मानससूत्र : भय इथले....

जगात अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांच्या शोधांनी संपूर्ण मानवी आयुष्याचा कायापालट झाला, जगणे आनंददायी झाले.
Fear
FearSakal

- डॉ. जयश्री फडणवीस

जगात अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांच्या शोधांनी संपूर्ण मानवी आयुष्याचा कायापालट झाला, जगणे आनंददायी झाले. त्यांच्यापैकीच एक म्हणजे सर थॉमस एडिसन. त्यांनी लावलेला एक जीवनावश्यक शोध विजेचा बल्ब. असे म्हणतात, की हा शोध लावताना त्यांना ९९९ वेळा अपयश आले आणि त्यांचा एक हजारावा प्रयोग यशस्वी ठरला.

कल्पना करा, की जर सर एडिसन येणाऱ्या सततच्या अपयशाने खचून गेले असते, अपयशाची भीती बाळगून खचून प्रयोग करायचे थांबले असते, तर आज आपले काय झाले असते? माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो विचार करा, की रोजच सारी संध्याकाळ मिणमिणत्या पणत्या, कंदिल लावून घरातच बसावे लागले असते! No Late evening Outings! No parties! No fun! आणि हो ‘मोशन पिक्चर कॅमेरा’चाही शोध थॉमस एडिसन यांचाच. (त्यांच्या नावावर १०९३ पेटंट्स आहेत)

हे सर्व सांगण्याचा हेतू इतकाच, की एकदा का आयुष्यात भीतीने घर केले, की आपण संपलोच! अनेक व्यक्तींना सतत कोणत्या ना कोणत्या भीतीने घेरलेले आपण पाहतो. भीतीचे अनेक प्रकार दिसतात.

उंचच उंच इमारतीवरून खाली डोकावण्याची भीती. अनोळखी माणसे अथवा अनोळखी जागेची भीती. बंद खोली अथवा लिफ्टमधून एकटेच जाण्याची भीती. इंजेक्शनची भीती. रक्ताची भीती. अंधाराची भीती. भुताखेतांची भीती आणि सरतेशेवटी मृत्यूची भीती! काही ठिकाणी तर भीतीचे मजेदार चित्रही बघायला मिळते.

पिढयान्‌पिढ्या चालत आलेली भीती. आजी, आई एखादे झुरळ अथवा पाल दिसल्यावर घाबरून भीतीने किंचाळत असेल, तर त्या घरातील मुलीही त्याच पद्धतीने घाबरताना दिसतात. मग घरातील पुरुष एखाद्या शूर-वीराच्या आवेशात झाडू घेउन अवतरताना दिसतो! एखाद्याच्या नवीन बाईकवर बसताना अगदी सहज तोंडातून येते ‘नीट चालवता येते ना? नाही म्हणजे, माझा insurance वापरायची वेळ आणू नकोस!’

खरे म्हणजे भीतीची ही भावना मानवनिर्मित आहे. नवीन जन्माला आलेले बाळ जसजसे मोठे होऊ लागते, तसतसा त्याचा भीतीशी परिचय करून दिला जातो. तोपर्यंत त्याला भीती म्हणजे काय हे माहितच नसते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भीतीचे बीजारोपण केले जाते. सुरवात आईपासून होते. बाळाने एखादी गोष्ट नीट केली नाही, खाल्ले नाही तर आई त्याला लगेच भीती दाखवते, बघ हं! बागुलबुवा येईल! हळूहळू वय वाढू लागते, तसे भीतीचे विविध प्रकार आजूबाजूचे लोक त्या बाळाला दाखवू लागतात.

शाळा- शिक्षकांची भीती, परीक्षेची भीती, तब्येत- डॉक्टरांची भीती, सुरक्षितता - पोलिसांची भीती! म्हणजे ज्यांचा आधार वाटावा त्यांचीच भीती घातली जाते. सर्वांत मोठी भीती म्हणजे ‘लोक काय म्हणतील?’ अशा प्रकारे विविध काल्पनिक भीतींशी ओळख होते आणि मग नकळत कल्पनाविश्वात जाऊन भीती निर्माण करण्याचे कौशल्य वाढीस लागते.

भीती साधारणत: दोन प्रकारात मोडते. एक काल्पनिक, दुसरी वास्तविक. वास्तविक भीतीची काही उदाहरणे बघू या. एखाद्या प्रवासात नदीला पूर आला असेल आणि पुलावरूनही पाणी जात असेल, तर तेथे त्या पुराला घाबरून त्यात गाडी न घालणे.

स्वतःचे व इतरांचेही संरक्षण करणे. तसेच जर कुठे आग लागली असेल, तर तिथेही घाबरून आगीत जाणे टाळायला हवे. सध्या पावसाळी सहली; तसेच ट्रेकिंग करतानाही स्वसुरक्षिततेकरता थोडी भीती बाळगायला हवी. भीतीचा वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावरही दीर्घ व खोल परिणाम होतात.

वैयक्तिक आयुष्यात अनेकदा भीतीमुळे येणारी नवीन संधी नाकारली जाते. एखादी नवीन गोष्ट करून बघण्याचे धाडस केले जात नाही. त्यामुळे आयुष्यात तोचतोपणा येऊन आळशी प्रवृत्ती वाढीस लागते. व्यक्तिमत्त्व विकास खुंटतो.

मानसिक त्रास

खूप खोलवर दडलेल्या भीतीमुळे मानसिक त्रास, चिंता वाटू लागतात. आयुष्यावर एक प्रकारची मरगळ पसरून नैराश्य येऊ लागते. त्याचे परिणाम शरीरावरही दिसू लागतात. रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार जडू लागतात. या सर्वांचा परिणाम कौटुंबिक; तसेच सार्वजनिक नातेसंबंधावरही होऊ लागतो.

ढासळणारा आत्मविश्वास

कोणत्या ना कोणत्या भीतीचे सावट घेऊन वावरत राहिल्यास स्वत:तील आत्मविश्वास ढासळू लागतो. एखादे काम नीट जमेल ना, याविषयी सतत शंका येऊ लागते. स्वतःच्या कर्तृत्वावरील विश्वास उडू लागतो.

निर्णयक्षमतेवर परिणाम

अंतर्मनात दडलेल्या भीतीचा परिणाम समोरच्याला समजून घेण्यावर होतो. पूर्वग्रहदूषित विकारांनी विश्वासार्हता डळमळते. आपलीच नजर गढूळ असल्यास समोरचाचा दृष्टिकोन स्पष्ट दिसत नाही. निर्णय घेणे कठीण जाते.

व्यावसायिक आयुष्यात सतत अपयश येत गेले, तर भिऊन व्यवसायच बंद केला जातो. समूळ कारण शोधले जात नाही. सर्जनशीलता संकुचित होते. कारण नवीन काही करण्याची सतत भीती वाटते आणि मानवी मनाला तर सतत काही तरी नवीन हवे असते. भीतीचा परिणाम संवादकौशल्यावरही झालेला दिसतो. बोलण्याचीच भीती वाटली, तर कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी तो खूप मोठा अडथळा ठरेल.

कोणत्याही गोष्टीची भीती बाळगताना समतोल साधावा लागेल. भीती ही योग्य मात्रेतच असावी. सद्सद्‍बुद्धीचा वापर करून स्वतःला प्रगत; तसेच सुरक्षित ठेवायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com