‘गुण’कारी परसबाग : निसर्ग आपल्या घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Backyard

आयुर्वेद हे खरंतर वेदशास्त्रच. आपल्याला माहीतच आहे, की ‌अथर्ववेदाचं हे उपांग म्हणजेच एक भाग आहे. त्यामुळे हे शास्त्र लिहिलं गेलं म्हणण्यापेक्षा अनुभवातून सांगितलं गेलं.

‘गुण’कारी परसबाग : निसर्ग आपल्या घरी

- डॉ. किरण पाठक

आयुर्वेद हे खरंतर वेदशास्त्रच. आपल्याला माहीतच आहे, की ‌अथर्ववेदाचं हे उपांग म्हणजेच एक भाग आहे. त्यामुळे हे शास्त्र लिहिलं गेलं म्हणण्यापेक्षा अनुभवातून सांगितलं गेलं. त्यात म्हटलं आहे, की मानव ही या विश्वाची अत्यंत लहान प्रतिकृती आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी. अर्थातच सृष्टी आणि मानव या दोघांमध्ये एक अतूट सजीव संबंध आहे. म्हणूनच

माती पाणी उजेड वारा

तूच मिसळशी सर्व पसारा

आभाळच मग ये आकारा

तुझ्या घटांच्या उतरंडीला

नसे अंत हा पार ....

असं माडगूळकरांसारखा द्रष्टा कवी सांगून जातो.

या अतूट सजीव संबंधाचा तोल राखायचा असेल, तर या दोघांचं आरोग्य उत्तम असणं अत्यंत गरजेचं. संपूर्ण वनस्पतीसृष्टीचा तोल हा याचा मूळ पाया. आपण या पायावरच लक्ष केंद्रित करायला हवं. हा पाया जितका भरभक्कम, तितकं निसर्गचक्र निरोगी आणि पर्यायानं आपणही तंदुरुस्त. आपले जितके जास्तीत जास्त हात ही पायाभरणी मजबूत करण्याच्या कामी लागतील, तितके आपण अधिक तंदुरुस्त, मनदुरुस्त आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ याची अनुभूती घेऊ शकणार आहोत.

सुदैवानं आपल्या देशात हवामानाचं वैविध्य आहे. आपल्या देशाच्या निरनिराळ्या राज्यांत निरनिराळ्या वनस्पती सहज वाढू शकतात. केरळात तांदूळ, नारळ, महाराष्ट्रात ज्वारी, कापूस, उत्तर प्रदेशात ऊस, आसाममध्ये चहा, मसाल्याचे पदार्थ, पंजाबमध्ये गहू, हिमालयाच्या कुशीत औषधी वनस्पती अशी प्रत्येक प्रांताप्रांतात विविधता आढळते. जगातील कित्येक देशांमध्ये सहा-सहा महिने बर्फवृष्टी होत असल्यामुळे सृष्टीची ही विविधता तिकडे आढळत नाही, तरीही स्वित्झर्लंडसारख्या देशानं सहा महिने सगळी भूमी बर्फाच्छादित असताना बर्फ वितळल्यानंतर जे काही गवत उगवतं, त्याचा उपयोग करत जनावरांचं संवर्धन करत संपूर्ण मिल्क इंडस्ट्री उभी केली आहे.

दूध, दुधाची पावडर, चॉकलेट्स असे अनेक प्रकार नवनवीन तंत्रज्ञान पद्धतीनं तयार करत जगभर त्यांची विक्री होते. चीनमध्येसुद्धा शिलीन श्वय इथं हबे प्रोव्हिन्स (Hubae province) या प्रांतात एक लाख तीस हजार झाडे ‘क्यू आर कोड’च्या (QR code shape) आकारात अतिशय काळजीपूर्वक वाढवली आहेत. (ऑक्सी पार्कच म्हणा ना!) निसर्ग आणि तंत्रज्ञानाची ही अफलातूनच सांगड म्हणायची. हे लक्षात घेत आपल्याकडे दर दहा कोसांवर मातीत उगवून येणाऱ्या या संजीवक वनस्पतींची लागवड आणि जोपासना आपण केलीच पाहिजे. तरच हा देश आणखीन सुजलाम सुफलाम होईल. आपल्याला नाही असं वाटत? चला तर याची सुरुवात अगदी आपल्या बाल्कनीतल्या बगीचापासून करूयात.

टॅग्स :saptarang