प्रेमाचा विजय अन् दोनदा लागलं लग्न

love marraige
love marraigeesakal

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

आयुष्यात मागे वळून बघताना अनेक सकारात्मक खऱ्याखुऱ्या घडलेल्या गोष्टी आठवतात. यातली प्रत्येक गोष्ट मला खूप काही शिकवून, समाधान देऊन, समृद्ध करून केली. अशीच आठवणारी एक गोष्ट अर्थात दोन लग्नांची गोष्ट. दोन लग्न; पण ती वेगवेगळी नव्हेत, तर एकाच जोडप्याची दोनदा झालेली लग्न. ही गोष्ट आहे साधारण २०१० च्या दरम्यानची. आमच्या हॉस्पिटलमधील अभिनव हा २४ वर्षीय तरुण मला ताणतणावाखाली असल्याचे दिसला. अत्यंत साधारण परिस्थितीतील, मात्र हुशार आणि कष्टाळू असलेला हा मुलगा कामात अचानक चुका करू लागला होता. या तरुणाच्या तब्येतीवर परिणाम जाणवत होता. त्याचे वजन झपाट्याने कमी होताना दिसत होते.

एके दिवशी अभिनवला विश्‍वासात घेऊन बोलते केले. हळूहळू तो बोलू लागला. साधारण पंचविशीत होणारा प्रेमाचा रोग त्याला जडला होता. पण, हे प्रकरण जरा वेगळेच होते. कुठलीही जोडी आधी प्रेमात पडते, मग पुढे सुरू होतो जबरदस्त ड्रामा. ‘खानदान की इज्जत मिट्टी में’पासून ते ‘पळून जाऊन लग्न’ वगैरेच्या गप्पा होतात. पण अभिनवचा किस्सा जरा धमाल होता. झालं असं, की अभिनवच्या घरची मंडळी त्याचं लग्न जमविण्याच्या खटपटीत होते. स्थळं येत होती, कुठे मुलगी पसंत पडत नव्हती, तर काहींच्या पसंतीस मुलगा उतरत नव्हता. अखेर नाशिकमधील एक स्थळ अभिनवला पसंत पडले. मुलीलाही पहिल्या नजरेत अभिनव आवडला. दोघांकडून होकारही झाला. मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाली आणि या दोन मनांची कहाणी सुरू झाली...

love marraige
विजय कशावर, जात की धर्मावर !

आणा-भाका घेत चक्क ‘जियेंगे साथ, मरेंगे साथ’ इथपर्यंत हा सिलसिला पोचला आणि नेमका इथेच मिठाचा खडा पडला. मुलीकडच्यांना जवळच्या नातेवाइकांकडून माहिती मिळाली, की मुलगा व्यसनी आहे, लफडेबाज आहे. अर्थात‌च ही माहिती सपशेल खोटी होती. यात तिळमात्र शंका नाही. पण हे आपल्याला माहीत असून उपयोग नव्हता. ज्यांना ही बाब कळली, ते मुलीच्या कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे आणि संपूर्ण निर्णय घेणारे नातेवाईक होते. ही स्वभावानेही जमदाग्नीचा अवतार मानली जायची. शहरातील गुंडगिरीपासून ते यशस्वी राजकारणी, असा प्रवास झालेल्या व्यक्तीची आमचे हे महाशय उजवे हात म्हणून ओळखले जात. त्यामुळे अशा व्यक्तीला मिळालेली माहिती खोडून काढायची तरी कशी? हा प्रश्‍न सगळ्यांना पडला होता. अभिनवच्या घरातील आणि समाजातील काही प्रतिष्ठितांनी सगळे प्रयत्न करून पाहिले; पण उपयोग शून्य. दुसरीकडे अभिनव आणि ऐश्‍वर्या जणू प्रेमदिवाने बनले होते. त्यात या नव्या माहितीमुळे दोघांच्या भेटी-गाठींवर बंधने लादण्यात आली.

ऐश्‍वर्याचा मोबाईल काढून घेण्यात आला. घराबाहेर जाणं बंद करण्यात आलं. जणू ती नजरकैदेत गेली. पण अशा बंधनानं जर दोन जीव दूर ठेवता आले असते, तर जगात दोन व्यक्तींमध्ये प्रेम झालंच नसतं. किंबहुना अधिकची बंधनं टाकल्यानं ही प्रकरणे मोठ्या संख्येने घडतात. असंच अभिनव-ऐश्‍वर्याचं देखील झालं. ही जोडी एकदमच पक्की झाली होती. या काळात आमचा अभिनव चक्क देवदास बनला होता. आम्ही ‘देवदास’कडून खात्री करून घेतली, की त्याचं मन किती पक्कं होतं. तो शंभर टक्के पक्का असल्याची खात्री झाली आणि मग आम्ही विचार केला, की चला प्रयत्न करू या, दोन प्रेमीजिवांना विवाह बंधनात आणण्याचा. पुढे अभिनवला विचारले, ऐश्‍वर्याची पूर्ण तयारी आहे का, हेदेखील पाहावे लागेल. अभिनवला सांगून ऐश्‍वर्याला बोलविणे पाठविले. एका आठवड्यात तो तिला घेऊन आला. ऐश्‍वर्याशी बोलल्यानंतर जाणवले, की ती तर त्याच्यापेक्षा पक्की आहे. त्यामुळे या दोघांना मदत करायला हवी, हे जाणून आम्ही नियोजनाला सुरवात केली.

ऐश्‍वर्याला समजावून, आत्मविश्‍वासाचे बळ देत तिला परत घरी पाठवले. खरंतर तिला तिच्या घरून काढून लग्न लावायचे आणि पुन्हा सहीसलामत घरी सोडायचे, ही प्रथमदर्शनी वाटते तेवढी सोपी बाब नक्कीच नव्हती. दोघांचं लग्न लावायचं होतं. शिर्डी, पुणे, मुंबई, वणी गड, औरंगाबाद, त्र्यंबकेश्‍वर असे एकेक पर्याय समोर येऊ लागले. वेळेची मुख्य अडचण असल्याने आम्ही त्र्यंबकेश्‍वरचा पर्याय लॉक केला. जवळचे स्नेही असलेले एक पोलिस अधिकारी तेव्हा तिथे कार्यरत होते. त्यांचाही आम्हाला मोठा आधार मिळणार होता. त्र्यंबकेश्‍वरजवळच एका मित्राचे रिसॉर्टही होते. एका डॉक्टर मित्राच्या मदतीने भटजींचीही व्यवस्था पार पडली. तरीदेखील ही सगळी व्यवस्था करत तब्बल चार महिन्यांचा कालखंड लोटला. योग्य संधी मिळत नव्हती. ऐश्‍वर्याने घरी विश्‍वास संपादन केल्याने तिची बंधनं सैल झाली होती. एक दिवस मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्ताची संधी मिळताच ती दोन समवयीन मैत्रिणीसह घराबाहेर आली. आमचे नियोजन पक्के होते. जवळपास वीस जणांची टीम तयार झाली. त्यात अगदी करवले, करवल्या, भटजी, साक्षीदार असे सगळे सज्ज होते. ऐश्‍वर्याबरोबर नसतानाही आम्ही लग्नाची आवश्यक खरेदी आधीच करून ठेवली होती. लग्नाचा दिवस उजाडला. सगळी टीम धडधडत्या अंतःकरणानं निघाली. आम्ही दोघे, ऐश्‍वर्या आणि तिच्या दोन मैत्रिणींना घेऊन गाडीने सुसाट वेगाने त्र्यंबकेश्‍वर गाठले. एक टीम आणि भटजी तिथे आधीच पोचून तयार होते. स्नेही असलेले पोलिस अधिकारी दोन सहकाऱ्यांसह उपस्थित होते. रिसॉर्टवाल्या मित्रानं जेवणावळीसह सर्व व्यवस्था केली होती. दोन मित्र रिसॉर्टच्या गेटवर तैनात होते. कोणी काही गडबड तर करायला येत नाहीत ना, यावर ते लक्ष ठेवून होते. म्हणता म्हणता गुरुजींनी लग्न लावले आणि प्रमाणपत्रही आमच्या हाती पडले. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. वधूचे सर्व साजशृंगार, आभूषणे उतरवून बरोबर साडेतीन तासांच्या आत नाशिकला आम्ही पोचलोही. ऐश्‍वर्या सुखरूप घरी पोचली. मधल्या काळात काही घडलेच नाही, अशा आविर्भावात हा एपिसोड इथे संपला.

love marraige
जागतिक नवरचनेचं आव्हान

अभिनवदेखील कामावर रुजू झाला. आता आमची लगबग सुरू झाली ती विवाह नोंदविण्यासाठी. कारण एकदा विवाह नोंदणी झाली, तर त्यानंतर त्यात कुणीही काही बदल करणे अशक्य होते, याची आम्हाला पूर्ण जाणीव होती. साधारण एक आठवडा गेला. मात्र या काळात आम्हाला एक अत्यंत सुखद अनुभव आला. देवदेखील सच्च्या प्रेमामागे उभा राहतो, असं म्हणतात. याचीच जणू प्रचिती आम्हाला आली. जे जमदग्नी नातेवाईक या लग्नाविरुद्ध होते, त्यांचं हृदय परिवर्तन होऊन त्यांनी लग्नाला चक्क होकार दर्शविला. आता आम्हालाच प्रश्‍न पडला, की आता नेमकं काय करायचं? आता आधी झालेलं लग्न जाहीर करायचं? की झालेलं सगळं तसंच झाकून ठेवून, रीतसर नव्यानं लग्न लावायचं?

अभिनव आणि ऐश्‍वर्याच्या घरच्यांचं कोणाचंही मन दुखावू नये म्हणून आम्ही लावलेलं लग्न झाकून ठेवून नव्यानं रीतसर लग्न लावण्याचा निर्णय घेतला. अवघ्या पंधरा दिवसांत हे ‘अधिकृत’ लग्नही लागलं. त्यात खऱ्या प्रेमाचा हिंमतीच्या कसोटीवर विजय झाला. या जोडीचा जणू पूर्ण विवाह झाला आणि असे हे दुसऱ्यांदा लग्न लागले.

विशेष म्हणजे, अभिनव आणि ऐश्‍वर्यानेदेखील आपलं खरं प्रेम गेल्या ११ वर्षांत सिद्ध केले आहे. दोघांच्या संसारवेलीवर छान दोन गोंडस फुलंदेखील फुलली आहेत. स्वतःचं घर त्यांनी घेतलं आहे. अगदी क्वचित होत असतील अशा दोन लग्नांचा वाढदिवस साजरा करत ही जोडी सुखानं जीवन व्यतीत करतेय.

(लेखक सुयश या प्रतिथयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com