
खेळातलं वैविध्य, आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लीलया गोल नोंदवण्याची क्षमता यामुळे दिएगो मॅराडोना फुटबॉलच्या विश्र्वात वेगळाच खेळाडू म्हणून ओळखला जायचा. अर्जेटिना या छोट्या देशाचं नाव फुटबॉलच्या विश्वात त्यानं चमकत ठेवलं. या मोठ्या खेळाडूंचं २५ नोव्हेंबरला निधन झालं. त्याच्या झंझावाती कारकिर्दीचा वेध....
खेळातलं वैविध्य, आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लीलया गोल नोंदवण्याची क्षमता यामुळे दिएगो मॅराडोना फुटबॉलच्या विश्र्वात वेगळाच खेळाडू म्हणून ओळखला जायचा. अर्जेटिना या छोट्या देशाचं नाव फुटबॉलच्या विश्वात त्यानं चमकत ठेवलं. या मोठ्या खेळाडूंचं २५ नोव्हेंबरला निधन झालं. त्याच्या झंझावाती कारकिर्दीचा वेध....
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लोहचुंबकाला चिकटलेले लोहकण त्याच्यापासून दूर करणे खूप कठीण काम असते, त्याप्रमाणे पायाला जणू काही फुटबॉलचा चेंडू चिकटलाच असावा असे त्या खेळावर जबरदस्त प्रभुत्व असलेले आणि विलक्षण लोकप्रियता मिळविलेले धडाकेबाज आणि किमयागार खेळाडू दिएगो मॅराडोना यांचं नुकतेच निधन झाले. जबरदस्त पदलालित्य, चेंडूवर हुकमी नियंत्रण, स्वतः गोल करणार किंवा सहकाऱ्याला गोल करण्यासाठी उद्युक्त करणार अशी त्यांची ख्याती होती. भलेही मादक द्रव्य आणि आणि उत्तेजकाचे सेवन यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली गेली असेल तरीही दोनशेहून अधिक देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळातील जादूगार म्हणूनच ते सदैव स्मरणात राहतील.
खेळाडू किती ज्येष्ठ असले तरी त्यांना आपण मित्रत्वाच्या नात्यानंच एकेरी संबोधतो, त्यामुळं आपल्याला त्यांच्याशी एक मैत्र जोपासता येतं. त्यामुळं माझ्या या लेखात त्यांचा उल्लेख एकेरीच केला आहे. अतिशय गरिबीतून आणि वेगवेगळ्या संघर्षमय परिस्थितीतही फुटबॉलमधली समृद्ध कारकीर्द मॅराडोना यानं घडविली. खेळाशी आणि देशाशी एकनिष्ठ असलेल्या या खेळाडूनं अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देण्याचं स्वप्न साकार केले पण त्याच बरोबर आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हजारो खेळाडूंना या खेळातच करिअर करण्याची प्रेरणा दिली.
मुलखावेगळे बालक!
मॅराडोना जन्मापासूनच मुलखावेगळा बालक समजला जातो. त्याच्या आई-वडिलांना चार मुली झाल्यानंतर झालेला हा पहिला मुलगा होता. लुनास येथील ज्या रुग्णालयात म्हणजे १९६० मध्ये ३० ऑक्टोबरला त्याचा जन्म झाला त्यादिवशी या रुग्णालयात पहिल्यांदा अकरा मुली जन्माला आल्या आणि त्यानंतर हा मुलगा जन्माला आला.
बालपणापासूनच फुटबॉलचा ध्यास
मॅराडोना याला बालपणापासूनच फुटबॉलचा ध्यास लागला होता असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. अगदी दीड-दोन वर्षांचा असल्यापासूनच तो कागदाचे गोळे करून ते पायाने मारीत असे. त्याचे हे कौशल्य पाहून त्याच्या काकांनी त्याला फुटबॉलचा छोटा चेंडू भेट दिला आणि तेथूनच खऱ्या अर्थानं मॅराडोना फुटबॉलशी जोडला गेला. पाय, खांदा आणि डोक्याच्या साहाय्याने चेंडू खेळवत राहणे हा त्याचा आवडता छंद होता. एकदा रस्त्याने असा चेंडू खेळवत जात असताना तो चेंडूसह एका गटारात पडला. अगदी गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत तो चेंडू काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे ओरडणे ऐकून त्याचे काका धावले आणि त्यांनी मॅराडोना याला गटाराबाहेर काढले.
तेव्हादेखील त्याच्या हातात चेंडू होता. फुटबॉलवरील त्याचे हे प्रेम पाहून त्याच्या काकांनी त्याला या खेळात करिअर करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. मॅराडोना याला चार बहिणी आणि तीन भाऊ होते. या सर्वांचे पालन-पोषण व्यवस्थितपणे करण्यासारखी त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे त्याला फुटबॉलसाठी प्रशिक्षण शिबिरात पाठवण्यासाठी पालक उत्सुक नव्हते. मात्र त्याच्या दोन-तीन मित्रांच्या आग्रहाखातर तो शिबिराच्या चाचणीसाठी गेला. या शिबिराचे प्रशिक्षक फ्रान्सिस्को कॉने॔जो यांच्या चाणाक्ष नजरेतून त्याचे कौशल्य सुटले नाही. या मुलाला जर योग्य प्रशिक्षण दिले तर तो मोठा खेळाडू होऊ शकतो हे लक्षात घेऊनच त्यांनी त्याला सर्व कौशल्य शिकविले.
करिअरची मुहूर्तमेढ रोवली
मॅराडोना याला आठव्या वर्षीच लास सेबोलीटस ( दी लिटील ओनियन) या संघाकडून कनिष्ठ गटाच्या स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनं केलं नसतं तर नवलच. त्याच्या अप्रतिम कौशल्याच्या जोरावर त्याच्या संघानं सलग १३६ सामने जिंकताना राष्ट्रीय स्तरावर विजेतेपदही पटकावलं. तिथंच त्याच्या करिअरची मुहूर्तमेढ रोवली गेली. बारा वर्षांचा असतानाच त्याला अॅस्ट्रेला रोझा या संघाकडून प्रथम श्रेणी स्पर्धांसाठी संधी मिळाली. या संघाकडूनही त्याने अनेक स्पर्धा गाजविल्या. सामन्यांमधील विश्रांतीच्या वेळी तो गुडघ्यावर, पायावर आणि डोक्यावर चेंडू वेगवेगळ्या प्रकारे उडवीत असे. त्याची शैली पाहून अर्जेंटिना ज्युनियर्स क्लबने त्याच्या बरोबर करार केला. या संघाकडून सोळाव्या वर्षी त्याला व्यावसायिक फुटबॉलचे क्षेत्रही खऱ्या अर्थाने खुले झाले. मग त्यानं मागे पाहिलेच नाही.
१९७६ ते १९९७ या २१ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यानं जवळजवळ पाचशे सामने खेळले आणि अडीचशेहून अधिक गोल नोंदविले. त्यामध्ये त्यानं अर्जेंटिना ज्युनियर्स, बोका ज्युनियर्स, बासि॑लोना, नापोली आदी नामवंत संघांकडून प्रतिनिधित्व केले. एखाद्या क्लबकडून खेळण्याचा ध्यास घेतला की त्याच संघाकडून तो खेळत असे. दुसऱ्या एखाद्या क्लबने जास्त मानधन देऊन करार करण्याचा प्रस्ताव ठेवला तरी तो असा प्रस्ताव धुडकावून लावत असे. त्याच्या दृष्टीने संघनिष्ठा अधिक महत्त्वाची असे.
चतुरस्र खेळाडू
जेमतेम साडेपाच फूट उंच असलेल्या या खेळाडूकडं सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी असणारी विविधता होती. चेंडूवरील नियंत्रण आणि ड्रिपलिंगचे कौशल्य पाहून भलेभले खेळाडू आणि प्रशिक्षकही आश्चर्यचकित होत असत. प्रतिस्पर्धी खेळाडूंना बुचकळ्यात टाकून स्वतः गोल मारण्याची किंवा सहकारी खेळाडूला पास देण्याची त्याची शैली अतुलनीय होती. गोल करण्यासाठी आवश्यक असणारी अचूकता, कल्पकता आणि नियोजन याबाबत त्याचा कोणी हात धरू शकत नव्हता. तो जरी मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू ओळखला जात असला तरी तितक्याच चपळाईने बचाव करण्याची हुकमत त्याच्याकडे होती. डाव्या पायाने चेंडू तटविण्याची त्याची शैली होती. तरीही बऱ्याच वेळेला तो उजव्या बाजूने प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करीत असे.
रिव्हर्स क्रॉस पद्धतीने पास देत प्रतिस्पर्धी बचाव रक्षकांना तो हतबल करीत असे. फ्रीकिक, पेनल्टी किकद्वारे अचूक गोल करण्यामध्ये तो अतिशय तरबेज. सरावाचे वेळी तो याच तंत्रावर अधिक भर देत असे. जरी त्याच्याकडे सर्वोत्तम खेळाडू होण्याची नैसर्गिक शैली होती तरीही तांत्रिकदृष्ट्या आपण परिपूर्ण असले पाहिजे असा त्याचा कटाक्ष असे.
उत्कृष्ट नेतृत्वशैली
अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघांचा कर्णधार म्हणून त्यानं आपला ठसा उमटवला होता. सहकार्यांमध्ये आत्मविश्वास, समन्वय निर्माण करणे, खेळाडूंना धीर देणे, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत त्या सोडवण्यास प्राधान्य देणे या त्याच्या गुणांमुळे सहकाऱ्यांना तो प्रत्यक्ष मैदानावरील प्रशिक्षकच वाटत असे.
विश्वजेतेपदाचे स्वप्न साकारले
मॅराडोना यानं १९८२ च्या विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केलं. या स्पर्धेत त्याला आणि त्याच्या संघास फारसे यश मिळाले नाही. मात्र या स्पर्धेतील अनुभव त्याला १९८६ च्या विश्वचषकासाठी उपयुक्त ठरला. या स्पर्धेत त्याने आपल्या संघाला एक हाती विजेतेपद मिळवून दिले असेच म्हणावे लागेल. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात पूर्णवेळ तो मैदानावर खेळत होता. यावरून त्याची जिद्द शारीरिक क्षमता आणि मानसिक कणखरपणा सिद्ध होतो. त्यानं या स्पर्धेत पाच गोल केले आणि आपल्या सहकाऱ्यांना गोल करण्यासाठी मदत केली. सतराव्या वर्षी प्रसार माध्यमांना मुलाखत देताना त्याने विश्वविजेतेपदाच्या स्वप्न साकारण्याचे ध्येय असल्याचे सांगितले होते. हे स्वप्न त्याने मेक्सिकोत झालेल्या स्पर्धेत साकारले.
वादग्रस्त ऐतिहासिक गोल
या स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत त्याने पहिला गोल चक्क हाताने चेंडू मारत केला. निमिषार्धात त्याने केलेला हा गोल पंचांनी देखील मान्य केला. हा गोल "हॅन्ड ऑफ द गॉड" म्हणून विश्वचषकाच्या इतिहासात अजरामर ठरला. कालांतरानं त्यानं आपली ही चूक मान्य केली पण तोपर्यंत स्पर्धाही पार पडली होती. हा गोल झाल्यानंतर त्याने पाठोपाठ केलेला गोल शतकातील सर्वोत्तम गोल म्हणून नोंदविला गेला. स्वतःच्या मैदानात आलेला चेंडू त्याने प्रतिस्पर्धी संघातील गोलरक्षकासह सहा खेळाडूंना चकवित केला होता. त्याच्या या अप्रतिम गोलामुळेच त्याच्या पहिल्या चुकीवर नकळत पांघरूण घातले गेले. त्यानंतर उपांत्य फेरीत बेल्जियमविरुद्ध आणि अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीविरुद्ध संघास विजय मिळवून देण्यातही त्याचा सिंहाचा वाटा होता.
विजेतेपद हुकले
विश्वविजेतेपद मिळवण्यापेक्षाही ते टिकवणे अधिक कष्टप्रद असते. १९९० मध्ये पुन्हा मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. घोट्याच्या दुखापतीमुळे मॅराडोनाला अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. तरीही विश्व उपविजेतेपद हीदेखील त्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामगिरी होती. १९९४ च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी उत्तेजक चाचणी तो दोषी आढळला आणि तेथूनच त्याची विश्वचषकाची कारकीर्द संपुष्टात आली.
प्रतिमेला कलंक
खेळाडू कितीही कीर्तीच्या शिखरावर असला तरीही एखादी चूक त्याच्या प्रतिमेला डाग देणारीच ठरते. मॅराडोनाबाबत असेच घडले. कीर्तीच्या शिखराकडे वाटचाल करत असतानाच त्याला कोकेन या मादक द्रव्याचे व्यसन घडले. खरंतर झटपट यश मिळवण्यासाठी अनेक खेळाडू उत्तेजक आता शॉर्टकट मार्ग अवलंबतात तसा मार्ग निवडण्याची त्याला आवश्यकताही नव्हती तरीही ही त्याने १९९४ च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी हा मार्ग निवडला आणि त्याच्या दिमाखदार कारकिर्दीला कायमस्वरूपी कलंक लागला गेला.
हजार गोलांचा सम्राट म्हणून पेले यांची ख्याती आहे. तडाखेबाज आक्रमक खेळाडू म्हणून लिओनेल मेसी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांना तेजोवलय प्राप्त झाले. मादक द्रव्यांपासून दूर असलेल्या श्रेष्ठ खेळाडूंच्या पंक्तीत मॅराडोनाला स्थान नसले तरीही प्रतिकूल परिस्थितीला आत्मविश्वासाने आणि जिद्दीने सामोरे जात फुटबॉल सारख्या लोकप्रिय खेळात, लोकप्रियतेचे शिखर गाठता येते हेच त्याने दाखवून दिले. हीच त्याची ख्याती सदैव स्मरणात राहील.
मॅराडोनाला मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार
आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कारकिर्दीत ४९१ सामन्यांमध्ये २५९ गोल. अर्जेंटिनाच्या २० वर्षाखालील संघाकडून खेळताना पंधरा सामन्यांमध्ये आठ गोल तर वरिष्ठ संघाकडून ९१ सामन्यांमध्ये ३४ गोल. कर्णधार म्हणून १९८६ मध्ये अर्जेंटिना ला विश्वचषक विजेतेपद तर १९९० मध्ये उपविजेतेपद. पुन्हा १९९४ मध्ये कर्णधारपद. संघास पाचवे स्थान.
Edited By - Prashant Patil