सौंदाण्यातील आठवडेबाजारात लाभली आयुष्यभराची ‘शिदोरी’

पंख सकारात्मकतेचे
Life
Lifeesakal
Updated on

''‘पंख सकारात्मकतेचे’ सदर लिहायला सुरवात केल्यापासून मनामध्ये असंख्य सकारात्मक गोष्टींनी फेर धरला आहे. आज याच सकारात्मक गोष्टींच्या पोतडीतून एक गोष्ट जी की माझ्या अगदी लहानपणाची आहे आहे. साधारणतः १९७२ ते ७३ च्या काळातील म्हणजे माझे वय फक्त नऊ ते दहा वर्षे. गोष्ट माझ्या मित्राची, राजेंद्रची आहे.'' - डॉ. हेमंत ओस्तवाल

राजेंद्रच्या घरची आर्थिक स्थिती त्या वेळी बेताचीच होती. त्याच्या घरची थोडीफार शेती होती; परंतु त्या शेतीवर आर्थिक गुजराण होत नसल्याने, राजेंद्रचे एक चुलते, पंढरीनाथ गरम मसाल्याचे दुकान गावोगावी जाऊन आठवडेबाजारात लावत होते. आमच्या गावीही, चांदवडला दर सोमवारी आठवडेबाजारात पंढरीकाका गरम मसाल्याचे दुकान लावीत असत. मी आणि राजेंद्र, दर सोमवारी पंढरीकाकांना शाळा सुटल्यावर मदत करीत असू, जसे की जेवायला सोडणे, चहापाणी, वॉशरूम ब्रेक वगैरे वगैरे. पण यातली खरी मेख वेगळीच आहे. पंढरीकाकांचे गरम मसाल्याचे दुकान असल्याने त्यांच्याकडे आम्हास दरवेळी खारीक-खोबरे खायला मिळायचे.

आमची शाळा श्री नेमिनाथ जैन हायस्कूल, ही श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल, नेमीनगर, चांदवड, जैन लोकांकडून संचलित केली जात असल्याने, आम्हास ख्रिसमसऐवजी जैन धर्मातील सर्वांत पवित्र आणि महत्त्वाच्या अशा पर्युषण पर्वाच्या आठ दिवस सुट्या मिळायच्या. त्या वेळी आमच्या शाळेला पर्युषण पर्वाच्या सुट्या लागलेल्या होत्या. त्या दिवशी म्हणजे मला आजही आठवते तो बुधवार होता. राजेंद्र सकाळी सकाळी माझ्या घरी आला आणि विचारू लागला, ‘सौंदाण्याच्या बाजाराला, पंढरीकाकांना मदत करायला येतोस का? आज नेहमीपेक्षा गर्दी खूप जास्त असेल. कारण आजचा बाजार हा पोळ्याचा बाजार आहे. सोबत गणेशोत्सवदेखील अगदी जवळ आला आहे आणि पोळ्याचा बाजार असल्याने काकांनी हारकडेदेखील विकायला घेतलेले आहेत. आपण गेलो तर खारीक-खोबरे नेहमीप्रमाणे मिळतीलच, परंतु त्या बरोबरीने आज हारकडेदेखील खायला मिळतील. आज आपली डबल मजा होईल, चल ना, चल ना, जाऊ या ना आपण!’ राजेंद्र मोठ्या काकुळतीने विनंती करीत होता आणि खरे सांगायचे तर मलादेखील खारीक-खोबरे, हार-कंगण यांचे जबरदस्त आकर्षण होते आणि मी सौंदाण्याला जाण्यासाठी आई-वडिलांची परवानगीदेखील मिळविली. अगदी पटापट आवरून मी आणि राजेंद्र पंढरीकाकांबरोबर बाजाराला निघालोदेखील.

Life
दुनियादारी : आम्ही असू नाटकी

अंदाजे दहाच्या सुमारास आम्ही सौंदाण्याला पोचलो. साधारणतः साडेदहाच्या सुमारास सौंदाण्याच्या नदीपात्रात बाजारस्थळी पाल लावून दुकान लावले गेले होते आणि माझी व राजेंद्रची दुकानदारी जोरात सुरू झाली! म्हणता म्हणता आम्ही अंदाजे साडेबारापर्यंत निम्मे हारकडे संपविलेदेखील होते. अर्थातच त्यात खाल्लेही भरपूर होते. पंढरीकाकांनी आम्हा दोघांना घरून आणलेला डबा जेवून घ्यायला सांगितला आणि त्याबरोबरच त्यांनी त्यांच्या नेहमीच्या ओळखीच्या माणसाकडून दोन चांगले सामोसेदेखील मागवून आम्हाला दिले. आम्ही पालीच्या मागे बसून घरून आणलेला डबा खाल्ला आणि परत एकदा दुकानदारीला नव्या जोमाने उत्साहाने भिडलो. काकांना आम्ही विनंती केली, की आम्ही दुकान सांभाळतो, आपणदेखील जेवण करून घ्या. ‘थोड्या वेळाने करतो रे’ असे काकांनी आम्हाला उत्तर दिले आणि आम्ही सर्व जण दुकानदारीत व्यस्त झालो. अंदाजे दीड-पावणेदोनच्या दरम्यान चार-पाच लोक दुकानावर आले आणि काकांना ते त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह करू लागले आणि काकाही अगदी काही सेकंदांत पूर्वनियोजित प्लॅन असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर निघालेदेखील. आमच्या लक्षात आले, की काकांचा जेवणाचा डबा तर येथेच राहिला. राजेंद्र त्यांच्या मागे पळतच सुटला. काका भेटलेदेखील त्याला, पण त्याला जवळपास झिडकारतच पुढे निघून गेले. राजेंद्र काहीसा नाराज होतच डबा घेऊन परतला. त्याचा चेहरा खूपच उतरलेला, रडवेला झाला होता; परंतु त्याने ते लपविण्याचा केविलवाणा अयशस्वी प्रयत्न केला. आम्ही दोघेही ते सर्व विसरून दुकानदारीवर लक्ष केंद्रित करू लागलो. सणाचा बाजार असल्यामुळे आमची दुकानदारी खूप जोरात होती. अडीच वाजून गेले होते; परंतु पंढरीकाका अजूनही परतलेले नव्हते. बाजूचा एक मसाला व्यापारी छद्मी हास्य करीत आम्हाला सांगतो कसा, ‘कुठे आहे काका? काका झाला उताणा! तुम्ही बघत बसा वाट आता!’ ते काय बोलत होते याचा आम्हाला काहीही अर्थबोध झाला नव्हता. आम्ही दोघे त्यांच्यावर खूप चिडलो, पण खरे तर आम्ही दोघेही खूप रडवेले झालो होतो.

एव्हाना साडेचार वाजत आले होते. आम्ही हिमतीने धंदा करीत होतो. बाजार आता उतरतीला लागला होता. वेळ त्याच्या गतीने चाललेला होता. आता घड्याळात साडेपाच वाजत आले होते. आम्ही खूपच तणावात आलो होतो. त्या काळी आजच्यासारखे मोबाईल तर सोडा साधे दूरध्वनीही नव्हते. १५ पैशांचे पोस्टकार्ड सोडले तर संपर्काची जवळपास कोणतीही साधने नव्हती. आता काय करायचे, हा आमच्यासाठी फार मोठा यक्षप्रश्न बनला होता.आम्ही आमचा गल्ला मोजला, तब्बल सतराशेदोन रुपयांचा धंदा आम्ही केला होता. आजच्या काळात सतराशेदोन रुपये म्हणजे काहीच नाही. त्या काळात सतराशेदोन म्हणजे आजचे तुम्ही निदान ७० हजार पकडा इतका जबरदस्त धंदा आम्ही केला होता. त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले कुठले काम केले असेल तर ते म्हणजे सामानाचे. आम्ही दुकानाच्या सामानाची व्यवस्थित बांधाबांध केली. आता प्रश्न उभा राहिला हे सामान द्यायचे तरी कोणाकडे? किंवा ठेवायचे तरी कुठे? आम्ही बाजाराच्या गल्लीत चक्कर मारली आणि आमचा प्रश्न बरोबर सुटला. चांदवडचे एक व्यापारी पंढरीकाकांचे मित्र होते आणि विनंती केल्यावर त्यांनी सामान चांदवडला घेऊन जाण्याची तयारी दर्शविली. आमचा फार मोठा प्रश्न अशा रीतीने सुटला पण दुसरेच मोठे संकट समोर उभे ठाकले. एकच प्रश्न, पंढरीकाका कुठे गेले? पंढरीकाका कुठे गेले? काय उत्तर देणार आम्ही? काय उत्तर होते आमच्याकडे? आम्ही थातुरमातुर उत्तर देत होतो. कसातरी जीव सोडवला त्यांच्या प्रश्नाच्या माऱ्यातून. बाजारातून बाहेर पडलो आणि सगळ्यात पहिले काय केले असेल तर खूप रडून घेतले पण रडल्याने थोडीच प्रश्न सुटणार होता? पण रडल्याने मन थोडे शांत झाले. सायंकाळचे साडेसहा वाजत होते. मग विचार केला, आता आपल्याला कोणाची तरी मदत घ्यायलाच लागेल. राजेंद्रशी चर्चा करून त्यालाही समजावून सांगितले, की नाहीतर आपण येथेच अडकून जाऊ. काकांचे काही बरेवाईट तर झाले नाही ना, ही चिंता आम्हाला सतावायला लागली पण शोधायला तर लागेलच पण शोधायचे कसे? सुरवात कुठून करावयाची? कसे करायचे? सारेच अवघड होते. सगळ्यात प्रथम आम्ही दोघांनी संपूर्ण गावात एक चक्कर मारली. काकांचा कुठेही पत्ता नव्हता. रात्र व्हायला लागली होती. आमचा धीर खचत चालला होता. सुदैवाने मला तेवढ्यात अंधूकसे आठवले, की बहुतेक आमचे चौथीचे वर्गशिक्षक शिवाजी पवार सर सौंदाण्याचेच होते.

Life
सोनेरी स्वप्नं : तीन रुपयांची गारीगार !

आमची त्या वेळी चांदवडला घरगुती जेवणाची मेस होती आणि पवार सर आमच्याकडेच जेवायला पण येत होते. मग आम्ही मिशन पवार सर सुरू केले. मला एकदम डोळ्यासमोर त्या वेळीच बघितलेला व्हिक्टोरिया नंबर २०३ हा सिनेमा डोळ्यासमोर तरळला. त्यातील अशोक कुमार आणि प्राणसारखीच आमची गत झालेली होती, ‘दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे’. पण आता संपूर्ण गावात पवार सरांचे घर शोधायचे कसे? आम्ही तीन-चार ठिकाणी शोधायचा प्रयत्न केला. बाजारपेठ पालथी घातली; परंतु पवार सरांचे घर काही सापडत नव्हते. मग एक छोटीशी युक्ती सापडली, की चला आपण कोणतेही पवारांचे घर शोधून काढू या आणि मग मात्र काम सोपे झाले. आमचे पवार सर गावाबाहेर हायवेलगत राहत होते आणि आम्ही त्यांना गावभर शोधत होतो. घर बरे सापडले होते परंतु अडचणी मात्र आमचा पिच्छा सोडत नव्हत्या. पवार सर मालेगावला काही कामानिमित्त गेले होते आणि त्यांना यायला उशीर होणार होता. सरांच्या आई भेटल्या. अत्यंत प्रेमळ माता. त्यांनी आमचे सगळे ऐकून घेतले. त्यांनी आम्हाला खूप चांगला धीर दिला. सगळ्यात पहिले त्यांनी आम्हाला खूप छान खायला दिले. मानसिक आधार आणि पोटाला आधार दोन्ही मिळाल्याने आम्हाला पुष्कळ बरे वाटायला लागले. त्यादरम्यान त्यांनी त्यांच्या छोट्या मुलाला म्हणजेच आमच्या सरांच्या छोट्या भावाला अजयला बोलवले. सगळे समजावून सांगितले आणि त्यांना काकाश्रींना शोधायला पिटाळले. अजय अतिशय हुशार, चाणाक्ष. त्याला कसा अंदाज आला आम्हाला कळले नाही, परंतु पंचवीस-तीस मिनिटांमध्येच अजयकाका आमच्या पंढरीकाकांचा शोध लावून परतले.

अजय बोलायला लागला आणि आश्चर्याचे जबरदस्त धक्के आम्हाला बसायला लागले. आमच्या काकाश्रींचा तिथल्या भिलाटीमध्ये दुपारपासूनच दारू पिण्याचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. आधी आम्हाला त्याच्यावर विश्वासच बसला नाही. उलटपक्षी आमचा त्यांच्यावर संतापच झाला. आमचा अवतार बघून अजयकाका आम्हाला प्रत्यक्ष भिलाटीतच घेऊन गेले. समोरचे दृश्य बघून आम्ही हादरूनच गेलो. रडायला लागलो. कारण असले काही दृश्य आयुष्यात आतापावेतो आम्ही कधीही बघितले नव्हते. समोर १५-१६ लोकांचा समूह गोल करून बसलेला होता. त्यातला एक माणूस चामड्याच्या फुग्यातून एका फुटक्या कपातून सर्वांना दारू देत होता आणि सर्व जण मोठ्या आनंदाने एकाच फुटक्या कपाने दारूपान करत होते. सोबत एक खड्या मिठाची वाटीही होती. दारू प्यायली की त्यातला एक खडा प्रत्येक जण घेत होता. खरे सांगायचे तर आता कळते आहे की ते सर्व जण ‘आउट’ झालेले होते आणि काकाश्रीही आम्हाला अडखळत्या स्वरामध्ये दारू पिण्याचा आग्रह करू लागले. आम्ही हतबुद्ध झालो होतो. सगळ्यात पहिले आम्ही तेथून धूम ठोकली आणि पवार सरांच्या घरी पोचलो.घरी तर पोचलो पण आम्हालाच आमची अत्यंत लाज वाटत होती. कोणाशी बोलावेसे वाटत नव्हते. आमच्या बाल मनावरती मोठा आघात झाला होता. दारूबद्दल समाजामध्ये त्या वेळी तर अत्यंत बदनामी होती. लोक दारू पिणाऱ्याकडे अत्यंत वाईट नजरेने ज्याला आपण इंग्रजीमध्ये ‘गॉन केस’ म्हणतो तसे बघत असे. तसे बघितले तर संपूर्ण पवार कुटुंबीय आम्हाला मदतच करीत होते, जणू काही वाळवंटातील हिरवळ परंतु तरीही आमचे म्हणजे राजेंद्रचे पंढरीकाका असे वागल्याने आम्हाला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. आता मात्र आम्ही कधी एकदा सौंदाणे सोडून घरी पोचतो असे झाले होते. मात्र अडचणीची गोष्ट अशी होती, की आता कुठलीही बस चांदवडला जाण्यासाठी नव्हती. आमची घालमेल पवार सरांच्या आईच्या म्हणजे यशोदा आईच्या लक्षात आली होती. तिला बरोबर कळले होते, की आम्हाला खूप अपमानास्पद, लाजिरवाणे वाटत होते. ती सांगत होती, ‘मुलांनो, रात्र खूप झाली आहे. इतक्या रात्री तुम्ही कसे काय जाल. आत्ता जाणं धोकादायक आहे आणि हेही तुमचंच घर आहे. आज इथेच मुक्काम करा. कुठलीही चिंता करू नका. सकाळी सव्वासहाच्या पहिल्या गाडीने मी स्वतः तुम्हाला बसवून देईन.’ सरांची आई माउली पोटच्या पोरापेक्षाही आमची जास्त काळजी घेत होती. परंतु आम्ही अशा थांबण्याच्या कुठल्याही मनःस्थितीत नव्हतो. केव्हा एकदा घरी जातो असे झाले होते.रात्रीचे दहा वाजले होते. यशोदा माउलीचा नाइलाज झाला होता आणि तिने अजयकाकांना आम्हास सोडण्यासाठी बस स्टॉपवर पाठविले. आता घरी जाण्यासाठी एकमेव साधन त्या काळी म्हणजे फक्त ट्रकच होते. आम्हास म्हणजे आमच्या वयाच्या जवळपास सर्वच मुलांना त्या काळी सरदारजींची खूप भीती वाटायची. त्यांच्या कंबरेला लटकत असलेल्या कृपाणची खूप भीती वाटायची. त्यामुळे मी आणि राजेंद्र मनातल्या मनात देवाचा धावा करीत होतो की देवा बाकी कुठलाही ट्रक मिळू दे पण सरदारजींचा ट्रक नको. आमची भीती अजूनच वाढत होती. कारण बस स्टॉपवर अजयकाका आणि आम्ही दोघे सोडलो तर चिटपाखरूही नव्हते. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने जाण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. अनेक वाहनांना हात दिल्यानंतर एक टँकर थांबला. आतमध्ये बसलो तर आमची उरलीसुरली हिंमतही गेली. कारण नेमके सरदारजीच त्या टँकरमध्ये होते. उंचेपुरे, भरदार मिश्‍या आणि कंबरेला लटकलेले ते कृपाण. आमची तर पाचावर धारणच बसली! आम्ही सरदारजींबाबत खूप काही अवास्तव गोष्टी ऐकलेल्या होत्या. आमच्या नकळत आम्ही दोघेही केव्हा देवाचा धावा करू लागलो हे आम्हालाही कळले नाही. आम्ही जीव मुठीत घेऊन एकदम दक्ष होऊन बसलो होतो. पंढरीकाकाश्री नको त्या अवस्थेत सापडल्यापासून राजेंद्रची तर जणू दातखीळ बसली होती. त्यामुळे आता जो काही किल्ला लढवायचा होता तो मलाच लढवायचा होता. मात्र सरदारजींनी एकदम चांगले मायेने वागून आम्हास आश्चर्याचा सुखद धक्का दिला. अक्षरशः पहिल्या दहा मिनिटांतच सरदारजींनी आमची भीती घालून टाकली. सोबत आम्हास छान छान चॉकलेट्सपण दिलीत.

अंदाजे साडेअकराच्या सुमारास चांदवडला उतरलो, अर्थातच आम्हाला हायवेला पेट्रोलपंपाजवळ उतरून दिले. त्या काळी पेट्रोलपंप ते चांदवड गाव हे अंतर खूप जास्त वाटायचे आणि खासकरून रात्रीच्या वेळी तर संपूर्ण सामसूम असल्याने खूप भीतीदेखील वाटायची. अशा अवस्थेत आम्ही पहिले राजेंद्रच्या घरी गेलो. राजेंद्रने हंबरडा फोडून आईच्या कुशीत धाव घेतली आणि हे सगळे बघून राजेंद्रच्या घरचे सर्व जण खूप घाबरले. त्यांना कळेच ना नेमके काय झाले ते. पंढरीकाका कुठे आहे हेही त्यांना कळेना. त्यांचा सर्वांचा जबरदस्त गोंधळ झाला. मग मी संपूर्ण घटनाक्रम शांतपणे विदित केला. आता राजेंद्र शांत होत होता, तर राजेंद्रचे कुटुंबीय शॉकमध्ये चालले होते. सरतेशेवटी मी घरी जायला निघालो. रात्रीचा सव्वा वाजून गेला होता. राजेंद्रचे वडील मला सोडवायला आले होते.

Life
हलके फुलके क्षण अन् आनंदाचा ''बॅलन्स''


शॉकमध्ये जाण्याची आता माझ्या घरच्यांची पाळी होती. अपेक्षेप्रमाणे माझ्या घरचे सगळे जण शॉकमध्ये गेले; परंतु लगेच सर्वांनी माझ्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला. सर्व प्रकरण व्यवस्थित यशस्वीरीत्या हिंमत ठेवून कमालीच्या सकारात्मकतेने हाताळल्याबद्दल ‘हॅट्स ऑफ’ होता. माझ्या आई-वडिलांना, त्यांच्या सकारात्मकतेला बघितले तर घडलेली घटना अत्यंत नकारात्मक, धक्कादायक आणि जीवघेणी ठरू शकली असती अशी होती. त्या वेळच्या आमच्या वयाचा विचार केला तर नक्कीच भयानक होती, पण त्यातूनही त्यांनी सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून संपूर्ण आयुष्यात सकारात्मकतेने जगण्याची जणू शिदोरी दिली. आपणही सर्व जण अशीच सकारात्मकतेची शिदोरी संपूर्ण आयुष्यासाठी गाठी बांधून घेऊ या!

(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com