"मराठी'चे समकालीन वास्तव - भाग 2 

डॉ. नंदकुमार मोरे 
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

आपण आपली भाषा टिकवून ठेवली, वाढवली तर जगाला आपली स्वतंत्र दखल घ्यावीच लागणार आहे. भाषेत आज अनेक चांगल्या घडामोडी घडताहेत. साहित्यक्षेत्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अनेक सहित्य संमेलने भरवली जात आहेत. पंढरपूरला दरवर्षी सुमारे वीसपंचवीस लाख वारकरी आषाढीएकादशीला "ग्यानबा-तुकाराम' असा जप करीत मराठीतील भाषिक आणि वाङ्‌मयीन दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या कवितेचाच सन्मान करीत आहे. ही वारीच आता मराठी संस्कृतीची ओळख झाली आहे. 

मराठीच्या संदर्भात 1960 नंतरच बोलीभाषांना साहित्यक्षेत्रात स्थान देण्यात आलेले होते. एकरेषीय भाषावापराला सर्वार्थाने धक्का देण्याचे काम स्वातंत्र्योत्तर काळात सर्वप्रथम अनियतकालिकांनी केले. प्रस्तापित माध्यमांमध्ये व्यवहारभाषेला स्थान नव्हते. अलीकडे माध्यमांनीही बोलीभाषेविषयीचे दृष्टिकोन बदलले आहेत. लघुनियतकालिकांच्या चळवळीतून अनेक वाङ्‌मयीन संकेतांप्रमाणे साहित्यातील विशिष्ट वर्गाच्या भाषिक वर्चस्वालाही आव्हान दिले गेले. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रातील ही एक महत्त्वाची चळवळ होती. पुढे 1960 नंतरच्या साहित्यप्रवाहामध्ये अतिशय गडद अशी मुद्रा दलित साहित्याच्या चळवळीने उमटवली. गावकुसाबाहेरील उपेक्षित जीवनाचा अविष्कार जिवंतपणे त्यांच्या त्यांच्या बोलीत होऊ लागला. या चळवळीची आक्रमकता, झपाटलेपण आणि वेग मराठी साहित्यवर्तुळालाच हादरे देणारा होता. अनेक अलक्षित समाजांचे जगणे त्यांच्या भाषेसह अविष्कृत झाल्याने मराठी भाषा-साहित्य समृद्ध बनले. मराठीची अनेक रूपं समोर येऊ लागली. 

ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा उदय 
दलित साहित्याबरोबरच सत्तरच्या दशकात ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा उदय झाला. या चळवळीमुळे खेड्यातील बहुजन समाजातील नवशिक्षित तरूण लिहिते झाले. हे लेखक ग्रामीण भागातील विविध जाती-जमातीतील होते. त्यांनी व्यापक असे ग्रामीण जीवन आणि तेथील जीवनजाणिवा, आपली भाषा लेखनाचा विषय केला. त्यांच्या लेखनातून त्या त्या परिसरातील बोलीभाषा प्रकाशात येऊ लागली. भाषावापराचे हे भान लघुनियतकालिकांच्या चळवळीने बिंबवले होते. या नव्या भाषाभानामुळे वैशिष्ट्यपूर्ण असे विविधांगी अनुभवविश्व त्या त्या प्रदेशातील भाषेतून व्यक्त होऊ लागल्याने या साहित्याला एक परिमाण प्राप्त झाले. विविध जाती- जमातीचे आणि वर्गातील लेखक हे या चळवळीचे विशेष आहे. ही चळवळ सामाजिक आणि सांस्कृतिक या दोन्ही दृष्टीने साहित्यव्यवहाराकडे पाहत होती. त्यामुळे ग्रामवास्तवातील अलक्षित गोष्टी आणि अनुभव सहित्याचा विषय बनले. हे साहित्य वास्तववादी, नव्या बदलत्या खेड्याची स्पंदने आणि आपले अनुभव प्रामाणिकपणे मांडू लागले. या साहित्यचळवळीने मराठी साहित्य संस्कृतीचे केंद्र पुण्या-मुंबई बाहेर नेले. हे या चळवळीचे मोठे श्रेय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नवलेखक या चळवळीशी जोडून घेऊ लागले. छोटी छोटी साहित्य संमेलने, नवलेखकांच्या कार्यशाळा, शिबिरे आयोजित करून नव्या लेखकांना दिशा देण्याचे काम या चळवळीने केले. त्यामुळे या चळवळीतून निर्माण झालेल्या साहित्यातून महाराष्ट्रातील सर्वच प्रदेशातील बदलती ग्रामसंस्कृती, तेथील लोकांचे भावविश्व, प्रदेशनिहाय बदलणारे प्रश्‍न, त्या त्या प्रदेशातील भाषेतून अविष्कृत झाले. या साहित्यचळवळीने अनेक महत्त्वाचे लेखक कवी मराठी साहित्याला पर्यायाने भाषेला दिले. या चळवळीतूनच कृषिजन संस्कृतीचे साहित्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. मराठी समाजजीवनातील अलक्षित असे अनेक कोपरे त्यामुळे साहित्याचे विषय झाले. पर्यायाने मराठी साहित्याच्या आणि भाषेच्या कक्षा रूंदावल्या. मराठीच्या धमन्यांमधून नवे रक्त सळसळू लागले. मराठी भाषेतील अनेक सौंदर्यस्थळं, बलस्थानं या साहित्यामुळे अधोरेखित झाली. मराठीचा गोडवा, रसरशीतपणा, जिवंतपणा आणि तिचा समृद्ध शब्दसंग्रह या साहित्यामुळे समोर आला. 

आदिवासी साहित्याची चळवळ 
पुढे दलित, ग्रामीण साहित्याच्या प्रेरणेतून आणि अनुकरणातून आदिवासी साहित्याची चळवळ पुढे आली. आदिवासींपर्यंत शिक्षण पाहोचल्यानंतर त्या समाजातून लिहिणारे पुढे आले. यांचे साहित्य प्रारंभी ढोल, हाकारा, नाहाकंद, तारपा या आदिवासी जीवनाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून प्रकाशित हाऊ लागले. पुढे या चळवळीतून आदिवासी साहित्य संमेलने सुरू झाली. डोंगरदऱ्यात, जंगलात आणि अतिदुर्गम भागात राहून पारंपरिक पद्धतीने आपले जीवन व्यतीत करणारा हा समाज आणि त्यांची भाषा या साहित्यामुळे पुढे आली. या सर्व गोष्टींचा संबंध आजच्या मराठी साहित्याशी आहे. भाषेशी आहे. 

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतरचे साहित्य 
आजचे साहित्य आणि भाषा म्हणून नव्वदनंतरच्या काळाचा विचार करता येईल. 1990 नंतरच्या साहित्याला आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतरचे साहित्य असेही म्हणतो. या साहित्याबाबत सर्वात प्रथम समोर येणारी बाब म्हणजे संख्यात्मक विपुलता होय. नवदोत्तरी काळाचा विचार करता, वसाहती स्थापन करण्यामागे इंग्रजांचा जो हेतू होता; अगदी त्याच हेतूसाठी जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या नावाखाली अधिसत्तावादी गटांनी पुन्हा डोके वर काढलेले दिसते. पाश्‍चात्त्य राष्ट्रांनी येथील भांडवलदारांना हाताशी धरून जागतिकीकरण लादले आहे. वस्तुंचे अतिरिक्त उत्पादन करून त्या वस्तू विकत घेण्यासाठी भारत, चीन यासारख्या देशातील लोकसंख्या पाश्‍चात्त्यांना बाजारपेठ म्हणून हवी होती. या काळात माणसाचे ग्राहकामध्ये रूपांतर केले गेले. ज्यांना हवे होते त्यांनी आपल्यापद्धतीने जागतिकीकरणाचा लाभ घ्यायला सुरुवात केली आहे. परंतु ज्या कष्टकरी, दुर्बल बहुजनांवर हे जागतिकीकरण लादलेले आहे; तो मात्र या प्रवाहात फरफटत, वाहवत चाललेला आहे. ज्या बदलांसाठी कदाचित शतकभर थांबावे लागले असते. ते बदल जागतिकीकरणात पहिल्या दहापंधरा वर्षातच कमालीच्या वेगाने झालेले दिसतात. सर्वच गोष्टींचे बाजारिकरण झाले. जीवनात पैसा केंद्रवर्ती आला. पर्यटन, माध्यमं, मनोरंजन, संगणकक्रांती, स्मार्ट फोन, सोशल मिडिया, जाहिराती, मॉडेलिंग, मार्केटिंग, आयपीएल क्रिकेट, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, बहुराष्ट्रीय कंपन्या, सेझ, तयार आणि घरपोच खाद्यपदार्थ, शितपेय, बंदबाटल्यामधील पाणी, मॉलसंस्कृती असे अनेक बदल वीस पंचवीस वर्षातील आहेत. या बदलांमध्येच महाराष्ट्रात दररोज चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मलबार हिलला अंबानीनी बांधलेल्या शिसमहलाचे गुपित दडले आहे. या अनाकलनीय बदलांचा प्रचंड असा दाब आपल्यावर आहे. या दाबामुळे भारतीय जीवनपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसतात. या बदलाचे पडसाद भाषा आणि साहित्यातून दिसणे अपरिहार्यच आहे. तसे ते दिसू लागले आहेत. 1990 नंतरच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीतून आणि पार्श्वभूमीतून निर्माण झालेले, या काळाच्या जीवनवास्तवाचा वेध घेणारे साहित्य हेच खऱ्या अर्थाने नव्वदनंतरचे साहित्य म्हणून स्वीकारता येईल. या काळातील लेखकांचे दृष्टिकोन एकसारखे नाहीत. त्यामुळे या काळात लिहिलेले सर्वच प्रकारच्या साहित्यामध्ये आशय, अभिव्यक्ती, रूपबंध आणि भाषा या सर्वच पातळ्यांवर वैविध्यता दिसते. 

जवळजवळ बहात्तर देशांमध्ये मराठी माणूस 
आज सुमारे अकरा कोटी लोक मराठी बोलतात. सातवाहन, राष्ट्रकूट आणि मराठी राज्यकर्ते भारतभर राज्य करीत होते. त्यामुळे आत्ताच्या पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमध्येही मराठी लोक राहतात. आपल्या देशाची पस्तीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात महत्त्वाच्या पदांवर काम करतात. एवढेच नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात जवळजवळ बहात्तर देशांमध्ये मराठी माणूस पसरलेला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा विचार म्हणजे ती बोलणाऱ्या या साऱ्या लोकांचा विचार होय. त्यामुळे आज मराठी कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये वापरली जाते. तेथे तिची स्थिती काय आहे. या प्रश्‍नांचा विचार करावा लागतो. एवढ्या लोकांचा आपल्या भाषेशी संबंध कसा येतो हे पाहणेही महत्त्वाचे ठरणारे आहे. इंटरनेटवर फेरफटका मारल्यानंतर हे ठिकठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक मराठीबद्दल कसा विचार करतात, त्यांचे भाषाप्रेम किती आहे. तिच्यासाठी ते काय काय करतात हे पाहायला मिळते. महाराष्ट्रापासून दूरदूर राहणारे अनेक लोक ब्लॉग, स्वत:चे वेब पेज, मराठी संकेतस्थळं, फेसबुक, विकिपेडीया, मराठी ईपेपर, नियतकालिके यांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. आहे त्या ठिकाणी त्यांना पुरेसा पैसा मिळतो. पण जगण्यासाठी केवळ पैसा आवश्‍यक नसतो. आपली भाषाही जगण्यासाठी आवश्‍यक आहे हे भान त्यांना आलेले आहे. त्यातून ते नानाप्रकाचे उपक्रम करताना दिसतात. आपल्या भाषेचे महत्त्व आपल्यापेक्षा त्यांनाच अधिक कळलेले आहे. कारण बाहेर गेल्यानंतर त्यांना भाषेमुळे येणाऱ्या अडचणींचा थेटपणे तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांची भाषिक कुचंबणा ते व्यक्त करताहेत. भाषेपासून तुटलेल्या माणसाचे मन या फेरफटक्‍यातून वाचता येते. 

हिंदीचा वाढता प्रभाव 
सर्वदूर पसरलेल्या मराठी माणसाला जोडणारे दूरदर्शन हे एक साधन आहे. परंतु तेथे वापरली जाणारी मराठी कुणाची भाषा आहे हा मोठा प्रश्‍न आहे. भडक कथानकं, रोमॅंटिक प्रसंग आणि तशीच भाषा हे तेथील मराठीचे वास्तव आहे. तर एफएम सारख्या नव्या मनोरंजनाच्या ठिकाणी प्रवाही नव्हे तर वाहती मराठी वापरली जाते. महानगरातील महाविद्यालयांमधील मुलांची आपापसात गप्पा मारण्याची भाषा तेथे निवेदनाची भाषा म्हणून वापरली जाते. तेथील निवेदकांच्या भाषेची रचना मराठीची वाटत असली तरी; इंग्रजी, हिंदी भाषेतील शब्दांचा वापर अतिरेकी स्वरूपाचा असतो. त्याचबरोबर लहान मुलांसाठी म्हणून बनवलेले ऍनिमेशनपट तसेच कार्टून नेटवर्क, पोगो या वाहिन्यांवर हिंदीभाषेतून मालिका दाखवल्या जातात. त्या शहरी मुलांबरोबर खेड्यापाड्यातील मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. छोटा भीम, टॉम ऍण्ड जेली, ऑगी ऍण्ड कॉक्रोज इत्यादी मालिका उदाहरणादाखल सांगता येतील. या मालिका हिंदी भाषेत प्रसारित होत असल्याने लहान मुलांच्या भाषेमध्ये हिंदी शब्दांचा प्रभाव वाढतो आहे. 

मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला ? 
हिंदी चित्रपटांमुळे हा प्रभाव अगोदरच मराठीवर आहे. परंतु थेट लहान मुलांच्या व्यवहारात या मालिकांमुळे हिंदी शब्दांचे प्राबल्य वाढले आहे. हिंदी चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांची अवस्था फारच चिंताजनक होती. भारतातील चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम आहे. तथापि मराठी चित्रपट आवर्तात सापडणे मराठी भाषेच्या दृष्टीने ठिक नव्हते. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना प्रक्षेपणासाठी चित्रपटगृह उपलब्ध होत नव्हते. कोणी प्रसारणाची जबाबदारी घेत नव्हते. ही अवस्था बघून शासनाने मराठी चित्रपटांना अनुदान देणे सुरू केले. चित्रपटगृहांवर मराठी चित्रपट दाखवण्यासाठी बंधने घातली. अलीकडच्या काही वर्षांत श्वास, नटरंग, टपाल, तानी, फॉन्ड्री असे काही अपवाद वगळता मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला आहे, असे म्हणता येत नाही. त्यामुळे भाषा म्हणून ही गोष्ट क्‍लेशदायक आहे. 

शहरांमधून मराठीची घुसमट 
नाटकांची अवस्थाही वेगळी नाही. मुळात नाट्यव्यवहार खर्चिक आणि सीमित लोकांपुरता चालतो. मराठीत काही प्रायोगिक नाटकं चांगली लिहिली गेली आहेत. त्यांचे प्रयोगही होतात. मराठीचे संवादसामर्थ्य नाटकातून अधोरेखित होत असल्याने मराठी भाषेसाठी नाट्यव्यवहाराच्या कक्षा रुंदावणे आवश्‍यक आहे. नाटकांची चर्चा करताना मराठी भाषेवर लिहिलेले गो. पु. देशपांडे यांचे "म्युझिक सिस्टम' या नाटकाचा येथे उल्लेख करणे आवश्‍यक आहे. हे मराठी भाषेच्या ऱ्हासासंबंधीचे नाटक आहे. हे नाटक प्रायोगिक नाही तर; अतिप्रायोगिक आहे. त्यामुळे लेखकाला काय म्हणायचे आहे ते लवकर उमजत नाही. परंतु या नाटकातून ते महानगरांमधील मराठीविषयी बोलताहेत. कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही देशपांडे लिहितात तशी अवस्था नाही. भाषेला मारक ठरणारे इतर अनेक आवाज भाषेचा कोंडमारा करताहेत, तिला दुबळं बनवताहेत ते मुंबई, नागपूर, पुणे यासारख्या महानगरांमध्ये. त्यामुळे ते म्हणणात ते या शहरांच्या बाबतीत खरेच आहे. या शहरांमधून मराठीची घुसमट आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोतच. 

भाषेचे सामर्थ्य समजू शकणारे मुख्यमंत्री 
भारतातील भाषावैविध्य जसे अभ्यसनीय आहे; तसेच येथील भाषिक राजकारणही अभ्यासाचा विषय आहे. मराठीपुरता विचार केला तर महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून हा विचार नोंदवता येईल. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे भाषेचे सामर्थ्य समजू शकणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, हे मराठीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी भाषा आणि संस्कृतीसाठी अनेक उपक्रम सुरू केले. त्याचे सकारात्कम परिणाम आणि लाभ आपल्याला आजही पाहायला मिळाताहेत. परंतु त्यांच्यानंतर भाषेसाठी काम करणारे नेतृत्व मराठीला लाभले नाही. सीमाभागातील मराठी माणूस भाषेच्या प्रेमासाठी सतत आंदोलन करतो आहे. अनेकांना हुतात्म्यं पत्करावावे लागले. तरीही त्यांना न्याय मिळत नाही. मराठीवर जीवापाड प्रेम करणारे हे सीमावासी खूप अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात येता येईना आणि कर्नाटक सरकार भाषिक त्रास द्यायचे बंद करेना अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे सीमाभागातील सुमारे चाळीस लाख मराठी भाषिक मराठीवरील प्रेमामुळे दु:खी आहेत. ते मराठीसाठी प्रत्येक गावात छोटी छोटी साहित्य संमेलने भरवताहेत. मराठी सणउत्सव साजरे करताहेत आणि महाराष्ट्रातील प्रवेशासाठी अहोरात्र झगडताहेत. महाराष्ट्रात भाषेच्या मुद्दयावरून राजकारण करणे चाललेलेच आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाकडे मराठीसाठी ठोस कार्यक्रम नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषा विभाग हे स्वतंत्र खाते सुरू करून भाषांतर्गत काम करणाऱ्या सर्व शासकीय संस्थाना एकत्र आणले. सूसुत्रतेसाठी हे चांगले पाऊल त्यांनी उचलले. त्यांच्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी सकारात्मक पावले उचलली गेली. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी समितीची नेमणूक केली. मराठीचे पुढील पंचवीस वर्षांसाठीचे धोरण ठरवण्यासाठी नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. शासकीय पातळीवर अशा काही चांगल्या गोष्टी अलीकडच्या काळात घडताहेत हे भाषेच्या दृष्टीने बरेच आशादायी आहे. 

मराठीसाठी युनिकोड प्रणाली 
संगणकावरील वापरही बऱ्यापैकी वाढला आहे. युनिकोडमधील अतिशय चांगले टंक आज उपलब्ध झालेले आहेत. या कामी महाराष्ट्र शासनानेही चांगली पावले उचलली आहेत. शासकीय कामकाजासाठी मराठीचा आणि मराठी युनीकोडचा वापर करण्यासंदर्भात अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. शासकीय पातळीवर अद्याप या अध्यादेशाचे म्हणावे तसे स्वागत झालेले दिसत नाही. परंतु युनीकोडच्या वापराचे अनेक चांगले परिणाम नजरेत येताच ही गोष्ट खोलपर्यंत झिरपणार आहे. युनीकोडच्या निर्मितीचे आणि प्रसाराचे श्रेय मायक्रासॉफ्ट या अमेरिकन कंपनीला जाते. जागतिक भाषांमधील मराठीचे स्थान ओळखून माक्रोसॉफ्टने मराठीसाठी युनिकोड प्रणाली अंमलात आणली. अतिशय चांगला फॉन्ट आणि विविध कळफलक तयार करून मोफत वितरीत केले. त्याचा परिणाम म्हणजे संगणकावर, सोशल मेडियांवर थेट मराठीतून संवाद करणे सोपे झाले. विकिपेडीया सारखी संकेतस्थळे मराठीतून ज्ञानसंचय, प्रसार करू लागली. आज शेकडो मराठी संकेतस्थळं निर्माण झालेली आहेत. महाराष्ट्र शासनही त्यामध्ये मागे नाही. शासनाने आपले संकेतस्थळ मराठी तयार करून मराठीतील शेकडो दुर्मिळ पुस्तकं, विश्‍वकोश, संज्ञा संकल्पना कोश संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत. ही भाषेच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. मराठीचा वैश्विक प्रवास त्यामुळे शक्‍य झालेला आहे. या बरोबरच गुगलने इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्यासाठी एक टूल विकसित केले आहे. संगणकक्षेत्रातील मोठ्या कंपन्यांची, मोबाईल कंपन्यांची मराठीसाठी सुरू केलेले हे काम म्हणजे अकरा कोटी मराठी भाषिकांची त्यांनी ग्राहक म्हणून घेतलेली दखल आहे. 

मराठीत अनेक चांगल्या घडामोडी
आपण आपली भाषा अशीच टिकवून ठेवली, वाढवली तर जगाला आपली स्वतंत्र दखल घ्यावीच लागणार आहे. ही उदाहरणे याचीच द्योतक आहेत. 
भाषेत आज अनेक चांगल्या घडामोडी घडताहेत. साहित्यक्षेत्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अनेक सहित्य संमेलने भरवली जात आहेत. संमेलनांबाबत मतमतांतरे असली तरी; आखिल भारतीय साहित्य संमेलनाला होणारी गर्दी, तेथील पुस्तक विक्री ही मराठी भाषेबद्दलची लोकांची आस्था आहे. पंढरपूरला दरवर्षी सुमारे वीसपंचवीस लाख वारकरी आषाढीएकादशीला "ग्यानबा-तुकाराम' असा जप करीत मराठीतील भाषिक आणि वाङ्‌मयीन दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या कवितेचाच सन्मान करीत आहे. ही वारीच आता मराठी संस्कृतीची ओळख झाली आहे. विविध विषयावरील किमान दोन हजार मराठी पुस्तके दरवर्षी प्रकाशित होत आहेत. जवळपास पाचशे दिवाळी अंक मराठीतून प्रकाशित होतात. कथा, कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, वैचारिक अशा सर्वच वाङ्‌मयप्रकारांमध्ये दखलपात्र लेखन होत आहे. मराठीचे शब्दसंग्रह लिहिले जाताहेत. केवळ बोलीभाषांतील शब्दसंग्रह प्रकाशित झाले आहेत. बोलीतील शब्दांचे अर्थविश्व धुंडाळणारे राजन गवस यांचे "कुळकथा शब्दांची' सारखे सदर दैनिक सकाळ मधून प्रसिद्ध झाले. त्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. आपले शब्द आपली सांस्कृतिक मालमत्ता असते, याचे भान या सदराने समस्त महाराष्ट्राला दिले. 

सर्वच क्षेत्रामध्ये मराठीचे सामर्थ्य 
जीवनातील सर्वच क्षेत्रामध्ये मराठीने आपले सामर्थ्य दाखवले आहे. क्रिकेटसारख्या भारतातील सर्वात लोकप्रिय परंतु परकीयांच्या खेळासाठी मराठीने स्वत:चा शब्दसंग्रह तयार केला आहे. या खेळाशी संबंधित प्रत्येक शब्द आज मराठी भाषेत तयार आहे. हे एक उदाहरण भाषा काळाला कशी सामोरी जाते यासाठी पुरेसे आहे. बोलीभाषांमधील शब्द वापरायला सुरुवात केल्यावर त्यांना भाषा स्वीकारते हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. भालचंद्र नेमाडे, आनंद यादव, राजन गवस, सदानंद देशमुख यांच्या लेखनातून आलेले प्रादेशिक शब्द सर्वदूर वापरले जाऊ लागले आहेत. दुरंतोसारखा बंगाली शब्द भारतीय रेल्वेने देशभर पोहोचवला हे आपण जाणतोच. मराठीतील चांभारचौकशी, धेडगुजरी, परिटघडी, बामणीकावा, घिसाडघाई यासारखे शब्द वेगवेगळ्या जाती व्यवसायातून आलेले आहेत. ते भाषेतून काढून टाकावेत की त्यांचे सामान्यिकरण करावे यासंदर्भाने चर्चा सुरू झाली आहे. भाषेतील शब्द सहजासहजी काढून टाकता येत नाहीत. ते वापरण्यावर मर्यादा घालून घेता येते परंतु भाषेत समाजमान्यताच महत्त्वाची असते. 

भाषेसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था 
भाषेसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था स्थापन झालेल्या आहेत. अनेक व्यक्ती आपल्या पद्धतीने मराठीसाठी झटताहेत. शासनाने अनेक परिभाषा कोश सिद्ध केले आहेत. वाचू आनंदेसारखा उपक्रम करणाऱ्या पुरंदरे, भाषा आणि जीवन चालवणारी मराठी अभ्यास परिषद, केल्याने भाषांतर सारखे नियतकालिक आणि साने गुरुजींच्या प्रेरणेने निघालेली आंतरभारती संस्था इतर भाषांमधील साहित्य मराठीत आणते आहे. कोणत्याही भाषेतील जीवनानुभव मराठीत रिचवला जातो हे ती संस्था बिंबवते आहे. साहित्य मंडळे अनेक उपक्रम करतात. ग्रंथ संपादन, चर्चासत्रे इत्यादी उपक्रम भाषेच्या, साहित्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. मराठीचा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करणारी विविध विद्यापीठेही मराठीसाठी काहीएक करीत आहेत, मराठीचा जाहिरातींमध्ये प्रभावी वापर करणाऱ्या जाहिरात संस्था, साहित्यिक, विचारवंत, समीक्षक, संपादक सारेच मराठीची सेवा आपल्यापद्धतीने करताहेत. यासंदर्भाने अनेक उपक्रमांची चर्चा करता येईल. परंतु येथे वेळेची मर्यादा महत्त्वाची आहे. 

माझ्या कोल्हापूरचं उदाहरण 
प्रत्येक गावची म्हणून एक भाषा असते. ती भाषाच आपला सर्व व्यवहार पूर्ण करीत असते. दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रमाण भाषेपेक्षा हीच भाषा कामी येते. प्रमाण भाषा ही व्यापक व्यवहारासाठीची सोय आहे. माझ्या कोल्हापूरचं उदाहरण द्यायचे झाले तर, भावा काय करायलईस, जिकलास भावा, शानं हू की!, गबस!, गंडीवलईस, आंबा पाडालईस, रस्सा चरचरीत हुदे, जिकल्यात जमा, खुळ्या टाळ्नयाचं, कावलय, सपलच की सगळं, आनि काय निवांत असे शेकडो शब्दच कोल्हापूरचा भाषिक व्यवहार पूर्ण करतात. प्रत्येक गावची अशी भाषाच आपल्या जगण्याचा भाग असते. तीच आपले जीवन अर्थवाही करीत असते. तिच्याशिवाय आपल्याला करमत नाही. त्यामुळे ही भाषा ऐकल्याशिवाय आपण आपल्या गावात असल्याचे जाणवत नाही. ती भाषा आपल्या मनावरची खून असते. तिला सहजासहजी मिटवता येत नाही. त्यामुळे या प्रत्येक गावच्या मराठीची दखल म्हणजे मराठी भाषेची दखल होय. या साऱ्या भाषा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत तरच मराठी टिकणार आहे. कुणी किती म्हटले तरी अकरा कोटी लोकांची भाषा सहजासहजी मरणार नाही. उलट आपण भाषेच्या अंगाने उपक्रमशील राहिलो तर ती अधिक सक्षम आणि सामर्थ्यशाली बनणार आहे. 

(लेखक शिवाजी विद्यापीठात मराठी विभागात प्राद्यापक आहेत) 

Web Title: Dr. Nanadkumar More article