Deep Time Project
Deep Time ProjectSakal

वेळेचं भान, काळाशी मेळ !

फ्रान्समध्ये १५ मार्चला साथीच्या थैमानातच डीप टाइम प्रोजेक्ट नावाच्या महत्त्वाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. तो प्रयोग २४ एप्रिलला संपला.

फ्रान्समध्ये १५ मार्चला साथीच्या थैमानातच डीप टाइम प्रोजेक्ट नावाच्या महत्त्वाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. तो प्रयोग २४ एप्रिलला संपला. त्या प्रकल्पात १५ जण, ४० दिवस एका गुहेमध्ये राहिले होते. बारा वेगवेगळ्या क्षेत्रांतील तीस माणसं गुहेबाहेरून त्यांचं निरीक्षण करीत होती. घड्याळ किंवा बाहेरील दिवस-रात्र, वेळ दाखविण्याची कोणतीच वस्तू तेथे नव्हती. त्यांच्या मेंदूनं त्यांच्या शरीराच्या कालचक्राप्रमाणे झोपण्याची जाणीव दिली, की ते झोपत; भूक लागण्याची जाणीव दिली, की ते खात-पीत असत.

गुहेमध्ये नैसर्गिक उजेड नव्हता. तापमान दहा अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के राखलेली होती. कृत्रिम उजेड, हवा, जागा आणि संशोधनाचं काम करता येईल अशा सोयी त्यांना उपलब्ध होत्या. प्रकल्प-प्रमुख क्रिस्तियन क्लो यांना वाटलं, की ते आतमध्ये ३० दिवस होते. एकाला तेवीसच दिवस घालवल्याची भावना झाली. जोहान फ्रान्स्वाज दहा किलोमीटर पळण्याचा व्यायाम करायचा. इतर कोणताही विचार न करता, त्या क्षणाचा योग्य वापर करणं, हेच एक आव्हान होतं. या मंडळींचं झोपेचं चक्र, त्यांचं एकमेकांशी असणारं वागणं, बोलणं, या सगळ्यांची संवेदकांमार्फत नोंद होत होती. एक संवेदक तर छोट्या कॅप्सूलमध्ये ठेवून या लोकांनी गिळला होता. कॅप्सूल बाहेर पडेपर्यंत तो शरीराच्या तापमानाची आणि अन्नमार्गातील सूक्ष्म जीवांच्या वैविध्याची नोंद संगणकाकडं पाठवत होता. इलेक्ट्रोएनसेफॅलोग्राम मेंदूच्या नोंदी ठेवत होता. एमआरआय आणि इतर उपकरणानं शरीरातील घडामोडी, हृदयाचं चलनवलन यांची नोंद होत होती.

यातील दहा लोकांची, अजूनही तिथंच राहण्याची तयारी होती. क्रिस्तियन क्लोने कबूल केलं, की हे काम अर्धवट सोडून तसंच बाहेर पडावं, अशी भावनाही अनेकदा झाली होती. २४ एप्रिलला त्यांनी प्रकल्पाच्या संकेतांनुसार, ठरलेल्या शिस्तीनुसार कामं संपवली. ते बाहेर आले. पॅरिसला आल्यावर आधी मेंदूचा एमआरआय काढला. कारण, प्रकल्पाच्या सुरुवातीच्या एमआरआयशी त्याची तुलना करायची होती. यापूर्वी नथानिएल क्लाइटमननी १९३८ मध्ये एका गुहेमध्ये सलग ३२ दिवस काढले होते. फ्रान्समध्ये मिशेल सफ्र यांनी १९६२पासून असे अनेक प्रयोग केले होते. १९७२मध्ये ते टेक्सासच्या गुहेमध्ये सहा महिने राहिले. व्हेरोनिक लग्वें ही १९८८ मध्ये १११ दिवस एकटी गुहेत राहिली होती.

इतक्या मोठ्या प्रमाणावरचा आजपर्यंतचा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगांचं नीट नियोजन करावं लागलं. नोंदी ठेवण्याच्या पद्धतींची काटेकोर आखणी करावी लागली. ऐनवेळेला सुचणाऱ्या प्रयोगांसाठीसुद्धा तरतूद केली होती. जनुकीय नोंदींपासून, वासाबद्दलच्या जाणिवांपर्यंत सुमारे ५० प्रकारच्या नोंदी ठेवल्या. जगायला आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा त्यातून एक समूह म्हणून वेळेची एकतानता जुळवता आली. ठरलेलं काम संपवून ते पुढंसुद्धा चालू ठेवण्याची इच्छा या संशोधकांनी दाखवली.

या प्रयोगातून काही मूलभूत विज्ञानातील पैलू समजतीलच, शिवाय वेगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला मेंदू कसा सज्ज असतो हे कळालं. याचा मानव जातीलाच फायदा होणार आहे. २०२४ पासून पुढं चंद्रावर तळ करणं शक्य होणार आहे. तेव्हा जर माणसांनी तेथे काही काळ राहून प्रयोग करायचं ठरवलं, तर त्यासाठी स्वयंपूर्ण यंत्रणा उभारावी लागेल. तेथे समूहानं काम करण्यासाठी मानवी मेंदूचं, समूहाच्या नातेसंबंधांचं ज्ञान उपयोगी ठरेल. दूरवरच्या अवकाशयात्रा मानवसहित यानानं करताना या माहितीचा उपयोग होईल. तसंच, दूरवरच्या मोहिमांसाठी ‘काळ’ या संकल्पनेचा मानवी मेंदू घालत असलेला मेळ समजायला मदत होईल.

बंदिस्त परिस्थितीतील मोहिमा, पाणबुडीतील प्रकल्प, पाण्याखालच्या प्रयोगशाळा यांच्यामध्ये माणसांनी कामं करण्यासाठी हा अनुभव उपयोगी आहे. विविध प्रसंगी उदा. एकांतवासात, किंवा वाळवंटात हरवून गेल्यावर संपूर्ण संदर्भरहित परिस्थितीत दिशा, वेळ मेंदूला कशी समजून घेता येते; किंवा अशा परिस्थितीत मेंदू गोंधळून जात असेल, तो का; आणि परत मूळ पदावर तो कसकसा येतो, याची चाचपणी या प्रयोगातून झाली.

लष्करी मोहिमांमध्ये अनेकदा उंचीवर, जंगलात, पर्वतराजीत गुप्त मोहिमा घ्याव्या लागतात, त्यासाठी हे ज्ञान उपयोगी पडणार आहे. नेहमीच्या जागेपासून दूर, एकाकी समूहानं काम करताना कार्यक्षमतावाढीसाठी, गटांची पुनर्रचना करण्यासाठी मिळालेल्या ज्ञानानं व्यवस्थापनशास्त्रातील प्रयोगांना नवीन दालन खुलं होईल.अलीकडं माणसांचं मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीच्या शोधात, समूहांचं मोठाल्या प्रकल्पांसाठी विस्थापन होत आहे. तसंच, आव्हानात्मक हवामानात रस्तेबांधणी, बांधकाम प्रकल्प उभारणं यासाठी नेहमीच्या मानवी वस्तीपासून दूर जाऊन काम करायला, या सगळ्या ज्ञानाचा उपयोग होईल.

मेंदू आणि ज्ञानेंद्रियं यांच्याबद्दल नेहमी प्रयोग होतात, तेव्हा कामाच्या वेळा, घरच्या जबाबदाऱ्या, जनसंपर्क अशा अनेक कारणांमुळं असे प्रयोग गुंतागुंतीचे होतात. बरं, संगणकाच्या सहायानं सिम्युलेशन आणि प्रारूपाद्वारे बिनमानवी सहभागातून सैद्धांतिक काम करायचं, तरी त्यासाठी लागणारी माहिती, आकडेवारी प्रत्यक्ष प्रयोगातून निर्माण करावीच लागते. म्हणून प्रत्यक्ष प्रयोग करणं अत्यंत आवश्यक होतं.

डीप टाइम प्रकल्प हा आंतरविद्याशाखीय अभ्यास होता. त्यातून संशोधक तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करीत होते. नवीन परिस्थितीत जेव्हा कोणतेच जुने संदर्भ उपयोगी पडत नाहीत, तेव्हा नैसर्गिक स्थितीत मेंदू मार्ग कसं शोधतो? कोणताही यंत्राचा, ऋतुचक्राचा, उजेडाचा कोणताही संदर्भ नसताना मेंदू वेळ कसकशी समजून घेतो? या वेळेची शरीराच्या चक्राशी सांगड कशी घालतो?

मानव जातीलाच एक आत्मविश्वास मिळवून देणारा हा प्रयोग होता. हे संशोधन इथंच थांबणारं नाही. स्थळ काळाचे संदर्भ हरवल्यावरही दिशा शोधण्याचं मेंदूचं सामर्थ्य समजण्याचं, निरंतर काम आहे. सापेक्षता समजावताना आइन्स्टाईनने एक उदाहरण दिलं होतं. प्रेयसीची वाट बघताना लागलेला वेळ आणि तिच्याबरोबर घालवलेला वेळ हा एकसारखाच असला, तरी तो एकदा जास्त तर एकदा कमी वाटतो. निरपेक्षपणे पाहताना मात्र मूळ प्रश्न बाकी राहतोच. खरी वेळ आणि जाणवणारा वेळ यांच्यात मेळ कसा घालायचा?

(लेखक विज्ञानक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com