बुद्धिमत्ता... ना आईची ना वडिलांची!

आपल्याला किंवा लहान मुलांना आईकडून बुद्धिमत्ता आणि वडिलांकडून फक्त मानसिक ताण-तणावच मिळतो, असे मध्यंतरी वाचनात आले.
Childrens Mental Stress
Childrens Mental Stresssakal

आपल्याला किंवा लहान मुलांना आईकडून बुद्धिमत्ता आणि वडिलांकडून फक्त मानसिक ताण-तणावच मिळतो, असे मध्यंतरी वाचनात आले. प्रथमदर्शी ते खरेही वाटले; परंतु अधिक माहिती घेतली असता त्यात सुसूत्रता नसल्याचे जाणवले. खरे तर बुद्धिमत्ता म्हणजे आई-वडिलांची जहागिरी नसते. ती व्यक्तिसापेक्ष आणि कार्यसापेक्ष असते.

‘खरं पायात चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं’ अशी एक मराठी म्हण प्रचलित आहे. हेच जर अजून सांख्यिकीय भाषेत सांगायचे झाले तर खऱ्यापेक्षा खोटी माहिती सहा पट वेगाने पसरते. हा माहितीचा पसरण्याचा वेग सर्वच क्षेत्रांत कमी-अधिक प्रमाणात सारखा आहे. राजकीय पटलावर तर तो शंभर पट असेल, असा अंदाज आहे.

साधारण २०१० पासून सोशल मीडियाचा उगम आणि प्रसार खूप वेगाने झाला अन् अशी माहिती पसरण्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला. जगातील सर्वच देशांमध्ये खोटी आणि खरी माहिती पसरण्याचा वेग २०१० पासून वाढला अन् त्याला अजून गती मिळाली ती कोविड संक्रमणादरम्यान. खऱ्या वैज्ञानिक माहितीपेक्षा खोट्या गोष्टीच या काळात खूप वेगाने पसरल्या.

हे आता पुन्हा तुमच्यासमोर मांडण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी जगभरातील मीडियामध्ये एक बातमी फिरत होती. ती म्हणजे, आपल्याला किंवा लहान मुलांना आईकडून बुद्धिमत्ता आणि वडिलांकडून फक्त मानसिक ताण-तणावच मिळतो. त्या बातमीत ब्रिटन आणि अमेरिकेतील विद्यापीठांतील संशोधनाचा उल्लेख केलेला होता आणि त्यावरून असा निष्कर्ष निघाला, की अशी माहिती पसरवली जात होती.

माझे लक्ष त्या बातमीकडे गेले तेव्हा मलाही प्रथमदर्शी ती खरी वाटली; परंतु त्याबाबत वाचत असताना जाणवले की काहीतरी वेगळे आहे... बातमीत जे काही सांगितले आहे त्यात अधिक सुसूत्रता नाही. वैद्यकशास्त्र क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना आणि डॉक्टरांना हे माहीत असते, की आपल्यामध्ये येणारे बरेचसे आजार आपल्या मागील पिढीकडून येतात. त्यामधील बहुतांश आजार आईकडून येतात. त्याबाबत खूप संशोधनही झाले आहे.

कदाचित अशाच प्रकारे बुद्धिमत्ताही आईकडूनच येत असेल, हे सहजच खरे वाटू शकते. त्यानंतर त्या बातमीच्या मुळाशी जायचे ठरवले तेव्हा समजले, की २०१६ मध्ये अमेरिकेतील काही ब्लॉगरनी आणि एक-दोन मासिकांनी त्यांच्या वेबसाईटवर अशा प्रकारची माहिती प्रकशित केली होती. अगदी २०१९ मध्ये अनेक प्रथितयश जागतिक नियतकालिकांनी आणि भारतातील वृत्तपत्रांनीही ती दिली होती आणि त्यांचे संदर्भही अपुरे होते.

साधारणतः ज्या ब्लॉगरनी अशी माहिती प्रकाशित केली होती त्यांनी १९९४ मधील एका संशोधनाचा संदर्भ दिला होता. अगदी मागील आठवड्यापर्यंत त्यावर काही बातम्या आणि फेसबुक व व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावर लेख फिरत होते. एका ब्लॉग पोस्टचा संदर्भ त्यांनी दिलाय, ज्यात १९७२ ते २०१२ पर्यंतचा अभ्यास आहे.

सहजच त्या अभ्यासांचे पुनरावलोकन केले असता असे दिसून आले, की त्यामध्ये कोणत्याही शास्त्रज्ञांच्या नावाचा संदर्भ नव्हता! पण त्या बाबतीत विज्ञान खरोखर काय म्हणते, हे शोधण्यासाठी आपल्याला ‘आयक्यू’ म्हणजेच बौद्धिक पातळीची आधी माहिती करून घ्यायला हवी. आज आपण ज्या ‘आयक्यू’चा नेहमी उल्लेख करतो तो व्यक्तिसापेक्ष, तसेच त्याच्या कार्यसापेक्ष असतो.

त्याला एखाद्या विषयात खूप रस असेल तर त्या विषयाबद्दल त्याचा ‘आयक्यू’ उच्च असतो, पण फक्त ‘आयक्यू’ चाचण्या स्पष्टपणे नैसर्गिक बुद्धिमत्ता किंवा त्या व्यक्तीची एखाद्या विषयात किंवा कामात असणारी क्षमता ठरवत नाही. कारण सरावाने गुण सुधारतात हा एक जगन्मान्य सिद्धांत आहे आणि आपल्या संपूर्ण जनुकांचा विचार केला तर उच्च बुद्ध्यांकाशी (आयक्यू) निगडित असणारे केवळ एक-दोन टक्के बुद्धिमत्तेसाठी असतात. आता या स्मार्ट जनुकांवरील जी माहिती असते ती खूप कमी असते. त्यामुळे आपल्या आईकडूनच ही जनुके आपल्याला मिळतात आणि त्यामुळेच बुद्धिमत्ता वारशाने मिळते, असा कोणी दावा कसा करू शकतो?

याच युक्तिवादाचा संपूर्ण मुद्दा असा आहे, की मुलांची बहुतेक बुद्धिमत्ता एक्स (X) गुणसूत्रांवर अवलंबून असते. त्याउलट अनेक शास्त्रीय अभ्यासांत असे दिसून आले आहे की, लिंग नसलेल्या गुणसूत्रांपेक्षा, म्हणजेच (वाय) Y गुणसूत्रापेक्षा एक्स गुणसूत्राकडे मानसिक अपंगत्वाशी संबंधित अधिक जनुके आढळून आली. त्याउलट गरोदरपणात आईची निरोगी जीवनशैली, संतुलित पोषण आणि पालकांची सखोल व जबाबदार काळजी हे त्याहूनही महत्त्वाचे घटक आहेत.

आपल्याला माहीत आहे, की स्त्रियांमध्ये दोन एक्स गुणसूत्रे असतात. पुरुषांकडे एक एक्स गुणसूत्र आणि एक वाय गुणसूत्र असते, म्हणून आपल्याला प्रत्यक्षात फक्त एक कार्यात्मक एक्स गुणसूत्र आवश्यक आहे. म्हणूनच पुरुषांना एक्स गुणसूत्रामधील उत्परिवर्तनांशी संबंधित ऑटिझम किंवा रंग-अंधत्वासारखे काही विकार होण्याची शक्यता असते.

मातृशिक्षण, वय, कौटुंबिक गरिबी आणि जन्मक्रमासारख्या घटकांसह इतर घटकांचा मुलांच्या बुद्धिमत्तेवर सर्वात मोठा स्वतंत्र प्रभाव असतो. त्याच जोडीला हेच घटक जर वडिलांच्या बाजूने असतील तर तेवढेच परिणामकारक असतात.

आईकडील एक्स गुणसूत्रामधून जर बुद्धिमत्ता येत असेल तर तिच्याकडे असणारी जी दोन एक्स गुणसूत्रे असतात त्यामधील एक वडिलांकडून आलेले असते. मग त्यामधील कोणत्या एक्स गुणसूत्रामधून बुद्धिमत्ता येते, हे स्पष्ट होत नाही. त्यासाठी वडिलांकडून येणाऱ्या एक्स किंवा वायपैकी दोन्ही गुणसूत्रांचाही तेवढाच अभ्यास व्हायला हवा आणि तो माहितीसह जगासमोर यायला हवा. ज्या संशोधनाचा संदर्भ अशा बातम्यांमध्ये येतो त्यात आणि अभ्यासात पितृ बुद्धिमत्ता एक घटक म्हणून मोजली गेली नाही, कारण ती माहिती उपलब्ध नव्हती, असा दावा केला जातो.

आईकडे दोन एक्स गुणसूत्रे असतात; परंतु ती दोन्ही एकसारखी नसतात आणि अर्थातच, त्यांना त्यांच्या वडिलांकडून त्यापैकी एक मिळालेला असतो. आई साधारण आपल्या मुलांना फक्त एकच एक्स गुणसूत्र देते (दोन एक्स गुणसूत्रांनी थोडेसे आनुवंशिक अदलाबदल केल्यानंतर) आणि त्या मुलांना त्यांच्या वडिलांकडून दुसरे लिंग गुणसूत्र (एक्स किंवा वाय) मिळते.

एक्सवर जे काही आहे ते आईकडून मुलाकडे किंवा वडिलांकडून (सामान्यतः) मुलीकडे जाऊ शकते; परंतु आईकडे असलेली दोन एक्स गुणसूत्रे एकसारखी नसतात आणि विशिष्ट प्रकारचा वारसा मिळण्याची शक्यता आपोआप दुप्पट होत नाही. हाच गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरवला गेला, की आईकडे दोन एक्स गुणसूत्रे असतात आणि ती दुप्पट बुद्धिमत्ता पुढच्या पिढीला पुरवतात.

खरे तर बुद्धिमत्ता ही आई किंवा वडिलांची जहागिरी नसते. ती श्रीमंतांचीही नसते. जसे वर सांगितले तशी बुद्धिमत्ता ही व्यक्तिसापेक्ष आणि कार्यसापेक्ष असते. आई-वडिलांच्या जाती-धर्मावरही बुद्धिमत्ता ठरत नाही हे जगजाहीर आहे. तथापि, बुद्धिमत्ता ही केवळ आनुवंशिकतेची बाब नाही, आजूबाजूच्या पर्यावरणाचीही मोठी भूमिका त्यामध्ये आहे.

मुलांच्या पहिल्या पाच वर्षांत हे विशेषतः खरे आहे जेव्हा आपला मेंदू आपल्या परिस्थितीनुसार विकसित होत असतो. पारंपरिकरीत्या मुलांच्या घरातील वातावरणावर आईचा अधिक प्रभाव असतो. आता हे थोड्या फार प्रमाणात नक्कीच बदलत आहे. त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेची पातळी कोठून येते हे ठरवणे महाकठीण आहे. असे होऊ शकते, की आई किंवा वडील त्यामध्ये मोठी भूमिका बजावतात; पण आता आपल्याला तसेच विज्ञानालाही काहीच माहीत नाही.

आजच्या दिवशी आपण एवढेच म्हणू शकतो, की योग्य पोषण आणि पोषक वातावरण प्रत्येकाच्या मनासाठी अन् बुद्धिमतेच्या विकासासाठी आश्चर्यकारक कार्य करू शकते, आई आणि वडिलांची जनुके काहीही असली तरीही!

thoratnd@gmail.com

(लेखक लंडनमध्ये विज्ञान संशोधक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com