मानससूत्र : अडथळे असे करू दूर!

महिला उद्योजिका होताना येतात ते काही अडथळे आणि पेलावी लागतात काही आव्हाने. हिलरी क्लिंटन म्हणतात, की ‘कोणतीही टीका गांभीर्याने घ्या.
Women Entrepreneurs
Women Entrepreneurssakal
Summary

महिला उद्योजिका होताना येतात ते काही अडथळे आणि पेलावी लागतात काही आव्हाने. हिलरी क्लिंटन म्हणतात, की ‘कोणतीही टीका गांभीर्याने घ्या.

- डॉ. जयश्री फडणवीस

महिला उद्योजिका होताना येतात ते काही अडथळे आणि पेलावी लागतात काही आव्हाने. हिलरी क्लिंटन म्हणतात, की ‘कोणतीही टीका गांभीर्याने घ्या; पण वैयक्तिक नको- कारण टीकेमधील सत्यता आणि अचूकपणा तपासणे गरजेचे आहे, अन्यथा तिच्याकडे दुर्लक्ष करणेच बरे!’

आणि म्हणूनच प्रत्येक महिलेला (उद्योजिकेला) येणाऱ्या अडचणी; तसेच आव्हाने नीट समजून घेतल्यास त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित करता येईल. नेहमीचेच उद्योग म्हणजे ब्युटीपार्लर, खाद्यपदार्थ; तसेच साड्या, आर्टिफिशियल ज्वेलरी अथवा एखादे बुटीक यांच्या पलीकडे जाऊनही विचार करता येईल. जरा सा हटके!

1) लिंगभावविषयक पूर्वग्रह

तरुण महिला उद्योजिकेला लिंगभावविषयक पूर्वग्रहांना तोंड द्यावे लागते. त्यांना गंभीरपणे घेतले जात नाही. गुंतवणूकदार, ग्राहक किंवा त्यांचे स्वतःचेच कामगारही, ‘ही स्त्री आहे, व्यवसायास लागणारे कष्ट हिला झेपतील का? व्यवसाय वाढवत असताना ठीकठिकाणी करावा लागणारा प्रवास, अनियमित दिनक्रम; तसेच भरपूर वेळ देता येईल का?’ या प्रकारचे संशय व्यक्त करतात.

2) नेटवर्किंग

विविध संस्था, व्यवसायास आवश्यक तज्ज्ञ मार्गदर्शक; तसेच सरकारी योजनांचे पाठबळ या सर्वांचे नेटवर्क आपला व्यवसाय वाढविण्यास आवश्यक आहे. हे व्यवसायिक जाळे समृद्ध नसल्यास आवश्यक रिसोर्सेस उपलब्ध करणे कठीण होते.

3) कौटुंबिक जबाबदाऱ्या

महिला उद्योजिका एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते. घरातील लहान मुले, वडीलधारी मंडळी यांचे शारीरिक; तसेच मानसिक संतुलन साधत तिला रोजच तारेवरची कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित प्रवृत्तीचा असतो. स्त्रीने कसे जगावे, काय करावे, काय करू नये या सर्वांचे ठोकताळे पिढ्यान् पिढ्या ठरलेले आहेत.

४) असमान संधी

अनेक क्षेत्रांमध्ये एखादी संधी महिलेला द्यावी की नाही, हे तिच्या सद्य परिस्थितीवरून ठरविले जाते. उदाहरणार्थ, नुकतेच लग्न झाले असल्यास, लगेच वर्षा-दोन वर्षांत गरोदरपण आणि मग बाळाचा जन्म, त्यातून निर्माण होणाऱ्या पुढील जबाबदाऱ्या या सर्वांमुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता; तसेच मोठी गॅप निर्माण होण्याची भीती, अशा प्रकारच्या कारणांमुळे तिच्या व्यवसायात गुंतवणूक करावी की नाही यावरही विचार केला जातो. सर्वांत महत्त्वाचा तो आत्मविश्वास! कधी तो महिला उद्योजिकेला कमी असतो, तर कधी उगाचच जास्त फुगलेला.

एकंदरीतच अशा प्रकारच्या आव्हानांना तोड देत महिला उद्योजिकाला पुढे जावे लागते; पण कोठेही डगमगून न जाता ही आव्हाने पेलण्याची पूर्वतयारी करणे. स्वतःभोवती एक आश्वासक वातावरण निर्माण करणे. सुरवात आपल्या कुटुंबापासून केली, तर उत्तम आधार मिळतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यवसायाची नीट माहिती द्या, रोजच्या रोज उत्तम संवादाच्या माध्यमातून सगळ्यांना त्यात सामावून घ्या. त्यातून तुम्हाला तुमच्या वेळा पाळणे; तसेच अनेक जबाबदाऱ्यांचे वाटप करणे सोपे जाईल. त्याच वेळी थोडासा संयम बाळगून त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यायला वेळ द्या म्हणजे नातेसंबंधातील ताण-तणाव टाळता येतील, गैरसमज होणार नाहीत. प्रत्येकाच्या गरजांचे नीट चर्चा करून समाधानकारक मार्ग काढणे आवश्यक आहे.

आपल्या व्यवसायिक टीमवरही आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्यावर एखादे काम सोपविल्यावर त्यातच तुम्ही Micro management करू नका. छोटे छोटे व्यावसायिक निर्णय घेण्याची त्यांना मुभा द्या; पण ती देताना त्यांना निश्चितच आठवण करून द्या, की ‘घेतलेल्या निर्णयाची जबाबदारीही तुझ्यावरच असेल.’ या पद्धतीने काम करत गेल्यास तुमचाही भार हलका होईल आणि आपल्या व्यवसायाच्या प्रगतीला वेग येईल. त्यासाठी आपल्या व्यवसायात प्रभावी प्रतिनिधी मंडळ तयार करा.

महिला उद्योजिकेला पाहिले, म्हणजे नेहमीच एक विचार मनामध्ये डोकावतो, ‘समाजाचे नाकारणे ती नेहमीच सहन करते, आणि मग एका वेगळ्याच ऊर्जेने, तडफेने स्वतःला सिद्ध करते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com