मानससूत्र : भावनिक बुद्धी आणि आत्मनिरीक्षण

जगातील अनेक यशस्वी नेते आणि उद्योजक त्यांच्या आयक्यूबरोबरच ईक्यूचाही वापर प्रचंड प्रमाणात यशसंपादनासाठी करतात.
Study
StudySakal

- डाॅ. जयश्री फडणवीस

मानवाला बुद्धीचे वरदान आहे; पण त्याचबरोबर भावनिक बुद्धिमताही सतत विकसित व्हसला हवी, ती का विकसित असावी त्याचीही कारणे पाहिली. जगातील अनेक यशस्वी नेते आणि उद्योजक त्यांच्या आयक्यूबरोबरच ईक्यूचाही वापर प्रचंड प्रमाणात यशसंपादनासाठी करतात.

टेसला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक; पण ते सतत, दिवस-रात्र त्यांच्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. ‘टेसला’चे उत्पादन करीत असताना, प्रत्येक कर्मचाऱ्याची जातीने चौकशी करत.

काम करत असताना जर एखादी दुखापत झाली तर ती का झाली हे जाणव्यास ते काम स्वतः करून बघतात. त्यांची कर्मचाऱ्यांना लिहिलेली पत्रेही अतिशय भावनिक असतात. उदा. ‘मला तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही माझ्या टीमचा एक महत्त्वाचा सदस्य आहात, तुम्हाला दुखापत झाली, तर मला खूप वाईट वाटते, हृदयी अनंत यातना होतात.’

टेसलासारखी अद्ययावत, विजेवर चालणारी गाडी बाजारात कोठी खपेल अशीही शंका व्यावहारिक जगात व्यक्त केली जात होती आणि म्हणूनच आज जेव्हा अमेरिकेत हजारो लोकांनी टेसला गाडी विकत घेतली, तेव्हा त्या प्रत्येक ग्राहकाला ते लिहीत, ‘माझ्यावर व माझ्या कंपनीवर विश्वास ठेवून आपण गाडी घेतली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. गाडी वापरताना अजुनही काही नवीन गोष्टी सुचल्या तर नक्की कळवा, मी त्यावर विचार करीत पुढील उत्पादनात तुमच्या सुचनांचा नक्कीच विचार करीन.’

वरील उदाहरणावरून आपल्याला नक्कीच खात्री पटली असेल, की भावनिक बुद्ध्यांक किती महत्त्वाचा आहे. चला तर मग, छोट्या छोट्या गोष्टींचे वागण्यातील बदल; तसेल आत्मनिरीक्षण करून हे किती सहज शक्य आहे ते बघू या.

1) कोणताही संवाद अथवा कृती करताना करण्यापूर्वी समोरच्या व्यक्ती अथवा टीमवर त्याचा काय परिणाम होईल किंवा त्यांच्या आकलनक्षमतेनुसार ते याचा स्वीकार कशा पद्धतीने करतील, हे आधीच समजून घेतले पाहिजे. ते समजण्याकरीता आपला पूर्वानुभव, आयक्यू; तसेच ईक्यूचा उत्तम समतोल साधता येणे गरजेचे आहे.

2) समोरच्याचे बोलणे आपण नीट ऐकून घेतो का? कोणताही मागचा-पुढचा विचार न करता चटकन् प्रतिक्रिया देतो का? सत्य नेमके काय आहे हे समजून न घेता, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून एखाद्याशी वागतो का? आपल्याशी जर कोणी असे वागले तर काय?... या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा.

3) आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही किंवा एखादी व्यक्ती वागली नाही, तर आपली चिडचिड होते का? ती गोष्ट का मनासारखी नाही झाली, याचे मूळ कारण न शोधता इतरांना दोष देत बसतो का?

4) आपल्याकडून एखादी चूक झाल्यास आपण ती चूक प्रांजळपणे कबूल करतो का? एखाद्याच्या भावना आपल्याकडून दुखावल्या गेल्या, तर आपण त्या व्यक्तीची माफी मागतो का? की सरळ त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू लागतो? त्यांना टाळू लागतो? माफी नक्की मागा- ज्याने आपल्या मनातील अपराधीपणा कमी होतो, ताण-तणावाचे प्रमाण कमी होते. जसे आपण चांगले असतो, तसेच समोरील व्यक्तीही चांगलीच असते, आणि म्हणूनच ती आपल्या आयुष्यात असते. आपलीच माणसे आपल्याला पटकन माफही करतात- कारण त्यांनाही आयुष्यातील चांगले लोक गमवायचे नसतात.

5) कृतज्ञता आणि नम्रता ही भावनिक बुद्धिमत्तेची, आपल्या स्वभावाची अतिशय सुंदर बाजू आहे. ही बाजू आपल्या वैयक्तिक; तसेच व्यावसायिक जीवनात समोरच्याला जाणीवपूर्वक दाखवली पाहिजे, ज्याचा आपल्याला निश्चितच खूप फायदा होतो.

6) समोरच्यांचे दृष्टिकोन, परिस्थिती अथवा गरज आपण प्रामाणिकपणे समजून घेत आहोत हे आपल्या संवादातून, वागण्यातून समोरच्याला जाणवले पाहिजे.

वरील सर्व मुद्द्यांचे आकलन; तसेच आत्मनिरीक्षण जर आपण केले, तर समोरच्यांच्या गरजा; तसेच कौशल्यांची योग्य सांगड घालता येईल. वैयक्तिक; तसेच व्यावसायिक यश सहजगत्या संपादन करता येईल. आपल्या आयक्यूचा तर निश्चितच वापर होईल; पण आपला ईक्यूही (भावनिक बुद्ध्यांक) समृद्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com