जगाला पडलेल्या एका कोड्याची उकल (डॉ. जयंत गाडगीळ)

डॉ. जयंत गाडगीळ
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी उत्तर कोरियाबद्दल उत्सुकता जागवण्याचं आणि काही अंशी ती पुरवण्याचं काम अतुल कहाते यांनी "उत्तर कोरिया- जगाला पडलेलं एक कोडं' या नव्या पुस्तकाद्वारे केलं आहे.

भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी उत्तर कोरियाबद्दल उत्सुकता जागवण्याचं आणि काही अंशी ती पुरवण्याचं काम अतुल कहाते यांनी "उत्तर कोरिया- जगाला पडलेलं एक कोडं' या नव्या पुस्तकाद्वारे केलं आहे.

मुळात अविभक्त कोरियाबद्दल काही पार्श्वभूमी ध्यानात घेणं आवश्‍यक आहे. समारे दीड हजार वर्षं मांचुरियन, मंगोल, चिनी आणि जपानी लोकांनी कोरियावर अनेक आक्रमणं केली. सांस्कृतिकदृष्ट्या कोरिया कन्फ्युशियस, ताओवाद, बुद्धिझम यांच्या प्रभावाखाली होता. या विचारसरणींची एकमेकांबरोबर स्पर्धेची, कुरघोडीची नाती होती. त्यातून कोरियन झेन बुद्धिझम विकसित झाला. तो जपानच्या झेन बुद्धिझमपेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनंही कोरियानं काही महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. उदाहरणार्थ, दहाव्या-अकराव्या शतकात धातू वापरून केलेलं जगातलं पहिलं छपाईयंत्र कोरियानं केलेलं होतं. सध्याच्या परिस्थितीत भारताच्या तुलनेत हे देश केवढे आहेत, हेही समजून घ्यायला हवं. अविभक्त कोरियाच्या लोकसंख्येपेक्षा भारताची लोकसंख्या सुमारे सोळापट आहे, तर दक्षिण कोरियाच्या अठ्ठेचाळीसपट आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नागरिकांच्या उत्पन्नात आणि अर्थव्यवस्थेच्या आकारात फार मोठी तफावत आहे. जीडीपीचा विचार केला, तर उत्तर कोरियन नागरिकापेक्षा भारतीय नागरिक चौपट श्रीमंत आहे, तर उत्तर कोरियन नागरिक भारतीय नागरिकाच्या चौपट श्रीमंत आहे. एवढं असूनही दक्षिण कोरियाचं लष्करी खर्चाचं प्रमाण एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के आहे. दक्षिण कोरियाच्या युद्धाच्या खुमखुमीचं मूळ या अवाढव्य खर्चात आहे, तर त्यांच्या नागरिकांच्या दारिद्रयाचंही तेच कारण ठरतं.

हे सगळं लक्षात घेऊनच लेखकानं अगदी सुरवातीच्या प्रकरणातच उत्तर कोरिया, त्याचं महत्त्व, त्याचं राजकीयदृष्ट्या झालेलं विभाजन अशी सारांशानं माहिती देऊन उत्सुकतेचे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर साहजिकच आधुनिक काळात कोरियाची जडणघडण कशी झाली, त्याची फाळणी कशी झाली, सोव्हिएत रशिया, चीन हे साम्यवादी देश आणि अमेरिका यांच्या शीतयुद्धात या आशियायी देशाचं युद्धक्षेत्रात कसं रूपांतर झालं, चीन आणि रशियाच्या साम्यवादाच्या दोन प्रारूपांच्या जात्यात कोरिया- विशेषत: उत्तर कोरिया कसा भरडला गेला हे विस्तृतपणे सांगितलं आहे. पुढं याच कालखंडावर जणू क्‍लोज-अप घेऊन किम उल सुंग या हुकूमशहाचा उदय कसा झाला, त्यानं अमेरिका, चीन, रशिया या बड्या देशांना आपल्या कच्छपी कसं लावलं याची रंजक हकीगत सांगितलेली आहे. या हुकूमशहानं जनतेला आकाशीचा चंद्र आणण्यासारखी भुलवणारी आश्वासनं दिलेली नव्हती, तर सामिष सूप, पुरेसा भात, छप्पर असलेलं घर असं चित्र त्यानं रेखाटलं. तेही आश्वासक वाटावं इतकी या सर्वसामान्य जनतेची परिस्थिती दैन्याची होती. तसंच पहिल्या फळीतल्या विचारी, राष्ट्रवादी लोकांची जागा नंतर दांडगटानी घेतली, हे इतर अनेक देशांमध्ये दिसणारं चित्र इथंही दिसतं.

बड्या शक्तींनी नकाशावर रेघ मारून देशाची विभागणी केल्यानंतर त्या विभक्त देशात असणारं प्रेम- द्वेषाचं वातावरण, कुरघोडीचे प्रयत्न; तसंच भांडवलदारी आणि काही अंशी खुल्या व्यवस्थेचा अंगीकार केल्यानं दक्षिण कोरिया कसा समृद्ध झाला, हे लेखकानं सांगितलं आहे.

उत्तर कोरियातल्या हुकूमशाहीचं; तसंच जनतेच्या जीवनमानाचं वर्णन लेखकानं अनेक उदाहरणं देऊन केलेलं आहे. यातली वर्णनं अंगावर येणारी आहेत. किम घराण्यातल्या नातेवाईकांच्या लागेबांध्यांचंही वर्णन एका प्रकरणात आहे. सत्ताधीशांनी योग्य ते वास्तव न स्वीकारल्यामुळं जनतेची कशी फरपट होऊ शकते तेही लेखकानं प्रभावीपणे सांगितलं आहे. त्यामुळं जनतेचे कसे हाल झाले त्याचं विस्तारानं वर्णन नंतरच्या प्रकरणात आहे. या व्यतिरिक्त घराणेशाही, तिनं स्वीकारलेले काही काळानुरूप बदल असं सांगून झाल्यावर अण्वस्त्रसज्जता या विषयाच्या समेवर येऊन पुस्तक संपतं.

गप्पा मारत सांगितल्यासारखी अनौपचारिक भाषा हे या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य. त्यामुळं विषय सोपा वाटतो. प्रकरणातल्या अधूनमधून टाकलेल्या सारांशवजा चौकटी असलेली मांडणी विषय थोडक्‍यात समजून घ्यायला मदत करते, किंवा प्रकरण वाचून झाल्यावर उजळणीवजा सार म्हणून वाचायला उपयोगी पडते. कहाते यांच्या या पुस्तकामुळं मराठीत बहुधा पहिल्यांदाच आधुनिक काळातल्या (उत्तर) कोरियाबद्दल माहिती आली आहे. जगभरातून या देशाबद्दल उत्सुकता आहे, तशीच भीतीही आहे असा हा टीचभर देश. त्याबद्दल मराठीत पुस्तकस्वरूपात माहिती येण्यामुळं याबद्दल मराठी विश्वात उत्सुकता निर्माण होईल आणि ती भागवण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून अजून पुस्तकांची निर्मिती होईल अशी आशा आहे.

पुस्तकाचं नाव : उत्तर कोरिया- जगाला पडलेलं एक कोडं
लेखक : अतुल कहाते
प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे
पानं : 152, किंमत : 160 रुपये

Web Title: dr jayant gadgil write book review in saptarang