
प्रत्येक ज्ञान परंपरेत काहीतरी महत्त्वाचे शहाणपण आणि उपयुक्त सिद्धांत असतात. याचा अर्थ त्या ज्ञान परंपरेतील सर्वच सदासर्वकाळ योग्य आणि अचूक असते, असे नव्हे.
इतिहासाचे भवितव्य
प्रत्येक ज्ञान परंपरेत काहीतरी महत्त्वाचे शहाणपण आणि उपयुक्त सिद्धांत असतात. याचा अर्थ त्या ज्ञान परंपरेतील सर्वच सदासर्वकाळ योग्य आणि अचूक असते, असे नव्हे. कोणत्याही ज्ञान परंपरेला आकार देणाऱ्या संकल्पना आणि सिद्धांत यात वेळोवेळी बदल करावे लागतात, त्यात नवी भर घालावी लागते. भविष्यातील पिढ्यांना नवे शोध, नव्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर त्यातील काही भाग टाकून द्यावा लागतो.
जपानी-अमेरिकन वंशाच्या याशिहिरो फ्रान्सिस फुकुयामा या राजकीय विचारवंताने १९९२ मध्ये एक वादग्रस्त सिद्धांत मांडला. त्याच्या प्रबंधाच्या पुस्तकाचे शीर्षक काहीसे अनाकलनीय म्हणता यईल असे होते. ‘दि एण्ड ऑफ हिस्टरी अॅण्ड दि लास्ट मॅन’ (इतिहासाचा अंत आणि अखेरचा मानव). या शीर्षकाच्या प्रबंधाचा मुख्य सिद्धांत होता की उदारमतवादी लोकशाही शासन प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे आता मानवाला आणखी काही साध्य करण्यासारखे उद्दिष्ट उरले नाही. त्यामुळे आता यापुढे मानवी सांस्कृतीच्या उत्कर्षाच्या नव्या टप्प्याकडे जाण्याच्या कल्पनांचा ध्यास घेण्यापेक्षा त्याच त्या सामान्य कंटाळवाण्या जीवनचक्रात मानवी जीवन फिरत राहील.
फुकुयामाच्या सिद्धांताचा हा केवळ एक भाग होता. दुसऱ्या भागात त्याने असा दावा केला होता की, मानवी इतिहासातील जुन्या प्रवृत्ती पुन्हा उफाळून येतील आणि मानवी संकृतीची आजवरची संचित कमाई नष्ट होईल. समता आणि स्वातंत्र्यासाठी मानवाने केलेले स्फूर्तिदायक लढे कदाचित आजच्या जगाला महत्त्वाचे वाटणार नाहीत. फुकुयामाच्या सिद्धांताच्या दोन्ही विधानांचा एकत्रित विचार केला, तर एकविसावे शतक म्हणजे सर्व जगाच्या आजवरच्या एकमितीय वाटचालीची अखेर करणारे ऐतिहासिक शतक ठरू शकेल.
मानवी संस्कृतीबद्दल फुकुयामाने केलेल्या या उत्कंठावर्धक चिंतनात तो असा प्रश्न उपस्थित करतो की, रानटी अवस्थेपासून आजच्या उदारमतवादी लोकशाहीपर्यंतच्या मानवाच्या वाटचालीचा नेमका काय अर्थ आहे? तर मानवाला एका निरस, अस्थिर, पुनरुद्भवी आणि एका प्रकारे आधुनिक-प्राथमिक मानवी अवस्थेत आणून सोडले आहे; असा लावायचा का?
फुकुयामाची ही विचारप्रवर्तक मांडणी अमेरिकेत प्रसिद्ध झाली त्या वर्षी ‘ऑफ मेनी हिरोज’ या पुस्तकाचे माझे काम चालू होते. भारताने गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाचे आकलन कसे केले आहे, याचा धांडोळा घेणे हा माझ्या अभ्यासाचा भाग होता. दहा वर्षांत या पुस्तकासाठी मी जमा केलेल्या साहित्यावरून मला एक वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट दिसत होती की, भारतातील संस्कृत, तमीळ, पाली प्राकृत आणि अन्य आधुनिक भारतीय भाषांतील बौद्धिक परंपरात भूतकाळ समजून घेण्यासाठी इतिहासाचा कोणताही एकच एक असा प्रचलित आणि प्रस्थापित मार्ग नाही. या बौद्धिक परंपरेतील दृष्टिकोन किंवा परिप्रेक्ष्यातील विविधता इतकी विलक्षण आहे की, माझ्या मांडणीचे शीर्षक मला ‘ऑफ मेनी हिरोज’, ‘बहू नायकांविषयी’ असेच ठेवावे लागले.
मी असे नाव ठेवले याला दहाव्या शतकातील तत्त्वज्ञ राजशेखरही हासुद्धा काही प्रमाणात कारणीभूत ठरला. तो असे मानतो की रामायण हे ‘एक नायक’ असलेले महाकाव्य आहे, तर महाभारत हे ‘बहुनायक’ असलेले महाकाव्य आहे. इतिहास विश्लेषणासाठी हे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून त्यानी वापरल्याचे दिसते. तसेच भारतीय संस्कृतीचा उगम केवळ एकाच विशिष्ट बिंदूपासून सुरू झाला, असे काही ठरवणे फारच अवघड ठरेल. वास्तविक या गहन मुद्द्याबद्दल माझ्या मनात सुरू झालेल्या संघर्षाची सुरुवात कशी झाली, ते मी खरंतर विसरलो होतो; पण केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने गेल्या बारा हजार वर्षांच्या इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी एका समितीची घोषणा केल्यामुळे मला हे सर्व आठवले. या समितीत सर्व पुरुष प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत आणि ‘समितीत सर्व प्रतिनिधी केवळ उत्तर भारतातील आहेत;’ परंतु अशी समिती स्थापन करण्यामागील मूलभूत उद्दिष्टांबाबत कोणी फारसे लक्ष दिले नाही.
भारत एक सनातन वैदिक ज्ञान परंपरा असलेले राष्ट्र आहे, असा रा. स्व. संघाचा ठाम दृष्टिकोन आहे. ही त्यांची ठाम अपरिवर्तनीय भूमिका प्रस्थापित करण्याच्या हेतूने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. खरंतर प्रत्येक ज्ञान परंपरेत काही तरी महत्त्वाचे शहाणपण आणि उपयुक्त सिद्धांत असतात; परंतु याचा अर्थ त्या ज्ञान परंपरेतील सर्वच सदासर्वकाळ योग्य आणि अचूक असते, असे नव्हे. कोणत्याही ज्ञान परंपरेला आकार देणाऱ्या संकल्पना आणि सिद्धांत यात वेळोवेळी बदल करावे लागतात, त्यात नवी भर घालावी लागते. भविष्यातील पिढ्यांना नवे शोध, नव्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर त्यातील काही भाग टाकून द्यावा लागतो; परंतु सनातन ज्ञानाचे पुरस्कर्ते आणि समर्थकांना नव्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर प्राचीन भारतीय साहित्याविषयी कोणतेही प्रश्न विचारलेले आवडत नाही.
मध्ययुगातील अनेक संत कवी आणि विचारवंतांनी वैदिक ज्ञान साहित्याच्याही पुढे गेले होते. त्यांनी ते ज्ञान मानवी आकलनात आणण्यासाठी त्या ‘पवित्र ज्ञानात’ मोठे बदल करण्यास सुरुवात केली होती; परंतु हे वास्तव वैदिक ज्ञानाच्या समर्थकांना मान्यच नसते. या प्रक्रियेलाच इंग्रजी भाषेत ‘सेक्युलर’ अशी संज्ञा दिली जाते; परंतु अशा प्रकारे पारंपरिक वैदिक ज्ञानाबद्दल कोणता प्रश्न विचारणे हे ‘वसाहतवादी आणि पाश्चिमात्त्य’ असल्याचे लक्षण आहे; आपले प्राचीन ज्ञान भ्रष्ट करणारी ही प्रवृत्ती आहे, असे म्हणून नाकारले जाते.
वेदांची रचना अगदी सुरुवातीच्या (प्राचीन) संस्कृत भाषेत केली गेलेली आहे. वरील दृष्टिकोनामुळे आपोआप संस्कृत भाषेवर एक प्रकारे पूर्वजपरंपराचा हक्क प्रस्थापित होतो; परंतु हा दावा आजच्या नव्या भाषाशास्त्रीय निकषांच्या पार्श्वभूमीवर टिकणारा नाही. या अहंमन्य गैरसमजुतींचा उगम एकोणिसाव्या शतकातील भाषाशास्त्रीय धारणेतून झाला आहे. सुरुवातीला सर विल्यम जोन्स यांनी असे गृहितक मांडले होते की, जगातील प्राचीन भाषांमधील साधर्म्यांचा विचार करता त्या सर्व भाषांचा उगम मुळात इंडो-युरोपियन भाषेतून झालेला आहे. ‘इंडो-युरोपियन’ भाषा या जोन्सच्या गृहितक मांडणीमागे एक उद्देश होता. तो असा की त्यानंतरच्या काळात ‘अभिजात’ भाषा म्हणून मान्यता पावलेल्या संस्कृत भाषेपेक्षा ती पूर्णत: वेगळी आहे, हे सिद्ध व्हावे. एकोणिसाव्या शतकातील भाषाशास्त्रीय अहंमान्य धारणेनुसार ‘आर्य’ ही व्यक्तीविशेष संज्ञा म्हणून वापरली जात असे. वास्तविक संस्कृतमध्ये आर्य ही संज्ञा ‘सभ्य माणूस’ किंवा ‘आदरणीय माणूस’ अशा अर्थाने वापरली जात असे. युरोपियन माणसांसाठी अशी संज्ञा वापरणे सर्वथा गैरलागू होते. आर्य ही संज्ञा त्याच अर्थाने काही ‘हिंदू राष्ट्र’ या कल्पनेने भारलेल्या भारतीय अभ्यासकांनीही वापरायला सुरुवात केली. या भाषिक साधर्म्याच्या योगायोगावर आधारित एक अशी संकल्पना विकसित केली की, अतिप्राचीन काळात प्राचीन संस्कृत भाषिक लोकांनी उत्तरेकडे स्थलांतर करून युरोपमध्ये गेले होते; परंतु यापैकी कोणत्याही सिद्धांताची सत्यता सिद्ध करणारा प्राचीन स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास किंवा पुरातत्त्वशास्त्र, प्राचीन धातुशास्त्र, या विषयांच्या ग्रंथ संशोधन किंवा तुलनात्मक पुराण आणि लोककथांच्या अभ्यासाचा आधार नाही.
असे असले तरी संस्कृत भाषेचे अस्तित्व आणि वापर अतिप्राचीन काळापासून म्हणजे ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांपासून व्यापक प्रमाणात होता, हे सिद्ध करण्यासाठी सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृतीसंबंधी काही अनुत्तरित गूढ प्रश्नांची उकल करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतरचा कालखंड म्हणजे ख्रिस्तपूर्व २६०० ते ख्रिस्तपूर्व १९०० या कालखंडाच्या इतिहासाच्या नोंदी बऱ्याच प्रमाणात अचूक आहेत. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व १४०० ते ख्रिस्तपूर्व ९०० या कालखंडात करण्यात आली, याबाबत गंभीर प्रवृत्तीच्या विद्वानांत बऱ्याच प्रमाणात एकमत आहे. उपलब्ध पुराव्यांची काटेकोर छाननी आणि व्यापक संशोधनाच्या आधारे वेद रचनेचा कालखंड निश्चित करण्यात आला आहे; परंतु अशा शास्त्रीय पद्धतीने निश्चित करण्यात आलेला कालखंड हिंदुत्ववादी राष्ट्रवाद्यांना मान्य नाही. महाभारतात एक पौराणिक वंशावळ दिसते. ही ‘पौराणिक’ वंशावळ आणि ‘पौराणिक’ राजांची साखळी हाच आपला ‘वास्तविक इतिहास’ आहे, अशी हिंदुत्ववाद्यांची ठाम धारणा आहे. आजच्या सरकारचा वैचारिक मूलाधार लक्षात घेता आणि ‘भारत राष्ट्रा’विषयी आपल्या कल्पनांसाठी ते किती आग्रही आहेत, हे लक्षात घेता भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून कोणते पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करणे अपेक्षित आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
भारताच्या संपूर्ण इतिहासात भारतीय नागरिक या उपखंडात आढळणारी व्यापक मानवी समूहातील विविधता कोणत्या तरी एकाच बिंदूपासून उगम पावलेली नाही, अशी संकल्पना जोपासत आले आहेत. भारतातील लोकांचा इतिहास अनेक बिंदूंपासून सुरू झाला, हे मान्य केले तरच भारतातील लोकांचा इतिहास योग्य पद्धतीने आकलन करणे शक्य आहे. इतिहास आणि संस्कृतीविषयक सरकारी समिती निव्वळ रा. स्व. संघाच्या अपरिवर्तनीय ऐतिहासिक सत्याला पुष्टी देणार नाही, अशी आपण आशा करूया; परंतु जर का तसे घडले तर भारताचा भविष्यातील इतिहास दुर्दैवाने फुकुयामाच्या पुनरुद्भवी संकल्पनांचा सिद्धांत सिद्ध करणारा ठरेल!
Web Title: Dr Ganesha Devi Writes Knowledge Tradition Contains Some Important Wisdom And Useful Theories
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..