणतो, ‘‘मानवी प्रतिष्ठेवरील कोणत्याही पद्धतीचे आक्रमण किंवा दबाव मला मंजूर नाही.’’ ऑरवेल पुढे लिहितो की, ‘‘मला माहीत आहे की माझ्या कादंबरीचे फ्रेंच भाषांतर प्रसिद्ध होणे लांबण्यामागे राजकीय कारणे आहेत.’’ जॉर्ज ऑरवेलचा जन्म १९०३ सालचा.

तो १९५० पर्यंत जगला होता. त्याच्यानंतर दहा वर्षांनी १९१३ साली अल्बर्ट कामूचा जन्म झाला आणि ऑरवेलनंतर बरोबर एका दशकाने म्हणजे १९६० साली कामूचे निधन झाले. हा अगदी निखळ योगायोग, बाकी काही नाही! पण त्या दोघांमधील या निखळ योगायोगापलीकडील एक साम्य म्हणजे त्या दोघांनी फॅसिझम आणि अन्य कोणत्याही एकतंत्री राजवटीविरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण नवी पद्धत दाखवून दिली. कामूनी तत्त्वज्ञात्मक आधारावर प्रतिरोधाची पद्धत दाखवून दिली. त्याने आपल्या ‘दि मिथ ऑफ सिसिफस (१९४२)’ या कादंबरीत या प्रतिरोधाचा सिद्धांत अतिशय अचूक शब्दात मांडला आहे. ऑरवेलने आपल्याला एकतंत्रीय राजवटीविरुद्ध नवी परिभाषा दिली. ‘बिग ब्रदर’, ‘थॉट पोलीस’, ‘थॉट क्राईम’, ‘दि मिनिस्ट्री ऑफ हॅपीनेस’, ‘मेमेरी होल’, ‘डबल थिंक’ आणि ‘न्यूस्पिक’ असे अनेक त्यांनी तयार केलेले शब्द आता इंग्रजी भाषेत पूर्णपणे रुजले आहेत.

सध्या जगातील देश एका मागून एक लोकशाही पद्धतीने मान्यताप्राप्त झालेल्या ‘हुकूमशाहीच्या’ सावलीत वावरत आहेत. जगातील प्रचलित राजकारणाचे पण सर्व जगाने अनुभवलेल्या वास्तवाचे चित्र समोर ठेवणाऱ्या या पाऊणशे वर्षांपूर्वीच्या कलाकृतींचे स्मरण करण्याएवढी उसंत कोणाला मिळणार? आपल्या आजच्या वैचारिक-विषाणूग्रस्त जगात आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे उद्भवणाऱ्या व्यापक हिंसेचा सामना करताना आपण एका गोष्टीचे नक्की स्मरण ठेवायला हवे. ते म्हणजे ऑरवेल आणि कामूंच्या पिढीने त्यांच्या काळात आजच्यापेक्षाही अधिक तीव्र अत्याचाराच्या राजवटी बघितल्यात आणि तरीही त्या वेदना सहन करतानाही अधिक व्यापक मानवी संवेदना जाग्या ठेवल्या, मानवी सहवेदना विस्तारित केल्या.

फ्रेंच कामू आणि इंग्रजी मातीतला ऑरवेल यांचा आणखी एक समकालीन साहित्यिक म्हणजे महान अमेरिकन साहित्यिक हेमिंग्वे! ‘अ‍ॅनिमल फार्म’ आणि ‘दि प्लेग’ या दोन्ही कलाकृतींनंतर दोन-तीन वर्षांतच १९५० सालात हेमिंग्वेची ‘दि ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. अर्नेस्ट हेमिंग्वेला कामूच्या आधी दोन वर्ष साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. आज सन २०२२ मध्ये आपण अत्यंत गंभीर आर्थिक संकटात सापडलो आहोत. जगात आज राष्ट्र तुरुंग बनली आहेत. आज आपल्या भोवतीच्या प्रत्येक माणसाकडे संशयाने पाहत आहोत. अशा काळात आपण १९४५ ते १९५० या काळातील स्मृती जागवायला हव्यात. हिटलरने आत्महत्या केली त्या एप्रिल, १९४५ पासून ते १९५० या काळात ऑरवेल, कामू आणि हेमिंग्वे यांच्यासारख्यांनी जगाच्या संवेदना नव्या उंचीवर नेल्या. समाजात उत्तुंग आशा पल्लवित केल्या. अविचल निर्धार करणारा एखादा माणूस हे करू शकतो. मग समोरचा विषाणू किती का घातक असेना!

(लेखक भाषाशास्त्रज्ञ असून, भारतीय बोलीभाषेचे संशोधक आहेत.)

अनुवाद : प्रमोद मुजुमदार

Web Title: Dr Ganesh Devi Writes Present And Past Life History

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LifesaptarangHistory