फ्रेंच साहित्य : शक्यतांचा ध्यास नि वेध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

books Les bienveillantes and dora burder

सुरुवात कुठून आणि कुणापासून करावी? ‘कन्टेम्पररी’ हा शब्द गोंधळ निर्माण करणारा वाटतो; कारण, सर्वसामान्यपणे त्याचा अर्थ एकाच काळात/कालखंडात जगणाऱ्या व्यक्ती, प्राणी होय.

फ्रेंच साहित्य : शक्यतांचा ध्यास नि वेध!

- डॉ. मिलिंद डोंगरे milyadon1681@gmail.com

कन्टेम्पररी (Contemporary) फ्रेंच साहित्य म्हटलं की प्रश्न पडतो,

सुरुवात कुठून आणि कुणापासून करावी? ‘कन्टेम्पररी’ हा शब्द गोंधळ निर्माण करणारा वाटतो; कारण, सर्वसामान्यपणे त्याचा अर्थ एकाच काळात/कालखंडात जगणाऱ्या व्यक्ती, प्राणी होय. मग, आज आपण २०२२ मध्ये जगत असलो तरी आपण सर्वच समकालीन आहोत का? त्याचं उत्तर नकारार्थी वाटतं. कारण, एकाच काळात जगूनही आपण आपलं आयुष्य वेगवेगळ्या जीवनपद्धतीनुसार जगत असतो, तसंच आपल्या व्यवहाराचं पृथक्करण विभिन्न कालखंडांनुसार झालेलं असतं.

साहजिकच ‘समकालीन’ या शब्दाला वेगळा अर्थ देण्याची गरज भासते. इटालियन विचारवंत अगम्बेन यांच्या उक्तीचा आधार घ्यायचा तर ते म्हणतात, ‘समकालीनचा अर्थ एका विशिष्ट काळात राहूनही त्या काळाच्या बाहेरून (किंवा तो काळ अंतरावर ठेवून) विचार करणाऱ्या व्यक्ती/कृती.’ अशा व्यक्ती/कृती केवळ त्यांच्या काळाच्या प्रगतीच्या दीपस्तंभाभोवतीच घुटमळत न राहता त्यातील काळोखालाही बोलतं करतात. या अर्थी, गेल्या काही दशकांतल्या ‘समकालीन’ फ्रेंच साहित्यकृतींचा आढावा घेऊ या.

दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासून साम्राज्यवादाविरुद्ध आणि दडपशाहीविरुद्ध अनेक लेखक, विचारवंत आपले विचार मांडत होतेच. फ्रेंच वेस्ट इंडीजमधील मार्टिनिकन फ्रांट्झ फॅनॉन व अमे सेजर, सेनेगलचे लिओपोल्ड सेनघोर, सार्त्र यांनी फ्रेंच साम्राज्याविरुद्ध घेतलेल्या भूमिका महत्त्वाच्या आहेतच. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश, तसंच फ्रेंच साम्राज्याला त्यांच्या वसाहतींमधून माघार घ्यावी लागली व तिथं नवीन राज्ये उदयास आली. अशा देशांमधून नवीन आव्हानांना भिडणारं लेखन-चिंतन सुरू झालं. देशांना नवीन संघर्षांना सामोरं जावं लागणार होतं, याचे पडसाद साहित्यात पडलेले दिसतात, अगदी एकविसाव्या शतकातही!

फॅनॉननं वर्तवलेल्या नववसाहतवादनुसार, नवीन सत्ताधारी अभिजनांच्या हातून गरीब लोकांचं खच्चीकरण होण्याची शक्यता आणि कल्याणकारी राज्यांची व्यवस्था पूर्णपणे भांडवलशाहीकडे झुकणारी बैठक तत्कालीन वाटते.

त्याचप्रमाणे, सेनेगलचे सेमबेने उस्मान यांनी लिहिलेल्या ‘जाला’ (१९७३) (Xala) व अहमदू कुरूमा यांनी लिहिलेल्या ‘ले सोलंय देज ऐदेपोंदान्स’ (१९६८) (les Soleils des indépendances), या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये स्वातंत्र्याशी निगडित अनेक समस्यांचं विश्लेषण आणि विवेचन आढळतं. उस्मान यांच्या लेखनात परदेशी बाजारपेठा, परदेशी भांडवल यांच्या हव्यासापोटी देशातील निसर्गाचे व इतर संपत्तीचे केलेले गैरव्यवहार, तसंच कर्जबाजारी होणारी पात्रं दिसतात. याच विषयाशी निगडित गाएल फायची ‘पती पेई’ (२०१६) (Petit Pays) ही कादंबरी वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. या कादंबरीत लेखक त्याच्या आजोळच्या आफ्रिकेतील बुरुंदीच्या - आठवणींना उजाळा देतो. लेखकाच्या मनात घर करणाऱ्या ‘छोट्याशा देशा’तील - हुतू व तुत्सी या जमातींमधील हिंसाचाराचं वर्णन वाचकाला सुन्न करतं. माणसानं केलेल्या अघोरी कृत्यांचा निषेध साहित्यकृती करतात, तसंच आपल्यातील अमानवी विकृतींची आठवणही साहित्याद्वारे करून दिली जाताना दिसते.

एकीकडे नवीन देशांचे इतिहास, रीती-रिवाज, संस्कृती या बाबी चर्चिल्या जात असताना, फ्रान्समध्ये दुसरं महायुद्ध आणि ज्यूंचा नरसंहार या विषयांवर बरंच लिहिलं जात होतं आणि अजूनही लिहिलं जात आहे! भारतीय म्हणून आपल्याला त्यातून शिकवण घेण्यासारखी आहे.

आजच्या घडीलासुद्धा दुसरं महायुद्ध, ज्यूविरोध हे विषय फ्रेंच साहित्यात हाताळले जात आहेत. नोबेल पारितोषिकविजेते पॅट्रिक मोंदिआनो हे ज्यूंचा मत्सर, दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी, अपराधीपणा आणि युद्धानंतर बदललेला फ्रान्स हे विषय हाताळतात. जर्मन सैन्यानं पॅरिस काबीज केलेल्या काळात डोरा ब्रुडर नावाची एक पंधरावर्षीय मुलगी बेपत्ता होते. त्या मुलीचा शोध घेणारी ‘डोरा ब्रुडर’ (१९९७) ही कादंबरी वाचकाला, न लिहिलेल्या इतिहासाची, जणू साक्ष देत राहते. याच विषयावर जोनाथन लिट्टेल यांची ‘ले बियांव्योन्त’ (२००६) Les bienveillantes या बेस्टसेलर कादंबरीचा उल्लेख करावासा वाटतो.

विशेष म्हणजे, हे पुस्तक वेगळ्या भिंगातून लिहिलं गेलं आहे! या कादंबरीचा नायक जर्मन फोर्ससमध्ये कार्यरत असून त्यानं केलेल्या कत्तलींचा आलेख या पुस्तकात येतो.

सन १९५० नंतरच्या काळात फ्रान्समध्ये प्रभावशाली सैद्धान्तिक लेखन झालं. मार्क्सवाद, स्त्रीवाद, सायकोॲनॅलिसिस, डीकन्स्ट्रक्शन अशा अनेक विषयांवर विपुल लेखन झालं. फ्रान्समधील स्त्रीवादी चळवळीला लूस इरिगॅरी, जुलिया

क्रिस्टिवहा, एलिसबेथ बादिंते यांचं योगदान लाभलं, त्याचप्रमाणे अनेक लेखिकांनी स्त्रीचे प्रश्न, पुरुषसत्ता, धर्मातून किंवा भाषेतून निर्माण होणाऱ्या समस्या अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. एक विशेष उल्लेख फ्रँको-अल्जीरियन लेखिका आसिया जेबार यांचा करावासा वाटतो. आपल्या अनेक कादंबऱ्यांमधून (उदाहरणार्थ - वास्त ए ला प्रिजों (२००२) (Vasteest la prison) व फाम दालजे दों लर अप्पारतमो (Femmes d’alger dansleur appartement) (२००४)) त्यांनी अल्जीरियातील स्त्रियांचे प्रश्न तर जगासमोर मांडलेच; पण त्याचबरोबर तिथल्या बदलत्या राजकीय स्थित्यंतराचं आणि त्यातून उद्भवणाऱ्या पेचप्रसंगाचं अवधानही सोडलं नाही. सन १९९० च्या दरम्यान अल्जीरियातील इस्लामी मूलतत्त्ववादी

घटकांना खतपाणी मिळाल्यावर लेखक-विचारवंत-पत्रकार यांच्यावर हल्ले झाले, खूनही झाले. कामू, देरिदा यांच्यासारखे प्रभावशाली विचारवंत लाभलेल्या आणि मुक्त विचारांचा वारसा असलेल्या एके काळच्या अल्जीरियाला अवकळा आली.

अरबी समाजात ‘ब्लॉ’ला- पांढऱ्या रंगाला - सुतकाचं प्रतीक मानलं जातं, तसंच कोणत्याही लेखकाला कोरं पान हे भेडसावणारं असतंच. मृत्यूला संबोधणारं ‘ल ब्लॉ द अल्जेरी’ (२००२) (Le blanc de l’Algérie) हे पुस्तक विचारांवर केलेल्या हिंसेचा तीव्र निषेध करतं. स्त्रीवादी कादंबरीलेखनात फातु दिओम, मारीज काँदे, एलेन सिक्सु यांसारख्या लेखिका वंश-देश-लिंग-वर्ण इत्यादी स्तरांवर विश्लेषण करतात. जेबार यांचा उल्लेख एवढ्यासाठी केला की, त्यांचं अल्जीरियन असणं हे फ्रेंच भाषेला मिळालेलं वैभव आहे, तसंच त्यांच्या अल्जीरिया-कनेक्शनमुळे, मला फ्रान्समधल्या काही समाजघटकांची इथं नोंद करावीशी वाटते. ऐंशीच्या दशकात दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकी वसाहतीतून नोकरीच्या शोधात आलेल्या अनेक कामगारांच्या/मजुरांच्या आयुष्यावर लेखन झालं. अल्जीरिया, मोरोक्को, ट्युनिशियातून आलेल्या लोकांच्या तिसऱ्या-चौथ्या पिढ्यांनी आपलं आयुष्य, व्यथा मांडायचा प्रयत्न गेल्या दोन दशकांत केलेला दिसतो. यासंदर्भात, पॅरिस व इतर काही शहरांच्या उपनगरातील जीवन प्रस्तुत करून ‘ला एन’ (१९९५) La Haine आणि ‘बोल्यू’ (२००४) Banlieue या दोन चित्रपटांनी फ्रान्समध्ये खळबळ उडवली. अशा समाजघटकांचं अस्तित्व चित्रपटांतून आणि साहित्यकृतीतून अधोरेखित होत आहे, हे विशेष.

आज माणसाला आलेल्या एकटेपणाचा, तसंच ‘स्वतः’च्या विविध संरचनात्मक प्रक्रियांचा शोध व पश्चिम युरोपात प्रस्थापित झालेल्या चंगळवादी संस्कृतीवर बोट ठेवणारं लेखन मिशेल उएल्बेक करतात. जागतिकीकरणाच्या विळख्यात गुरफटलेल्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या समाजावर, त्यातील मानवी संबंधांवर, कलेवर, तिच्या स्थानावर, ऱ्हास पावलेल्या संस्कृतीवर अशा एक ना अनेक स्तरांवर उएल्बेक आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या ‘ला कार्त ए ल टेरितत्वार’ (२०१०) या कादंबरीला त्या वर्षीचा गोंकुर पुरस्कार मिळाला. फ्रेंच समाजातील नैतिक ऱ्हास, बदलती मूल्यं, समाजातील विविध विषमता, नवभांडवलवादामुळे निर्माण होणारे नानाविध प्रश्न यांचं सादरीकरण आणि विचारमंथन साहित्यकृतीतून झालेलं दिसतं. फ्रेंच साहित्यकृतींमध्ये ‘आपल्या’कडच्या काही समस्यांचं निदान होऊ शकेल, अशा शक्यतांचा ध्यास घेणं आवश्यक वाटतं.

(डॉ. मिलिंद डोंगरे यांनी दिल्लीतील ‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी’त (जेएनयू) फ्रेंच भाषेत पीएच.डी. केली आहे. सध्या ते कारैकाल (पुड्डुचेरी) इथल्या ‘अवैयार गव्हर्नमेंट कॉलेज’मध्ये फ्रेंच शिकवतात.)

Web Title: Dr Milind Dongare Writes Books Les Bienveillantes And Dora Burder

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bookssaptarang
go to top