बोलीचे सार्वभौमत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Ganesha Devi writes Sovereignty of speech language

भाषा या सामाजिक संस्थेची सुरुवात, तिच्या उद्भवाची नेमकी कारणे, तिच्या सुरुवातीच्या जडणघडणीचा घटनाक्रम हे उत्क्रांतीच्या ग्रंथातील सुरुवातीच्या व अस्पष्ट अक्षरात लिहिलेल्या पानांप्रमाणे आहेत.

बोलीचे सार्वभौमत्व

मानवी उत्क्रांतीतील कितीतरी गोष्टी अशा आहेत, की ज्याविषयी कोणतेही शास्त्रीय विधान करणे अशक्य आहे. त्यासंबंधी केवळ ठोकताळे बांधता यावेत आणि तेही तेवढेच तर्कशुद्ध वाटावेत. भाषा या सामाजिक संस्थेची सुरुवात, तिच्या उद्भवाची नेमकी कारणे, तिच्या सुरुवातीच्या जडणघडणीचा घटनाक्रम हे उत्क्रांतीच्या ग्रंथातील सुरुवातीच्या व अस्पष्ट अक्षरात लिहिलेल्या पानांप्रमाणे आहेत.

विश्व उत्पन्न होत असताना कोणत्याही प्रकारचा ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही, यासंबंधी मत व्यक्त करणे शक्य असले, तरीही ते मत सिद्ध करणे अशक्य आहे. ईश्वर अपौरुषेय आहे किंवा नाही, यावर मत व्यक्त करण्यासारखेच तेही मत केवळ तत्त्वज्ञानात्मक तर्कसिद्धांताच्या स्वरूपाचे राहील. मानवाला व मानवाआधीच्या इतर प्राणिमात्राला, ध्वनिसंवेदन प्राप्त होण्याआधी, ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही, हेही निश्चित करणे अशक्य आहे. अतिन्द्रिय अनुभवातून ऐकू येणारा सततचा ध्वनी - अनाहत नाद आणि स्वरयंत्रातून श्वास तोडून-जोडून बनविलेला ध्वनी, हे दोन्ही एकाच प्रवृत्तीचे असतात किंवा नाही, हे सांगणेही कठीण आहे. शिवाय अर्थव्यवहारासाठी केवळ ध्वनिनियंत्रणाचाच मार्ग मनुष्यप्राण्याने का निवडला, डोळ्यांची भाषा विकसित करून किंवा मधमाश्यांप्रमाणे शरीराच्या इतर हालचालीने प्रकाशनियंत्रण करून अर्थ व्यवहार करण्याची क्षमता उपलब्ध असतानाही, ती पूर्णपणे विकसित का केली नाही, हे सारे प्रश्न जरी विचारता आले, तरीही त्यांची उत्तरे केवळ तर्काच्या पलीकडे नीटशी स्पष्टपणे मांडता येत नाहीत.

ध्वनिनियंत्रणाने संवाद-व्यवहार स्थापन झाल्यानंतर, त्यात उत्क्रांती होत होत जेव्हा अंक व लिपी यांच्या आधारे प्रत्यक्ष ध्वनिमाध्यमाचा उपयोग न करताही अर्थव्यवहार शक्य बनला व अंक आणि लिपी यांचे महत्त्व प्रस्थापित झाले, तेव्हा व त्यानंतर, ध्वनिभाषेचे महत्त्व क्रमश: ओसरले का नाही, हेही स्पष्ट करणे जवळपास अशक्य आहे. त्याचप्रमाणे अर्भकाच्या मेंदूमध्ये ध्वनिव्यवस्थेची नोंद करून भाषाकौशल्य आत्मसात करण्याची उपजत शक्ती असण्यासंबंधीचे सिद्धांत प्रस्थापित झाले असले, तरीही लिपीमध्ये गुंतलेले भूमितीचे आकार स्वीकारून बाल्यावस्थेत किंवा प्रौढावस्थेतही लिपी आणि ध्वनी यांच्या परस्परावलंबनाचे नियम स्पष्टपणे मांडणारे सिद्धांत अजूनही अस्तित्वात नाहीत.

शारीरिक हालचालींमधून व्यक्त होणारा अर्थ, ध्वनीमधून व्यक्त होणारा अर्थ, हे सारे भाषेच्या अर्थव्यवहारात समाविष्ट असतात. त्यामुळे ‘अर्थ’ ही संस्था अथवा पदार्थ नेमक्या कशा प्रकारचा किंवा प्रकारची आहे, याविषयीचे निदान अजूनही नक्की करता आलेले नाही. त्यासंबंधीचे सिद्धांतही गृहितात्मकच आहेत. अर्थ म्हणजेच भाषा, की अर्थ भाषेपूर्वी आणि भाषेबरोबरही विस्तारलेला असतो किंवा अर्थ केवळ भाषेतच असतो आणि भाषेचा विस्तार अर्थाच्या विस्तारापेक्षा जास्त विस्तृत असतो, याहीविषयी नेमके काही सांगणे अशक्य आहे.

भाषा हा अनुभव एकाच व्यक्तीच्या आकलनाच्या आवाक्यात असला, तरीही भाषा अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी सुरुवातीच्या क्षणी एकापेक्षा जास्त व्यक्ती अस्तित्वात असणे जरुरीचे असते. त्यामुळे भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, असे मानण्यात आले आहे. एकंदरीत, भाषा अर्थ आहे, पदार्थ आहे, आध्यात्मिक शक्ती आहे किंवा सामाजिक संस्था आहे किंवा केवळ उत्क्रांतीच्या ओघातील एक शारीरिक प्रक्रिया आहे, अथवा भाषा एकाच वेळी या सर्व गोष्टी आहेत, हे सांगता येणे अजूनही शक्य दिसत नाही. या साऱ्या अडचणी, भाषाशास्त्र हे सर्वांत प्रगत मानवी शास्त्र असतानाही उभ्या राहतात.

संस्कृतीसंबंधीचा विचार करताना असे एक मत मांडण्यात आले आहे, की भाषेबाहेर संस्कृती असू शकत नाही. आकलनासंबंधीही असेच मत मांडण्यात आले आहे. अर्थासंबंधीही ‘अर्थ भाषेव्यतिरिक्त असू शकत नाही’ असे मत प्रतिपादित झालेले आहे. थोडक्यात, मनुष्याच्या बुद्धिव्यवहारातील प्रत्येक क्षमतेसाठी वेगवेगळ्या संदर्भात भाषा हा सीमारेषात्मक प्रतिशब्द वापरण्यात आलेला आहे. वास्तविक स्वप्ने भाषिक संरचनेची नसतात, तरीही स्वप्नांची भाषा अशी संकल्पना मानसशास्त्रज्ञ व भाषाशास्त्रज्ञ स्वीकारतात. इतकेच नव्हे तर ज्या प्राण्यांना विकसित भाषा अवगत नाही अशा प्राण्यांना स्वप्ने पडत नसावीत, असाही समज आहे. भाषा नसेल तर स्मृतीही अशक्य आहे, असे गृहीतकृत्य आहे. त्याचप्रमाणे प्रेरणा, कल्पना, विवेक इत्यादी बुद्धिव्यवहाराच्या क्षमता भाषेशिवाय अशक्य बनतात, असे स्वीकारले गेले आहे.

ही गृहीतकृत्ये स्वीकारण्यास काहीच हरकत नाही, पण इतर अनेक अनुभव मनुष्यप्राणी आणि इतर प्राणी यांच्यात समान प्रमाणात पाहावयास मिळतात व ते त्यांच्या त्यांच्या बुद्धिव्यवहारातील महत्त्वाचे अनुभव आहेत. यात सर्वांत मोठा अनुभव भीतीचा. उंचीवरून खोल जागी पडण्याची भीती, तो अनुभव सर्व प्राण्यांत समान प्रमाणात असतो. त्या अनुभवाला फारसे स्पष्ट भाषिक स्वरूप नाही. त्याचप्रमाणे शरीरसंबंधाच्या आकर्षणातून निर्माण होणारी भावना, ज्याला भाषेमध्ये प्रेम किंवा वासना किंवा आकर्षण असे शब्द आहेत, तो अनुभवही मानवाखेरीजच्या प्राण्यांतही असतो. ही दोन्ही विधाने विवाद्य आहेत, पण त्यांची विवादात्मकता भाषेसंबंधीच्या इतर सिद्धांतांच्या विवादात्मकतेपेक्षा जास्त नाही.

फिनॉमेनॉलॉजी, जे आकलनशास्त्रांपैकी एक महत्त्वाचे शास्त्र आहे, त्यात असे मानण्यात आले आहे की मानवाचा विश्वासंबंधीचा अनुभव सतत पसरत जातो व त्यापाठोपाठ तो अनुभव ग्रहण करण्यासाठी भाषेचा व्याप वाढत राहतो. याउलट असेही मानण्यात आले आहे की भाषा ही सामाजिक संस्था क्रमश: प्रगल्भ बनत जाते व त्या प्रमाणात याआधी भाषेत न पकडले गेलेले, पण मानवाखेरीजच्या विश्वात अस्तित्वात असलेले अनुभव भाषा ग्रहण करत राहते. वास्तविक असे अनुभवविश्व असते का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर लिपीबद्ध न झालेली भाषा, ज्यांचे व्याकरण लिहिले गेले नाही, अशी ध्वनी आणि शब्दांची संघटना, ज्यांना मान्यता प्राप्त झाली नाही, अशी अर्थव्यवहाराची वळणे, ही सारी ‘भाषा’ असतात काय, हाही प्रश्न निरुत्तर राहिलेला आहे. अशा साऱ्यांना ‘पोटभाषा’ किंवा ‘अपभ्रंश’ या दालनात ढकलले गेले आहे.

वास्तविक ध्वनीच्या अत्यंत गूढ अशा उगमापासून सर्वत्रच्या अस्तित्वापर्यंतच्या पटलावर, मानवी भाषा हा एक पोटभाषेचाच प्रकार मानावा लागेल. संपूर्ण अर्थव्यवहाराच्या शारीरिक, लाक्षणिक व शाब्दिक व्यापारांत शाब्दिक भाषाव्यवहार हा संपूर्ण अर्थपटलाची केवळ एक पोटभाषा आहे, असे मानावे लागेल. त्यानंतर, अनुभवव्याप्तीच्या सततच्या विस्तारव्यवहारात, भाषेत जखडलेला अनुभव हा अनुभवाची पोटभाषा मानावा लागेल. मानवाच्या संपूर्ण शाब्दिक भाषाव्यवहारात लिपीबद्ध व व्याकरणबद्ध झालेला भाषांचा मर्यादित व्यवहार हा त्या शब्दभाषाब्रह्मांडाची एक पोटभाषा मानावा लागेल. त्यामुळे ज्याला आपण पोटभाषा म्हणतो, ती म्हणजे प्रमुख भाषेच्या मागे राहिलेली व अपूर्ण उत्क्रांती झालेली भाषा असते हा विचार कदाचित संपूर्णत: चुकीचा नसला तरी विवाद्य तरी आहेच.

अशीही कल्पना करता येईल की, अनुभव व शब्दभाषा यांच्या सततच्या ओढाताणीत, ती ओढाताण सहन करण्यासाठी एखाद्या विशिष्ट भाषेतील काही घटक कार्यरत असतात, जे त्यांचे भाषा या स्वरूपातील अस्तित्व न गमावता - म्हणजे जे एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती यांच्यामध्ये कमीत कमी खोट्या चलनी नाण्याएवढे अदलाबदल करण्यालायक तरी राहतात - भाषेबाहेरच्या अनुभवाशी खेळू शकतात. रूपकात्मक भाषेत सांगायचे झाले तर एखादा अत्यंत गतिमान ग्रह सततचा फिरत असावा, पण त्याचे कवच लाव्हाप्रमाणे प्रवाही असावे व तो लाव्हारस त्या ग्रहाशी अत्यंत निकटचा संबंध न ठेवताही त्याच्या बरोबरच फिरत राहावा, काहीशी अशी भाषेची गती असते. यात स्पष्ट, सुघटित प्रमुख भाषा असते व अर्धघटित पण मुक्त पोटभाषा असते व या पोटभाषेतून भाषेच्या पर्यावरणाबाहेरचा अर्थ व अनुभव सतत प्रमुख व सुघटित भाषेत येत राहतो. ज्या समाजात किंवा देशात विशिष्ट प्रदेशाची बोली अथवा भाषा न बोलणारे राज्यकर्ते असतात, ज्या संस्कृतीमध्ये समाजातील स्वामित्व असणारा वर्ग एकभाषिक नसतो, अशा देशात किंवा संस्कृतीत कोणती बोली पोटभाषा व कोणती बोली मान्य भाषा बनेल, यासंबंधी पुन्हा एकदा विचार करणे जरूर आहे.

Web Title: Dr Ganesha Devi Writes Sovereignty Of Speech Language

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Languagesaptarang